esakal | संघर्षाची ‘सीमा’ (संदीप काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

sandip kale

संघर्षाची ‘सीमा’ (संदीप काळे)

sakal_logo
By
संदीप काळे Sandip98868@gmail.com

मी सीमाताईच्या पाया पडलो आणि तिला कडकडून मिठी मारली. वाटलं, तिच्यातली एक टक्का जरी ऊर्जा आपल्याला मिळाली तरी आपलं आयुष्य उजळून जाईल...

सांगलीला मित्राच्या साखरपुड्याला गेलो होतो. वैभव खरात हा माझा सांगलीचा मित्र. औरंगाबादला विद्यापीठात वैभव आणि मी एकाच रूममध्ये राहायचो. तो मला चार वर्षं सीनिअर होता, तेव्हापासूनची आमची मैत्री. वैभवला आई-वडील नाहीत. त्याचं पालन-पोषण सीमा नावाच्या त्याच्या बहिणीनंच केलं. विद्यापीठात वर्षातून किमान
दोन-तीन वेळा तरी त्याची बहीण गावाकडून रेशनपाणी घेऊन यायची. अनेक वेळा तिच्या हातूनच आम्ही राखी बांधून घेतली. साखरपुड्याच्या कार्यक्रमात ओळखीचं सगळं घर दिसत होतं; पण सीमाताई दिसत नव्हती. मी वैभवला विचारलं : ‘‘सीमाताई कुठं आहे?’’
तर वैभवसह कुटुंबातले आसपासचे सगळे सदस्य आश्‍चर्यानं माझ्याकडं पाहू लागले. मला कळेचना की नेमकं झालंय काय? मला राहवलं नाही. मी वैभवला पुन्हा तोच प्रश्न विचारला.
‘‘सांगतो तुला नंतर,’’ असं म्हणून वैभव आपल्या कामात गुंतला.
सकाळी दहाचा कार्यक्रम. सगळेजण आले; पण सीमाताईचा पत्ता नव्हता. दोन वाजले. आलेले सगळे पाहुणे आपल्या घरी जायला निघाले. वैभवच्या गावाकडून काही मंडळी आली होती. त्यातल्या एका आजोबांनी मला माझी खुशाली विचारली. पावसानं आम्हाला कसं साफ हरवून टाकलं...याची कहाणी ते दुःखी स्वरात सांगू लागले. मी आजोबांनाही विचारलं : ‘‘वैभवची बहीण सीमा दिसत नाही.’’

गप्पांमध्ये रंगलेल्या आजोबांच्या कपाळाला एकदम आठ्या पडल्या. ते शांत झाले आणि हळू आवाजात माझ्या कानाशी येऊन म्हणाले : ‘‘त्या बाईला रोग झालाय म्हनं, म्हनुनशिनी तिला समद्यांपासून दूर ठेवलंया म्हनत्यात. काय खरं देवालाच ठावं!’’
आता मात्र मला सकाळपासूनचं सगळं चित्र डोळ्यासमोर येऊ लागलं.
‘कुठलाही आजार झाला तरी माणसाला माणसापासून तोडायचं असतं का,’ असा प्रश्‍न माझ्या मनात आला.
वैभव येणाऱ्या पाहुण्यांमध्ये रमला होता; पण माझं मन काही रमेना. बहीण म्हणून जिनं हातात राखी बांधली तिच्यावर नेमकं संकट आलंय तरी कुठलं आणि ती आता राहते तरी कुठल्या प्रकारच्या हालात याचा तपशील घ्यायलाच हवा असं मला आतला आवाज सांगू लागला.
मी बाहेर आलो. सांगलीची मला फारशी माहिती नव्हती. माझ्या एका जुन्या पत्रकारमित्राला मी बोलावून घेतलं. त्याच्या कानावर सगळा प्रकार घालून, आपल्याला सीमाताईचा शोध घ्यायचा आहे, असं मी त्याला सांगितलं. त्यानं त्याची सूत्र हलवली आणि मी अनेक
तर्क-वितर्कांमध्ये गुंतलो. तासाभरानंतरची फोनाफोनी झाल्यावर माझ्या सहकाऱ्याला थोडासा धागा सापडला. ज्या घरी सीमाताई आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राहायची त्या घरी आम्ही पोचलो. दार वाजवलं. आतमधून एक आजी बाहेर आल्या. सीमाताईबद्दल त्यांना विचारलं तर आजींनी सुरवातच ‘त्या रोगील्या बाईचे तुम्ही कोण?’ या प्रश्नानं केली.
मी दुसरं काहीही न बोलता आजींना विचारलं : ‘‘काय रोग झालाय तिला?’’
आजी जरा तिरकसच वाटल्या.
‘‘तुम्ही तिचे कोण ते सांगा आधी...’’
मी म्हणालो : ‘‘मी तिचा भाऊ आणि हा माझा मित्र.’’
‘‘तिनं इथली रूम सोडून तीन महिने झाले. आता ती आमच्याकडं राहात नाही,’’ असं म्हणून आजी दार लावून घेऊ लागल्या.
तेवढ्यात अजून एक व्यक्ती बाहेर आली. त्या आजींचा तो मुलगा असावा कदाचित. तो म्हणाला : ‘‘त्या सरकारी दवाखान्याच्या जवळ राहतात. त्यांचा मोबाईल नंबरही माझ्याकडं आहे.’’
हे ऐकून जरासा धीर आला. मी त्या नंबरवर फोन केला. तिकडून सीमाताईच बोलत होती. मी आवाज ओळखला. सीमाताईनंही मला ओळखलं. मी तिला तिचा पत्ता
विचारत होतो; पण ती सांगू इच्छित नव्हती. तिला वैभवची शपथ घातल्यावर तिनं पत्ता सांगितला. घरं बदलत बदलत तिनं शहराच्या कडेला असलेल्या एका वस्तीत संसार थाटला होता. घरी गेलो, छोटीशी दहा बाय दहाची खोली आणि तिथं सगळं सामान एकाच ठिकाणी ठेवलं होतं. एका मोडक्या खुर्चीत एक माणूस बसला होता. सीमाताईची मुलगी मोठं इंग्लिश पुस्तक घेऊन काहीतरी वाचत होती. घरात जेवढी भांडीकुंडी आणि पसारा होता त्यापेक्षा दुपटीनं पुस्तकं होती. सीमाताईनं आम्हा दोघांनाही बसायला चटई टाकली होती. त्या तिघांमध्ये आम्ही दोघं वाढल्यानं खोलीची सगळी जागा व्यापून गेली. मी तिला खुशाली विचारली. प्राथमिक बोलणं झालं होतं. पुढं काय बोलावं हे मला सुचत नव्हतं; पण सीमाताई आपल्याच घरातली असल्यानं भीती मात्र वाटत नव्हती. पाहतो तर काय, सीमाताईनं राखीचं ताट तयार करून आणलं होतं. राखीचं ताट बघून तिला काहीतरी झालंय हे मी विसरूनही गेलो. तिच्याही चेहऱ्यावरची उदासी दूर झाली होती. ओवाळून झालं. काय घेताय...चहा-कॉफी, असं म्हणत सीमाताईनं बोलायला सुरवात केली.
मी म्हणालो : ‘‘सीताच्या साखरपुड्याला का आली नाहीस?’’
सीमाताई हसत म्हणाली : ‘‘आता तुम्ही सगळे भाऊ मोठे झालात रे... आता मला बोलवत नाही.’’

सहज हसण्यावारी घेऊन तिनं एका सेकंदात तो विषय तिथंच तोडला. मी सीमाताईला म्हणालो : ‘‘ताई, एक विचारू का? काय आजार झालाय तुला? कुठलाही आजार झाला तरी असं आपल्या सगळ्या माणसांपासून दूर जायचं का? आणि दाजी कुठं आहेत?’’
सीमाताई हसली आणि शांतपणे माझ्याशी बोलू लागली.
तिनं ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या ऐकून क्षणभर माझा विश्‍वासही बसत नव्हता. वर्षभराच्या काळात सीमाताईनं जे भोगलं होतं ते भोग कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत एवढे ते गंभीर होते. तिची ‘आपबीती’ अतिशय दुःखदायक होती.
सीमाताईला एड्स झाला होता तिच्या नवऱ्याकडून...!

खंगून खंगून तो वर्षभरापूर्वीच मरण पावला आणि आता सीमाताईही या आजाराला धैर्यानं तोंड देत आहे. सीमाताईच्या नवऱ्याच्या मृत्यूपर्यंत घरच्यांना या आजाराबाबत कल्पना नव्हतं. सीमाताई ही एड्स‌ची रुग्ण आहे हे नवऱ्याच्या पश्‍चात हळूहळू सगळ्यांना कळलं. सीमाताईच्या जमातीनं तिच्याशी नातं तोडलं. एका खासगी संस्थेत सीमाताईचा नवरा क्‍लार्क होता. त्या संस्थेला अनुदानही नव्हतं. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर तिला फुटकी कवडीही मिळाली नाही. मुलं शिकत होती. घरच्यांचा आधार नाही आणि माहेरच्यांचाही आधार नाही. ज्या ज्या घरी ती भाडेकरू म्हणून राहायची त्या त्या घरमालकाला कुठून तरी तिच्या आजारपणाविषयी कळायचं आणि घरमालक पुढच्या महिन्यापासून खोली सोडायला लावायचा. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या ओळखीच्या सगळ्या दुनियेशी सीमाताईनं संपर्क तोडला होता.
खूप वर्षांनंतर ती आपल्या जवळच्या माणसाकडं बोलून मोकळी झाली होती. सीमाताईचा मुलगा आता बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. सीमाताई ज्या कॉलेजात साफसफाईचं काम करते त्याच कॉलेजमध्ये वेदिका ही तिची मुलगी इंजिनिअरिंगला आहे. ओळखपाळख आणि मदत याशिवाय सीमाताईनं आपलं एक वेगळं जग निर्माण केलं. दोन्ही मुलं नेहमी फर्स्ट क्‍लास येणारी. कुठला कोचिंग क्‍लास नाही आणि विकतची पुस्तकदेखील नाहीत. कॉलेजचं काम आणि तीन घरी धुणी-भांडी करून सीमाताई तिच्यासह चार माणसांना पोसते. सीमाताईसोबत राहणारा तो माणूस म्हणजे सीमाताईचा दुसरा नवरा. सीमाताईनं त्या माणसाला आपलं मानून त्याला आपल्या घरात आणि मनात जागा दिली होती. गावात सीमाताई आणि संतोष यांचं घर शेजारी शेजारी होतं. ते दोघं सोबतच लहानाचे मोठे झाले. वयात आल्यावर दोघांनाही एकमेकांची ओढ वाटू लागली. दोघांच्या घरी हे कळलं तेव्हा बरीच आदळआपट झाली. कारण जात, प्रतिष्ठा, सन्मान, पाटीलकी या सगळ्या चौकटी आड आल्या होत्या. दोघं एकमेकांपासून दूर झाले. तरी दोघांचं प्रेम कायम होतं. एका अपघातात संतोषची पत्नी मरण पावली. सीमाताईच्या नवऱ्याच्या मृत्यूच्या चार वर्षं आधी ही घटना घडली होती. संतोष हा सीमाच्या संपर्कात होताच; पण जेव्हा सीमाला सगळ्या दुनियेनं सोडलं तेव्हा तो तिचा पाठिराखा बनला.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्या दोघांचं एकमेकांवर जसं प्रेम होतं तसंच ते आजही आहे. संतोषला अर्धांगवायू झालेला आहे. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सतत हलताना दिसत होता. दिवसभर एका खुर्चीवर बसायचं आणि संध्याकाळी खाली अंथरुणावर झोपायचं एवढाच त्याचा दिनक्रम; पण सीमाताईचा तो खंबीर पाठिराखा.
आम्ही घरी असतानाच सीमाताईचा मुलगा रमण आला. सीमाताईनं ओळख करून दिली, ‘बघ, तुझा मामा तुला भेटायला आलाय...’
तो आला आणि माझ्या पाया पडला. माझ्याशी बोलण्यात रमला. कदाचित रमणला आपल्या कुणी नातेवाइकांनं कधी जवळ घेतलं नव्हतं. ते चौघं खूप आनंदात जगत होते. दुनियादारीशिवाय.
कितीही मोठं संकट आलं आणि आपण उद्या कधीही मरू याची कल्पना असूनसुद्धा संतोष आणि सीमा आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं घालवत असताना दिसत होते.
वैभवचा तिकडून फोन आला : ‘‘अरे, कुठं आहेस?’’
मी म्हणालो :‘‘सीमाताईकडं.’’
वैभव काही क्षण गप्प झाला. परत म्हणाला :‘‘ चेष्टा करतोस का रे?’’ मी म्हणालो : ‘‘नाही. बोल सीमाताईशी.’’
मी सीमाताईकडं फोन दिला. ती त्याला म्हणाली : ‘‘अरे वैभव, तो आलाय माझ्याकडं. तू कसा आहेस...?’’ मग मात्र वैभवलाही भावना अनावर झाल्या. रडव्या आवाजातच तो बोलू लागला. त्यानं सीमाताईचा पत्ता माझ्याकडून घेतला आणि त्यानं फोन ठेवला. अर्ध्या तासानंतर वैभव सगळ्या कुटुंबाला घेऊन सीमाताईच्या घरी दाखल झाला. त्या दोन्ही कुटुंबांचा तो तब्बल १० वर्षांनंतरच्या भेटीचा क्षण होता. अवर्णनीय. कर्तृत्ववान आणि धाडसी माणसं कुठल्याही आजाराला आणि संकटाला कधी घाबरत नाहीत. ती घाबरतात ती आपल्या नातेवाइकांना. ‘क्‍या कहेंगे लोग’ ही टॅगलाईन त्यांच्या अवतीभवती फिरत असते!

‘नवऱ्याचा आजार, स्वतःचा आजार सीमाताईनं आम्हाला सांगितला नाही...’, ‘शिवाय कनिष्ठ जातीचा पुरुष तिनं तिच्या घरात आणून ठेवला...’ अशा कितीतरी घटनांसाठी सीमाताईला जबाबदार ठरवत तिच्या घरच्यांनी तिला वाळीत टाकलं होतं.
घरात सगळी माणसं मावत नव्हती म्हणून आम्ही सगळेजण बाहेर बसलो होतो. आम्ही रस्त्यावर होतो आणि सीमाताई व तिचं कुटुंब घरात. आम्ही रस्त्यावर असणारी सगळी माणसं प्रतिष्ठेचा, जातीचा, अहंपणाचा, पदाचा, परंपरा इत्यादींचा बडेजाव मिरवत जगणं क्लिष्ट करून जगणारी माणसं होतो. आतमध्ये आमच्यासाठी काहीतरी पाहुणचाराच्या बेतात असणारी सीमाताई आणि संतोष ही दोन माणसं सर्वात आनंदी माणसं होती. त्यांची टॅगलाईन एकच होती : ‘प्रत्येक क्षण सुखाचा, आनंदाचा करायचा. आपलं जगणं सुखाचं करायचं, आपल्या मुलांसाठी जगायचं. कुठलीही खोटी प्रतिष्ठा नाही आणि अहंपणाचा कुठलाही आव नाही.’

‘आम्ही निघतो’ असा मी सीमाताईला आत निरोप पाठवला. कुंकवाचं ताट घेऊन आलेली सीमाताई वैभवच्या बायकोला कुंकू लावू लागली. वैभवच्या बायकोच्या चेहऱ्यावरची नाखुशी लपत नव्हती. मी सीमाताईच्या पाया पडलो आणि तिला कडकडून मिठी मारली. वाटलं, तिच्यातली एक टक्का जरी ऊर्जा आपल्याला मिळाली तरी आपलं आयुष्य उजळून जाईल...
बाकी, वैभवसह सगळेच तिच्या जवळ जायला घाबरत होते. ती वैभवच्या जवळ आली आणि म्हणाली : ‘‘तू आता पुन्हा कधी येणार मला भेटायला?’’
तो आपल्या बायकोकडं बघत म्हणाला : ‘‘येतो लवकरच.’’
मी खिशात हात घातला आणि जे काही पैसे आहेत ते तिला द्यावेत असं फार वाटलं; पण तिला काही द्यायला आपण फार लहान आहोत, असंही वाटून गेलं. या भेटीत तिला काही पैसे द्यावेत याची मला हिंमतच झाली नाही. आपण दुबळ्या आहोत म्हणूनच हा आपल्याला पैसे देतोय, असं तिला वाटेल ही भीती माझ्या मनात होती. सीमाताईनं विश्‍वासानं मला सगळं सांगितलं आणि मी ते आज अनेक ‘सीमाताईं’पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. आज एकीकडं आजारानं गांजलेल्या आणि दुसरीकडं समाजानं पिचवलेल्या अनेक ‘सीमाताई’ समाजाच्या वाईट प्रथांमुळे खितपत पडल्या आहेत.
सीमाताईचा आजार तर दुर्धर आहेच; पण समाजव्यवस्थेनंही तो असाध्य करून ठेवला आहे.
एक प्रसंग आठवतो...मेडिकल कॉलेजमध्ये एडस्‌चा एक रुग्ण मरण पावला; तर एमबीबीएसच्या मुलांनीही अंत्ययात्रेला यायला नकार दिला होता. हे सारं मन विषण्ण करणारं आहे. समाजानं किती ‘सीमां’ना असं पिचत ठेवलं आहे...याला कुठली सीमाही नाही नि परिसीमाही. जिथं रक्ताचाच भाऊ परका होतो तिथं समाज तर लांबच राहिला...सीमाताईनं बांधलेली राखी मनगटावर घट्ट बांधली गेली होती. मनगटाला बिलगली होती. जणू तिलाही मायेची ऊब हवी असावी, कुठल्याही ओवाळणीपेक्षा...

loading image
go to top