दोष कुणाचा...? (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com
रविवार, 8 सप्टेंबर 2019

आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही...

आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही...

मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी वास्तू असल्यानं पायऱ्या चढूनच वर जावं लागतं आणि आमचं ऑफिस सर्वात शेवटच्या मजल्यावर. ऑफिसच्या खालच्या बाजूला बहुतकरून वकिलांची छोटी छोटी ऑफिसेस आहेत. एक पंखा, एक टेबल, एक कॉम्प्युटर एवढं सगळं अगदी पाच बाय पाचच्या खोलीत सुरू असतं. एक वकील आणि एक पक्षकार असे दोघं जरी त्या खोलीत बसले तरी ती खोली ‘भरून’ गेल्यासारखी वाटते. एवढ्या कोंदट ठिकाणी एवढ्या मोठ्या डिग्र्या असलेली ही माणसं दिवस कसा काढत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. जाता-येताना वकिलांचं एक वाक्‍य नेहमी कानावर पडतं : ‘काळजी करू नका, निकाल आपल्या मनासारखा लागेल.’ वकिलांचं हे वाक्‍य ऐकून समोर बसलेल्या पिचल्या-गांजलेल्या व्यक्तीला, न्यायालयीन लढाई जिंकल्याचा आनंद - थोडा वेळ का होईना - नक्की मिळत असेल. म्हणजे किती हा आत्मविश्वास? आणि त्याच आत्मविश्वासाच्या आधारे दर तारखेची ‘फी’ वकिलांसाठी नाही तर प्रत्येक तारखेला लागणाऱ्या कागदपत्रांसाठीच घेतली जाते. वकील बिचारे स्वत:साठी कधी ‘फी’ मागतच नाहीत काय, असाही प्रश्न ऑफिसच्या पायऱ्या चढताना आणि उतरताना मला नेहमी पडायचा. कोर्टाची पायरी चढताना जसे वादी-प्रतिवादींचे हाल होतात, त्यापेक्षाही जास्त हाल बिचाऱ्या वकिलांचेही पाहायला मिळतात. ‘उकडणाऱ्या’ चर्चगेटच्या भागात काळा कोट घातल्यावर त्यांना आणखी किती त्रास होत असेल हे सांगायला नकोच. एवढा त्रास सहन करूनही त्यांना नाना प्रकारची बोलणीही खावी लागतात.

एकेक करत मी ऑफिसच्या पायऱ्या वर चढत जात होतो. पहिल्या मजल्यावर एका पायरीवर दोन लहान मुलं - एक जेमतेम सात वर्षांचा मुलगा; तर दुसरी आठ वर्षांची मुलगी असेल - बसून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून रडत होती. खालच्या बाजूनं एक महिला खिडकीतून बाहेर बघत होती आणि वरच्या बाजूला एक माणूस मोबाईलवर खेळत होता. मुलांचं रडत रडत सुरू असलेलं संभाषण मी ऐकत होतो. मुलानं त्या मुलीला विचारलं : ‘‘ताई, आता परत मला कधी भेटशील?’’
मुलगी म्हणाली : ‘‘बाबा घेऊन आले की भेटेन.’’
मुलगा परत म्हणाला : ‘‘ ‘तुला भेटायला मी तुझ्या शाळेत येईन,’ असं तू मागच्या वेळीही म्हणाली होतीस; पण तू आली नाहीस. सगळ्यांच्या घरचे भेटायला येतात; पण आपल्या घरचं मला कुणीही भेटायला येत नाही. ‘मी राखीपौर्णिमेला येईन,’ असंही तू म्हणाली होतीस; पण तेव्हाही आली नाहीस.’’
लहान मुलगा डोळे पुसत आपल्या बहिणीला नाना प्रश्न विचारत होता आणि ती मुलगीसुद्धा त्या मुलाला कठोरपणे उत्तरं देत होती. मी थोडासा पुढं झालो आणि त्यांना विचारलं : ‘‘काय झालं? इथं का रडत आहात? कोण आहात तुम्ही?’’
मुलीनं भीत भीतच उत्तर दिलं : ‘‘हा माझा भाऊ आहे. आम्ही दोघं बहीण-भाऊ आहोत. आम्ही एकमेकांना भेटतोय, बोलतोय.’’
मी मध्येच विचारलं :‘‘तुमचे आई-वडील कुठं आहेत?’’

दोघांनीही आपल्या आई-बाबांकडं बोट दाखवलं. खाली खिडकीतून बाहेर बघणारी ती महिला म्हणजे त्या मुलांची आई आणि वर मोबाईलवर खेळत बसलेली ती व्यक्ती म्हणजे त्या मुलांचे वडील होते. मी जरा मोठ्या आवाजात त्या मुलांना म्हणालो : ‘‘माझ्या ऑफिसमध्ये चला. तुमच्या आई-वडिलांनाही सोबत घ्या. तिकडं पाणी प्या.’’
शेजारच्या छोट्याशा केबिनमध्ये बसलेले ॲडव्होकेट जाधव
माझा आवाज ऐकून बाहेर आले आणि म्हणाले : ‘‘धन्यवाद...पण ते इथंच बोलतील तुमच्याशी. त्यांना वर नेता येणार नाही.’’
मी म्हणालो : ‘‘ठीक आहे.’’
या मुलांच्या आई-वडिलांचं भांडण झालेलं असून त्या भांडणातून गुंतागुंत होत गेलेली आहे, असं जाधव यांनी मला ओझरतं सांगितलं. जाधव आत गेले. एकूण प्रकरण काय आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मी वर तिसऱ्या मजल्यावर ऑफिसमध्ये जाऊन बसलो. वर्तमानपत्रांची फाईल हातात घेतली आणि वर्तमानपत्रं चाळायला लागलो; पण त्या वाचण्यात माझं लक्ष लागत नव्हतं. त्या दोन मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. कोर्ट जवळ असल्यानं अशी कितीतरी प्रकरणं रोज पाहायला मिळतात; पण आज पाहिलेल्या प्रकरणामुळे माझं मन खरंच खूप हेलावून गेलं होतं. काहीतरी खूप वाईट झालंय अशा भावनेनं मन अगदी निराश होऊन गेलं. टीव्हीचा रिमोट हातात घेतला आणि टीव्ही लावला, त्यातही मन लागेना. जागेवरून उठलो आणि परत खाली यायला लागलो तर ती मुलं अजून तिथंच बसली होती. जाधव वकिलांचा दरवाजा ठोठावून आत गेलो. वकीलसाहेब काहीतरी लिहीत बसले होते. ते रोजच्या ओळखीतले असल्यानं मला ‘बोला’ म्हणत त्यांनी कान माझ्याकडं आणि नजर कागदाकडं ठेवत आपलं लिखाणाचं काम सुरूच ठेवलं. मी म्हणालो : ‘‘वकीलसाहेब, ही मुलं किती लहान आहेत हो...खूप रडत आहेत. मला त्यांचं रडणं पाहवत नाही.’’
जाधव म्हणाले :‘‘अहो, हे काय एका दिवसाचं आहे का? ते नेहमीचंच झालंय. आम्हाला त्याची सवय झालीय. गेल्या १५ वर्षांच्या प्रॅक्‍टिसमध्ये, अशी किमान १५ तरी प्रकरणं वर्षाकाठी येत असतील. आता पाहा, किती मोठा आकडा आहे हा!’’
जाधव हे हाडाचे वकील वाटत होते. त्यांच्याजवळ मोठमोठ्या चार डिग्रीज् होत्या; पण ‘इमोशन्स’ नावाचा काही प्रकार दिसत नव्हता. मी त्यांच्यासमोर वर्तमानपत्र ठेवत म्हणालो : ‘‘ही बातमी वाचली का आज? दोन-चार दिवस फिरत होतो या बातमीसाठी. खूप धक्कादायक प्रकार आहे हा.’’

जाधव यांनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि वर्तमानपत्र हातात घेतलं. म्हणाले :‘‘मग! सकाळीचं वाचली मी. अहो, अशी खूप प्रकरणं मला माहीत आहेत. तुम्ही मारा ना कधीतरी चक्कर माझ्याकडं.’’ जाधव यांना मला थोडंसं खुलवायचं होतं. त्यात मी यशस्वी झालो होतो. ते अनेक विषयांसंदर्भात माझ्याशी बोलू लागले आणि मी ऐकू लागलो.
मी मध्येच म्हणालो : ‘‘बाहेर रडणाऱ्या त्या मुलांचं प्रकरण काय आहे ते मला सांगा ना प्लीज.’’
ते दीर्घ श्वास घेत म्हणाले :‘‘अजून प्रकरण कोर्टात सुरू आहे हो... काय सांगावं? शहाणी माणसं टोकाची भूमिका घेतात आणि त्यांच्यामुळे अशा लहान मुलांना खूप त्रास होतो.’’
हो-नाही म्हणत जाधव यांनी मला त्या लहान मुलांची सगळी कहाणी सांगितली. त्या कहाणीनंतर माझ्या लक्षात आलं, की
शिकली-सवरलेली माणसं सगळ्या बाजूंनी किती अपयशी ठरतात. मग अशा प्रकरणात दोष कुणाचा तरी असतो आणि शिक्षा मात्र अन्य कुणाला तरी भोगावी लागते.

अकोल्याच्या संगीता जाधव यांचा बेळगावच्या सचिन पाटील यांच्याशी विवाह झाला. दोघंही रत्नागिरीला कामाला होते. सचिन ज्युनिअर कॉलेजात प्राध्यापक आणि संगीता तिथंच एका खासगी शाळेत शिक्षका होत्या. दोघंही तिथं राहायला शेजारी शेजारी. त्यातून त्यांची मैत्री झाली आणि दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. तीन वर्षं संसार सुखानं झाला, मग नंतर भांडण-तंटे, वादावादी वाढत गेली. ही वादावादी कोर्टाच्या दारात कधी येऊन पोचली हे कळलंच नाही. पोलिस, कोर्ट-कचेऱ्या, ‘मै बडा-तू बडा,’ ‘माझंच खरं’ यांत खरं कोण आहे याचा निकाल अनेक वर्षांनंतरही कोर्टानं अजून दिलेला नाही. या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची दोन मुलंही विभक्त होणार होती. एकमेकांचा लळा असलेली ही भावंडं...पण मुलगा आईसोबत आणि मुलगी वडिलांसोबत गेली. दर तारखेच्या वेळी ही मुलं एकमेकांना अशीच भेटतात आणि त्यांना अश्रू अनावर होतात, ती खूप रडतात, अशी माहिती जाधव यांनी मला दिली.

ती मुलं रडत असताना जाधव, ती मुलं आणि त्यांचे आई-वडील या तिघांकडं मी पाहत होतो. ‘काही देणं-घेणं नाही’ या भूमिकेत आई-वडील होते. आपली मुलं रडतात, त्यांना एकमेकांचा सहवास हवा आहे, त्यांना सोबत ठेवलं पाहिजे, त्यांना दया दाखवली पाहिजे अशी कुठलीही माणुसकीची भूमिका आई-वडिलांची दिसत नव्हती. जाधव हे न्यायाच्या भूमिकेत होते. ‘ते भांडतात आणि मी त्यांची केस लढवतो. आता जे काही असेल ते न्यायाधीशांच्या हाती आहे,’ अशी भूमिका जाधव यांची होती. मी दोन्ही मुलांच्या शेजारी जाऊन बसलो.
त्यांना म्हणालो : ‘‘तुम्हाला भूक लागली आहे का?’’
मुलगा शांत होता. मुलगी बोलत होती. ती म्हणाली : ‘‘नाही, आम्ही जेवलोय.’’
मी त्यांच्याजवळ जाऊन बसलोय हे पाहिल्यावर त्यांचे आई-वडील येऊन ‘तुम्ही कोण?’ असं म्हणून मला हटकतील असं मला अपेक्षित होतं; पण तसं काहीही घडलं नाही.
खालच्या बाजूला एक ज्यूस सेंटरवाला होता. मी खाली गेलो आणि ज्यूसचे दोन ग्लास भरून दोन्ही मुलांसमोर ठेवले. दोघांनीही काही क्षणांतच ते ग्लास रिकामे केले. मी म्हणालो :‘‘चॉकलेट खाणार का?’’ त्या दोघांनी एकमेकांकडं बघितलं...बोलले काहीच नाहीत. रिकामे ग्लास नेण्यासाठी आलेल्या मुलाला मी चॉकलेट आणायला सांगितलं आणि ते चॉकलेट त्यांना दिलं. त्या दोघांना मी त्यांची नावं विचारली. एवढा वेळ शांत असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आता प्रसन्न भाव उमटले. दोघांनी सांगितल्यानुसार, मुलीचं नाव होतं सायली आणि मुलाचं नाव होतं संकेत. त्या अर्ध्या तासात त्या दोघांशी माझी चांगलीच गट्टी जमली. जगाची कुठलीही ओळख नसणारे ते दोघं एकमेकांच्या प्रेमासाठी खूप आसुसलेले होते. या दोघांनाही आई-वडील नको होते. कारण, या वकिलाच्या सांगण्यानुसार, त्या दोघांच्या आई-वडिलांनी एकमेकांच्या चुली अजून कुणासोबत तरी पेटवल्या होत्या. ती मुलं म्हणजे त्या दोघांसाठी ‘इच्छा नसलेलं ओझं’ होतं असं वकीलसाहेबांच्या बोलण्यावरून वाटत होतं. दोन्ही भावंडांची आता निरोपाची वेळ आली होती. मुलाला नेण्यासाठी आई आणि मुलीला नेण्यासाठी बाबा आले तेव्हा त्या भावंडांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले होते. धरून ओढलं तरी ते दोघं उठत नव्हते.
मी म्हणालो : ‘‘अहो, बोलू द्या थोडा वेळ त्यांना.’’
मुलाची आई म्हणाली : ‘‘गाडीची वेळ होत आली आहे. मला उशीर होतोय. मला निघावं लागेल.’’
मी विनंती केल्यामुळे ती दहा मिनिटं थांबली. त्या पती-पत्नीशी मी बोललो. मी माझी ओळख सांगितल्यामुळे ते दोघंही माझ्यासमोर जोरजोरानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. ‘हा किती वाईट’ आणि ‘ती किती वाईट’ हे पटवून देण्यात त्यांची स्पर्धा चालली होती जणू. इतके मुद्दे त्या दोघांकडंही होते. खरं तर असे आई-वडील कुठल्याही चिमुकल्यांच्या नशिबी येऊ नयेत, असं त्या दोन्ही शिक्षित माणसांचं वर्तन होतं. शेवटी, त्या भावंडांची निरोपाची वेळ आली.

आई-वडील त्या दोघांना ओढत नेत होते...आणि मी? काहीच न करू शकणारा मी सगळं माहीत असूनही बघतच बसलो होतो. त्या भावंडांचं ते रडणं, एकमेकांना मिठ्या मारणं आणि एकमेकांचे डोळे पुसणं हे माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. ती मुलं जशी खाली उतरली तसा मीही त्यांच्यासोबत खाली उतरलो. गर्दीच्या ओघात एकीकडं आई आणि मुलगा; तर दुसरीकडं मुलगी आणि वडील जायला निघाले. ती दोन्ही लहान मुलं जाताना खूप लांबपर्यंत एकमेकांकडं पाहत होती आणि मधून मधून माझ्याकडंही पाहत होती. त्या दोघांना मला काहीतरी सांगायचं होतं आणि मलाही काहीतरी समजून घ्यायचं होतं; पण माहीत नाही, ती वेळ कधी येणार ते. त्या गर्दीत ते दिसेनासे झाले...
नंतर बराच वेळ कुठल्याच कामात माझं मन लागेना. दोन्ही मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यांपुढून जाईनात. बाजूलाच असलेल्या कोर्टात गेलो. माझा मित्र ॲड. हसन पटेल याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो म्हणाला : ‘‘असे कितीतरी प्रकार रोज माझ्यासमोर मला दिसतात. न्यायव्यवस्था, समाज आणि एकूण वातावरण हे सगळं पाहून मन नीडर झालंय. इथं कुणाचाच कुणावर विश्वास नसल्यामुळे कदाचित अशी प्रकरणं वाढत असतील.’’

‘अहं’ सिद्ध करण्यासाठी माणसं कोणत्या थराला जातील ते सांगता येत नाही. त्यांचं मीपण सिद्ध करता करता किती जणांचं भलं होतं आणि किती जणांना त्रास भोगावा लागतो याचा ताळेबंद कधी त्यांनी मांडला नसेल, म्हणून कदाचित ही सगळी प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली असावीत. कोर्टाच्या आवारात सगळी शिकलेलीच माणसं पाहायला मिळतात. कदाचित अडाणी माणसांना माणुसकीचं वलय चिकटलेलं असावं म्हणून ते कोर्टाची पायरी चढायला धजत नसावेत. त्या अडाणी माणसांना भावनाही चांगल्या कळत असाव्यात. आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ या शिक्षित आणि कळत्या माणसांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना आपण कधीतरी समजून घ्याव्यात असं या अनेक ‘संगीतां’ना आणि ‘सचिन’ना कधी वाटेल? काय माहीत...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write bhramti Live article