पंखांविना भरारी... (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

‘दीपस्तंभ फाउंडेशन’ ही जळगावातली संस्था माणुसकीचं, उंच आकाशी झेप घेणाऱ्यांचं माहेरघर आहे. ही संस्था आपली संस्था आहे, असं समजून आपण सगळे जण काम करू या. आपल्या भागातल्या उत्साही, जिद्दी, होतकरू तरुणांना या संस्थेचा रस्ता दाखवू या.

गे ल्या पंधरवड्यापासून निवडणूक वगळता अन्य काहीही विषय नाहीत. जिकडं जावं तिकडं केवळ निवडणूक...लोकांच्या प्राथमिक प्रश्नांचा खुद्द लोकांनाच विसर पडला आहे जणू काही! आपले प्रश्न, आपले गंभीर विषय आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोचवण्याची हिंमत लोकांमध्ये नाही. आणि लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा गाडा हाकणाऱ्यांना काहीच देणं-घेणं नाही.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या
निवडणुकीचे रागरंग मी फार जवळून पाहिले, अनुभवले. सर्वत्र फार किळसवाणा प्रकार पाहायला मिळाला. ज्यांना आपलीच काळजी नाही त्यांना आपल्या मुला-बाळांची काळजी वाटायचं काही कारण नाही. सगळ्याच ठिकाणी जळगावच्या यजुर्वेंद्र महाजनांसारखी (९८२२४७६५४५) माणसं तुमच्या मदतीला येऊ शकणार नाहीत.
त्याचं झालं असं, की गेल्या शनिवारी मी जळगावात होतो. ऑफिसची सगळी कामं आटोपून लगेच औरंगाबादला जाण्याच्या तयारीत होतो. तितक्‍यात माझ्या सहकारी शीतल पवार यांचा मला फोन आला. त्या म्हणाल्या : ‘‘तुम्ही जर जळगावात असाल तर ‘दीपस्तंभ फाउंडेशन’ला नक्की भेट द्या. तिथं तुम्हाला वेगळ्या धाटणीचे तरुण भेटतील. त्यांचं काम तुम्हाला नक्की आवडेल. त्या संस्थेबद्दल शीतल यांनी मला बरंच काही सांगितलं, त्यामुळे मला त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. सहा वाजले होते. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे त्या शहरातली ‘फौज’ होतीच. आमचे ‘यिन’चे मुखमंत्री तेजस पाटील, दिव्या पाटील, धनश्री माळी, माझे काही सहकारी असे आम्ही निघालो ‘दीपस्तंभा’कडे. गाडीतून उतरताना कानावर गाण्याचा आवाज येत होता.
‘इतनी शक्ती हमें दे ना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना...

एकापाठोपाठ अशी गाणी सुरू होती.

तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य-सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी...
हीच अमुची प्रार्थना अन्‌ हेच अमुचे मागणे...
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी
तोवरी देई अम्हांला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी...

आणि माझ्यासोबतचे बाजूला एका कोपऱ्यात शांतपणे जाऊन बसले होते. एवढं शांत आणि प्रसन्न वातावरण फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. जी मुलं गात होती आणि जी मुलं गाणाऱ्यांच्या मागं गात होती ती सगळी मुलं आणि मुली शरीरानं दिव्यांग होती.
‘आपण काहीही कामाचे नाही’ असं त्यांचा उत्साह पाहून वाटत होतं.
ज्यांना हात-पाय नाहीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही अशा त्या सर्व मुलांमध्ये कमालीचा उत्साह होता. अर्ध्या तासाची प्रार्थना संपली आणि आम्ही राजेंद्र चव्हाण नावाच्या प्राध्यापकांसमोर जाऊन उभे राहिलो. आम्ही इथं येणार आहोत याची कल्पना चव्हाण यांना अगोदर होतीच. सुटाबुटात असणाऱ्या चव्हाण यांना दोन्ही डोळे नाहीत. मात्र, त्यांचा उत्साह पाहून, त्यांना डोळे नाहीत, असं जाणवत नव्हतं. या संस्थेचं काम कसं चालतं, ज्यांना समाजानं नाकारलं आहे अशा मुलांनी काय काय केलं हे सगळं आम्हाला चव्हाण यांनी सांगितलं. ते ऐकून आम्ही थक्क झालो.

माझ्यासोबत असणारे तेजस, दिव्या आणि धनश्री त्या ठिकाणी कमालीचे शांत होते. एरवी त्याना सांगावं लागतं, ‘बाबांनो, जरा शांततेनं घ्या.’ आम्ही एकेक करत सगळ्या खोल्यांमध्ये फिरायला सुरवात केली. त्या मुलांना भेटलो. चर्चा केली. तेव्हा अनेक प्रश्न पडले.
माझ्याकडे सर्व अवयव आहेत तरीपण मी यांच्यासारखं आकाशाला गवसणी घालणारं स्वप्न का पाहू शकलो नाही? माझ्याकडे सगळे पर्याय असतानाही मी आकाशात का भरारी घेतली नाही? मी सहज एखादं स्वप्न उराशी बाळगून त्यानुसार वाटचाल का केली नाही? मी लुळा नाही, मी पांगळा नाही, मी अंध नाही, मी दरिद्री नाही... तरीही स्वप्न धाडसानं पाहण्याची या मुलांसारखी हिंमत माझ्यात का नाही? असे किती तरी प्रश्नच प्रश्न...
***

गरीब, दिव्यांग, अनाथ मुलांसाठी सन २००५ पासून यजुर्वेंद्र यांनी हा प्रोजेक्‍ट सुरू केला.. दिव्यांग-प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘गुरुकुल’, निराधार-वंचित मुला/मुलींसाठी ‘संजीवन’, तसेच ‘मनोबल’ अशा तीन संस्थांचा जन्म झाला.
यजुर्वेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली अनुभवी शिक्षकांची फळी आता ‘दीपस्तंभ’ची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. त्या बळावर यजुर्वेंद्र यांनी आपलं आयुष्य या तीन संस्थांसाठी वाहून घेतलं आहे.
कुठलंही भरभक्कम आर्थिक पाठबळ नसताना, भविष्यात आर्थिक पाठबळ मिळेल याची कुठलीही शाश्वती नसताना यजुर्वेंद्र यांनी या तीन संस्थांची स्थापना केली. यजुर्वेंद्र यांची या कार्याविषयीची सच्ची निष्ठा, स्वच्छ उद्देश आणि या कार्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या अगणित शक्‍यता पाहून समाजातल्या अनेक दानशूर व्यक्ती पुढं आल्या. ‘हे काम तुझं एकट्याचं नाही तर संपूर्ण समाजाचं आहे,’ हाच संदेश त्या सगळ्यांच्या या आर्थिक मदतीतून पुढं आला. समाजातल्या आबालवृद्धांपासून प्रत्येकाला या कामात खारीचा वाटा उचलावासा वाटत आहे हे या कामाचं यश म्हणायला हवं.
‘गुरुकुल’, ‘संजीवन’ आणि ‘मनोबल’ या तिन्ही उपक्रमांचा खर्च हा देणग्या, यजुर्वेंद्र यांच्या व्याख्यानांचं मानधन व ‘दीपस्तंभ’ प्रकाशनाच्या नफ्यातून भागवला जातो; पण हे एवढंच पुरेसं नाही या संस्थेला. आजही तुम्हा-आम्हासारख्या दानशूर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे.
***

शेजारच्या खोलीत आम्ही एकेक करून दुसऱ्या तरुणांशी बोलायला सुरवात केली. चेताली राम पातावार ही नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरची तरुणी. तिच्या कमरेच्या खालच्या भागात जीवच नाहीये. छोट्या तीनचाकी सायकलवर बसून ती इकडं तिकडं ये-जा करत असते. ‘तिला शाळेत पाठवू नका, तिला घराबाहेर पाठवू नका,’ असं लहानपणापासून म्हणून तिच्या शिक्षकांनी चेतालीच्या आई-वडिलांना घाबरवलं होतं. मात्र, स्वतःच्या हिमतीच्या जोरावर तिनं बीएपर्यंतचं शिक्षण पहिल्या श्रेणीमध्ये पूर्ण केलं. प्रत्येक परीक्षेत ती पहिली यायची. तिचं अक्षर अगदी मोत्यासारखं. ती बोलत होती आणि आम्ही ऐकत होतो. ती म्हणाली : ‘‘मला स्पर्धक कुणीच नाहीये. मीच माझी स्पर्धक आहे. मला दिव्यांग लोकांसाठी, मुलांसाठी आयुष्यभर काम करायचंय. त्यासाठी क्‍लास वन अधिकारी होण्याचं माझं स्वप्न आहे.’’
चेताली म्हणाली : ‘‘जळगावला शिकण्यासाठी आले. पहिल्यांदाच घराबाहेर पडले होते. मला पाठवायचं आई-बाबांचं धाडस होत नव्हतं; पण अखेर त्यांनी ते दाखवलं. इथं आल्यावर मला रुळायला चार दिवस लागले; पण आता मी इथल्या वातावरणात चांगलीच रुळले आहे. महाजन सरांसारखा धाडसी माणूस माझा पाठिराखा बनल्यामुळे ते शक्‍य झालं.’’
तिच्या खोलीत नजर फिरवली तर इतिहासाची आणि महात्मा गांधींजींची अधिक पुस्तकं दिसत होती.
‘‘गांधीजींवरची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत. गांधीजी मला फार आवडतात,’’ असं तिनं यासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर दिलं. गांधीजी जगातले सर्वश्रेष्ठ कसे आहेत, याचेही तिनं अनेक दाखले दिले.
***

नंतर कोल्हापूरची माउली अडकूर भेटली. जन्मतःच दिव्यांग असलेल्या माउलीला गायनाची खूप आवड. पाकिस्तानी संगीताबद्दलची माहिती तिनं मला दिली. तिचं संगीतातलं हे ज्ञान पाहून मी चकित झालो. गरिबीतून आलेली, तसा कुणाचाही हातभार नसलेली मुलं ध्येयानं किती झपाटलेली आहेत हे मला जाणवलं. गावाकडचं वातावरण, तिच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, शेतीवाडी याविषयी माउली म्हणाली : ‘‘चॅलेंज स्वीकारायला मला खूप आवडतं. मी जो विषय हाती घेते त्यात प्रावीण्य मिळवतेच.’’
शाळेत असतानाचे अनेक किस्से तिनं मला सांगितले. अनेक विषयांवर चर्चा केली. माउलीची सकारात्मकता पाहून मी अवाक्‌ झालो. ‘मृत्युंजय’ कादंबरीतल्या अनेक बाजू चांगल्या आणि वाईट कशा आहेत हेही तिनं माझ्यासमोर मांडलं.
***
पंकज गिरासे. पाच वर्षांना असताना वडील वारले. गरिबीच्या झळा सोसत त्यानं शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केलं. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी मारामारी असायची, त्यात हा दिव्यांग. आईच्या जोरावर पंकजनं आकाशाला गवसणी घालायचं स्वप्न पाहिलं. त्याला कलेक्‍टर व्हायचंय, यासाठी तो ‘दीपस्तंभ’मध्ये मन लावून अभ्यास करतोय. त्याला चिंता आहे ती आईची. आपल्यापासून दूर असलेली आई काय करत असेल याची काळजी त्याला आहे.
पंकजला अपयशाची भीती वाटत नाही. स्वतःवरही त्याचा दांडगा विश्वास आहे. दिलेलं अभ्यासाचं काम तो अगदी त्याच वेळेत करतो.
***

महेंद्र निगडे हा कऱ्हाडचा आहे. त्याच्या शाळेत त्याला सर्वजण चिडवायचे. तो दिव्यांग होता यात त्या बिचाऱ्याचा काय दोष...?
पण याच चिडीतून त्यानं काही स्वप्नं उराशी बाळगली. अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं; पण तो खचला नाही. तो सातत्यानं काम करतोय.
***
स्वप्नील बागूल. अंगात रक्तवाहिन्या कमी आणि नळ्याच जास्त! डोक्‍यावर मायेचं छत नाही की कुणाचा आधार नाही. असं असलं तरी त्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. आपले ‘आपले’ असतात असं सांगत घरच्यांच्या आठवणीनं त्याचे डोळे पाणावले होते. त्याला हलता येत नाही की उठता येत नाही; पण या पठ्ठ्याची तळमळ काही थांबत नाही.
***
या संस्थेत उच्च शिक्षण घेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हे काही एवढे पाचजणच नाहीत. तर असे कितीतरी जण जळगावला आहेत आणि पुण्यातही आहेत. जळगावच्या संस्थेत शिकणाऱ्या किमान ५० जणांना तरी मी भेटलो असेन. प्रत्येक जण दिव्यांग आहे. प्रत्येकाची कहाणी करुण आणि वेदनामय आहे. राज्यातून जिल्ह्यातली मुलं इथं येतात, राहतात, शिकतात. आमच्या गप्पा सुरू असताना यजुर्वेंद्र महाजन तिथं प्रवेशले.
‘सर आले, सर आले’ असं म्हणत सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव बघायला मिळाला. संस्थेत शिक्षण घेणारा प्रत्येक मुलगा मनानं अधू होता; पण प्रत्येकाच्या मनात उत्साह शिगोशिग होता. प्रत्येकात जणू हत्तीचं बळ होतं. कुठून आला एवढा उत्साह? याचं कारण इथलं वातावरण आणि महाजन सर... ही मुलांची ऊर्जास्थानं आहेत.
जे आयुष्याकडे पाहू शकत नाहीत, कुणासाठी काहीही योगदान देऊ शकत नाहीत अशा दीड हजार मुलांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. या ठिकाणाहून ट्रेनिंग घेऊन जाणारी पाच हजार मुलं राज्याच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहेत. यासंदर्भात कधी शासनानंही विचार केला नाही की राजकीय इच्छाशक्तीनंही! यजुर्वेंद्र आणि त्यांची पत्नी मानसी यांच्या कल्पनेतून खूप मोठं काम इथं उभं राहिलं आहे.
यजुर्वेंद्र म्हणाले : ‘‘सगळ्यांच्या मदतीचा हात मिळाला आणि त्यातून हे मोठं काम उभं राहिलं. एकाही मुलांकडून एकही पैसा न घेता आम्ही इथं शिक्षण देत असतो. ज्यांचं कुणीच नाही, जे दिव्यांग आहेत आणि खचलेले आहेत, अशांसाठी ही संस्था ‘आधारवड’ आहे.’’

ही संस्था माणुसकीचं, उंच आकाशी झेप घेणाऱ्यांचं माहेरघर आहे. आपण सगळे जण, ही संस्था आपली संस्था आहे, असं समजून काम करू या. आपल्या भागातल्या उत्साही, जिद्दी, होतकरू तरुणांना या संस्थेचा रस्ता दाखवू या. या संस्थेला आज मदतीची गरज आहे. आपली मदत कुणाचं तरी आयुष्य घडवू शकते. या ठिकाणी भेटलेला प्रत्येक तरुण मला ऊर्जा देणारा होता.
‘‘दादा, परत कधी येतोस?’’ असं म्हणून माझा हात हातात घट्ट पकडलेला तो स्पर्श... त्या स्पर्शातला ओलावा मला अद्याप जाणवत राहतो. ‘सांड की आँख’ या सिनेमातला एक डायलॉग आहे : ‘आदमी बूढा हो गया तो क्‍या हुआ? दिल जवाँ रहना चाहिये।’ तसं या सगळ्या दिव्यांग मुलांचं आहे. त्यांच्याकडं बघून लोकांना वाटतं, की ही मुलं काहीही करू शकत नाहीत; पण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काही क्षण घालवल्यावर असं वाटतं की जे काही करतील ते ही मुलंच करतील. बस्स!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com