दंगलीचे मारेकरी... (संदीप काळे)

संदीप काळे sandip.kale@esakal.com
Sunday, 27 October 2019

कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं.

कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं.

त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार सरांचा फोन आला. त्यांनी विचारलं :‘‘उद्या दौरा कुठं आहे?’’
मी म्हणालो : ‘‘नाशिकवरून धुळ्याला चाललोय.’’
ते म्हणाले : ‘‘मालेगावला जाणार नाहीस का?’’
मी म्हणालो : ‘‘नाही.’’
ते म्हणाले : ‘‘मालेगावला जा. कारण, तुला त्या ठिकाणचे वेगवेगळे विषय हाताळता येतील.’’
हे बोलताना त्यांनी मला मालेगावचे वेगवेगळे पैलू सांगितले.
ते सगळे पैलू ऐकताना मला वाटत होतं, की आपण कुठं राहतो आणि कोणत्या संस्कृतीची जोपासना करतो?
त्यांनी सांगितलेले सगळे विषय, त्या विषयांभोवती फिरणारं समाजकारण आणि राजकारण यांवर विचार करता करता माझ्या डोक्‍यात कमालीचा गुंता झाला होता.
मी धुळ्याचा दौरा रद्द करून मालेगावला निघालो. रस्त्यात अनेक लोकांशी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी चर्चा सुरू होती. मालेगाव हा महाराष्ट्रामधला वेगळा विषय आहे. इथल्या सांस्कृतिक जीवनाचं एकूण चित्र खरंच वेगळं आहे.
म्हणजे, आज मालेगाव म्हटलं की, तिथली दंगल, हिंदू-मुस्लिम यांच्यातलं वैर, तिथली मंदिरं, मशिदी आणि अत्यंत खोलात जाऊन पाळल्या जाणाऱ्या रूढी-परंपरा हे पूर्णपणे वेगळं आहे. यातून खूप चांगल्या सकारात्मक गोष्टीसुद्धा रोज नव्यानं घडत आहेत, त्यांचा शोध घेत मी मालेगावमध्ये फिरलो. एकीकडे हिंदू, दुसरीकडं मुस्लिम आणि मध्ये ‘बॉर्डर’. दोन्हीकडेही कट्टरपणा. त्या कट्टरपणाला दोन्हीकडच्या कट्टर जातीय सामाजिक संघटनांनी आणि राजकीय व्यक्तींनी आणलेली धार पाहून लक्षात येत होतं, की इथं सर्वसामान्यांना नाहक त्रास दिला जातो. आमचे ‘सकाळ’चे सहकारी गोकुळ खैरनार यांच्यासह चार-पाच मित्रांना घेऊन आम्ही मालेगावातल्या काही प्रमुख भागांना भेटी दिल्या. गल्लोगल्ली मुलांचे बसणारे गटच्या गट, बेरोजगारी, व्यसनाधीनता, वेगवेगळ्या घटना यांचं चित्र पुढं येत राहिलं.

आम्ही आसिफ शेख यांची वाट बघत त्यांच्या कार्यालयात बसलो होतो. शेख हे त्या भागात एके काळी महापौर होते. त्यांनी मुस्लिम मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कामाची माहिती आम्हाला त्यांच्याकडून ऐकायची होती. खैरनार हे पत्रकार. त्यामुळे हळूहळू त्या भागातले सगळे पत्रकार तिथं जमू लागले. शहजाद अख्तर, जाहिद शेख, मुजाहिद अख्तर, इसिफ अनिज अजहर हे पत्रकार आमच्याभोवती आले. आम्ही परस्परांशी ओळख करून घेतली. या सगळ्या पत्रकारांनी मिळून एक वेगळेपण नक्कीच जपलं होतं. आमच्या भोवती जमलेले पत्रकार उर्दू भाषेशी संबंधित होते. सात साप्ताहिकं, आठ दैनिकं आणि बाहेरून येणारी दहाहून अधिक दैनिकं असं उर्दू पत्रकारितेचं मालेगावमधलं चित्र होतं. मालेगाव म्हटलं की दंगल...मालेगाव म्हटलं की दोन समाजांमधली प्रचंड तेढ...असं चित्र आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतं; पण या उर्दू पत्रकारांनी आणि मराठी पत्रकारांनी मिळून काही चौकटी आखल्या होत्या. त्या चौकटींमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही
याची काटेकोर दक्षता कायमस्वरूपी घेतली जात होती.
इथलं सामाजिक ऐक्‍य अबाधित राहावं यासाठी मालेगावातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी जी जबाबदारी घेतली होती, त्याच्याही पुढं जाऊन इथल्या मराठी आणि विशेषत: उर्दू पत्रकारांनी एक भूमिका बजावली होती व ती अजूनही कायम आहे.

एकादशीच्या दिवशी मंदिरासमोर गाय कापून टाकण्यात आली होती. याविषयीची बातमी किंवा चर्चा पसरणार नाही आणि त्यातून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी या पत्रकारांनी घेतली होती, असं मुजाहिद अख्तर यांनी मला सांगितलं.
हे असे प्रकार करण्यामागं कोण आहे, कसं राजकारण शिजतंय आणि संबंधित लोकांना त्याचा कसा फायदा होत आहे हे पटवून सांगण्यात मालेगावमधले उर्दू आणि मराठी पत्रकार यशस्वी झाले होते. हे फक्त एखाद्‌दुसऱ्या वेळी व केवळ मंदिरासमोरच घडलं होतं असं नाही, तर मशिदीसमोरही विटंबना करण्याचा प्रकार झाला होता. या प्रकारांविषयीची माहिती पसरणार नाही याची खबरदारी ही सगळी जाणकार मंडळी घेत होती आणि आजही घेत आहेत.

सन २००१ पासून आजपर्यंत एकही दंगल मालेगावात झाली नाही, याचं मुख्य कारण तिथल्या पत्रकारांनी घेतलेली भूमिका. ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. सन २००१ पूर्वी मालेगावमध्ये २७ दंगली झाल्या होत्या. त्या दंगली ऐन निवडणुकीच्या काळात घडवून आणल्या जायच्या. घरंच्या घरं उद्‌ध्वस्त झाली होती. एकमेकांच्या क्रोधानं अक्षरश: कुटुंबंच्या कुटुंबं खाक झाली होती. सन २००१ पासून आजपर्यंत गेल्या १८ वर्षांच्या कालावधीत इथलं चित्र पूर्णपणे बदललं आहे. त्यातून झालं असं, की शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा विचार पालक आता प्रामुख्यानं करतात. ‘चांगलं शिक्षण घेऊन बाहेर कसं जाता येईल’ असा विचार तरुण मुलं करू लागली आहेत व त्या ध्येयप्राप्तीसाठी तसं वागू लागली आहेत. सन २००१ पूर्वी मालेगावमध्ये तीन भावांमध्ये एक जण शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे असं चित्र होतं. आता मात्र तिघंच्या तिघं शाळेची पायरी चढतानाचं चित्र दिसतं. मालेगावमधल्या घराघरात कपड्यांशी संबंधित छोटेखानी उद्योग आहेत. ते उद्योग वाढतील कसे याविषयी तरुणाईची मानसिकता आता बदललेली आहे. धर्म, जातपात आदींना खतपाणी घालून आपली पोळी भाजून घेणारे कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी शिक्षित तरुणाईनं पुढाकार घेतला आहे. परिणामी, खूप जहाल असलेल्या आणि जहरी टीका करणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांना इथं आपला जम बसवता येत नाही, तसंच ‘एमआयएम’सारखा पक्षही मालेगावात आपली पाळेमुळे फार खोलवर रुजवू शकत नाही.
पत्रकारांची दक्ष भूमिका, समाजात कार्य करणारे कार्यकर्ते आणि वाढत चाललेलं शिक्षणाचं प्रमाण या सगळ्यामुळं हे शक्य झालं आहे.

तालुक्याचं ठिकाण असलेलं मालेगाव हे कमालीचं धार्मिक असून, चारशे मंदिरं आणि तीनशे मशिदी असं मालेगावमधलं चित्र आहे. कदाचित त्यामुळेच मालेगावमध्ये धार्मिकता अधिक बळावत असेल. आमच्या गप्पा सुरू असताना मुस्लिमांमधल्या अंतर्गत जाती आणि त्यांतून निर्माण होणारा अंतर्गत द्वेष हाही कधी कधी किती टोकाला जातो, हेसुद्धा या मंडळींनी मला सांगितलं : ‘मोहंमद शकील यांनी दंगलीच्या काळात इथल्या परिस्थितीचं केलेलं चित्रण डोळ्यांसमोरून जात नाही...दंगल पेटवणाऱ्यांना लहान लहान मुलांचीही दया येत नाही...जिथं माणुसकी पूर्णपणे संपते तिथं दंगलीचा उगम होतो...’
‘मंदिरांतून आणि मशिदींमधून उपदेश करणारेच या दंगलीला अनेक वेळा कारणीभूत असू शकतात,’ याचे अनेक दाखलेही चर्चा करताना माझ्यासमोर येत गेले. दंगलीत मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या घरी जायचं आम्ही ठरवलं होतं. यातल्या एका पत्रकारमित्रानं दोन-चार ठिकाणी फोन केले. दोन ठिकाणी जायचं ठरलं. रस्त्यानं जाताना आम्ही एका चहावाल्याकडे थांबलो. त्याचं नाव शकील शेख. शकील नववीपर्यंत शिकला आहे. नंतर वडिलांचं चहाचं दुकान पाहायचं त्यानं ठरवलं. शकीलनं दिलेल्या माहितीनुसार, तो घरातला थोरला. त्याचे सहाही धाकटे भाऊ नोकरीसाठी सौदीमध्ये गेले आहेत. पैसा, घर, गाडी, बंगला असं सगळं शकीलकडे आहे; पण आपला वडिलोपार्जित चहाचा व्यवसाय त्याला बंद करायचा नाही. मालेगावमध्ये पूर्वी झालेल्या एका दंगलीत शकीलचे आई-वडील मृत्युमुखी पडले.
तो म्हणाला :‘‘मी नंतर आत्याकडे नाशिकला गेलो. दंगलीच्या वेळी बाकीचे सगळे भाऊ शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेर होते.’’
शकील म्हणाला : ‘‘माझा कुठल्याही हिंदूवर अजिबात रोष नव्हता आणि नाही. मात्र, हे सगळं ज्या मानसिकतेतून घडून आलं त्या मानसिकतेवर माझा रोष होता.’’

आम्ही ज्या घरी भेटण्यासाठीची वेळ घेतली होती त्या घरी पोचलो. तिथं रस्त्याच्या कडेला छोटीशी बाज टाकून आम्ही तीवर बसलो. घराच्या पलीकडच्या रस्त्यावर खूप माणसं जमली होती.
मी ज्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या थोरल्या बंधूंचं काही वेळापूर्वीच निधन झालं होतं व ती गर्दी त्यामुळे जमली होती अशी माहिती मिळाली. या घटनेनंतर मी माझा विचार थोडासा बदलला. आता दंगलीसंदर्भातल्या कुठल्याही विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता. दोन मिनिटं त्यांचं सांत्वन करावं आणि निघावं, असा विचार मी आणि माझ्यासोबतच्या इतरांनी केला. आम्ही ज्या अब्दुल जब्बार यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटलो आणि ‘निघतो’ असा निरोप त्यांच्यापर्यंत पोचवला.
ते म्हणाले : ‘‘अहो, माझा भाऊ गेला म्हणून काही अडचण नाहीये. तुम्ही बसा, आपण चर्चा करू या. तुम्ही इतक्‍या दुरून भेटायला आलात...’’ त्यांनी हात हातात घेऊन आग्रहानं बसवून घेतलं.
जब्बार हे अनेक दंगलींचे साक्षीदार होते. या दंगलीला ज्यांनी खतपाणी घातलं होतं, त्या प्रत्येक व्यक्तीवर जब्बार यांचा रोष होता.
एका विशिष्ट जाती-धर्माचा, पक्षाचा, व्यक्तीचा पगडा जर संपूर्ण शासकीय यंत्रणेवर असेल तर त्यातून गरिबांची कशी माती होते, गरिबांची घरं कशी उद्‌ध्वस्त होतात, याचे अनेक दाखले जब्बार यांनी माझ्याशी बोलताना दिले. त्यांनी सांगितलेल्या माहितीचे बरेचसे पैलू शंभर टक्के सत्य होते.

‘मुस्लिम खराब आहेत, मुस्लिमांना सोई-सुविधा देऊ नका, त्यांना उच्च शिक्षण देऊ नका, त्यांचा कुठल्या तरी जातीय देशाशी संबंध आहे,’ ही मानसिकता घेऊन वावरणारा मोठा वर्ग मुस्लिमांकडे एका वेगळ्या चष्म्यातून बघतो. त्यातून धार्मिक तेढ, दंगलीसारखे प्रकार अधिक होतात हे सत्य आहे, हे जब्बार यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. जब्बार यांची बहीण बिल्किशबानू ही रोजच्याप्रमाणे घराच्या छतावर धुणं वाळत घालण्यासाठी गेली होती. त्या वेळी गावात दंगलीचं वातावरण होतं. दंगल अचानक भडकली आणि पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यात बिल्किशबानूला गोळी लागली आणि ती जागेवरच कोसळली. महंमद अली रोड परिसरातले १३ जण त्या दंगलीत जागेवरच गेले होते. त्या वेळी तब्बल ११ दिवस कर्फ्यू होता. बिल्किशबानूच्या मरणानंतर आख्खं कुटुंब कसं नेस्तनाबूत झालं याची कहाणी जब्बार यांनी मला सांगितली.
त्या दंगलीत ज्यांना ज्यांना जीव गमावावा लागला, त्यांच्या त्यांच्या नातेवाइकांनी ‘आम्हाला मोबदला मिळावा,’ या मागणीसाठी
कोर्ट-कचेऱ्या केल्या; पण बिल्किशबानूच्या कुटुंबाचा आधार असणारे जब्बार यांनी मात्र मिळणारी शासकीय मदत नाकारली होती. ही मदत नाकारण्यामागच्या भूमिकेविषयी सांगताना जब्बार म्हणाले : ‘‘दंगल घडवून आणणाऱ्या लोकांची मानसिकता वाईट होती आणि त्या वाईट मानसिकतेचा मी मोबदला कसा मागू?’’
‘अल्लानं तिला बोलावून घेतलं... नशिबात होतं ते घडलं,’
मोबदला न मागण्यामागचं असंही एक दुसरं कारण जब्बार यांनी दिलं.
आम्ही ज्या दुसऱ्या घराची वेळ घेतली होती त्या घरी आम्हाला जे सांगण्यात आलं, तो किस्सा शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. दंगल कुठल्या थराला जाऊ शकते, हे त्यातून कळलं.
***

जब्बार यांच्या घरून आम्ही सुगण बरंठ यांच्या घरी गेलो.
दंगलीच्या काळात शहरात शांततेचं वातावरण कसं राहील यासाठी बरंठ आणि त्यांच्या टीमनं पुढाकार घेतला होता. त्यात त्यांना अनेकदा यशही आलं.
बरंठ म्हणाले : ‘‘दंगली या स्वार्थासाठी घडत असतात. यात कुणाचा तरी वैयक्तिक स्वार्थ दडलेला असतो. मात्र, त्यांत जीव नाहक जातात.
जिथं दंगल सुरू असते तिथं विचार मारले जातात.’’
दंगलींमागं अविचारी माणसं कशी असतात ते बरंठ यांनी अनेक उदाहरणांसह आम्हाला सांगितलं.
गांधीविचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जगभर फिरणारे बरंठ यांना, आपल्याच गावात उद्भवणाऱ्या दंगली शमवण्यासाठी बराच वेळ लागला होता.

दंगली का होतात, माणसं विचार करणं का सोडून देतात,
एखाद्याचं कुटुंबच्या कुटुंब जाळून टाकताना माणसं कचरत कशी नाहीत...आपापल्या समाजातल्या माणसांच्या मनात दोन्हीकडच्यांनी द्वेष पसरवत राहायचा...हे सगळं काय चाललंय? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मला मालेगावमध्ये दिवसभर राहून मिळाली होती.

आता मालेगाव शांत आहे. कारण, लोक शहाणे झाले आहेत. तरुणाईत शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पत्रकारांनी घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका आजही कायम आहे. या सगळ्याच्या परिणामी, मालेगावात रक्तरंजित दंगल तर होत नाहीच; पण कुविचारांच्या दंगलीलाही आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात.
हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत
मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्यासाठी ‘मालेगाव पॅटर्न’ खूप महत्त्वाचा वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write malegaon hindu muslim bhramti Live article