‘भारत’चा ‘पाकिस्तान’ (संदीप काळे)

संदीप काळे sandip98868@gmail.com
Sunday, 28 July 2019

भारतकाका म्हणाले : ‘‘आम्ही फुकटची मदत कुणाची घेत नाही.
‘आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहावं, आनंदी राहावं,’ एवढंच फक्त मागणं तुम्ही देवाकडं आमच्यासाठी मागा. बाकी, तशी आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही!’’

भारतकाका म्हणाले : ‘‘आम्ही फुकटची मदत कुणाची घेत नाही.
‘आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहावं, आनंदी राहावं,’ एवढंच फक्त मागणं तुम्ही देवाकडं आमच्यासाठी मागा. बाकी, तशी आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही!’’

मुंबईत पाऊस सुरू झाला की थांबत नाही हे नेहमीचंच...आज सातवा दिवस उजाडला तरी पावसाची रिपरिप काही थांबत नव्हती. तो कोसळतच होता. ‘सकाळी बाहेर पडू नका,’ अशी सूचना महापालिकेनं केली होती तरीही काम सोडून घरी बसतील ते मुंबईकर कसले! मी नेहमीप्रमाणे धो धो पावसात सकाळी आठ वाजताच घराबाहेर पडलो. पत्रकार संघाची निवडणूक होती. त्या निवडणुकीत माझ्या मित्राचं पॅनेल नशीब आजमावत होतं. त्यांचा आग्रह पाहून मतदान करणं हे मलाही गरजेचं वाटलं.
त्या दिवशी पावसाचा जोर अधिकच होता. मी मतदान केलं आणि घराच्या दिशेनं निघालो. दादरला दोघांना भेटायचं होतं, त्यांची भेट झाल्यावर वडाळामार्गे नवी मुंबईच्या रस्त्याला लागलो. वडाळ्यात शिरताच पावसाचा जोर आधीपेक्षा जास्तच वाढला. रस्त्यावर पाणी वाहत होतं. जोराचा वारा होता. वाऱ्याच्या जोरानं गाडी उडेल की काय अशी भीती वाटत होती. मुख्य वस्तीपासून ते सी-लिंकला लागेपर्यंत मध्ये फारशी घरं नव्हती. त्यामुळे एवढ्या पावसात गाडी थांबवून आसरा घ्यायचा कुठं असा प्रश्न होताच. वाऱ्याचा वाढलेला जोर पाहता आता गाडीत थांबणं शहाणपणाचं नव्हतं. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि बाजूला असलेल्या तुटक्‍या-फुटक्‍या घराच्या आसऱ्याला जाऊन थांबलो. घरात डोकावलं तर दोनजण पांघरूण घेऊन बसल्याचं मला दिसलं. मी अडचणीत आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी मला आत बोलावलं. त्यांनाच बसायला जेमतेम जागा आहे हे दिसत होतं, त्यामुळे आत जावं की नाही याचा विचार मी करत होतो. मात्र, आतमध्ये गेल्याशिवाय पर्यायही नव्हता; कारण, पावसाचा जोर भयंकरच वाढला होता. आतमध्ये एक काका होते आणि चार मुलं. चौघांच्याही वयात साधारणतः १०-१० वर्षांचा फरक होता. काकांचं वय अंदाजे ५५ ते ६० असावं. कामात व्यग्र असणारे काका मी आत गेल्यावर बाजूच्या मुलाला म्हणाले : ‘‘अरे पाक्‍या, साहब को बैठने के लिये कुछ दे दे।’’ त्या मुलानं बाजूला पडलेली मळकी रिकामी बॅग घेतली आणि मला बसायला दिली. भयाण शांतता असलेल्या त्या घरात ते पाचही जण आपापलं काम करण्यात गुंग होते. कुणी भाजी करत होतं, कुणी कपडे शिवत होतं, कुणी देवाच्या पूजेत मग्न होतं; तर कुणी घरातली साफसफाई करत होतं.
ते काका मला हळूच म्हणाले : ‘‘क्‍या साहब, बारिश में फॅंस गये क्‍या?’’
मी म्हणालो : ‘‘हां.’’
माझं लक्ष घरात बसण्यात आणि त्या काकांच्या बोलण्याकडं अजिबात नव्हतं. सुनसान जागेवर जिथं वस्ती नाही तिथं मी थांबलो होतो. समोर गाडी रस्त्यावरच होती. प्रचंड वारा, इथून आपली सुटका कशी होईल, ही भीती माझ्या मनात होती. ते काका पुन्हा म्हणाले : ‘‘कहाँ रहते हो साहब?’’
‘‘नई मुंबई में।’’
‘‘नई मुंबई में कहाँ?’’
‘‘खारघर में।’’
माझ्याशी बोलून काका पुन्हा त्यांच्या कामात गुंतले. दोन दोऱ्या एकत्रित करून दोरी विणण्याचं काम करण्यात ते मश्‍गूल झाले. पाऊस आणि वारा थोडा कमी झाला होता; त्यामुळे मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि परत निघण्याच्या तयारीत असतानाच घरात मला मशिदीचा आणि लक्ष्मीचा असे दोन फोटो दिसले. मला थोडी शंका आली; पण पुन्हा वाटलं, झोपडीत राहणारे मोठ्या मनाचे आणि दिलदार असतात, त्यातून हा प्रयोग त्यांनी केला असेल. आपण कशाला विनाकारण शंका घ्यायची? तरीही राहवेनाच.
मी धीर करून काकांना विचारलं : ‘‘चाचा, ये दो फोटो कैसे लगाये?’’ तर ते म्हणाले : ‘‘मस्जिद का फोटो पाक्‍या पूजता है और लक्ष्मी के फोटो को राजा पूजता है।’’
शेजारीच असलेल्या येशूंच्या फोटोकडं बोट दाखवत ‘‘ येशू को मैं पूजता हूँ।’’ असं सांगत काका गालातल्या गालात हसले आणि पुन्हा हातातलं काम करू लागले. एकाच घरात वेगवेगळ्या देव-देवता कशा काय, या माझ्या शंकेचं समाधान अजूनही होत नव्हतं.

मी काकांना पुनःपुन्हा खोलात जाऊन विचारलं : ‘‘अनेक जाती-धर्मांच्या देवांसंदर्भातल्या आवडी-निवडी एकाच घरात कशा काय जपता-जोपासता?’’
त्यावर ‘‘जाने दो ना साहब ऽऽ, ये काल का महिमा है’’ असं म्हणत काका माझ्या प्रश्‍नाला बगल देऊ लागले. अधिक खोलात शिरायला ते तयार नव्हते. मात्र, शंतनू नावाचा मुलगा मध्येच बोलला आणि म्हणाला : ‘‘साहेब, आम्ही सगळे जण वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहोत म्हणून वेगवेगळ्या देवांची पूजा करतो.’’
मी त्या मुलांना म्हणालो : ‘‘तुम्ही या घरात भाड्यानं राहता का?’’ काकांकडं बघत तो मुलगा म्हणाला :‘‘भाड्यानं नाही, हे घर भारतकाकाचं आहे. याच घराच्या शेजारी आमचंही घर होतं; पण आता ते घर नाहीये. आमचंही कुणी नाहीये आता. भारतकाकाच आमचा सांभाळ करतो.’’
मला आश्‍चर्य वाटलं. मुंबईत असं फारसं सहसा घडताना दिसत नाही. म्हणजे, एका दिवसाचाही पाहुणा कधी एकदा जाईल, असं वाटत असतं मुंबईकरांना.
मला हे सगळं एकत्रित कसं आलं ते ऐकायचं होतं; पण या पाचही जणांना जेव्हा मी खोदखोदून विचारू लागलो तेव्हा काही सांगावं या मूडमध्ये त्यांच्यापैकी कुणीच नव्हतं. मात्र, मी खूप घुटमळलो आणि त्यांच्याकडून मला जे हवं होतं ते काढून घेण्यात यशस्वीही झालो.
***

भारत म्हणजे सगळ्यांचा काका, पाक्‍या म्हणजे ‘पाकिस्तान’ नावाचा मुलगा, तसंच शंतनू, विजय व राजू असे पाच जण या घरात राहतात.
तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या याच वडाळा भागात असणाऱ्या वस्तीत साथीचा आजार बोकाळला होता. सहा झोपड्यांमध्ये असणारी २८ पैकी पाच माणसं वाचली. बाकीची मृत्युमुखी पडली. या घरातली सगळी माणसं - लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत - खासगी कंत्राटदाराकडं नालेसफाईचं, मैला साफ करण्याचं, ड्रेनेजच्या आत उतरून साफसफाई करण्याचं कामं करायची. सुरवातीला दोघं खूप आजारी होते. पुन्हा मग उलट्या, संडास आणि अंग सुजणं हा प्रकार सर्वांना सुरू झाला.
मीरा-भाईंदरमध्ये असलेल्या एका बाबानं येऊन ‘घरात देवी कोपली’ असं म्हणत लिंबू आणि मिरच्या बांधत होम-हवन केलं; पण काहीही फरक पडला नाही. दवाखान्यावर कुणाचाच विश्वास नव्हता. पाच दिवसांत सगळी माणसं मरण पावली.
भारतकाका म्हणाले : ‘‘आता आम्ही पाचजण - म्हणजे जे वाचलेलो आहोत ते - तुम्हाला इथं दिसत आहोत. आम्ही प्रत्येक कुटुंबातली एकेक व्यक्ती आहोत. या मुलांना माझ्याशिवाय कुणी नाही. ही मुलं जाणार कुठं? छोटी-मोठी कामं करून आम्ही सगळे गुण्यागोविंदानं एकत्र राहतो. आता ही मुलं म्हणजेच माझे जवळचे नातेवाईक आहेत. माझी बायको आणि दोन मुलं याच साथीच्या आजारात मरण पावली. आता या मुलांमध्येच मी त्यांना पाहतो.’’
हे सांगताना भारतकाकांचे डोळे पाणावले होते.
भारतकाका पुढं म्हणाले : ‘‘गफूर नावाचा माझा मित्र माझ्या शेजारीच राहायचा. तोही आमच्यासोबत मैला उचलायचं काम करायचा. १६ वर्षांनंतर त्याला मुलगा झाला. पाकिजा देवीच्या नवसानं हा मुलगा झाला असल्याचं त्याचं मत होतं. त्यामुळे मुलाचं नाव त्यानं ‘पाकिस्तान’ असं ठेवलं. ‘पाकिस्तान’ला त्याला खूप शिकवायचं होतं. आपण करत असलेलं नालेसफाईचं काम त्याच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्याची धडपड सुरू असायची; पण नशिबापुढं कुणाचं काय चालतं?’’
‘मेरा बेटा’ असं म्हणत भारतकाकांनी शेजारीच उभ्या असलेल्या ‘पाकिस्तान’च्या पाठीवरून हात फिरवला.
भारतकाकांनंतर मी त्या चारही मुलांशी बोललो. चौघांचं एकमेकांवर खूप प्रेम. एकमेकांना समजून घेण्यात आणि एकमेकांना कामात मदत
करण्यात त्यांना अतिशय आनंद. सगळे जण पडेल ते काम करतात. साथीच्या आजाराच्या दुर्घटनेपासून या पाचही जणांचे हात मैला भरण्याच्या कामावर जाताना थरथरतात. गल्ली-बोळात जाऊन
साफसफाईचं काम करणं, कुणी सांगेल त्यांच्या गाड्या धुणं, कुणाची बाग साफ करून देणं अशीही छोटी-मोठी काम ही मुलं करतात.
भारतकाका आता थकलेत; त्यामुळे त्यांना फारसं काम उरकत नाही.
‘‘काकांनी झोपडीत बसून राहावं, आम्ही त्यांना आता काम करू देणार नाही,’’ अशी या चौघांची भूमिका. केवळ दैवलीलेनं मिळालेल्या बापाला तळहाताच्या फोडासारखं जपण्याचं काम चौघंही करताना दिसत होते.
या पाचजणांचं परस्परांवरचं प्रेम तर मी पाहिलंच; पण त्याचबरोबर मुंबईतल्या सफाईकामगारांचा प्रश्नही किती बिकट आहे हेही मला या पाचजणांच्या चित्तरकथेतून जाणवलं.
***

भारतकाकांचा जन्म इथंच कसा झाला...त्यांचे आजोबा व वडील गटार साफ करण्याच्या कामात कसे कुशल होते...आपल्या आजोबांचा मृतदेह ड्रेनेजच्या नाल्यात सडलेल्या अवस्थेत आठ दिवसांनंतर कसा आढळून आला...अशा अनेक बाबी भारतकाकांनी सांगितल्या. माझ्या बाजूला असलेले फोटो आणि घरातलं वातावरण बघून हिंदुस्थानच्या एकतेचं वातावरणच जणू मी त्या घरात अनुभवत होतो.
भारतकाकांचा सगळ्यात आवडता पाक्‍या म्हणजे पाकिस्तान!
‘‘पाक्‍या आता लिहा-वाचायला शिकला आहे. ‘शाळेत जा’ असं मी त्याला नेहमी सांगतो; पण तो माझं ऐकत नाही,’’अशी लटकी तक्रारही भारतकाकांनी माझ्याकडं केली. जेमतेम दोन ड्रेस, जेमतेम चार भांडी, गरजेपुरतं अंथरूण-पांघरूण, थोडासाच कांदा-लसूण, शिळं अन्न आणि...आणि भरपूर समाधान आणि आनंद असं या घरातलं चित्र. खेड्यात पारधी समाजाची पालं मी पाहिली आहेत, शिकलकऱ्यांचीही पालं मी पाहिली आहेत; पण भारतकाकांचं घर या पालांपेक्षा वेगळं होतं.
मुंबईतलं जे वास्तव संवेदनशील माणसाला विचार करायला भाग पाडतं त्या वास्तवाचं दर्शन घडवणारं भारतकाकाचं हे घर होतं. मुंबईचे अनेक चेहरे आहेत. भारतकाकांचं हे घरं ‘मुंबईचा आणखी एक चेहरा’ बनून समोर आलं.
‘‘मैं क्‍या मदद कर सकता हूँ?’’
असं मी निरोप घेताना भारतकाकांना विचारलं.
भारतकाका म्हणाले : ‘‘आम्ही फुकटची मदत कुणाची घेत नाही.
‘आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहावं, आनंदी राहावं,’एवढंच फक्त मागणं तुम्ही देवाकडं आमच्यासाठी मागा. बाकी, तशी आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही!’’
आपला भारत कसा आहे, हे कधी पाहायचं असेल तर
भारतकाकांच्या त्या मोडक्या-तोडक्या घरात एकदा जावं लागेल. भारताच्या एकतेचं खरं चित्र तिथं अनुभवता येईल.
वास्तवात, भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली खरी;
पण इथं ‘भारत’ आणि ‘पाकिस्तान’ यांचं एकमेकांवरचं प्रेम कुठल्याही बाप-लेकासाठी आदर्शवत् असंच म्हणता येईल.
त्या घरातून मी बाहेर पडलो; पण मनातले प्रश्न कायम होते.
खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले प्रश्न, त्यातून होणारी जीवितहानी, अनेकांचं होणारं नुकसान यावर तोडगा फक्त प्रेमानं निघू शकतो. माणसापुढच्या अडचणी प्रेमानंच सोडवता येऊ शकतात.
प्रेमानंच दुःख दूर करता येऊ शकतं. फक्त त्यासाठी पुढाकार घेणारे हात मात्र निःस्वार्थीपणे पुढं आले पाहिजेत; मग प्रश्न एका कुटुंबातला असो, अनेक कुटुंबांचा असो किंवा अनेक देशांचा...अडचणींवर, दुःखांवर मार्ग निघतोच निघतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write mumbai bhramti article