मराठीतला हॅरी पॉटर...! (संदीप काळे)

sandip kale
sandip kale

नचिकेतचा निरोप घेतला आणि मी निघालो. मुलं चांगली घडतात, बनतात त्याच्या मागं घरचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते वातावरण नचिकेतला मिळालं आहे. नचिकेतनं मला त्याची कादंबरी भेट दिली.घरी आल्यानंतर मी कादंबरी वाचली. कादंबरीचं नाव आहे ‘नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे रहस्यमय जग’. या कादंबरीत दोन विश्वं आहेत. एक आपली दुनिया आणि दुसरी दुनिया फॅंटसीची. गूढ, रहस्यमय...

बालसाहित्यात हातखंडा असणारे प्राचार्य डॉ. सुरेश सावंत सर मुलांच्या साहित्यविश्वात रमणारे हाडाचे शिक्षक आहेत. सावंत सरांची सोशल मीडियावरची एक पोस्ट मी नांदेडमध्ये वाचली.
दहावीतल्या मुलानं कादंबरी लिहिली असल्याचा उल्लेख त्या पोस्टमध्ये होता. त्या मुलाविषयी आणि कादंबरीविषयी सरांनी जे वर्णन केलं होतं ते वाचून त्या मुलाला भेटावं, ती कादंबरी वाचावी असं कुणाही साहित्यप्रेमीला वाटावं. सरांकडूनच त्या मुलाचा पत्ता आणि फोननंबर मिळवला. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या घरी जाऊन पोचलो. भाग्यनगर हा नांदेडमधल्या साहित्यिकांचा-विचारवंतांचा परिसर.
ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत नरहर कुरुंदकर इथंच राहायचे. सदाशिवराव पाटीलही इथंच राहतात. मी ज्या मुलाला भेटायला निघालो होतो त्या मुलाचं घर ज्येष्ठ साहित्यिक भू. द. वाडीकर सरांच्या घराशेजारी आहे.
मी घरात प्रवेश केला. येणार असल्याची पूर्वसूचना दिल्यानं ते माझी वाटच पाहत होते. खुशाली विचारून झाल्यावर मी मुख्य विषयाकडे वळलो.
***

‘सध्याच्या पिढीला वाचनाची आवड नाही... इंग्लिश साहित्य आपली वेगळी उंची गाठून आहे...मुलं शिक्षण सोडून वेगळे प्रयोग करत नाहीत...’ असा नकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे हल्ली खूप वाढला आहे. मात्र, त्या घरातल्या सगळ्या लोकांना जेव्हा मी भेटलो तेव्हा अशा नकारात्मक दृष्टिकोनाच्या नेमकं उलटं चित्र पाहायला मिळालं. या घरात सगळं काही अगदी पर्फेक्‍ट आणि बरोबर चाललं होतं. मी ज्या मुलाला भेटायला गेलो होतो त्याचं नाव नचिकेत मेकाले (९९२३९७१२६१). तो सध्या दहावीत आहे. त्यानं एक जबरदस्त कादंबरी लिहिली आहे. तिचं नाव आहे ‘नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे रहस्यमय जग’. १२० पानांच्या या कादंबरीतून एक वेगळंच भावविश्व उलगडत जातं. या मुलाच्या भावविश्वातून, कल्पनाविश्र्वातून त्यानं जे काही मांडलंय त्याला तोड नाही असं मला वाटलं.

मी नचिकेतशी बोललो. शाळांमधली परिस्थिती, नचिकेतच्या वयाच्या मुलांची मानसिकता आणि आजूबाजूला जे काही पेरलं गेलेलं आहे त्याचा त्याच्या वयाच्या मुलांच्या मनावर होणारा परिणाम...असे सगळे बारकावे मी टिपत होतो.
मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांमधली पुस्तकंच पुस्तकं नचिकेतच्या घरात आहेत. नचिकेतचे वडील केशव मेकाले शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. आई नंदिनी शिक्षिका आहेत. बहीण निकिजा बारावीत शिकते. मी या दोन्ही भावंडांच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक उपक्रमांबद्दलची माहिती घेतली. नचिकेत स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, बुद्धिबळ अशा सगळ्यांमध्ये अव्वल. पहिलीपासूनच त्याला वाचनाची आवड निर्माण झाली. त्यानं खूप कथा-कादंबऱ्या वाचल्या आहेत आणि त्या वाचनातून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

जे. के. रौलिंग यांची अतिशय गाजलेली ‘हॅरी पॉटर’ ही कादंबरीमालिका जगभरातल्या साहित्यप्रेमींना माहीत आहेच. या मालिकेंतर्गत नऊ वेगवेगळे भाग प्रकाशित झालेले आहेत आणि त्या भागांवर नऊ चित्रपटही झळकले आहेत. शाळकरी वयातल्या जवळपास सगळ्याच मुलांना हे चित्रपट आवडतात.
त्यातून त्यांचं काल्पनिक जग मोठ्या प्रमाणात विस्तारलं जातं.
नचिकेत म्हणाला : ‘‘जेव्हा मी एखादी कादंबरी वाचतो तेव्हा तिच्यातल्या पात्रामध्ये मी शिरतो आणि आपणच ते पात्र आहोत असं मला वाटतं. कादंबरीत पुढं जे जे घडतं ते ते मीच करतोय असा मला भास होतो.’’
नचिकेतला ही दृष्टी आली कशी याचा मागोवा घेत, आपल्याला काही सापडतंय का हे मी पाहत होतो. त्याच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रांमध्ये एका पत्राची झेरॉक्स प्रत आढळली. मी ते तीनपानी पत्र वाचलं. किती धक्कादायक प्रकार आपल्याकडे सुरू आहे आणि त्याची जाण एवढ्या छोट्या मुलाला आहे, असं ते पत्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं. जे या लहान मुलाला कळतं ते शिक्षण विभागाला कळत नसेल का असाही प्रश्न मला त्यानंतर पडला.

नचिकेतनं ते पत्र नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांना लिहिलं होतं. ‘कॉपीमुक्त परीक्षा’ हा पॅटर्न परदेशी यांनी त्यांच्या काळात राबवला होता. ते तिथून गेल्यानंतर परत मागच्यासारखेच घाणेरडे प्रकार परीक्षेदरम्यान काही प्रमाणात तिथं सुरू झाले होते व ते पाहून नचिकेतला चीड आली होती. घरात वडील शिक्षण खात्यात अधिकारी, आई शिक्षिका...त्यामुळे हा विषय घरात चर्चिला जायचा. नचिकेतच्या त्या पत्राची त्या वेळी खूप चर्चा झाली होती.
‘मुलांची बदललेली मानसिकता; त्याला कारणीभूत असलेलं शाळेतलं वातावरण, ‘तू हेच बनलं पाहिजेस, तू हेच वाचलं पाहिजेस,’ असं
आई-वडिलांकडून मुलांवर सतत टाकलं जाणारं दडपण यामुळे
चांगलं ‘टॅलेंट’ असूनसुद्धा मुलं वैफल्यग्रस्त-निराशाग्रस्त होतात. कुठल्याच परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात उरत नाही...’
नचिकेत त्याचे विचार व्यक्त करत होता...
नचिकेतचे वडील केशव मेकाले म्हणाले : ‘‘शिक्षणातला गोडवा हरवत चालला आहे. मुलांना स्वातंत्र्य राहिलं नाही आणि त्यातून त्यांची गळचेपीही होते. ‘तू इतकेच गुण मिळवले पाहिजेस,’ असं जेव्हा पालक मुलांना सांगतात तेव्हा ते मुलांवर दडपण आणत असतात. तिथून त्यांची गळचेपी व्हायला सुरवात होते.’’
नचिकेतच्या आई नंदिनी म्हणाल्या : ‘‘ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप ‘टॅलेंट’ आहे; पण त्यांच्यात आत्मविश्वास नाही. गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास हरवला आहे. शासनाच्या वतीनं उचललं जाणारं पाऊल, एकूण परिस्थिती, उराशी बाळगलेलं स्वप्न यांतून त्यांच्या हाती काही लागणं कठीण होऊन जातं.’’

नचिकेतचे आई-वडील मला जे काही सांगत होते ते सकारात्मक बदल कसे केले जाऊ शकतात याबद्दल. कदाचित हीच सकारात्मकता नचिकेतमध्येही उतरली असावी आणि त्यातूनच त्यानं पहिलीपासून ते आतापर्यंत पंचाण्णव टक्‍क्‍यांचा आकडा कधीच सोडला नाही.
घरात होणारे संस्कार, शाळेत होणारे संस्कार, त्या संस्कारांना पालकांकडून किती प्रमाणात मोकळीक मिळते यावर मुलं फुलतात. नचिकेतच्या बाबतीत हे चांगल्या प्रकारे घडलं आहे.
नचिकेतला आयएएस व्हायचं आहे ते पगार आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नव्हे, तर ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षण मिळावं यासाठी. तो जे काही ठरवेल तसा तो नक्की बनेल असंच दर्शवणारं त्याचं बोलणं-वागणं-साधेपणा होता.
नचिकेतनं त्याची कादंबरी माझ्या हातात ठेवली आणि तो माझ्या पाया पडण्यासाठी जवळ आला. त्याला तसं करू न देता मी त्याला आलिंगन दिलं आणि म्हणालो : ‘‘खूप मोठा हो. जे. के. रौलिंग यांच्या ‘हॅरी पॉटर’च्याही पुढची झेप तू लेखनात घे आणि ते लेखन तुझ्या हातून मराठीतून होऊ दे.’’
नंतर मी त्याला म्हणालो : ‘‘तुझ्या या पुस्तकावर तुझी सही दे मला!’’ यावर त्यानं त्याच्या आईकडे, मग वडिलांकडे आणि मग बहिणीकडे पाहिलं. त्याला तिघांकडूनही काही उत्तर आलं नाही. परत त्यानं आईकडे बघितलं आणि माझ्या हातातलं पुस्तक घेऊन त्यावर आपला ‘ऑटोग्राफ’ दिला!
सही करून झाल्यावर मी त्याला विचारलं : ‘‘तू मध्येच थबकलास का? आणि शेवटी आईकडे बघून सही का दिलीस?’’
तो म्हणाला : ‘‘मी जे करतोय ते बरोबर आहे की नाही हे मला माझ्या आईच्या डोळ्यात दिसतं!’’
***

नचिकेतचा निरोप घेतला आणि मी निघालो. मुलं चांगली घडतात, बनतात त्याच्या मागं घरचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते वातावरण नचिकेतला मिळालं आहे. घरी आल्यानंतर मी कादंबरी वाचली. कादंबरीत दोन विश्वं होती. एक आपली दुनिया आणि दुसरी ती दुनिया. पहिल्या विश्वात नचिकेत हा सुशांत, इशांत, अनोज, ओंकार, शुभम्‌, सिद्धार्थ, अभिनव या मित्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करतो आणि ते प्रयोग अफलातून असतात. म्हणजे मुक्तपणे जंगलात संचार करून, मुक्तपणे समुद्रात विहार करून तिथले बारकावे आणि सगळं चकित करून सोडणारं काल्पनिक भावविश्व या पहिल्या भागात मांडण्यात आलं आहे. आपल्या दुनियेतून नचिकेत जेव्हा दुसऱ्या दुनियेत प्रवेश करतो तेव्हा तिथं त्याला रॉबर्ट, स्टाईन फोर्स्ड्‌, किंगो, स्क्रिशो बक्‍शी, आर्किल मिश्‍की असे मित्र भेटतात. तिथं असणाऱ्या एका दुष्ट माणसाचा हे सगळे मिळून पराभव करतात. जिथं जिथं वाईट पद्धती आहेत, वाईट शक्ती आहेत त्या संपवण्याचा प्रयत्न कादंबरीच्या दोन्ही भागांमध्ये केलेला आहे. या कादंबरीतल्या नायकासोबत असणारी तनिष्क आणि ऋग्वेदिका ही दोन पात्रं कमालीची खिळवून ठेवतात. प्रत्येक मुलाला आवडेल असं ‘मटेरिअल’ मुलांच्याच भाषेत आणण्याचं, ते टिकवून ठेवण्याचं काम नचिकेतनं केलं आहे.
***

या कादंबरीला आकार देण्याचं काम प्राचार्य सावंत सरांनी केलं आहे. मराठवाड्यातल्या अनेक बालसाहित्यिकांना उभं करण्याचं आणि त्यांच्या लेखणीला बळ देण्याचं कामही सावंत सरांनी केलं आहे.
या विषयांच्या अनुषंगानं मी त्यांना भेटलो. ते म्हणाले : ‘‘हा मुलगा मराठीतला मोठा साहित्यिक होईल. कल्पनाविश्व उभं करण्याची त्याच्यातली ताकद अद्भुत आहे. ‘गूढ गोष्टींचं रहस्यमय जग’ ही एक फॅंटसी आहे. बाल-कुमारांना अद्भुतरम्यता फार आवडते.’’
नचिकेत हाच या फॅंटसीचा नायक आहे. बुद्धी, ताकद आणि हिंमत यांचा त्रिवेणीसंगम या नायकात झालेला आहे. त्याची मित्रमंडळीही कल्पक आहेत. सुष्ट प्रवृत्तीनं दुष्ट प्रवृत्तीवर मिळवलेला विजय हा या कथेचा मध्यवर्ती आशय. या फॅंटसीत नचिकेतनं अफलातून कल्पनांसह त्याचं स्वप्न गुंफलं आहे. या फॅंटसीत जसं नचिकेतचं स्वप्नरंजन आहे तशीच त्याची दूरदृष्टीही तीत दिसून येते.
कुमारवयाची जी गरज असते ते साहस, ते शौर्यही या कथेत आहे.

आपण राहतो त्या वास्तव जगाशिवाय आणखीही एक जग असतं. ते अद्भुतरम्य असतं, नानाविध चमत्कृतींनी भरलेलं असतं.
त्या जगात जलपरी आहे, फिनिक्‍स आहे, महाकाय धबधबा आहे, मनोहारी निसर्गसौंदर्य आहे, जादूई प्रयोग आहेत, जादूच्या वस्तूंची दुकानं आहेत, कार्टूनसारखी दिसणारी विचित्र माणसं आहेत, हवेत तरंगणारी पुस्तकं आहेत, पुस्तकांत व्हिडिओ आहेत, युनिकॉर्न नावाचा घोड्याच्या आकाराचा पक्षी आहे, जादूची छडी आहे, जादूची अंगठी आहे, तरंगत्या गाड्या आहेत, इथल्या घराचं छत उघडलं जातं, भिंती गायब होतात. या फॅंटसीची भाषा खास आजच्या कुमारांची भाषा आहे. या कथेत विज्ञानाचं आणि चमत्कारांचं बेमालूम मिश्रण आहे, एक रोमहर्षक नाट्यही आहे. नचिकेतच्या रूपानं मराठी बालसाहित्याला एक हीरो गवसला आहे, असं मला वाटलं.
सामान्यतः प्रौढ व्यक्ती ज्या विश्वात प्रवेशच करू शकत नाहीत, अशा रोमांचकारी विश्वाची सफर नचिकेतनं वाचकांना घडवली आहे. आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या अंगानं पाहिल्यास ही एक अस्सल कलाकृती आहे. नाट्यमय घटनांनी, प्रसंगांनी भरलेली ही फॅंटसी खिळवून ठेवते.

या कादंबरीवर ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियातून माझ्याशी भाष्य केलं होतं त्यात बालसाहित्यिक नामदेव माळी हेसुद्धा एक होते. माळी सरांशी मी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणाले : ‘‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसा हा प्रकार आहे. दहावीला असलेला एक मुलगा इतकं छान लेखन करू शकतो यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. ग्रामीण भागात आमचं खरं टॅलेंट आहे.’’

एका दहावीच्या मुलानं कादंबरी लिहिली, ती कादंबरी उत्कृष्ट आहे, त्याने जगावेगळा प्रयोग केलाय, असा हा विषय अजिबात नाही. विषय त्यापलीकडचा आहे, तो म्हणजे एखाद्या दहावीच्या मुलाला ‘मी हॅरी पॉटरसारखी कादंबरी दोन महिन्यांत लिहू शकतो,’ असा आत्मविश्वास येण्याचा. विषय आहे ठरवून दिलेल्या वेळेत ते काम त्यानं पूर्ण केल्याचा आणि त्याहीपलीकडे जाऊन, यासारखेच मी अनेक विषय पुढं निर्माण करणार आहे, या नचिकेतमध्ये आलेल्या आत्मविश्वासाचा. परीक्षेचं आणि अपेक्षांचं ओझं वाहून आपलं जगणं खुजं करून बसलेल्या त्या प्रत्येक मुलाला ‘आपण नचिकेत व्हावं’ असं वाटतं; पण त्यांना यश मिळत नाही. त्याचं कारण, त्यांच्या भवतालच्या वातावरणात असलेला खुजेपणा, त्यांच्या आई-वडिलांच्या मानसिकतेमध्ये असलेला खुजेपणा हेच आहे. मराठीत हॅरी पॉटरसारखंच काहीतरी घडावं याची कल्पना खडकमांजरीसारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या नचिकेतला सुचून त्याची अंमलबजावणी होते, ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. ज्यांना मराठीतला हॅरी पॉटर बनायचं आहे असे अनेक ‘नचिकेत’ गावागावात आहेत.
प्रश्न एवढाच आहे की आता आपण त्यांच्यावर फुंकर कशी घालतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com