'बापा'सोबत मिळालेलं 'घरपण' (संदीप काळे)

संदीप काळे sandip98868@gmail.com
Sunday, 14 July 2019

नागपूरच्या उदयनगर भागात "विमल-आश्रम' नावाचा अनाथाश्रम आहे.
रेड लाईट एरियातली मुलं, टाकून देण्यात आलेली मुलं आणि विशेषत: दगडाच्या खाणीत काम करणारी जी मंडळी आहेत त्यांची मुलं या अनाथाश्रमात राहतात, शिक्षण घेतात...
या आश्रमाविषयी आणि तो समर्पित भावनेनं चालवणारे रामभाऊ इंगोले यांच्याविषयी...

नागपूरच्या उदयनगर भागात "विमल-आश्रम' नावाचा अनाथाश्रम आहे.
रेड लाईट एरियातली मुलं, टाकून देण्यात आलेली मुलं आणि विशेषत: दगडाच्या खाणीत काम करणारी जी मंडळी आहेत त्यांची मुलं या अनाथाश्रमात राहतात, शिक्षण घेतात...
या आश्रमाविषयी आणि तो समर्पित भावनेनं चालवणारे रामभाऊ इंगोले यांच्याविषयी...

मुंबईत असणारे पोलिस अधिकारी, मित्र मनोजकुमार शर्मा यांना काही कामानिमित्त भेटायला गेलो होतो. शर्मा हे सेवाभावी म्हणून सर्वपरिचित आहेत. गप्पा झाल्यावर शर्मा यांच्या मोबाईलमध्ये मी त्यांचे काही जुने फोटो पाहत होतो. एका फोटोत शर्मा हे त्यांच्या पत्नीसोबत एका लग्नात कन्यादान करत असताना दिसले. मला आश्‍चर्य वाटलं. यांना कुठं एवढी मोठी मुलगी आहे, असा प्रश्न मला पडला. शंका उपस्थित केल्यावर त्यांनी मला सारा प्रकार सांगितला.

नागपूरमध्ये एका अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलीचा विवाहसोहळा आयोजिण्यात आला होता. त्या सोहळ्यात कन्यादानाची जबाबदारी शर्मा पती-पत्नीनं सर्व कर्तव्यांसह पार पाडली होती. त्या वेळचा तो फोटो होता. त्या लग्नाच्या पत्रिकेवर "प्रेषक' म्हणून शर्मा यांचं नाव होतं. त्यांनी मला त्या अनाथाश्रमाविषयीची बरीच माहिती दिली. त्यांनी सांगितलेले किस्से शहारे आणणारे होते. त्या अनाथाश्रमाविषयी बोलताना ज्या रामभाऊ इंगोले यांच्याविषयी शर्मा यांनी मला सांगितलं त्या इंगोले यांना भेटावं, त्यांचं काम जवळून पाहावं आणि ते काम जगालाही दाखवावं असं सारखं वाटत होतं. त्यातूनच नागपूरला जायचं ठरवलं. त्या दिवशी शर्मा यांचा निरोप घेताना रामभाऊंचा नागपूरमधला पत्ता मी घेऊन ठेवला.
***

नागपूरला उतरलो. जिथं रामभाऊ इंगोले (संपर्क: 8669329662, ई-मेल आयडी: vimlashram@yahoo.co.in) यांचं काम चालतं तिथं जाऊन पोचलो. घरासमोर छान रांगोळी काढलेली होती. आत गेलो. घरातली सगळी मुलं काहीतरी करण्यात दंग होती. कुणी चित्र काढत होतं, कुणी टीव्ही पाहत होतं. किचनमधून खास विदर्भातल्या रश्‍शाचा वास येत होता. किचनमध्ये रविवारचा बेत शिजत असावा. मी येणार असल्याची पूर्वकल्पना रामभाऊंना दिलेली होती. जसा घराच्या बाहेरचा टापटीपपणा जाणवत होता, तसा तो घरातही होता. घर एकमेकांच्या आधारावर आणि घरातल्या मोठ्या माणसांच्या संस्कारांवर उभं राहतं, हे घरातल्या एकूण वातावरणावरून लक्षात येत होतं. काही वेळानंतर रामभाऊ आले. खरं तर त्यांच्याविषयी जितकं ऐकलं होतं त्यापेक्षा रामभाऊ कितीतरी साधे होते. शर्मा यांच्याव्यतिरिक्त नागपूरमधल्या काही मित्र-मैत्रिणींनी रामभाऊंविषयी मला भरभरून सांगितलं होतं ः "एक स्वतंत्र चळवळ चालवणारा माणूस, अतिशय मोलाचं-महत्त्वाचं काम करणारा माणूस.'

""गप्पा मारू; पण अगोदर जेवण करू,'' रामभाऊंनी आपुलकीनं आग्रह केला. आम्ही पंगतीत जेवायला बसलो. रामभाऊंचा जवळपास सगळाच इतिहास मला इकडून-तिकडून कळला होताच; पण हा सगळा गाडा चालवताना होणारी ओढाताण रामभाऊ कशी सहन करतात, हे मला जाणून घ्यायचं होतं. भविष्यात या सगळ्या पीडित मुलांसाठी त्यांचं "बापपण' कायम कशा प्रकारे राहणार आहे? "रामभाऊ नावाची चळवळ' पुढं अनेक मुलांच्या पालकत्वातून कशी सुरू राहणार आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला जाणून घ्यायची होती. महाराष्ट्रात खूप मोठमोठे सामाजिक प्रयोग अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी सुरू केले खरे; पण पुढं त्या प्रयोगांना लाभणारं "बापपण' समोर आलंच नाही. त्यामुळे हे प्रयोग आहेत तिथंच थांबले आणि अखेर लयाला गेले. रामभाऊंकडून मला अनेक विषय समजून घ्यायचे होते. रामभाऊंनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अगदी संयमानं आणि शांतपणे दिली. सन 1980 पासूनचा सगळा प्रवास त्यांनी माझ्यासमोर उलगडला. रामभाऊंसारखं काम केलेली खूप कमी माणसं महाराष्ट्रात असतील, हे जाणवलं. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर त्यांच्या एवढ्या मोठ्या कामाची कुठंही नोंद कशी घेतली गेली नाही, हे आश्‍चर्यच म्हणावं लागेल.
***

वर्ष ः 1980. स्थळ ः नागपूरचा गंगा-जमुना भाग. वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या या रेडलाईट एरियावर बुलडोझर फिरवण्यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनात नागपूरच्या या रेड लाईट एरियाचा थरकाप झाला. जांबुवंतराव धोटे यांच्यासारखी अनेक दिग्गज मंडळी या उपेक्षित महिलांच्या मागं ठामपणे उभी होती. हे आंदोलन अनेक दिवस सुरू होतं. रामभाऊ हेसुद्धा उपेक्षितांच्या बाजूनं होते. रेड लाईट एरियामध्ये एका महिलेकडून राखी बांधून घेण्यासाठी रामभाऊ गेले होते. तिथं त्यांनी त्याच महिलेचं एक मूल सोबत घेतलं आणि त्याला शिकवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पुढं हळूहळू रामभाऊंनी या मुलासारखी अनेक मुलं एकत्रित केली आणि त्यांना शिकवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. सुरवातीच्या काळात रामभाऊंकडं पाठवण्यासाठी कुणी मुलं द्यायला तयार नसायचं; पण जेव्हा अगोदरच्या मुलांचा निकाल चांगल्या पद्धतीनं यायला लागला तेव्हा मुलांची संख्या आपसूक वाढायला लागली. आता आपण या मुलांसाठी आयुष्य पणाला लावायचं आणि यांना शिकवायचं, असं रामभाऊंनी त्यानंतर ठरवलं. सुरवातीच्या काळात रामभाऊंचं हे काम पाहून त्यांना नातेवाइकांनी वाळीत टाकलं. मुलांना घेऊन राहण्यासाठी त्यांना कुणी भाड्यानं घर द्यायला तयार होईना. शाळेत, गावात, समाजात या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी रामभाऊंना मोठा संघर्ष करावा लागला. अनेक वेळा हा संघर्ष पोलिस ठाण्यापर्यंतही पोचला.

वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या वस्तीकडं माणसं "पुरुषी' नजरेनं पाहतात. रामभाऊंनी मात्र या वस्त्यांकडं माणुसकीच्या "दृष्टी'नं पाहिलं. त्या वस्त्यांच्या माध्यमातून भविष्यात घडणारी चांगली माणसं निर्माण झाली पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून - खिशात एक रुपयाही नसताना- रामभाऊंची सन 1980 पासून सुरू झालेली ही लढाई आजपर्यंत सुरू आहे. स्वत:च्या माणसांनीच रामभाऊंना वाळीत टाकलं, तिथं समाजाला काय नावं ठेवायची? ज्या रामभाऊंनी आख्खं आयुष्य पीडित मुलांसाठी दावणीला बांधलं होतं त्या माणसाचा सगळा इतिहास, मागच्या सगळ्या खाणाखुणा जेव्हा मी जवळून पाहिल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की रामभाऊंविषयी बोलणारी माणसं ही त्यांच्याविषयीच्या आकसातूनच बोलतात. असो. मी रामभाऊंचं एकूण काम घेऊन समजून घेण्यासाठी पुढं पुढं सरकत होतो.

नागपूर शहरात असणाऱ्या उदयनगर भागात रामभाऊंचा "विमल-आश्रम' हा प्रकल्प आहे आणि दुसरा प्रकल्प नागपूरपासून 25 किलोमीटरवर पाचगावला आहे. दोन्ही ठिकाणी मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणावर शाळेत आणि निवासीही आहेत. शासनाची नव्या पैशाचीही मदत न घेता त्या दोन्ही ठिकाणी चालणारं काम नोंद घेण्यासारखं आहे. रेड लाईट एरियातली मुलं, टाकून देण्यात आलेली मुलं आणि विशेषत: दगडाच्या खाणीत काम करणारी जी मंडळी आहेत त्यांची मुलं अशा तीन वर्गवारींतली मुलं रामभाऊंच्या आश्रयाला येतात. अशी मुलं शोधून त्यांना "घरपण' मिळवून देण्याचं काम करणारी एक टीम कार्यरत आहे. पुढच्या वर्षी रामभाऊंच्या चळवळीची चाळिशी पार पडणार आहे. या 40 वर्षांत मागं वळून पाहताना रामभाऊंकडं प्रत्येक दिवसाची एक नवी यशोगाथा आहे. किती मुलं आली याचा आकडा त्यांना सांगता येणार नाही आणि मीही त्यांना तो विचारला नाही; पण हजाराच्या घरात हा आकडा गेला नसेल तरच नवल! कुणी डॉक्‍टर झालं, कुणी इंजिनिअर झालं, कुणी स्वत:चा उद्योग सुरू केला...अनेक मुला-मुलींच्या डोक्‍यावर लग्नाच्या शुभेच्छांची फुलं टाकताना "आपण बापाचं कर्तव्य पुरं केलं,' अशी रामभाऊंची कर्तव्यपूर्तीची आनंदपूर्ण भावना होती. अशी कितीतरी उदाहरणं. ही मुलं शिकली, मोठी झाली, चांगल्या कामाला लागली, त्यांनी चांगला संसार उभा केला यापेक्षा त्यांना समाजात चांगलं स्थान मिळालं, समाजानं त्यांना स्वीकारलं हे रामभाऊंच्या लेखी जास्त मोलाचं-महत्त्वाचं आहे. या मुलांची काळजी वाहण्यात, त्यांची देखभाल करण्यात अडथळा येऊ नये यासाठी रामभाऊंनी स्वतःचा संसार मांडण्याचा मोह टाळला व ते अविवाहित राहिले. लग्नानंतर आपल्याला मुलं-बाळं झाल्यावर या मुलांच्या प्रेमात अडसर येऊ नये, या मुलांकडं दुर्लक्ष होऊ नये हा त्यामागचा हेतू.
आज रामभाऊंचं पालकत्व घेऊन मिरवणारी मुलं पाहून रामभाऊंच्या चळवळीचं चीज झाल्याचं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं.

रामभाऊ म्हणाले ः ""मी अनेकांना सोबत घेऊन एक छोटंसं काम सुरू केलं. तेव्हाचं छोटं काम आता खूप वाढलंय. माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांनी मिळून समाजाच्या एका खितपत पडलेल्या वर्गाला बळ देण्यासाठी पावलं उचलली. मला आता भविष्याची चिंता नाही. माझ्या पश्‍चातही या कामाला हातभार लावणारे अनेक निःस्वार्थी बांधव पुढं येतील आणि माझं हे काम सुरू ठेवतील. आताही जेव्हा मला मदतीची गरज असते, जेव्हा मुलांच्या पोटाच्या खळगीचा प्रश्न येतो, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा मदत करणारे अनेक जण धावून येतातच. चांगल्या कामासाठी कुणीही मदतीसाठी "नाही' म्हणत नाही, असं मला वाटतं. फक्त तुमचं चांगलं काम सुरू आहे, हे लोकांना कळलं पाहिजे.''

-माझ्याशी बोलताना रामभाऊ सतत हातात काहीतरी काम घेऊन बसत होते. पूर्वीचे आल्बम्स, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या, शासकीय स्तरावर सतत फसव्या स्वरूपात दिली गेलेली आश्वासनं हे सारं मी पाहत होतो. आजही रामभाऊंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ कुठंही बसत नाही अशी अवस्था आहे. मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या कामाला देणाऱ्यांचे हातसुद्धा सढळपणे पुढं आले पाहिजेत; पण तसं होत नाही. त्यामुळे रामभाऊंसोबत काम करणाऱ्या अनेक नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना तिथं राहणाऱ्या शेकडो मुलांच्या उद्याच्या भाकरीचा प्रश्न भेडसावतोय हे खरं आहे. रामभाऊंना मात्र याची चिंता नाही.

"आमच्याकडं आलेला एकही मुलगा गेल्या 39 वर्षांत उपाशी राहिलेला नाही किंवा शिक्षणापासून वंचित राहिलेला नाही,'' हे रामभाऊ मोठ्या अभिमानानं सांगतात.
रामभाऊंकडून मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, जी मला लोकांना सांगता येऊ शकणार नाहीत. जोडू पाहण्याऐवजी मोडू पाहणारं शासन, फसवेगिरीची आश्वासनं देणारी अनेक राजकीय मंडळी यांचा वीट इथंही येणं अगदी साहजिकच होतं; पण कुणालाही दोष न देता सतत पुढं जात राहणं हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून रामभाऊंची चळवळ पुढं चालली आहे आणि चालतच राहील. एवढी भक्कम चाकं या चळवळीची आहेत.
***

मी नागपूर सोडलं. सगळ्यांचा निरोप घेतला. "यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हीच आपली काशी आणि हीच आपली पंढरी', असं माझ्या मनाला सतत वाटत होतं. सामाजिक आधाराच्या मदतीसाठी रामभाऊंच्या चळवळीनं कधी कुणासमोर पदर पसरला नाही. त्यासाठी जिथं गरज पडली तिथं रामभाऊंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली; पण आर्थिक मदतीसाठी त्यांना लोकांसमोर पदर पसरावा लागतोच. त्या पदरात दान टाकणारे दाते अलीकडं कमी होत आहेत हा भाग वेगळा. रामभाऊंसारखी माणसं आपल्याकडं खूप कमी आहेत. आपल्याला "रामभाऊ' बनता येणार नाही, रामभाऊंसारखं समर्पित वृत्तीनं काम करता येणार नाही, रामभाऊंसारखं एखाद्या कामावर आयुष्य ओवाळून टाकताही येणार नाही; पण रामभाऊंची ही चळवळी जिवंत ठेवण्यासाठी मात्र आपण नक्कीच हातभार लावू शकतो आणि तेच खूप महत्त्वाचं आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sandip kale write Vimal Ashram bhramti article