जागा भरणे आहे... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

कॉलेजचं आवार गर्दीनं फुलून गेलं होतं. बहुतेक उमेदवारांचे चेहरे तणावात होते. एखादी गाडी आल्यावर प्राध्यापक त्या दिशेला धावायचे. मुलाखत घेण्यासाठी आलेले एक्स्पर्ट गाडीतून ऐटीत उतरायचे. गर्दीकडं पाहत ‘आता तुमचं भविष्य आमच्या हातात आहे’ असा चेहरा करून रुबाबात इमारतीकडं निघायचे. मागोमाग संस्थेचे विश्वस्त एकेक करत येऊ लागले. बहुतेकजण मावळतीकडं झुकलेले होते. अनेकांना तर दुसऱ्याच्या आधारानं चालावं लागत होतं. शेवटी मराठी विभागप्रमुख बाई संथ चालीनं दाखल झाल्या. त्या निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी प्राध्यापकांचं निवृत्तीचं वय दोन वर्षांनी वाढल्याचा जीआर आला. त्यात बाईंसह अनेकांनी पुन्हा बाळसं धरलं. ‘बाईंनी वाचलेली मराठीतली एक आख्खी कादंबरी दाखवा आणि हजार रुपये घेऊन जा,’ अशा पैजा अनेकांनी लावल्या होत्या. ही पैज आतापर्यंत कुणीही हरलेलं नाही असं त्यांच्या बाबतीत बोललं जाई. त्यांना पाहताच ‘चला आत’ असं शिपाई गर्दीकडं बघत ओरडला. विषयवार, जातवार विभागणी झाली. नेहमीप्रमाणे ओपनवाले जास्त होते. मुलाखती सुरू झाल्या. आम्ही दाटीवाटीनं हॉलच्या बाकड्यावर बसलो. बरेचजण चिंतेत होते. एकानं प्रकाशित झालेले सर्व लेख, पुस्तकं, मासिकं पिशवीत भरून आणली होती. ती भली मोठी पिशवी त्यानं लहान बाळासारखी पोटाशी धरली होती. एक मध्यमवयीन बाई मन लावून कसलं तरी पुस्तक वाचून तयारी करत होत्या. मला फारशी फिकीर नव्हती. मी स्थानिक असल्यानं जाहिरात आल्यापासून मी याचा-त्याचा संबंध काढून संस्थाप्रमुखांना व विश्वस्तांना भेटलो होतो. ‘तुम्हाला आडवं कोण येणार? तुमच्यासारखी माणसं तर हवीच आहेत’ असं म्हणून बहुतेकांनी मला शब्द दिला होता. मुळात माझ्या रूपात जागा भरली गेल्यानं त्या आशावादी, केविलवाण्या गर्दीकडं मी सहानुभूतीनं पाहत होतो. तेवढ्यात शेजारचा म्हणाला : ‘‘मी रात्रभर प्रवास करून इथं पोचलो आहे. थेट विदर्भातून. जाईन तिथं आधीच जागा भरून ठेवलेल्या असतात. फक्त तांत्रिकदृष्ट्या मुलाखतीचा फार्स केला जातो आणि यात बळी म्हणून नेहमी आमच्यासारख्यांचा वापर होतो. क्वचित काम झालंच तर पैसे मागितले जातात. आता तर सातव्या वेतन आयोगामुळे ‘रेट’ भलताच वधारलाय. तुम्हाला द्यायला एवढे पैसे असते आमच्याकडं तर आम्ही व्यवसाय-धंदाच नसता का केला ? किडनी घेत असतील तर तयारी आहे आपली.’’
मी म्हणालो : ‘‘ही संस्था वेगळी आहे. संस्थाप्रमुख व इतर सारे सज्जन आहेत. ते गुणवत्तेला प्राधान्य देतात. त्यात तुम्ही पीएच.डी. ना?’’
तो म्हणाला : ‘‘आजकाल कुणीही पीएच.डी. होतोय हो. लिहून देणाऱ्यांची दुकानं जोरात सुरू आहेत. आता जेमतेम बुद्धीचा कुणीही पीएच.डी. कसा होतो याचंच संशोधन करण्याची वेळ आली आहे अन् तुमच्या डिग्र्यांना चाटतोय कोण? जास्त हुशार माणसं संस्थेला तापदायक ठरतात. मेंढ्यांच्या कळपात एखादी शेळी पुरे. साऱ्याच शेळ्या नि बकरे झाले तर कळप नियंत्रणात राहत नाही. त्याचा त्रास गुराख्याला होतो. जाऊ द्या. हे आमचं रडगाणं नेहमीचंच आहे. आतापर्यंत मी पन्नास ठिकाणी इंटरव्ह्यू दिले असतील. घरच्यांना वाटतं, हा नुसता जातो आणि काळं तोंड घेऊन परत येतो. हाच माठ्या असणार! शेवटी काल आई-बाप रानात गेल्यावर मी एकाकडून उसने पैसे घेऊन गुपचूप निघून आलो.’’

मला त्याचं जास्तच वाईट वाटलं. त्याला अंधारात ठेवू नये म्हणून मी म्हणालो : ‘‘बहुतेक माझं काम झालेलं आहे. साऱ्या विश्वस्तांनी मला शब्द दिलाय. माझ्या बारा कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. शिवाय, मी पीरिअड घ्यायला लागलो ना, तर इतर विषयांची पोरंसुद्धा येऊन बसतील वर्गात.’’
तो हसत म्हणाला : ‘‘हे तुमचं स्वतःचं मत आहे. हेच संस्थेचं असलं तर बरं होईल.’’
मी म्हणालो : ‘‘अहो, इथल्या मराठी विभागाची पार रया गेलीये. एक प्राध्यापक व्यसनी झालेले आहेत, तर दोन प्राध्यापक रोज भांडत असतात. एकमेकांची जिरवण्यासाठीच आपल्याला वेतन मिळतं असं त्या दोघांना वाटतं जणू. बाईंना तर मस्टरवर सही करण्याचाही कंटाळा आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची स्ट्रेंग्‍थ कमी झाली आहे. अशा स्थितीत मला नव्हे तर या कॉलेजला माझी गरज आहे.’’
तो निव्वळ हसला.
आम्ही बोलत असतानाच माझं नाव पुकारलं गेलं. मी सारं बाड घेऊन आत्मविश्वासानं आत गेलो. एक्स्पर्ट ओळखीचेच होते. त्यांनी तोंडभरून हसत स्वागत केलं. समितीचे अध्यक्ष म्हणाले : ‘‘आम्ही बापड्यांनी तुमच्यासारख्या प्रतिभावंतांना काय विचारावं! मी तर तुमचं बरंच साहित्य वाचलेलं आहे.’’
बाई म्हणाल्या : ‘‘मीसुद्धा!’’
तेव्हा माझी खात्रीच झाली की यांनी कुणीच माझं काही वाचलेलं नाही. तेवढ्यात चहा आला. मलाही आग्रह झाला. मी प्रसन्न मनानं बाहेर पडलो. मुलाखती संपल्यावर विदर्भवाला जवळ येत म्हणाला :
‘‘नेहमीप्रमाणे बळी जायलाच आलो होतो! मात्र, अर्जाचे पाचशे रुपये घेतात तर संस्थेनं निदान नाश्ता तरी द्यायला नको का?’’
मी हसलो तसा तो म्हणाला :‘‘तुम्हाला माझी मागणी क्षुद्र वाटली असेल; पण मी काल दुपारी घरून निघताना जेवलो आहे. आता फक्त परतीच्या प्रवासाचे पैसे खिशात आहेत. येतो.’’
मी हळूच खिसा चाचपला आणि त्याची नजर चुकवत म्हणालो : ‘‘या’’
***

मित्राचा जमीनखरेदीचा व्यवहार होता. तो म्हणाला : ‘‘नोंदणी कार्यालयात जाऊन येऊ.’’ त्याच्याबरोबर गेलो.
माझ्याबरोबर मुलाखतीला असलेले, संस्थेवर काम झालेले एक प्राध्यापक मला तिथं भेटले. मला पाहून चाचरले. मी मोकळ्या मनानं त्यांचं अभिनंदन करत विचारलं :‘‘इकडं काय काम काढलंत?’’
ते हळू आवाजात म्हणाले : ‘‘चार एकर जमीन दुसऱ्याच्या नावावर करून द्यायचीये. त्यासाठी आलो होतो. येतो.’’
माझी नजर दूर पार्किंगकडं गेली. तिथं संस्थाप्रमुखांची गाडी रुबाबात उभी होती.
# # #

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com