मायेचे डबे... (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 11 ऑगस्ट 2019

आम्ही पाच मित्र एका खोलीत राहत असू. तशी आमच्या गावातली खूप मुलं शहरात शिकण्यासाठी राहत होती. रोज सकाळी एसटीनं आमच्या जेवणाचे डबे यायचे. ते आणण्यासाठी आम्हा मित्रांच्या पाळ्या ठरलेल्या असत. ठरलेला वार आल्यावर ज्याची पाळी असेल त्यानं लवकर सायकल काढायची आणि स्टॅंडवर डबे आणायला जायचं. आमच्या पाच मित्रांत एकच सायकल होती. डबे गोलाकार आणि पत्र्याचे असत. त्यांच्या झाकणावर ‘पाठवणार’ म्हणून वडिलांचं किंवा भावाचं नाव आणि ‘घेणार’ म्हणून आमचं नाव रंग वापरून लिहिलेलं असे. दोन दोन डब्यांच्या जोड्या सुतळीनं बांधून पुढं सायकलच्या नळीला आणि एक डबा मागं कॅरिअरला लावून डबे खोलीवर आणले जायचे.

आम्ही पाच मित्र एका खोलीत राहत असू. तशी आमच्या गावातली खूप मुलं शहरात शिकण्यासाठी राहत होती. रोज सकाळी एसटीनं आमच्या जेवणाचे डबे यायचे. ते आणण्यासाठी आम्हा मित्रांच्या पाळ्या ठरलेल्या असत. ठरलेला वार आल्यावर ज्याची पाळी असेल त्यानं लवकर सायकल काढायची आणि स्टॅंडवर डबे आणायला जायचं. आमच्या पाच मित्रांत एकच सायकल होती. डबे गोलाकार आणि पत्र्याचे असत. त्यांच्या झाकणावर ‘पाठवणार’ म्हणून वडिलांचं किंवा भावाचं नाव आणि ‘घेणार’ म्हणून आमचं नाव रंग वापरून लिहिलेलं असे. दोन दोन डब्यांच्या जोड्या सुतळीनं बांधून पुढं सायकलच्या नळीला आणि एक डबा मागं कॅरिअरला लावून डबे खोलीवर आणले जायचे. त्या वेळी बहुतेकजण तोंडं धुऊन सज्ज असायचे. डबे आल्यावर गोलाकार बसायचे. आपापले डबे सोडायचे.

माझ्या डब्यात काचेची बरणी असे. त्यात आई दूध किंवा पातळ भाजी पाठवायची. गव्हाची पोळी क्वचितच येई. बहुतेकदा बाजरीच्या भाकरीच असत. कारण, आमच्या कोरडवाहू जमिनीत बाजारीशिवाय चांगलं काहीच पिकत नसे. डबे उघडल्यावर पहिलं काम म्हणजे भाकरीचे पातोडे (पापुद्रे) चाचपून पाहायचे. कधी कधी वडिलांचा डोळा चुकवून आई त्यात रुपया-दोन रुपयांची नोट गुपचूप पाठवत असे. नोट सापडेल त्याचा चेहरा ‘खुल जा सिम सिम’वाल्या अलिबाबासारखा चमकून जायचा! बऱ्याचदा डब्यात वडिलांची चिठ्ठी येई. तीत ‘नीट अभ्यास कर’, ‘कॉलेज बुडवत जाऊ नकोस’ अशा सूचना असत. त्या चिठ्ठीचं सामूहिक वाचन होई. वडिलांचा तो उपदेश कानावरून मनात झिरपवणारा एखादाच असे. मग त्या चिठ्ठीला उत्तर म्हणून ‘अभ्यास जोरात सुरू आहे. पैसे संपले आहेत. शंभर रुपये पाठवून देणे.’ असं उत्तर धाडलं जाई. मग नंतर बरेच दिवस चिठ्ठ्या येणं एकदम बंद होई! कधी कधी एखादा मित्र दुसऱ्याच्या डब्यात ‘उद्या कॉलेजची ट्रिप जाणार आहे. शिरा-पुरी करून पाठवणे’ अशी चिठ्ठी टाकून द्यायचा. दुसऱ्या दिवशी त्याच्या डब्यात आलेल्या
गोडाधोडावर मग सगळेच ताव मारायचे. आज आपल्याला हे पदार्थ आले कसे हे मात्र त्या मित्राला शेवटपर्यंत समजत नसे. एकदा या चिठ्ठीप्रकरणावरून चांगलीच गंमत झाली. मंग्याला ‘हजर दिवस’ भरले नाहीत म्हणून कॉलेजनं परीक्षेला बसू दिलं नव्हतं. त्याचे वडील गावाकडं पायजमे, सदरे असं शिवणकाम करत असत.

‘आजचा पेपर कसा गेला?’ अशी चिठ्ठी ते रोज डब्यातून पाठवत. त्यावर ‘कालच्यापेक्षा आजचा सोपा होता’ अशी लोणकढी थाप मारून मंग्याही रोज चिठ्ठी पाठवून त्यांना धीर देत असे. काही दिवसांनी मंग्याच्या डब्यात एक व्यवस्थित शिवलेली प्लास्टिकची पिशवी आली. आम्ही उत्सुकतेनं ती उघडली. सुरवातीला मंग्यानं वडिलांना पाठवलेल्या खोट्या चिठ्ठ्या बाहेर आल्या...नंतर कॉलेजनं मंग्याच्या वडिलांच्या नावे पाठवलेलं पत्र दिसलं. ‘तुमच्या मुलाला परीक्षेला बसू देण्यात आलेलं नाही,’ असं ते पत्र होतं. नंतर कागदाचा एक छोटा कपटा निघाला. त्यावर मंग्याच्या वडिलांनी लिहिलं होतं : ‘उद्यापासून डबा बंद. भीक मागून खा.’ नंतर बरेच दिवस चारच डबे येत होते. मंग्या आमच्यात संपादला जाई. शेवटी तो गावाकडं जाऊन वडिलांच्या भरपेट शिव्या खाऊन आला तेव्हा कुठं त्याच्या खाण्याचे वांधे मिटले! कधी कधी संध्याकाळपर्यंत भाजी विटून जात असे. बाजरीच्या भाकरीचेही तुकडे पडत. मग आम्ही चौकात असलेल्या भज्यांच्या गाडीवर जायचो. सगळी गिऱ्हाइकं जाऊन सामसूम व्हायची वाट पाहायचो. भज्यांच्या थाळीत शेवटी फक्त भुगा उरलेला असे. भजीवाला आम्हाला तो सारा भुगा एक रुपयात देऊन टाकायचा. खोलीवर पुन्हा पंगत बसायची. भाकरीचे तुकडे अन् भज्यांचा कुरकुरीत भुगा. चेष्टा-मस्करी करत उदरभरण व्हायचं. रात्री भूक लागू नये म्हणून आम्ही भरपूर पाणी प्यायचो. एखाद्या मोठ्या हॉटेलात बसून सुग्रास अन्न खाणारेही इतके हसत-खेळत मजेनं जेवत नसतील! बाहेरून सुख-सुविधांचे कितीही धबधबे कोसळून उपयोग नसतो, आनंदाचे झरे मनातूनच फुटलेले असावे लागतात.
***

आम्हाला दिवसभर पुरेल इतका डबा देण्यासाठी आई भल्या पहाटे उठत असे. गाडी निघून गेली तर लेकरू उपाशी मरेल, अशी धास्ती वाटून तिच्या मनात रोज पहाटे मायेचा गजर वाजत असेल. अंधारतोंडीच गावातल्या चुली पेटत. लाकडी काठवटीत भाकऱ्यांचा थपथप आवाज सुरू होई. एकदा मार्तंडची आई डबा करायला पहाटेच उठली. घरासमोर रचून ठेवलेल्या सरपणाच्या मोळीत तिनं अंधारातच हात घातला. तेव्हा तीत लपलेल्या काळ्याकभिन्न इंगळीनं तिला डंख मारला. ‘पोरगं उपाशी राहू नये’ म्हणून तिनं त्या असह्य वेदना सोसत भाकरी थापल्या. त्या वेळी मार्तंड खोलीवर गाढ झोपलेला होता. डबा भरून दिल्यावर ती बेशुद्ध पडली. हे कितीतरी वर्षांनी समजलं तेव्हा मार्तंड लहान मुलासारखा हमसून हमसून रडला. त्याचं रडणं पाहायला मात्र आई नव्हती. (आई-बापांनी खाल्लेल्या खस्ता बहुतेकांना वेळ निघून गेल्यावर समजतात. तेव्हा मात्र ओंजळीत पश्चात्तापाशिवाय काहीही शिल्लक नसतं). प्रत्येकाची आई असं काही जीवघेणं सोसत मुलांची काळजी घेत होती. डबा भरल्यावर वडील तो स्टॅंडवर घेऊन येत. जीवघेणी थंडी असो वा मुसळधार पाऊस, वडिलांचा नित्यनेम कधी चुकत नसे. एसटीच्या टपावरून असे शंभरेक डबे येत. ते उतरवून घ्यायला इकडं मुलं सज्ज असत. पोटाची सोय लागल्यावर बाकी साऱ्या गोष्टी गौण वाटत. आता हे सारं आठवल्यावर, आपणही आई-बाबांसारखं लवकर उठायला हवं होतं आणि पीरिअडला जायला पाहिजे होतं असं वाटतं. नंतर पीरिअड्स कायमचे संपले. गावी गेलो. काय करावं म्हणून झोप येत नाही तेव्हा अस्वस्थ चेहऱ्यावर नकळत कुणाचा तरी हात फिरतो. आयुष्यभर डबे करून, दिवसभर रानात राबलेला तो खरबरीत हात मायेचा मऊसूत स्पर्श देऊन जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article