esakal | चौकोनी तुकड्यातला आनंद... (संजय कळमकर)
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay kalamkar

चौकोनी तुकड्यातला आनंद... (संजय कळमकर)

sakal_logo
By
संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com

फोडणीचा झणझणीत वास नाकाशी रेंगाळल्यावर मी बायकोला म्हणालो : ‘‘आज काहीतरी झकास बेत दिसतोय. मस्त वास आला.’’
ती म्हणाली : ‘‘डोक्याबरोबरच आता नाकही दाखवून घ्या तुमचं. मी आज कोरडं बेसन केलंय.’’
नंतर माझ्या लक्षात आलं, हा वास समोर राहणाऱ्या माने यांच्या फ्लॅटमधून येतोय. अपार्टमेंटमध्ये ही गंमतच असते.


सकाळी-संध्याकाळी साऱ्याच बायका एकाच वेळी स्वयंपाकाला लागल्यावर संमिश्र वास दरवळतात आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्याचा आनंद मिळतो. तो तोंडाऐवजी नाकाला मिळतो एवढंच! फक्त याच बाबतीत नाही, तर शेजारच्या फ्लॅटचं दार कुणी वाजवलं तर आजूबाजूच्या साऱ्याच फ्लॅटमधले रहिवासी घाईघाईनं उठतात आणि दरवाजे उघडतात. टीव्हीचंही असंच. बरं, मोठ्या आवाजातली एकच सीरियल सुरू असेल तर काही नाही; पण कुणाकडं बातम्या, कुणाकडं कार्टून असे सारे आवाज एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि जत्रेच्या गलबल्यात येऊन पडल्याचा विचित्र वैताग येतो.

मिश्रा यांच्या घरात तर कायम हिंदी डब्ड् सिनेमे सुरू असतात. त्यामुळे त्यांची मुलंच नाहीतर मिश्रासुद्धा जिने चढताना-उतरताना, चालताना उड्या मारत चालतात. अध्येमध्ये भिंतींना ठोसेही मारतात. एखाद्या दिवशी ते तमिळ हीरोसारख्या उंचावरून फरशीवर उड्या मारून फरशीची वाट लावतील की काय असं आम्हाला वाटत राहतं. अपार्टमेंटच्या सभोवताली टाकलेले ब्लॉक आधीच
निम्मे-अर्धे फुटून गेलेत. पार्किंगच्या फरश्याही खचू लागल्या आहेत. याबाबतीत मागच्या मीटिंगमध्ये मी सर्वांना सावध केलं...‘या फरश्या अशाच खचत राहिल्या तर एक दिवस संपूर्ण अपार्टमेंट जमिनीत गाडलं जाईल. ते थेट शंभरेक वर्षांनी हडाप्पासारखं उत्खननात सापडेल. पुरातत्व खात्याला काम मिळण्याआधी सावध व्हा!’
मात्र, सार्वजनिक कामं कुणी चटकन मनावर घेतील तर शपथ. फक्त बिल्डरच्या नावानं बोटं मोडण्यापलीकडं कुणी काही करत नाही. बिल्डर इमारत बांधून अंतर्धान पावतात. ‘उंबराचं फूल’ सापडेल पण ते सापडत नाहीत. आमचा बिल्डर तर एकदम कविमनाचा. आम्हाला इमारतीचं महत्त्व पटवून देताना त्यानं सांगितलं : ‘‘या इमारतीपासून पुढं गर्द झाडी सुरू होते. तीत मोर आहेत. सकाळ-संध्याकाळ त्यांची केकावली ऐकू येते. हरणांची लोभस कुटुंबं आहेत. शिवाय, ही जागा उंचावर असल्यानं तुम्हाला डोंगरावर राहिल्याचाही फील येईल. पश्चिमेकडून मंद वारा येऊन घरभर पसरेल. सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून कोवळं ऊन्ह थेट किचनमध्ये प्रवेश करेल. आग्नेयेकडच्या गॅलरीत गेलात तर दत्ताचं मंदिर दिसेल. नैर्ऋत्येच्या खिडकीतून दूरवर सरपटणारी आगगाडी दिसेल. लोणावळ्यात उंचावर घरं बांधणाऱ्यांना तरी यापेक्षा वेगळं काय दिसतं?’’ बिल्डरचं हे ‘कवित्व’ वर्षभर टिकलं. नंतर आजूबाजूचं रान ‘स्वच्छ’ होऊन तिथं बिल्डिंगा उगवल्या. मोराच्या केकावलीऐवजी भटक्या कुत्र्यांचं भुंकणं कानावर पडू लागलं. जागा उंचावर असल्यानं पाणी कमी दाबानं मिळू लागलं. सगळ्या बाजूनं बिल्डिंगा होऊन आमच्या इमारतीला मांजराच्या पिलासारख्या लुचल्या. त्यामुळे गाळीव वारा वाट्याला येऊ लागला. बाहेर पडल्यावरच तो काय सूर्यप्रकाश दिसू लागला. आग्नेयेकडच्या गॅलरीत उभं राहिल्यावर, शेजारी नवीनच झालेल्या इमारतीची भिंत नाकाला लागते की काय अशी भीती वाटून, डोळ्यांआड झालेले मंदिरातले दत्तगुरू आठवू लागले. हरणं तर दूरच, आम्हाला फसवून बिल्डरनं ‘फसवणं’ म्हणजे ‘हरणं दाखवणं’ हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरवला. शिवाय, जाताना आम्हा रहिवाशांत भांडणंही लावून दिली. ज्याला गाडीच नाही अशा पोंक्षेंना प्रवेशद्वाराशी असलेलं मुख्य पार्किंग विकलं आणि भविष्यात आपण कधीतरी गाडी घेऊ या आशेनं त्यानंही ती घेऊन ठेवली. त्या जागेवर कुणी गाडी लावली की रणकंदन सुरू होतं. सुदैव हे की पोंक्षे चादर-गादी घेऊन विकतच्या पार्किंगमध्ये येऊन झोपत नाहीत. बिल्डर पार्किंग असं विकू शकतो का यावर आम्ही पार्किंगमध्ये बसून नेहमी खल करतो. पार्किंगमध्ये सूचनाफलक लावलेला आहे. आमच्या इमारतीतली दोन-तीन खट्याळ पोरं त्यावर लिहिलेल्या सूचनांचं विडंबन करतात. ‘मीटिंग करू या’चा ‘चीटिंग करू या’ असा विपर्यास करण्यात त्यांना आनंद मिळतो.
***

स्वतंत्र बंगल्यात चोऱ्या होतात, एकटं वाटतं म्हणून फ्लॅटच बरा असं म्हणून समाधान करून घेतलं जातं; परंतु जागेचे भाव गगनाला भिडल्यानं हा पर्याय स्वीकारल्याचं कुणी सांगत नाही. ‘भल्या मोठ्या इमारतीत हे काडेपेटीतल्यासारखे राहतात’ असं कुणी म्हणत असेल तर त्याला खुशाल म्हणू द्यावं. अशी कोण कुठली, वेगवेगळ्या
जाती-धर्माची, भिन्न स्वभावाची माणसं - भलेही नाइलाजानं का होईना - गुण्यागोविंदानं राहतात, सर्वधर्मसमभाव पाळतात, भांडणंसुद्धा कुजबुजत करतात? विशेष म्हणजे, तांदळात खडा असावा तसा प्रत्येक इमारतीत एकतरी बिलंदर स्वभावाचा माणूस असतोच. त्याचा विक्षिप्तपणाही सारे सहन करतात. सायंकाळी सारे म्हातारे पार्किंगमध्ये एकत्र येऊन भूतकाळाचं सलाईन टोचून घेत गप्पा मारतान दिसतात. महिला स्लॅबवर गेट टूगेदर करून आनंद मिळवतात. आजच्या विस्कळित कुटुंबव्यवस्थेच्या या काळात अपार्टमेंट जणू एखाद्या विशाल कुटुंबाप्रमाणे आनंदानं राहते.

loading image
go to top