आनंदाची गर्दी (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

तुम्हाला जगातल्या प्रत्येक नमुन्याचा माणूस पाहायचा असेल, तर बसस्थानकावर तासभर फिरा; पण फिरताना आपल्याला कुणी नमुना म्हणून पाहत नाही ना याची काळजी घ्या. स्थानकावरच्या गर्दीनं अनेकांचा जीव मेटाकुटीला आलेला असतो; पण पाहणाऱ्याला दृष्टी असेल, तर त्याला तिथल्या अनेक गंमती जाणवतील आणि पाहिजे ती एसटी येईस्तोस्तर वेळ कसा भुर्र्कन निघून जाईल.

खेड्यातल्या बायबापड्या मोकळ्या जागी पिशव्या, इतर सामान आणि पोरं-सोरं घेऊन बसतात. अचानक एसटी आल्यावर पोरगं आधी उचलावं, की सामान यात त्यांची त्रेधा उडते. आलेली प्रत्येक एसटी आपलीच आहे असं समजून त्यांची अविरत धावपळ सुरू असते. त्या गर्दीत एखादा दांडगा दाढीवाला बोकड, सलूनचं दुकानं शोधत असल्यासारखा स्वतःच्या मस्तीत फिरत असतो. मार्गात आडवं येईल, त्याला आपल्या खास आखूड शिंगानं तो ढुसण्या देतो. जंगलात फिरणाऱ्या वनराजाप्रमाणं त्याची ऐट असते. कोपऱ्यात एखादा मत्त पोळ स्वतःचं अंग चाटत उभा असतो. कोपऱ्यात कॉलेजातल्या मुलींचा एक ग्रुप आपण कुठंच पाहत नाहीत असं दाखवत, सभोवार पाहत उभं असतं. आजकाल चेहरा झाकण्याची फॅशन असल्यानं त्यांना कुणी पाहू शकले नाही, तरी त्या निर्धोकपणे सर्वत्र पाहू शकतात. त्यांच्या अवतीभोवती येनकेनप्रकारे स्वतःचे अस्तित्व दाखवीत तरुणांच्या टोळ्या फिरत असतात. एखादा डोलकाठीसारखा हडकुळा तरुण निरुद्देश हसत, तोंडावर हात फिरवीत उभा असतो. तर काहीजण विनोद वगैरे झाला असं दाखवत गुलचट हसून, एकमेकांना टाळ्या देत स्वतःकडं लक्ष वेधण्याचा प्रयोगात गुंतलेले असतात. डचमळणाऱ्या गर्दीत एखादा चांगल्या कपड्यातला जंटलमन स्वतःचं अंग चोरून उभा असतो. ‘खरं म्हणजे मी विमानाच्या प्रवासाच्या लायकीचा आहे, परंतु चुकून एसटीसाठी आलोय,’ असा त्याच्या चेहऱ्यावरचा भाव असतो. त्याच्या त्या ऐटबाज नजरेचं मात्र तिथं कुणालाही कौतुक नसतं. आत बाकडा-बाकडावर तर खूप माणसं बसलेली असतात. जांभया देणारी, लवंडलेली, झोपलेली, झोपणाऱ्यांकडं पाहत जागी असणारी- त्यात प्रवासी, भिक्षेकरी, स्त्रिया, पोरं, विक्रेते, दारुडे, खिसेकापू, मवाली. त्यांना शोधणारे पोलिस, असे पुष्कळ. काही प्रवासी वर्तमानपत्रं वाचण्यात, तर बहुतांश मोबाईलवर रममाण झालेले असतात. स्पीकरवर अजिबात कळणार नाही, अशा गूढ आवाजात गाड्यांचं वेळापत्रक सांगण्याचं काम सुरू असतं. त्यात मध्येच काहीतरी संगीत लागून अगम्य जाहिरातींचा मारा प्रवाशांच्या डोक्यावर कोसळत असतो. एसटी आल्यावर त्या गर्दीत समुद्रात लाटा उसळाव्यात तशा माणसांच्या लाटा उसळतात. कंडक्टर खाली उतरून शिटी वाजवत एसटी मागं घेतो. गुळाची ढेप गुंडाळलेल्या गोणपाटाच्या छिद्राशी मुंगळे गोळा व्हावेत, तसे प्रवासी एसटीच्या दरवाजाशी गोळा होतात. हातात असेल नसेल ती टाकाऊ वस्तू खिडकीच्या गजातून आत टाकून, अनेकांची सीट रिझर्व्ह करण्याची घाई सुरू असते. मागच्या संकटकाळी दरवाजाचा उपयोग ‘गर्दीकाळी’ म्हणून सुरू झालेला असतो. एसटी गर्दीचा लचका तोडते आणि पसार होते. बाकीची गर्दी ती जखम भरून काढते. हे कुठल्याही शहरातल्या बसस्थानकाचं रूप असतं.

त्याउलट परिस्थिती छोट्या गावातल्या स्थानकांची असते. दिवसभरातून एक-दोन एसट्या ये-जा करणारी ही स्थानकं शांत असतात. तिथं घाई अशी कुणालाच नसते. एसटी दिसल्यावर आपल्याला घेतल्याशिवाय ती जाऊच शकत नाही अशा खात्रीनं प्रवासी डुलतडुलत तिच्या दिशेनं निघतात. कंडक्टर तोपर्यंत दरवाजा उघडून ठेवतो. गाडी निघण्याच्या बेतात असतानाच कुणीतरी प्रवासी दूरवरून हात हलवत पळत येताना दिसतो. एकंदर खेड्यात असी सारी संथ गंमत असते. आमचं गाव मात्र शहर आणि खेडं यामध्ये कुठंतरी रेंगाळणारे आहे. आमच्या गावच्या स्थानकावर पूर्वी फारशी गर्दी नसायची. एक-दोन चहाची छोटी हॉटेलं आणि मध्येच झुडूप उगवल्याप्रमाणं सलूनची एखाददुसरी लाकडी टपरी दिसायची. गफूरभाईंच्या हॉटेलात वर्तमानपत्र यायचं. त्यातले अभिनेत्रींचे मादक फोटो असलेली रंगीत पुरवणी वाचणारे गायब करायचे. म्हणून पुरवणी येईल त्या दिवशी गफूरभाई लगबगीनं ती लपवून बाकी वर्तमानपत्र वाचण्यासाठी सार्वजनिक करायचे. स्थानकावर गोल थाळ्यात भेळ विकणारे भेळवाले मात्र भरपूर होते. त्यांच्याकडं काळ्या रंगाची मोठी गोल थाळी असायची. त्यात शेव, मुरमुरे, छोट्या पातेल्यात मटकी, शेंगदाणे, कापलेला कांदा आणि टोमॅटो असे पदार्थ हारीनं मांडलेले असायचे. एसटी आल्यावर हे भेळवाले खांद्यावर तिपई घेऊन त्या दिशेनं पळायचे. खिडकीशी तिपई उलगडून त्यावर थाळी ठेवत ‘भेळ....घ्या चटकदार भेळ’ अशी हाळी देत प्रवाशांना जागं करायचे. खिडकीतून दोन रुपयांची लाल नोट पकडलेला हात बाहेर यायचा. मग भेळवाला चपळाईनं कागद घेऊन त्यावर मुरमुरे, शेव, कापलेला कांदा, मटकी एकत्र चुरून, त्यावर लाल मिरचीचा तडका मारत, वर शिरोमणीसारखा एखादा टम्म शेंगदाणा टेकवायचा. बहुतेक प्रवासी आमच्या गावातल्या अशा थाळीतल्या भेळीचा आस्वाद घ्यायचे. भेळीबरोबर कैरीची फोड असेल, तर खाणाऱ्याला अजून बहार यायची. एक कैरी आणून दिली, तर भेळीवाला एक भेळ फुकट द्यायचा. म्हणून आम्ही सुट्टीच्या दिवशी कुठूनकुठून कैऱ्यांवर डल्ला मारून त्या भेळीवाल्याला आणून द्यायचो. त्या बदल्यात मिळालेली भेळ घेऊन नदीवर जाऊन खात बसायचो. भेळीबरोबर कैरी असती, तर अजून मजा आली असती असंही वाटून जायचं. नंतर एसट्या आणि माणसांची गर्दी वाढत गेली. त्यात भेळवाल्याचा आवाज हरवून गेला. आता स्थानक हॉटेल्स, पानाचे ठेले, सलूनची दुकानं, रिक्षा, काळ्या-पिवळ्या जिपा, मालवाहू टेम्पो, चेहऱ्यांच्या गर्दीनं बरबटलेल्या फ्लेक्सच्या माऱ्यानं स्वतःचा शांत चेहरा हरवून बसलं आहे. आता याच गर्दीला ‘आनंदाची गर्दी’ म्हणण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com