बायको नावाचं प्रकरण! (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

जिच्याशिवाय पुरुषाला करमत नाही; पण बऱ्याचदा तिचाच अडथळा वाटतो असं एकमेव प्रकरण म्हणजे ‘बायको.’ बायकोविषयीची मतं परीस्थिती आणि व्यक्तीनुसार बदलणारी असतात.

त्यामुळं तिची निश्चित अशी व्याख्या करता येणार नाही; परंतु खाष्ट, कडकलक्ष्मी, खडूस, फटकळ, भांडकुदळ; या उलट प्रेमळ, मायाळू, प्रतीआई अशी तिची अनेक साक्षात्कारी रूपं असतात. अर्थात यातलं तिचं एकच रूप कायम दिसेल असं नाही. नवरोबा दोरीत वागला, तर तीही प्रेमळ आणि मायाळू राहते; पण नवऱ्याच्या वर्तनाची गाडी रुळावरून घसरली, तर मात्र ती रौद्र रूप धारण करते. मग तिला समजावता समजावता पुरुषाच्या नाकीनऊ येतात. आता पुन्हा अशी चूक होणार नाही अशी वरकरणी माफी मागून पुरुष, हे अंगावर आलेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न करतो; पण यापुढं करायचं ते जपून करावं लागेल, असे सावध विचार त्याच्या मनात तरळत असतात. इतकं आकांडतांडव झालं, तरी पुरुषाची मूळ वृत्ती काही बदलत नाही. मग जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही असं म्हणून काही दिवस बायको त्याच्याकडं दुर्लक्ष करते.

काही बायका मात्र नवऱ्याला वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. जणू त्याला सरळ करणं हेच त्यांच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असतं. अशा घराची परिस्थिती कायम धगधगणाऱ्या अफगाणिस्तानसारखी अशांत असते. कधी कधी काही चूक नसताना बिचाऱ्या नवऱ्याची फक्त संशयावरून कणीक तिंबली जाते. मग तो उठतो आणि देवदाससारखा सैरावैरा फिरून पुन्हा फुग्यासारखे गाल फुगवून घरात येऊन बसतो. नवरोबा किती वेळात घरी येणार आहे, याचा बायकोला अंदाज असतो. त्याच्या स्वभावाचे सारे तपशील तिच्याकडं तयार असतात. काही नवरे मात्र बायकोशी भांडणाचा बरोबर फायदा उचलतात. बाहेर मित्रांची टोळी तयारच असते. मस्त पार्टी होते. भांडणाचा असा सकारात्मक उपयोग करणाऱ्या पुरुषांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. घरात सासू-सासरे असतील, तर रोज भांडणाचे लवंगी फटाके फुटत असतात. त्याच्या ठिणग्या मात्र पुरुषांच्या अंगावर उडतात. त्यामुळं तो बऱ्याचदा कातावून जातो. जन्म देणारे आई-वडील आणि पुढं जन्मभर साथ देणारी बायको यांच्यातली कुणाची बाजू घ्यावी हे त्याला जन्मभर कळत नाही. या दोन नात्यांत त्याचं सँडविच होऊन जातं. ज्येष्ठांचे स्वभाव मुलांसारखे हट्टी असतात. ‘सून आपल्याकडं दुर्लक्ष करते, हा ठोंब्या मात्र बायकोला काहीच म्हणत नाही,’ अशी भावना अनेकांच्या मनात असते. अर्थात अशा स्थितीत नवऱ्याची कुचंबणा जाणणाऱ्या तुरळक बायकाही असतात. त्या त्याला समजून घेतात. आधार देतात. सासू-सासऱ्यांना जपलं, तर नवराही खूश राहतो, त्याला मानसिक त्रास होत नाही अशा विचार करणाऱ्या बायकांचाही मोजका वर्ग अस्तित्वात आहे.

वारंवार सांगूनही पुरुषाला रात्री उशीर झाला, तर बायको बराच वेळ दार न उघडण्याचा आनंद घेते. प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून दार किंवा डोअरबेल हळू वाजवणं, दबक्या आवाजात हाक मारणं असे प्रयोग बराच वेळ सुरू राहतात. एवढं करूनही काही कठोर हृदयाच्या बायकांना पाझर फुटत नाही. मग बिचाऱ्या पुरुषाला पडवीच्या भिंतीच्या आधारानं रात्र काढावी लागते. उघडलंच दार तर रात्रीच्या शांततेत युद्धाची ठिणगी पडते. ‘काहीही बोल; पण हळू बोल’ एवढाच नवरोबांचा आग्रह असतो. कारण घरात माझा फार रुबाब आहे, असा गैरसमज त्यानं सर्वत्र पसरवलेला असतो. नवऱ्याचं घरी उशिरा येणं या कारणाबरोबरच मोबाईलवर त्यानं संशयास्पद हालचाली करणं यावरून बहुधा युद्धाची ठिणगी पडते. आपण कितीही वेळ मोबाईलवर वेळ घालू शकतो; पण बायकोनं एक तर मोबाईल वापरूच नये, किंवा अगदीच मोजका वापरावा अशी बहुतेक पुरुषांची इच्छा असते. स्वतःच्या फेसबुकवरच्या फ्रेंड रिक्वेस्टी दणादण स्वीकारताना बायकोनं मात्र इतर पुरुषांच्या रिक्वेस्ट रिजेक्ट कराव्यात, अशी त्याची मनोमन इच्छा असते. एकंदर मोबाइल हा सध्या कुटुंबात सवतीचं काम करताना दिसतो. मोबाईलनं अनेकांच्या प्रपंचात कलीसारखा प्रवेश मिळवून तिथली शांतता ढवळून टाकली आहे. अर्थात घरात नवरा-बायकोची होणारी भांडणं बहुधा लुटुपुटूची असतात. बायको भांडकुदळ असेल, तर नवरोबा अशा युद्धाचा कायम सराव करताना दिसतात. दोघांपैकी एकाला या भांडणांत नमतं घ्यावं लागतं. प्रपंचात भांड्याला भांडं लागतच असतं, अशी बतावणी करून वेळ मारून न्यावी लागते. मात्र, किरकोळ लढाईचं रूपांतर महायुद्धात होऊ देऊ नये. नाही तर त्याचे गंभीर परिणाम सर्वच संबधितांना भोगावे लागतात. ज्ञानप्राप्तीचा मात्र भांडणात चांगला उपयोग होऊ शकतो. ‘शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधला होता, तुम्ही माझ्यासाठी पाचशे स्क्वेअर फुटांचा फ्लॅट तरी घ्या,’ असं बायकोनं समजा म्हटल्यास या विषयावर बायकोशी नीट भांडता यावं म्हणून तरी वाचन असणं गरजेचं आहे.

काही पुरुषांना बायकोला खूश कसं ठेवावं याचं तंत्र जमून गेलेले असते. जेवताना ते स्वयंपाक कसाही असला, तरी बायकोच्या नसलेल्या सुगरणपणाची स्तुती करतात. ‘तुझ्या हातची चव कुणाच्या हाताला नाही,’ असं म्हटलं, तरी तिच्या स्वयंपाकाचा शीण कुठल्या कुठं पळून जातो. याउलट बायको एखाददिवशी फारच गोड बोलली, तर पुरुषांनी सावध व्हावं. दागिन्यासाठी केलेली ती प्रस्तावना असू शकते. मात्र, याउलट पुरुष विनाकारण गोड वागू लागला, तर बायकांनी सावध व्हावं. या गोडव्याखाली एखादं खारट प्रकरण लपवण्याचा त्याचा हेतू असू शकतो. हे काहीही असलं, तरी नवरा-बायकोच्या नात्यात निकोप मोकळेपणा असेल, तर सारं घर कसं आनंदी राहतं. ‘बायको नावाचं प्रकरण’ आनंदानं घेतल्यास, प्रपंचाचं पुस्तक कसं सुरेख होऊन जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com