आमचे ‘ऐतिहासिक’ शिक्षक (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

गुरुजींनी आम्हाला गणित घातलं : ‘‘घराच्या ओट्यावर पाण्यानं भरलेल्या पाच बादल्या ठेवल्या आहेत. त्यातल्या दोन बादल्या सांडल्या, तर शिल्लक किती राहिल्या?’’ सर्वांनी वजाबाकीचं गणित सोडवलं. नाऱ्यानं मात्र गणित न सोडवता उभं राहून विचारलं : ‘‘गुरुजी बादल्या कुणी सांडल्या?’’ तेव्हा ‘‘गणित सोडवायचं सोडून तू दुसऱ्याच पंचायती का करतोस,’’ म्हणून गुरुजींनी त्याला बुकलून काढलं. तरी बादल्या कुणी सांडल्या असतील ही नाऱ्याच्या मनातली शंका काही गेली नाही. मोठा झाला, तरी दरवर्षी बादल्या सांडणारे गुरुजी नाऱ्याच्या लक्षात आहेत. असे येनकेन प्रकारे काहीतरी वैशिष्ट्यं असलेले शिक्षक प्रत्येकाच्या लक्षात राहतात.

गुरुजींनी आम्हाला गणित घातलं : ‘‘घराच्या ओट्यावर पाण्यानं भरलेल्या पाच बादल्या ठेवल्या आहेत. त्यातल्या दोन बादल्या सांडल्या, तर शिल्लक किती राहिल्या?’’ सर्वांनी वजाबाकीचं गणित सोडवलं. नाऱ्यानं मात्र गणित न सोडवता उभं राहून विचारलं : ‘‘गुरुजी बादल्या कुणी सांडल्या?’’ तेव्हा ‘‘गणित सोडवायचं सोडून तू दुसऱ्याच पंचायती का करतोस,’’ म्हणून गुरुजींनी त्याला बुकलून काढलं. तरी बादल्या कुणी सांडल्या असतील ही नाऱ्याच्या मनातली शंका काही गेली नाही. मोठा झाला, तरी दरवर्षी बादल्या सांडणारे गुरुजी नाऱ्याच्या लक्षात आहेत. असे येनकेन प्रकारे काहीतरी वैशिष्ट्यं असलेले शिक्षक प्रत्येकाच्या लक्षात राहतात. त्यातल्या त्यात मारकुट्या शिक्षकांना विसरणं तर केवळ अशक्यच. पूर्वीच्या काळी पालक सांगायचे : ‘‘पोराची चांगली कणिक तिंबून काढा.’’ पालकांचीच परवानगी असल्यानं शिक्षक हुरुपानं काटकोनी पोरांचा ‘सरळकोन’ करून टाकत. शिक्षेच्या अत्यंत अभिनव पद्धती शिक्षकांनी हुडकून काढल्या होत्या. वर्गात भिंतीला खुंट्या ठोकलेल्या असत. हाताची बोटं एकमेकांत गुंतवून गुरुजी पोराला उचलून भिंतीकडं तोंड करून खुंटीला शर्टासारखे टांगून ठेवीत. ‘उद्या पाढा पाठ करून येईन’ अशी खात्री दिल्याशिवाय लटकंती संपत नसे. घरी गेल्यावर झोप किंवा कंटाळा आला, तर घरातली खुंटी पाहून वर्गातली खुंटी आठवे आणि झोप कुठल्याकुठं पळून जाई. पायाचे अंगठे धरायला लावणाऱ्या शिक्षकांना तर रामदेवबाबांच्या आधी योगाचं महत्त्व समजलं असावं. टेबलावर हात उलटा ठेवायला सांगून वरून छडी मारणे, नाक चिमटीत धरून ओढणं, कान रेडिओच्या बटणासारखा पिळणं, उन्हात अनवाणी उभं करणं, मैदानाला फेऱ्या मारायला लावणं अशा शिक्षा देणाऱ्या शिक्षकांना जसे कुणी विसरू शकत नाही, तसे त्यांच्या धाकापायी आम्ही शिकलो अशी कबुलीही अनेकजण देतात.
आम्हाला इतिहास शिकवणारे गुरुजी तर आमच्या पक्के लक्षात आहेत.

शाहिस्तेखानाची फजिती शिकवताना त्यांच्या अंगात वीररस संचारला होता. हातात छडी घेऊन ते वर्गाच्या खिडकीकडे पळाले. जणू खान त्या खिडकीतून उडी मारून पळत होता. त्यांनी सपकन् छडीनं गजावर वार केला. ‘‘अरेरे बोटावर निभावलं’’ असं ते ओरडले, तेव्हा आम्ही खिडकीखाली तुटलेली बोटे पडलीत का ते पाहू लागलो. एकंदर तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. इतिहासाचा प्रत्येक धडा ते अशाच नाट्यमयतेनं शिकवायचे. त्यांची बदली झाली, तेव्हा आम्हाला वाईट वाटलं. नवीन आलेले गुरुजी शांत रसात न्हालेले होते. ते मराठी छान शिकवायचे; पण खरी गंमत यायची इतिहासाच्या तासाला. अफझलखानाबाबतची गोष्ट त्यांनी खुर्चीवर बसून शांतपणे शिकवली. गुरुजींना चढलेली शांतरसाची नशा कधीही उतरली नाही.
माध्यमिक शाळेत आल्यावर तर तास पद्धतीमुळे अनेक शिक्षक संपर्कात आले. गणिताचे सर आमच्या पक्के लक्षात आहेत. गणित आणि इंग्रजीच्या सरांनी कधी हसायचं नसतं असा जणू प्रघातच पडलेला होता. आमच्या गणिताच्या सरांचा चेहरा मात्र नेहमी सुटलेल्या गणितासारखा हसरा असे. आम्हाला कंटाळा आला, की ते छान छान कविता म्हणून दाखवत. त्यांचा आवाज गोड होता. ते सुरेल चालीत कविता म्हणत. याउलट मराठीच्या सरांचा कुठल्याच चालीशी काहीही संबंध नव्हता. त्यांचा आवाज घोगरा असल्याने नाजूक भावनेच्या कविताही ते संतापून गात. मग मुलं हसत. त्यामुळे कविता शिकवल्यानंतर ‘तुम्हीच चाल लावा आणि म्हणा’ असं ते सांगत. मुलं म्हणत : ‘‘गणिताचे सर कविता छान गातात.’’ मग मराठीचे सर संतापत. एका शिक्षकापुढे दुसऱ्याची स्तुती करू नये हे त्या वेळेस आम्हाला कळत नसे. त्यामुळं मराठीच्या सरांचा गणिताच्या सरांशी छत्तीसचा आकडा असा गणिती संबंध तयार झाला होता. गणिताच्या सरांनाच मराठी विषय का दिला जात नाही ते आम्हाला समजत नसे; पण आपल्याकडे ज्याला ज्यात आवड नाही तेच त्याला दिलं जाण्याची प्रथा कसोशीनं पाळली जाते. आमचे एक हेडमास्तर मात्र छडी घेऊन पोलिसांसारखे कायम पडवीत फिरते राहत. कुणी तावडीत सापडलं, तर नुसतीच छडी उगारत ‘मारू का मारू’ ओरडत त्याला नुसतच घाबरून सोडीत. या प्रयोगात एखादं पाचवी-सहावीचं लहान पोरगं रडायला लागलं, तर ते स्वतःच घाबरून ‘‘अरे गंमत केली. घाबरायचं नसतं,’’ म्हणून त्याची समजूत घालत. कॉलेजला आल्यावर शिक्षकांच्या शिकवण्यापेक्षा त्यांच्या राहणीमानाकडे जास्त लक्ष जाई. हे लक्षात घेऊन काही प्राध्यापक शिकवण्यापेक्षा राहणीमानाकडंच जास्त लक्ष देत. कँटीनपेक्षा ग्रंथालयात रमणारे प्राध्यापक छान शिकवत. एका प्राध्यापकांना ‘पिरिअड घ्या,’ असं म्हणालो, की ते म्हणत : ‘‘आज मला मूड नाही.’’ दुसऱ्या दिवशी ते म्हणत : ‘‘चला, मला पिरिअड घ्यायचाय.’’ मग आम्ही म्हणत असू : ‘‘आज आम्हाला मूड नाही.’’ तिसऱ्या दिवशी आम्हाला दोघांनाही मूड नसे. एखादे दिवशी दोघांनाही मूड असे; पण तो नेमका ‘रविवार’ असे. हे मूडी प्राध्यापक संस्थाप्रमुख आल्यावर मात्र त्यांच्या सेवेला तत्पर असत. त्यामुळं प्राचार्यही त्यांना दबकून असत. आमच्या मराठीच्या प्राध्यापकांच्या तासाला मात्र इतर वर्गातली मुलंही येऊन बसत. शिकवताना मराठी लेखकाचे दाखले, ‘कविता’, ‘विनोद’ कथा सांगून ते अध्यापनात कमालीची रंजकता आणत. डस्टरऐवजी हातानं फळा पुसणारे ते वर्गाकडे जाताना खडू मेलेला उंदीर चिमटीत पकडावा तसा पकडत. तसंच वर्गात शिरताना हळूच पर्समधील आरशात डोकावणाऱ्या एक प्राध्यापिका, त्या उलट अत्यंत साध्या राहून मुलांवर आईप्रमाणं प्रेम करणाऱ्या अनेक शिक्षिका अजूनही स्मरणात आहेत. आयुष्यात एखादी घटना घडली आणि तिला आपण समर्थपणे तोंड दिलं, तर शिक्षकांची आठवण येते. अन् मग लक्षात येतं : ‘अरे, अमुक गुरुजींनी तर ही गोष्ट आपल्याला तेव्हाच सांगितली होती. आज त्या शिकवणीचा उपयोग झाला.’ नकळत आपले गुरुजी शिकवणीच्या रूपात आपल्याबरोबर अदृश्यपणे वावरत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article