दिवाळी गावाकडची... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

‘दिवाळीला फटाके आणायचे’ असा धोशा मी लावल्यावर बाबांचा चेहरा एकदम भुईनळा पेटल्यासारखा झाला. खूपच हट्ट धरल्यावर गालावर आणि पाठीवर दोन-चार फटाके वाजले, तशी आई जवळ घेऊन म्हणाली : ‘‘का सणासुदीचं मारता हो माझ्या लेकराला?’’

बाबा म्हणाले : ‘‘आपल्या गावातला तो गावडे लावत असतो ना फटाकड्यांचं दुकान...या कार्ट्याला तोवर दम नाही. शहरात जाऊन फटाकडे आणणं परवडतं का?’’
बाबांच्या तोंडाची वात अशी पेटली की आम्ही भावंडं फुसक्या फटाक्यासारखे फुसफुसत बसायचो.
गावडेनं गेल्या वर्षी गावातल्या चौकात फटाक्यांचं दुकान लावलं होतं. दुकान म्हणजे काय तर रस्त्यावर पोतं टाकून तो फटाके विकायला बसायचा. गिऱ्हाईक पाहिल्यावर त्याच्या तोंडाची वात जी पेटायची ती समोरच्यानं फटाके खरेदी केल्याशिवाय विझतच नसे. गेल्या वर्षी गावडेकडून घेतलेले निम्मे फटाके आवाज न करता नुसतेच सापासारखे फुस्कारत उडालेले आम्हाला आठवले. ‘हे रॉकेट घेऊन पाहा...पेटवून दिल्यावर थेट चंद्रापर्यंत जाईल! तुम्हाला दिसणारच नाही...’ असं सांगून गावडेनं आख्ख्या गावाला रॉकेट्‌स विकली होती. आम्ही ते काचेच्या बाटलीत उभं करून पेटवलं व आकाशात उत्सुकतेनं पाहिलं. आधी वाटलं, गावडेनं सांगितल्यानुसार, ते अत्यंत वेगानं चंद्रावर जाऊन पडलं असावं आणि म्हणून आम्हाला दिसलं नसावं. मुळात, ते बाटलीतच फुस्स करून मेल्यासारखं पडून राहिलं होतं!

दिवाळीच्या त्या दिवसांत आमच्या गावावर एकही रॉकेट उडालेलं आम्हाला दिसलं नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. गावडेची फटाक्यांची उधारी कुणीही दिली नाही. मात्र, बाबा एके दिवशी कुठल्या तरी कामानिमित्त शहरात गेले तेव्हा त्यांनीच पिशवीभर फटाके आणले. भांडणं नकोत म्हणून ते आम्हा तिन्ही भावंडांना वाटून दिले. आम्हा भावंडांत फटाक्यांची चोरी व्हायची म्हणून मी ते ज्वारीच्या पोत्यामागं लपवून ठेवायचो. अशी मोठी मजा असायची तेव्हा. माध्यमिक शाळेत गेलो तेव्हा थोडी समज यायला लागली आणि फटाक्यांचा हट्ट करणं मी सोडून दिलं. कुणी जास्त फटाके वाजवत असल्यावर त्याच्या शेजारी जाऊन उभं राहायचं आणि आनंद लुटायचा, असं मी करू लागलो. याशिवाय, एखाद्यानं मोठी लड पेटवून दिल्यानंतर तीत न वाजलेले फटाके शोधायचे...ते वेचून दुसरीकडं घेऊन जाऊन वाजवायचे...असंही मी आणि गावातली इतरही अनेक मुलं करायची.
‘ज्याच्या घरासमोर फटाक्यांच्या ‘चिंध्या’ जास्त तो श्रीमंत’ असं तेव्हा समजलं जायचं. मात्र, आजकाल कर्ज काढून (आणि ते कायमचं बुडवून) मजा करायची सवय वाढल्यानं खरं श्रीमंत कोण आहे ते समजतच नाही.

दिवाळीत नव्या कपड्यांची खरेदी पैसे उपलब्ध होतील तशी व्हायची. कपडे गावातच घेतले जायचे. कारण, ते उधार मिळायचे.
दिवाळी जवळ आल्यावर आई वेगवेगळ्या डाळी दळून आणायची. लाडू बांधायला तर आख्खं घरदार बसायचं. घराघरातून खमंग तळणाचा संमिश्र वास दरवळायचा आणि हा वास गल्लीतल्या वाटसरूलाही मोहवायचा! कधी लाडू टणक होऊन दातांना आव्हान द्यायचे...कधी शेव चावताना दाभाड दुखायचं...कधी गुलाबजामची भट्टी बिघडून त्यांच्या खारका व्हायच्या...कधी चकली तुटता तुटायची नाही...पण हे सगळे पदार्थ बिघडले तरी आम्हाला चविष्टच लागायचे. कारण, त्यात मिसळलेली असायची आईची माया.

आकाशकंदिलाची तयारी तर महिनाभर आधीपासूनच सुरू व्हायची. बांबूच्या लवचिक कामठ्या घेऊन त्यांना चांदणीचा आकार द्यायचा...तयार झालेल्या त्या चांदणीच्या मधोमध पणती ठेवण्यासाठी बांबूचाच बारीक त्रिकोण करायचा...चांदणीच्या आकाराचा हा आकाशकंदील लटकवल्यानंतर तो वाऱ्यानं हलू नये यासाठी वजन म्हणून तळाशी एखादा दगड ठेवायचा...असं ते सगळं असायचं.

दिवाळी अंकांची तर मी मोठ्या आतुरतेनं वाट पाहायचो, त्यातही विनोदी अंक जास्त आवडीचे.
दिवाळी अंकांमधली व्यंग्यचित्रं, कथा, कविता अन्‌ एखादी दीर्घ कादंबरी मनाला-मेंदूला विचारांचा, मनोरंजनाचा फराळ पुरवायची. काही लेखक-कवी अनेक दिवाळी अंकांत दिसायचे. एवढं सगळं हे साहित्यिक कधी लिहीत असतील बुवा अशी शंका मनात यायची. दुसरीकडे दिवाळीच्या आधीच गावातले बलुतेदार खापराच्या पणत्या, लक्ष्मीपूजनासाठीची लक्ष्मी (केरसुणी/झाडणी) आणून द्यायचे.
मातीच्या पणत्या उजळल्यानंतर त्यांतलं तेल पाझरू नये यासाठी आई मातीच्या पणत्या शेणानं सारवून घ्यायची. वर्षातून कधीतरी एकदाच, म्हणजे दिवाळीतच मिळणारे नवे कपडे, गोडधोड पदार्थ, फटाके, उजळलेल्या पणत्या आणि त्यामुळे गावच्या गल्ली-बोळातल्या अंधाराला पडलेली प्रकाशाची छिद्रं...मामाचा गाव, एकत्र येणारे पाहुणे-रावळे...माझ्या लहानपणची गावाकडची दिवाळी ही अशी होती...साधीसुधी; पण निखळ-निर्मळ आनंद देणारी.
पैसे, सुविधा फारशा नव्हत्या; पण घराघरात उजळलेल्या पणत्यांचा स्निग्ध प्रकाश मनामनात पसरायचा. दिवाळी हा सण उजळण्याचा, समाधानाचा असायचा.
***

आता वर्षभर नव्या कपड्यांची खरेदी सुरू असते. सणावाराला घेतल्या गेलेल्या कपड्यांचं काही अप्रूप त्यामुळे वाटत नाही. मिठाईची दुकानं तर जागोजागी उगवलेली. रोज येता-जाता आकर्षक पद्धतीनं रचलेल्या, सजवून ठेवलेल्या मिठायांची ही दुकानं पाहून डोळ्यांबरोबरच जीभही बधीर झाल्यासारखी होते! तऱ्हेतऱ्हेचे नक्षीदार आकाशकंदील दुकानाच्या बाहेर गर्दी करून लटकत असतात...कृत्रिम रोषणाईसाठी हव्या त्या रंगांचं, आकाराचं साहित्य मिळतं...पणत्याही वातीसकट मिळतात...
मित्र सांगत होता : ‘‘लवकरच रिमोटवरच्या पणत्याही मिळू लागतील. तेलबिल नासवायचं नाही! घराभोवती लावलेल्या सगळ्या पणत्या रिमोट दाबल्यावर एकाच वेळी उजळतील..’’

आता कुणीही आणि कधीही फटाके वाजवतं. चौकाचौकात फराळ तयार करून घेण्यासाठी भट्ट्या लागलेल्या आढळतात. एरवी, चुलीसमोर दिसणारी आई आता बाहेर फराळ तयार करून घ्यायला रांगेत उभी असलेली दिसते. पूर्वी सगळे खिसे झाडून निघालेल्या नोटा लक्ष्मीपूजनाला ठेवल्या जायच्या. त्या रात्रभर देवघरात ठेवायची बाबांना भीती वाटे. न जाणो, पणतीमुळे त्या पेटल्या किंवा चोरीलाच गेल्या तर! बाबा रात्रीच कधीतरी उठायचे आणि एकच नोट देवासमोर ठेवून बाकीचे पैसे सुरक्षितपणे जवळ ठेवायचे. त्या पैशांना घामाचा वास असायचा. आता मात्र लक्ष्मीपूजन स्वतःच्या घरात असलं तरी, लक्ष्मी स्वतःचीच असावी, अशी काही अट राहिलेली नाही.
शिवाय, बदलत्या काळानुसार नात्यांचीही गणितं आता बदललेली दिसतात. दूरच्या ठिकाणी असलेले भाऊ दिवाळीला येतील याची शाश्वती नाही. आले तरी ज्या घरात वाढले तेच घर त्यांना गैरसोईचं व परकं वाटतं. गावातली माणसं अनोळखी वाटतात. आताही दिवाळीच्या पणत्या घराघरात उजळतात; पण मनाच्या कोपऱ्यात साकळलेला काळोख मात्र त्या उजाळ्यामुळे विरळताना दिसत नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com