पणत्या लावाव्याच लागतील...! (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

गेल्या चार दिवसांपासून मुलं व पत्नी दिवाळीच्या खरेदीला जाण्यासाठी आग्रह करत होती. ‘उद्या नक्की’ म्हणत दिवस सरकत राहिले. स्वतःची कंपनी असून रावसाहेबांना वेळ मिळेना. कामगारांची बोनसची मागणी जोर धरू लागली होती. एका कंपनीशी मोठा करार होणार होता. ते त्या गडबडीत होते. त्यातच ‘दिवाळीला तरी आम्हाला वेळ द्यावा’ असा धोशा कुटुंबानं लावल्यानं त्यांनी सकाळीच बायकोला व मुलांना फैलावर घेतलं : ‘तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर हवा तेवढा पैसा आहे. कपडे वगैरे खरेदीला मीच कशाला पाहिजे? माझं काय चाललंय ते समजत नाही का?’
त्यांच्या अशा बोलण्यानं मुलाचं-मुलीचं व त्यांच्या आईचं तोंड बारीक झालं. रावसाहेब कामगारांशी बोलणी करण्यासाठी कंपनीत निघून गेले. ते गेल्यावर मुलगी आईला म्हणाली : ‘‘खात्यावर भरपूर पैसा असणं म्हणजे दिवाळी असते का गं आई...? बाकीच्या फॅमिलीज्‌ पाहिल्या का कशा गोळ्यामेळ्यानं खरेदीला जात आहेत...एकमेकांचा सहवास नसलेली अशी कोरडी दिवाळी साजरी करण्यात काय अर्थ आहे?’’ आईकडं उत्तर नव्हतं.
***

कपडे कधी घ्यायचे, म्हणून पोरं मागं लागली होती; पण अजून पगाराचा पत्ता नव्हता. ‘बिल ट्रेझरीत गेलं आहे, उद्या नक्की पगार होणार’ अशा आवया उठत होत्या. पगाराचे पैसे हातात आल्याशिवाय कुठंच जाणं शक्य नव्हतं. सातपुते मित्राबरोबर बाजारात गेला तेव्हा त्याला दोन अधिकारी खरेदी करताना दिसले. यांचे पगार कसे वेळेवर होतात? कर्मचाऱ्यांना काय कुटुंबं नसतात का? पण इतपत विचार करण्याइतकी संवेदनशीलता मुळात कुठंच राहिली नव्हती.
‘पगार झाल्यावर बाजारात जाऊ’ असं लहान मुलांना कसं सांगणार? आपला बाप रोज शर्टिंग करून ऑफिसात जातो, म्हणजे तो कुणी मोठा साहेब असणार असा मुलांचा समज होता. त्यात आपल्याच शेजारी राहणाऱ्या भांगे यानं मोठी खरेदी केली. त्याच्या बायकोनं आपल्या घरी येऊन रसभरीत वर्णन करून ‘ही’ला उंची साड्या वगैरे दाखवल्या. तेव्हापासून गाडं बिघडलं. आता हा भांग्या ऑफिसात काय करतो हे बायकोला कुणी सांगावं? ही गंमतच आहे. प्रामाणिक माणसांपेक्षा लबाड माणसांच्या घरातच पणत्या आधी उजळतात! ते काही असो, आपण स्वच्छ प्रकाशात जगायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा निर्भेळ आनंद मिळतो.
***

‘आमचे हे प्राध्यापक आहेत’ असं ही अभिमानानं सांगते.
पुढच्यांचं ठरलेलं वाक्य, ‘सातवा आयोग मिळाला तेव्हाच तुमची दिवाळी सुरू झाली. आता तुम्हाला या दिवाळीचं कसलं अप्रूप!’ आमची ‘ही’ दुखरं हसत ‘हो, हो’ म्हणते. इतर प्राध्यापकांच्या बाबतीत हे खरं असेल; परंतु दिवाळी साजरी कशी करावी हा आमच्यापुढं मात्र प्रश्न आहे. गेल्या सात वर्षांपासून मी विनाअनुदानित कॉलेजात प्राध्यापक आहे. या पदानं प्रतिष्ठा तेवढी दिली. आर्थिक बाबतीत मात्र ‘शिमगा’ आहे. मराठवाड्यातला आमचा एक प्राध्यापकमित्र संध्याकाळी एका हॉटेलात वेटरचं काम करतो, हे तुम्हाला खोटं वाटेल. कधी कधी कॉलेजातली पोरं-पोरी हॉटेलात पार्टीला येतात आणि सरांनाच ऑर्डर देतात! आमची परिस्थिती वेगळी नाही. फक्त माझ्याऐवजी ‘ही’ घरात शिवणकाम करून हातभार लावते एवढंच. ज्या समाजात शिक्षकांना प्रतिष्ठा नाही त्या समाजाला सुदृढ कसं म्हणावं? अर्थात या गोष्टी नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकवण्यापुरत्या ठीक आहेत. काही प्राध्यापकमित्रांकडून उसने पैसे घेतल्याशिवाय आता दिवाळी होणार नाही. हे सण तरी वारंवार का येतात?
***

सोयाबीन चांगलं जमलं होतं. वाटलं, दिवाळी आनंदात जाणार. अचानक पाऊस आला. त्याच्या आदल्या दिवशी सोयाबीन काढून पेंढ्या बांधून ठेवल्या होत्या. वावरात पाणी साचलं. त्यात पेंढ्या...नव्हे दिवाळी बुडून गेली. पाऊस लहरी झाला आहे. आम्ही शेतकरी त्याच्याशी घट्ट जोडलेलो. आम्ही दिवाळी करायची की नाही ते पाऊस ठरवणार! दरवर्षी त्याचा लहरीपणा वाढत चाललाय. एखाद्याच्या लहारीपणाशी आयुष्य जोडल्यावर काय धडपड करावी लागते ते आम्हालाच माहीत! दोन भाऊ शहरात चांगल्या नोकरीला आहेत. आई-बापांना मी सांभाळतो. भाऊ म्हणतात : ‘त्यांना खेड्याची सवय आहे. शहरात करमत नाही.’ हे कारण बरं आहे. एक भाऊ दिवाळीला येतो. तासभर थांबून जातो. ‘ते खुर्चीसारखे संडास नाहीत म्हणून गैरसोय होते’ असं त्याचं कुटुंब म्हणतं. दुसरा भाऊ पैसे पाठवतो. बहुधा आई-वडील आहेत तोपर्यंत पाठवील. त्याला माया आहे; पण बायको येऊ देत नाही. हे कुणाला सांगण्यात अर्थ नाही. अडचणी सगळ्यांनाच आहेत. आपण त्या मांडून देखण्या करणं मनाला पटत नाही. बाकी बोलायला नको. फक्त भांडवल करण्यासाठी शेतकरी या शब्दाचा उपयोग होतो. आमचे प्रश्न मांडून किती लोकांनी स्वतःची उत्तरं सोडवून घेतली त्याला माप नाही. आमचे प्रश्न मात्र तसेच. पणतीच्या प्रकाशानंही न सुटणारे.
***

कळकट कपडे, वाढलेली दाढी अशा केविलवाण्या अवस्थेत तो रस्ताच्या कडेला भीक मागत बसला होता. दिवाळीची खरेदी करून उलट-सुलट धावणाऱ्या गर्दीचं लक्ष जावं म्हणून वेदनेनं विव्हळत होता. कुणी पैसे टाकत होते, तर कुणी मिठाई. त्याला झोपडी आठवली. कोपऱ्यात ठेवलेल्या चिल्लरीचं पोतं या दिवाळीत नक्की भरेल. मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या; पण त्या दाखवता येणार नव्हत्या. मग भीक कोण देईल? दु:खी दिसून आनंदी राहण्याचा मार्ग त्याला सापडला होता!
***

काही जण सुखात आहेत; पण त्यांना ते दाखवता येत नाही. काहींना दाखवायचं आहे; पण सुख नाही. दिवाळी म्हणजे आनंदक्षण....असं म्हटलंच जातं त्यामुळे आपणही तसंच म्हणायचं. हीच तर खरी जगण्यातली गंमत आहे. सार्वजनिक आनंदात स्वतःच्या अडचणी, वेदना, दुःखं विरघळून टाकायची. पणत्या लावायच्या. त्या प्रकाशात निबिड अंधार काहीसा विरळ होतो. मार्ग दिसतो. नकळत जगण्याचाही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com