बरं झालं वेळेवर आलात... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

आमच्या गावात बेंदूरकर नावाचे एकच डॉक्टर होते. म्हातारपणाकडे झुकलेले, थुलथुलीत, उंचीला कमी...प्रेमळ. गोड बोलायचे. प्रसन्न हसायचे. त्यामुळे पेशंटला बरं वाटायचं.( काही डॉक्टरांचे चेहरे इतके गंभीर असतात की सर्दी झाली तरी आता हे ‘तुम्हाला जीवघेणा रोग झाला आहे,’ असंच आपल्याला सांगतील की काय अशी भीती वाटते. डॉक्टर हुशार असण्याआधी प्रसन्न असावेत असं माझं अवैद्यकीय मत आहे! असो).

‘कुठलाही आजार इंजेक्शन दिल्याशिवाय बरा होत नाही,’ असं डॉक्टर बेंदूरकर यांचं ठाम मत होतं. त्यांना इंजेक्शन भरताना पाहून मला ते रंग खेळण्यासाठी पिचकारीच भरत आहेत असं वाटायचं. त्या वेळी इंजेक्शनची खूप भीती वाटायची. बहुधा इंजेक्शन दिलं जात असताना ते दृश्य जर इंजेक्शन घेणाऱ्याला दिसलं तर त्याला आणखीच भीती वाटेल म्हणून ते पार्श्वभागावर दिलं जात असावं, असा आमचा लहानपणी पक्का समज होता. विशेष म्हणजे, भीती घालवण्यासाठी डॉक्टर इंजेक्शन देताना पेशंटला बोलण्यात गुंतवायचे आणि पटकन इंजेक्शन देऊन मोकळे व्हायचे. मला इंजेक्शन देताना त्यांचा नेहमीचे प्रश्न : ‘‘कितवीला आहेस? तुला कोणते सर आहेत? कोणता विषय आवडतो?’’ इत्यादी.

मी आपला घाबरत उत्तरं द्यायचो. कधी कधी त्यांची ही मात्रा मात्र चालत नसे. गंग्या कधीच शाळेत गेलेला नव्हता...तो इंजेक्शन घ्यायला गेला तेव्हा त्याला डॉक्टरांनी विचारलं : ‘‘कितवीला आहेस?’‘
गंग्या म्हणाला : ‘‘शाळंत नाही जात.’’
तरी डॉक्टरांनी सवयीप्रमाणे विचारलं :‘‘कोणते सर आहेत...? कोणता विषय आवडतो...?’’
यावर गंग्या हसत म्हणाला: ‘‘डाक्तर द्या गपचीप सुई...म्या नाय घाबरत...’’ यावर बेंदूरकरही वरकरणी हसले आणि थोड्याच वेळात गंग्याच्या किंकाळीनं दवाखाना हादरून गेला! त्या काळी बहुधा कुठलाही आजार झाल्यावर घरगुती उपचार होत. नाहीच बरं वाटलं तर दवाखान्यात नेलं जाई. जडी-बुटीनं भरलेला आजीचा बटवा ही जणू औषधोपचारांची पेटीच असायची. ताप आला की आजी कुठल्या तरी झाडाची मुळी उगाळून तिचा लेप कपाळावर लावायची. अंगावर पित्त उठलं तर भेंड्याची (भिंत बांधण्यासाठी पूर्वी वापरली जाणारी मातीची मोठी कच्ची वीट) पांढरी माती अंगभर चोळली जायची. उन्हाळी लागली की बेंबीवर गार पाण्याचं खापराचं छोटंसं मडकं किंवा राखेचा ढेपसा ओला करून ठेवला जायचा. माझे दात किडले तेव्हा आमच्या गावातल्या एका म्हाताऱ्यानं कुठल्याशा झाडाच्या बोराएवढ्या फळाचा धूर करून मला तोंडात तो धूर घ्यायला लावला होता. त्यानं कीड गळून पडली. अर्धं डोकं (अर्धशिशी) दुखू लागल्यावर आई गावातल्या एका म्हाताऱ्याला बोलवायची. तो म्हातारा पिंपळाच्या पानाची पुंगळी करून ती एका बाजूच्या नाकपुडीत घालायचा आणि खालून झटका मारायचा. त्याबरोबर घोळाणा फुटायचा. म्हातारा म्हणायचा : ‘‘गेलं नासकं रक्त बाहेर...आता तू ठणठणीत झालास.’’

एकदा रानात दगड उचलताना माझ्या हाताला विंचवानं नांगी मारली. मी ठणाणा बोंबलायला लागलो. आई घाबरली. तेव्हा आमच्या रानात राखणीसाठी एक भिल्लीण झोपडी करून राहायची. तीनं झोपडीतून कसलीशी पांढरी भुकटी आणली. विंचू चावला त्या ठिकाणी थोडंसं तेल टाकून भुकटी चोळली. पुढच्या काही मिनिटांत आराम पडला. नंतर मी खूप दिवस ती भुकटी कशाची होती हे त्या भिल्लिणीला विचारत होतो. शेवटी नंतर खूप वर्षांनी तिनं मला सांगितलं :‘‘रानात सापडणारा आग्या फोक वाळवून त्याची भुकटी करायची. ती चोळली की वेदना नाहीशा होतात.’’ असे कितीतरी घरगुती उपचार असल्यानं दवाखान्याचं महत्त्व त्या काळी वाटायचं नाही. नंतर गावात सरकारी दवाखाना झाला. कुठलाही आजार झाल्यावर तिथले डॉक्टर भल्या मोठ्या पांढऱ्या गोळ्या द्यायचे. त्या गोळ्यांचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नसायचा! पेशंट आजारातून बरा होई; पण ती भली मोठी गोळी घशात अडकून तो मरेल की काय अशी भीती वाटायची! त्याचबरोबर एक लाल औषधही दिलं जायचं. त्यासाठी घरूनच एखादी भली मोठी बाटली घेऊन जावी लागायची. ‘तीन वेळा चमच्यानं घ्या’ असा कंजूस सल्ला सरकारी डॉक्टर कधीही देत नसत. कारण, त्या औषधाचे कॅनच्या कॅन भरून कोपऱ्यात ठेवलेले दिसत. कितीही न्या आणि कितीही प्या...पण माणूस बरा होई हे नक्की.
***

आता बहुतेक पेशंटच्या पांढऱ्या पेशी मरू लागल्या आहेत. बहुधा त्या पुन्हा वाढण्याचं औषधं विकसित झाल्याचं पेशींना समजलं असावं. गावाच्या प्रत्येक गल्लीत आता दवाखाने दिसतात. शहरात तर दवाखान्याच्या इमारती हॉटेलपेक्षा देखणेपणाचं रूपडं पांघरून उभ्या आहेत. आता प्रत्येक अवयवाचे स्पेशालिस्ट निघाले आहेत. काही दिवसांनी डाव्या नाकपुडीचे वेगळे, उजव्या नाकपुडीचे वेगळे असे स्पेशालिस्ट दिसले तर नवल वाटायला नको. अद्ययावत मशिनरी निघाल्यानं, डॉक्टर फारशा चिकित्सेच्या भानगडीत न पडता रोगाचं निदान मशिनरीवर सोपवून देतात. सगळेच डॉक्टर असं करत असतील असं नाही. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर तर प्रत्येक पेशंटला तपासल्याबरोबर म्हणतात : ‘‘बरं झालं वेळेवर आलात. थोडा उशीर झाला असता तरी गेला असतात.’’

त्या भीतीनं ते संबंधित पेशंट पुढं आठ-पंधरा दिवस त्यांच्याच सहवासात राहायचे! बरं, डॉक्टर होण्यासाठी परीक्षेत अमुकच गुण पाहिजेत असं काही नाही सध्याच्या काळात. कमी गुण पडलेल्या मुलांना पालक काही खास मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जातात. हातातल्या बॅगेत लाखो रुपये असतात. कॉलेजवाली मंडळी पोराला बॅगसह ठेवून घेतात ती थेट डॉक्टर करूनच सोडतात! डिग्री नसलेल्या डॉक्टरांपेक्षा ही पैसे भरून डॉक्टर झालेली मंडळी जास्त धोकादायक असतात; पण ती ओळखण्याची सोय नसते. अर्थात, एरवी सामान्य वाटणारी डॉक्टर नावाची ही माणसं आपण आजारी पडल्यावर मात्र साक्षात देव वाटतात. या क्षेत्राचा सन्मान अजूनही टिकून आहे, आपण माणसांचे डॉक्टर आहोत आणि माणूसच माणसाला माणुसकीनं मदत करू शकतो याचं भान असलेले अनेक डॉक्टर आहेत तोपर्यंत...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com