सूत्र नसलेले संचालक... (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

कुठल्याही कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक निवडताना तो लयबद्ध आवाजाचा; परंतु मध्यम बुद्धीचा असावा असं आमचं स्पष्ट मत आहे! मुलीला पाहायला जाताना नवऱ्यामुलापेक्षा बाकीच्यांनी बेंगरूळ दिसावं असा जो एक अलिखित नियम आहे, तसे सभेच्या अलिखित नियमांनुसार, इतर पाहुण्यांपेक्षा सूत्रसंचालक वगैरे कमी पट्टीचे असावेत, म्हणजे पाहुण्यांचा मान राहतो. आजकाल सभेत मात्र सूत्रसंचालकाला चांगला मान आणि धनही मिळत असल्यानं अनेक हुशार मंडळी या स्थानी बसण्यास सरसावली आहेत. ती चांगलीच हुशार असल्यानं दोन भाषणांच्या मध्ये स्वतःचं छोटंसं भाषण उरकून घेतात. सूत्रसंचालनात कुणाच्याही कवितेचे तुकडे, संतवचनं, विनोद, दाखले, आठवणी सांगून ते संचालन रंजक करण्याच्या प्रयत्नात त्यांना भान राहत नाही. सुरवातीला एक-दोनदा श्रोत्यांना हा प्रकार सुखद वाटतो; परंतु प्रत्येक भाषणानंतर सूत्रसंचालकाचा असा प्रतिभा-आविष्कार सभेला गुदमरून टाकतो. त्यातल्या त्यात कविसंमेलनाचा सूत्रसंचालक हा नवकवी असणं हे फार धोकादायक. एका कवीची कविता झाल्यावर हा सूत्रसंचालककवी ‘अगदी याच विषयावर मी काल-परवाच एक ताजी कविता केली आहे,’ असं सांगून मूळ कवीपेक्षा लांबलचक कविता सुरू करतो. सारी सूत्रं त्याच्याच हातात असल्यानं ती त्याची ‘नव’कविता ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे, संमेलनात वीस कवी असतील तर प्रत्येकाला
एकच कविता म्हणण्याची संधी मिळते. सूत्रसंचालक मात्र आपल्या वीस कविता म्हणून घेतो! म्हणून कवींनी संमेलनात कवी म्हणून जाण्यापेक्षा नेहमी सूत्रसंचालक म्हणून जावं, म्हणजे त्यांना मनसोक्त कविता म्हणण्याचा आनंद मिळू शकेल! काही कवी मात्र सादर करून झालेल्या कवितेवर दोन ओळींत भाष्य करून पुढच्या कवीला बोलावतात तेव्हा श्रोत्यांना हायसं वाटतं. खरं म्हणजे, कविसंमेलनाला कवींची संख्या अफाट असते. (हे मराठी साहित्याचं सुदैव म्हणावं तर, श्रोत्यांची संख्या कवींपेक्षा कमी असते याला काय म्हणावं?).

एका संमेलनात नवोदितांचं असंच एक भरगच्च कविसंमेलन ठेवण्यात आलं होतं. कवींची तोबा गर्दी होती. कविता म्हणण्यासाठी आपला नंबर लागावा म्हणून कवींनी ‘माझा नंबर घ्या,’ असा सूत्रसंचालकाभोवती गिल्ला केला होता. स्वतः सूत्रसंचालक उत्तम कवी होता; पण सूत्रसंचालन करताना आपण आपली कविता म्हणायला गेलो तर, नंबरला असलेले कवी आक्रमक होऊन आपलं काय करतील याचा नेम नाही ही भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती! शेवटी, कवींची मजल सूत्रसंचालकाच्या हातातल्या यादीचा कागद हिसकावण्यापर्यंत गेली तेव्हा मात्र तो चिडला. तेवढ्यात त्याला दूर मंडपात उभा असलेला एक पोलिस दिसला. कविसंमेलनात पोलिसाचं काय काम अशी शंकादेखील त्याच्या मनात आली नाही. त्यानं घाईघाईनं पोलिसाला हात करून मदतीला बोलावून घेतलं. पोलिस लगबगीनं आला आणि त्यानं ‘‘चला, मागं हटा...गर्दी करू नका’’ असा खाकी दम देत कवींना शांत केलं. सूत्रसंचालकाचा श्वास मोकळा झाला. ‘‘आता तुम्ही इथंच थांबा आणि मला संरक्षण द्या,’’ असं सूत्रसंचालक म्हणाला. कविसंमेलन सुरळीत सुरू झालं.

पाच-सहा कवींच्या कविता वाचून झाल्यानंतर मात्र अस्वस्थ झालेला पोलिस सूत्रसंचालकाच्या कानाशी लागून म्हणाला : ‘‘माझ्या बहिणीची कविता आधी घ्या. नाहीतर मी निघून जाईन. मी तिच्यासाठी इथं आलोय. नाहीतर तुमच्या कविलोकांचा आम्हाला काय फायदा न्‌ तोटा?’’ यावर ‘‘तुम्ही शेवटपर्यंत इथंच थांबायचं’’ या बोलीवर सूत्रसंचालकानं पोलिसाच्या बहिणीचं नाव पुकारलं.
***

साहित्यविषयक कार्यक्रमांपेक्षा राजकीय कार्यक्रमांतल्या सूत्रसंचालकांची जातकुळी वेगळीच असते. फार काही आलंकारिक बोलण्यापेक्षा व्यासपीठावर बसलेल्या सर्व छोट्या-मोठ्या पुढाऱ्यांची स्तुती करणं हे त्याचं प्रमुख ‘सूत्र’ असतं. त्या स्तुतीमुळे ‘व्यासपीठ’ भलतंच सुखावून जातं. काही पुढाऱ्यांना तर स्वतःचं थोरपण सूत्रसंचालकाकडून प्रथमच समजतं! एक धटिंगण पुढारी तर आपले दोन-चार पंटर सूत्रसंचालकाशेजारी कायम बसवायचा. पुढारी भाषणाला उठण्याआधी ते पंटर एक काम करायचे. ते काम म्हणजे, त्यांच्या साहेबांना काय काय उपाध्या लावायच्या याविषयी ते त्या सूत्रसंचालकाला माहिती द्यायचे. ‘भाग्यविधाते’, ‘कार्यसम्राट’, ‘गरिबांचे कैवारी’, ‘कार्यकुशल’, ‘नीडर’, ‘तरणंबांड व्यक्तिमत्त्व’, ‘सामान्य जनतेचं दैवत’, ‘गळ्यातील ताईत’ वगैरे वगैरे...यातली एखादी उपाधी विसरली तरी पंटर सूत्रसंचालकाला दम देऊन ती म्हणायला लावायचे. त्या उपाध्या ऐकून इतकी महान व्यक्ती आपल्या परिसरात असल्याचं श्रोत्यांना प्रथमच समजायचं. साहेबही असे बेरकी की या साऱ्या उपाध्या लावून झाल्याशिवाय भाषण करायला उठत नसत.
ते उठल्यानंतर ‘हे आहेत होय’ अशी कुजबुज गर्दीत उमटे. एकंदर राजकीय सभेत सूत्रसंचालन करणं हे मोठ्या कसरतीचं काम असतं. प्रत्येक वक्ता भाषणाला उठताना त्यानं उपभोगलेली पदं सूत्रसंचालकाला न चुकता सांगावी लागतात. ‘अमुक हे १९६५ मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच होते’, ‘तमुक ७२ च्या दुष्काळात सोसायटीचे चेअरमन होते’ (‘त्या वेळी सोसायटी बुडता बुडता वाचली’ : गर्दीतली कुजबुज) अशा त्यांच्याशिवाय कुणालाच न आठवणाऱ्या पदांचा उल्लेखही करावा लागतो.

सूत्रसंचालन ही कला आहे. ते थोडकं आणि सहज करावं. लोकांच्या पचनी पडेल एवढीच पाहुण्यांची स्तुती करावी. पाहुण्यांनी त्यांचं परिचयपत्र चारपानी दिलं असलं तरी त्याचा सारांश काढून तो वाचावा. कारण, त्या परिचयपत्रातल्या सगळ्या गोष्टी खऱ्याच असतील याचा भरवसा नसतो. पाहुणे भाषणाला उठत असताना अगदी ऐतिहासिक स्टायलीत ‘दिल थाम के बैठो..आणि आता आपल्यासमोर येतील...’ असली काहीतरी रहस्यभेद केल्यासारखी वाक्यं वापरू नयेत. ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी...तयाचा वेलू गेला गगनावेरी’ किंवा ‘आभाराचा भार कशाला’ वगैरे ओळी/वाक्यं सूत्रसंचालकाला नवीन वाटत असली तरी श्रोत्यांनी ती खूपदा ऐकलेली असतात व त्यांची ती पाठही झालेली असतात. सूत्रसंचालकानं सभेत फारच भडकपणा केला तर काजूकरीत काजू कमी आणि करीच जास्त झाली असं सभेच्या बाबतीत घडू शकतं. खरं म्हणजे, सभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुणातरी गंभीर चेहऱ्याच्या आणि खूप वेळ बसून राहील अशा व्यक्तीला अध्यक्ष केलेलंच असतं. सूत्रसंचालकानं सभा ताब्यात घेण्याऐवजी ती सुसूत्रपणे चालेल एवढीच काळजी घेतली तरी पुरे...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com