सिनेमाचा तमाशा (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

यात्रेची वर्गणी जमा झाल्यावर तमाशा आणायचा की सिनेमा, याच्यावरून गावात वाद झाला. सिनेमा आणला तर बाया-बापड्यापण पाहतील म्हणून शेवटी सिनेमावर कारभाऱ्यांचं एकमत झालं. मागच्या यात्रेचा तमाशा ठरवायला गावातले काही कारभारी गेले होते. ‘तमाशा कसा आहे दाखवा’ म्हणून त्यांनी तिथंच नृत्याची बैठक लावली ते बरोबर नेलेली गावची सारी वर्गणी संपल्यावरच बैठक संपली! नंतर कारभारी मोकळ्या खिशानं गावात आले तेव्हा वेगळाच ‘तमाशा’ झाला.

या पूर्वानुभवामुळे या वेळी जबाबदार मंडळी सिनेमा ठरवायला गेली. सिनेमांची छोटी छोटी ऑफिसेस शहरात होती. तिथल्या भिंती सिनेमांच्या पोस्टर्सनी गच्च भरलेल्या होत्या. वयस्कर कारभारी मंडळी भिंतीवरचं मादक चित्रं पाहून गांगरली. त्यातले एक माळकरी म्हणाले :‘‘अरारा..! काय हे वंगाळ चित्र....येच्यापेक्षा तमाशा बरा..’’
दुसरा म्हणाला : ‘‘सिनेमाला जादा पैसं घ्या...पन त्यात काय बी वंगाळ नगं. म्हंजी तेच्यातल्या साऱ्या बायान्ला फुल्ल कपडे पायजेत.’’
तिसरे कारभारी म्हणाले :‘‘लफडे-लुफ्डे तर अजेबात चालणार नाईत. तसं काय दिसलं तर लगीच शिनिमा बंद पाडू.’’
सिनेमावाला म्हणाला :‘‘तुम्हाला पाहिजे तसा सिनेमा कुठंच मिळणार नाही. तुम्हालाच काढावा लागेल. त्याच्यापेक्षा एखादा देवाचा न्या.’’
मग सिनेमावाल्यानं काही पौराणिक सिनेमांचे पोस्टर्स दाखवले. ते पोस्टर्स पाहिल्यावर माळकरी असलेल्या सदस्यानं देवी-देवतांच्या पोशाखांवरून पौराणिक सिनेमाविषयीही शंका काढलीच.

कपाळाला गंध लावलेले चौथे हुशार कारभारीही तिथं उपस्थित होते. त्यांनी पुढं होऊन हस्तक्षेप केला आणि बरीच चर्चा होऊन अखेर तोच पौराणिक सिनेमा निश्चित झाला.
असं सगळं अंतिम स्वरूपात ठरल्यावर ‘एका खेळाचे हजार रुपये’ हा दर ऐकून चौघंही अवाक्‌ झाले. मुळात वर्गणी जमा झाली होती चार हजार रुपये. त्यात कुस्त्यांचा हगामा, देवीचा छबिना असं सारं उरकायचं होतं. अखेर, ‘हो’, ‘नाही’ करता करता सातशे रुपयांना सिनेमा फायनल झाला. सिनेमावाला रिळाची पेटी, पडद्याचं कापड घेऊन संध्याकाळच्या मुक्कामी एसटीनं गावात येणार होता. त्याला दोनदा चहा आणि सिनेमा संपल्यावर एकदा जेवण द्यायचं असाही करार झाला. सिनेमावाला म्हणाला :‘‘निम्मे पैसे आत्ता भरा. उरलेले सिनेमाचा इंटरव्हल झाल्यावर द्या.’’ तसं गंधवाल्या
सदस्यानं विचारलं : ‘‘ही इंटरव्हल काय भानगड असतीय?’’
माळकरी हसत म्हणाला: ‘‘आवं, लोकं इराकतीला उठल्यावं बाकीचे पैसे द्यायाचे.’’ यावर सिनेमावाला हसला. त्यानं गावातल्या भिंतींवर डकवण्यासाठी पोस्टरचे तुकडे दिले. गावातल्या वर्गणीच्या पैशातून चहाही न पिता स्वखर्चानं कारभारी सिनेमा ठरवून गावात परतले.
***

पौराणिक सिनेमांची पोस्टर्स पाहून तरुण पोरांनी नाकं मुरडली. कारभाऱ्यांनी त्यांना पोस्टर्स गावभर चिकटवायला सांगितली तेव्हा त्यांनी ती कशीही उलटीपालटी डकवून दिली. त्यामुळे कारभाऱ्यांनी नेमका कोणता सिनेमा आणलाय ते गावाला काही कळेना. शेवटच्या दिवशी दवंडीवाल्यानं बहारदार दवंडी दिली : ‘‘आज रात्री मराठी शाळेच्या पटांगणावर यात्रा कमिटीकडून एक धार्मिक, पौराणिक, कौटुंबिक, जोरात फायटिंग व बहारदार गाणी असलेला सिनेमा दाखवण्यात येणार आहे. गर्दी होणार असल्यानं जागा राहणार नाही. ज्यानं त्यानं लवकर येऊन गोणपाट टाकून आपली जागा धरून ठेवावी हो ऽऽऽ मी बी जाणार...तुम्ही बी या.’’

करारानुसार, मुक्कामी एसटीनं सिनेमाची चौकोनी पेटी आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी आमच्यासारख्या पोरांबरोबर कारभारीपण हजर होते. ती भली मोठी पेटी छकड्यात घालून शाळेत नेण्यात आली. पेटी घेऊन आलेल्या माणसाला ऑपरेटर म्हणतात, हे अनेकांना पहिल्यांदाच समजलं. त्यानं पडदा म्हणून - कधीकाळी पांढरं असावं असं - एक मळकट कापड बांबूला ताणून बांधलं. मशिन ठेवायला हेडमास्तरांचं टेबल घेतलं. भोकाड पसरलेल्या पोराच्या तोंडासारखा भोंगा एका बांबूला बांधला. अशी जय्यत करेपर्यंत अंधार पडू लागला. सिनेमा जवळून चांगला दिसतो असा समज असल्यानं पडद्याजवळ गोणपाट टाकून बसायला लोकांची गर्दी उसळली. सिनेमाच्या मशिनजवळ काचेचा एक बल्ब आजारी असल्यासारखा खिन्न प्रकाश सोडत लटकत होता. बाकी सगळ्या पटांगणावर अंधार होता. सिनेमाला गाव लोटल्याचं पाहून कारभाऱ्यांना समाधान वाटलं.

‘ओ ऑपरेटर, सुरू करा खेळ’ असं कुणीतरी ओरडलं. एका कारभाऱ्याच्या हस्ते मशिनजवळ नारळ फोडण्यात आला. सिनेमा सुरू झाला. चित्र अस्पष्ट दिसत होतं. मध्येच धोतर फाटल्यासारखा टर्र आवाज करत फिल्म तुटायची. सगळीकडे अंधार पसरला की एकच गोंधळ उडायचा. पोरं तोंडात बोटं घालून शिट्ट्या मारायची. पुनःपुन्हा फिल्म तुटू लागली तसे लोक वैतागले. एक कारभारी दुसऱ्याला म्हणाला : ‘‘गावाला काय कळतंय! गदाळ सीन आल्यावं आप्रेटर बराब्बर रीळ कापितोय.’’
भोंग्यातून कसला आवाज येतोय कुणालाच कळेना. त्यात ‘आम्हाला आवाजच येत नाही’ असं म्हणून कुणीही उठून भोंग्याचं तोंड स्वतःकडे फिरवू लागला. प्रेक्षक इराकतीला जाताना मशिनच्या फोकसपुढून जायचे. त्या सावल्यांनी पडदा झाकून जायचा. एकंदर सिनेमा संपला तेव्हा तिथं फक्त ऑपरेटर आणि चार कारभारीच शिल्लक राहिले. नंतर काही दिवसांनी यात्रेच्या हिशेबाची गावबैठक झाली. तीत तुटक्या सिनेमाला फार पैसे दिले, काहीतरी घोटाळा केला म्हणून चारही कारभाऱ्यांची कमिटीतून हकालपट्टी करण्यात आली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com