या कानांनी ऐकलं... (संजय कळमकर)

संजय कळमकर sanjaykalmakar009@gmail.com
रविवार, 8 डिसेंबर 2019

लहानपणी आम्हाला भाषणं ऐकायला फारशी मिळत नसत. शाळेत तुरळक वक्ते यायचे. ते खूप वेळ बोलत; पण आम्ही त्यांचं खूप वेळ ऐकत नसायचो. पहिल्या पाच मिनिटांत वाळू खेळण्याचा नाहीतर एकमेकांना खडे मारण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. पुढची मुलं हसली की आम्ही हसायचो, त्यांनी टाळ्या वाजवल्यावर आम्हीही टाळ्या वाजवायचो.

लहानपणी आम्हाला भाषणं ऐकायला फारशी मिळत नसत. शाळेत तुरळक वक्ते यायचे. ते खूप वेळ बोलत; पण आम्ही त्यांचं खूप वेळ ऐकत नसायचो. पहिल्या पाच मिनिटांत वाळू खेळण्याचा नाहीतर एकमेकांना खडे मारण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. पुढची मुलं हसली की आम्ही हसायचो, त्यांनी टाळ्या वाजवल्यावर आम्हीही टाळ्या वाजवायचो.

थोड्याच वेळात प्रचंड बडबड सुरू व्हायची आणि वक्ता त्यात हरवून जायचा; पण वक्ते इतके चिकाटीचे की ते काही केल्या माईक सोडत नसत. बाद झाल्यावरही एखाद्यानं फलंदाजी करत राहावी तसे ते बोलत राहायचे. कुणी ऐकत नसताना बोलत राहणाऱ्या वक्त्यांचं मला कौतुक वाटत आलं आहे. एकंदर, त्या वयात वक्ता कसा असावा यापेक्षा तो कसा नसावा याचाच अनुभव आम्ही घेतला. लहानपणीच आम्हाला असे अनेक ‘पिळे’ वक्ते (श्रोत्यांचे मेंदू धुतलेल्या कपड्यासारखे पिळणारे) भेटले. त्यामुळे कुणी भाषणाला येणार आहे असं समजलं तरी आम्ही सावध व्हायचो. आम्हाला शाळेच्या पटांगणात एकत्र केलं जायचं. बऱ्याचदा वक्ते सावलीत आणि आम्ही उन्हात असायचो. भाषण ऐकायला पुढं बसल्यावर अनेक अडचणी येतात हे आम्ही अनुभवानं शिकलो होतो. कितीही कंटाळा आला तरी मध्येच उठता येत नाही, शिवाय बोलताना वक्त्यानं अचानक आपल्याकडे पाहिलं तर ‘सगळं समजत आहे, तुमचं चालू द्या’ असा चेहरा करावा लागतो म्हणून सर्वात मागं बसणं सोईचं ठरायचं.

एकदा तर भलतीच गंमत झाली. गावात नवीन निवडून आलेल्या सरपंचांना सत्कारासाठी शाळेत बोलावण्यात आलं. अशा वेळी हेडमास्तर आमच्यातल्या एखाद्या मुलाला सुरवातीला भाषण करायला सांगत. त्या वयात सरांनी लिहून दिलेलं पाठ केल्याशिवाय भाषण करता येत नसे. आमच्या वर्गातला एखादा मुलगा भाषणाला उठल्यावर त्याचं भाषण पाडायचं असा आमचा एकमेव उद्योग असायचा. त्यासाठी त्याचं अवधान विचलित करण्यासाठी आम्ही बसल्या जागेवरून खोड्या करत असू. सरपंचांच्या सत्काराच्या कार्यक्रमात आमच्या वर्गातल्या रघूला भाषण करण्याची संधी मिळाली. सरांनी पाठ करायला सांगितलेलं भाषण त्यानं सुरू केलं. त्याचं साभिनय भाषण ऐकून मुलंच नव्हे तर पाहुणेही दाद देऊ लागले. ते पाहून आम्हाला वाईट वाटलं. वर्गातल्या एखाद्या मुलाची स्तुती होणं आम्हाला कसं मानवेल! मग रघूचं अवधान विचलित करण्यासाठी आमचे प्रयोग सुरू झाले. कुणी त्याच्याकडे पाहून माकडासारखं नाक खाजवायला लागलं, तर कुणी खोट्या खोट्या जांभया देऊ लागलं. शेवटी, रघू आमच्या हालचालींनी अस्वस्थ झाला. त्याचं लक्ष वारंवार आमच्याकडे जाऊ लागलं तसा तो ‘आलेले पाहुणे थोर आहेत’ हे एकच वाक्य कॅसेट गुंतल्यासारखं पुनःपुन्हा बोलू लागला. पुढं तर अगदीच बाका प्रसंग उभा राहिला. थोड्या वेळानं वाक्यातल्या ‘थो’चा ‘चो’ झाला. ते ऐकून हेडमास्तर त्याला शर्टच्या शेपट्याला धरून मागं ओढू लागले. ‘आलेले पाहुणे चोर आहेत’ हे वाक्य ऐकून सरपंच संतापानं उठले. दाणदाण पाय आपटत निघून गेले. नंतर काय झालं कुणास ठाऊक; पण हेडमास्तर बरेच दिवस शाळेत आलेच नाहीत. या प्रकरणाच्या मुळाशी आम्ही आहोत हे समजल्यावर सरांनी आम्हाला फैलावर घेतलं. माझा कान रेडिओच्या बटणासारखा पिळत ते म्हणाले : ‘‘खाली बसून टवाळ्या करता येतात. जरा भाषणाला उभा राहून पाहा, काय होतं ते. लवकरच आपल्याकडे मोठे साहेब येणार आहेत. समारंभात मुलांचा सहभाग असतो, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्या वेळी तू माईकवर बोलायचंस, ‘आदरणीय पाहुण्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत.’ नंतर तुम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचा.’’

सरांचा आदेश पाळण्याशिवाय पर्याय नव्हता. आपण मुलांना हसायचो, आता मुलं आपल्याला हसतील या भीतीनं आम्ही जोरदार तयारी सुरू केली. मी तर रात्रंदिवस, ‘आदरणीय पाहुण्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत’ एवढं एकच वाक्य पाठ करायला सुरवात केली. समारंभाचा दिवस उजाडला. मला स्टेजवर बोलावण्यात आलं. मी रुबाबात वर गेलो. माईकसमोर उभा राहीपर्यंत परिस्थिती चांगली होती; पण समोर मुलांची गर्दी पाहून तोंडाला कोरड पडली. पाय लटपटू लागले. मी डायस घट्ट पकडलं. त्यामुळे शरीराला बऱ्यापैकी अर्थिंग मिळालं. मी माईक धरून त्यात तीन-चार वेळा नागासारखं फूस फूस केलं आणि भलतंच वाक्य बोलून गेलो : ‘आदरणीय पाहुण्यांचं आम्ही ‘पुष्पपुच्छ’ स्वगत करत आहोत.’’ काय झालं ते मला समजलं नाही; पण मुलं हसू लागली. पाहुणे उठत म्हणाले : ‘‘पुष्प मला दे, पुच्छ तुलाच राहू दे.’’ तेव्हा कुठं झालेली चूक लक्षात आली.

एकंदर, भाषण ही वेगळ्या धाटणीची कला आहे हे शालेय वयातच अनुभवयाला मिळालं. पुढं अनेक वक्त्यांची भाषणं ऐकण्याचा योग आला. काही सहजपणे बोलणारे, तर काही आक्रस्ताळेपणा करणारे. ओरडल्याशिवाय भाषण प्रभावी होत नाही असा अनेक वक्त्यांचा गैरसमज असतो. काहीजण आपली विद्वत्ता दाखवण्याच्या प्रयत्नात श्रोत्यांचा अतोनात छळ करतात. काही वक्त्यांना तर भाषण कुठं थांबवावं तेच कळत नाही. ‘संपलं बुवा एकदाचं’ असा सुस्कारा श्रोत्यांनी सोडतानाच ते पुन्हा पोटभाषण सुरू करतात, तर काहींना विषयांच्या पुनरुक्तीची सवय असते. काही राजकीय लोकांची भाषणं ऐकताना विनोदी कथाकथन ऐकल्याचा आनंद मिळतो. सारांश काय तर, वक्ता कितीही विद्वान असो, त्याचं तोंड आणि श्रोत्यांचे कान समपातळीत आले तरच त्या भाषणाला अपेक्षित परिणाम लाभतो! नाहीतर वक्ता आपला बोलत राहतो आणि ‘या कानांनी ऐकलं आणि त्या कानांनी बाहेर पडलं’ अशी श्रोत्यांची गत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sanjay kalamkar write halaka fulaka article