‘नागरिक’ आणि ‘शास्त्र’ (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

नागरिकशास्त्र शिकवताना गुरुजींनी मुलांना विचारलं : ‘‘राष्ट्रपती राजवट कधी लागते सांगा?’’ बंड्या पटकन उठत म्हणाला : ‘‘गुरुजी राष्ट्रपती राजवट रात्री लागते आणि पहाटे उठते.’’ बंड्याच्या या उत्तरावर सारा वर्ग हसू लागला. गुरुजींचा चेहरा तर एकदम राष्ट्रपती राजवट लागल्यासारखा झाला. त्यांनी तरातरा बंड्याजवळ येऊन त्याचा कान रेडिओच्या बटनासारखा पिरगळला.

‘‘मुर्खा, पुस्तकात आहे ते उत्तर सोडून टीव्हीत पाहिलेलं उत्तर काय देतोस?’’ बंड्यानं निष्पापपणे विचारलं : ‘‘टीव्हीत दाखवतात ते खोटं असतं का गुरुजी?’’ गुरुजींना काय बोलावं समजेना. तोंडाशी आलेले शब्द गिळत ते बंड्यावर ओरडले : ‘‘तुझं पुस्तकापेक्षा टीव्हीत जास्त लक्ष असेल तर जा घरी. टीव्ही पाहात बैस. चल उचल दफ्तर.’’ गुरुजींच्या ओरडण्याचा बंड्याला अंमळ राग आला. दफ्तर उचलून तो मिजाशीत बाहेर पडला. तो गेला आहे, असं समजून गुरुजी पुन्हा शिकवू लागले, तर बंड्या पुन्हा खिडकीत येऊन ओरडला : ‘‘मी पुन्हा येईन.’’ त्याच्या या बाणेदार आरोळीवर सारा वर्ग हसू लागला. गुरुजी मात्र अंगातलं त्राण गेल्याप्रमाणं मटकन खाली बसले.

गुरुजींना वाटलं, बंड्या काही दोन दिवस शाळेत येणार नाही; पण दुसऱ्या दिवशी तो भल्या सकाळीच वडिलांना घेऊन शाळेत आला. शनिवार असल्यानं मैदानावर सकाळचा परिपाठ जोरात सुरू होता. वडिलांना घेऊन आलेल्या बंड्याला पाहून गुरुजींच्या पोटात धस्स झालं. भल्या सकाळी हे झेंगट गळ्याशी येईल याचा त्यांनी विचारही केला नव्हता. अपेक्षेप्रमाणं त्यांना हेडमास्तरांचं बोलावणं आलं. ते ऑफिसात गेले, तेव्हा कोपऱ्यात उभा असलेला बंड्या गालात हसतोय असा त्यांना उगीचच भास झाला. त्यांना पाहिल्याबरोबर बंड्याचे वडील आत्माराम ओरडले : ‘‘गुरुजी, प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊन तुम्ही बंडूला वर्गातून हाकलून का दिलंत?’’ गुरुजी म्हणाले : ‘‘त्यानं पुस्तकातलं उत्तर द्यावं हे मला अपेक्षित होतं.’’ हेडमास्तरांनी पक्षश्रेष्ठीसारखा चेहरा करत विचारलं : ‘‘ प्रश्न काय होता?’’ सारा खुलासा झाल्यावर त्यांनीही गुरुजींचीच बाजू घेतली. तसे आत्माराम म्हणाले : ‘‘अहो, बाहेरचं जग किती जोरानं पळतंय! तुमची कासवासारखी सरपटत चालणारी पुस्तकं कधी त्याची बरोबरी करायची? आता तुमचं नागरिकशास्त्र इतिहासजमा झालं.’’ गुरुजी म्हणाले : ‘‘पुढच्या वर्षी बदलणार आहे साराच अभ्यासक्रम.’’ बंड्याचे वडील म्हणाले : ‘‘बाकीचा अभासक्रम पंचवीस वर्षांनी का बदलेना; पण नागरिकशास्त्राचं पुस्तक मात्र आठवड्याला बदललं पाहिजे. अहो, आम्ही शाळेत असल्यापासून आम्हाला नागरिकशास्त्र शिकवताना सांगायचे, मुलगा-मुलगी एकसमान अन् मोफतचे गणवेश मात्र फक्त मुलींनाच. आम्ही हिंडायचो फाटक्या विजारी घालून. ही ‘समानता’ म्हणजे विजारीसारखी फाटकीच म्हणायची का नाही? आता बाहेरचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र मिनिटा-मिनिटाला बदलतंय. समजा तुम्ही आदल्या रात्री पोरांना प्रश्न दिला, की आपल्या मुख्यमंत्र्यांचं नाव लिहून आणा अन् पहाटेच मुख्यमंत्री बदलत असेल, तर या बिचाऱ्या पोरांनी तरी काय करायचं? मात्र, तुम्ही बसता जुनीच पुस्तकं धरून. बाहेर काय चाललंय तेच शिकवा ना पोरांना.’’ गुरुजी म्हणाले : ‘‘असं केलं, तर सारी मुलं नापास होतील.’’ आत्माराम म्हणाले : ‘‘होऊ द्या. मुलांना खोटं शिकवून वरच्या वर्गात घालण्यापेक्षा खरं शिकवून जागरुक नागरिक बनवलेलं कधीही चांगलं.’’ आपण बरंच काही चांगलं बोललो आहोत, असं समजून ते बंड्याला घेऊन निघाले. तसे गुरुजी बंड्याला मागं बोलावत म्हणाले : ‘‘काय सांगायचं ते इथंच सांगून जा. पुन्हा खिडकीत येऊन काही आरोळी ठोकू नकोस. तू सोमवारी शाळेत येणार आहेस का?’’ बंड्या निराशा लपवत ऐटीत म्हणाला : ‘‘हो. मी पुन्हा येईन; पण दम खाऊन येईन. तोपर्यंत माझ्यासाठी शिकवायचं थांबू नका गुरुजी.’’ त्याच्या अशा अगोचर बोलण्यानं गुरुजी संतापले; पण हेडमास्तर मात्र खो खो करत हसू लागले. तसे गुरुजी सुस्कारा सोडत म्हणाले : ‘‘ठीक आहे. यापुढे मी पुस्तकाऐवजी बाहेरचं नागरिकशास्त्र शिकवत जाईन.’’ हेडमास्तर घाबरत म्हणाले : ‘‘तसं काही करू नका. आपण शासकीय पुस्तकांना बांधील आहोत. भले बाहेर काही घडो. आपल्याला पगार पुस्तकं शिकवण्याचा मिळतो. ते खरं की खोटं हे पाहणं आपलं काम नाही. पोटापासून शिकवलं, की माणूस खरं शिकवतो आणि पोटासाठी शिकवणारा माणूस वरून येईल तेच शिकवतो. हे मी तुम्हाला शिकवण्याची गरज नाही.’’
***

बंड्याला प्रश्न पडला, की बाहेरच्या जगाचं प्रतिबिंब ज्यात पडलेलं नाही अशी पुस्तकं शिकायला शाळेत तरी कशाला जायचं? पूर्वी गुरुजींनी सांगितलं होतं : ‘वयाची अठरा वर्षं पूर्ण झालेली माणसं मतदानाला जातात.’ चार दिवसांनी निवडणुका होत्या. मतदानाच्या दिवशी पाच वाजत आले, तरी बाबा मतदानाला जाईनात. त्याला वाटलं, बाबांना अठरा वर्षं पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी असावीत. तर सहाच्या दरम्यान बाबांना न्यायला एक गाडी आली. त्यांच्या हातात गुपचूप कसली तरी वस्तू देण्यात आली. नंतर बाबा त्याच गाडीत बसून मतदानाला गेले. म्हणजे न्यायला मोफतची गाडी आली अन् हातात काहीतरी दिलं, तरच माणसं मतदानाला जातात तर! बाबांचं तर काही कळतच नाही. महिनाभर टीव्हीला डोळे लावून बसले होते. कोण फुटलं, कोणता नेता कुठं गेला सारं आपल्याला सांगत होते. पुन्हा म्हणाले : ‘‘लोकशाही पुढाऱ्यांनी नाही, लोकांनी बिघडवली.’’ म्हणजे हे असं कसं बुवा? ‘‘जाऊद्या, काही समजत नाही,’’ म्हणत बंड्यानं वैतागून ठिगळाची गोधडी अंगावर ओढून घेतली आणि तो घुप्प झोपी गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com