‘वर जाण्याची’ गोष्ट (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

आटपाट नगर होतं. तिथं एक मारुती पाटील नावाचे निस्वार्थी गृहस्थ राहत होते. ते सर्वसामान्य लोकांची कामं करायचे. गरिबांचे अश्रू पुसायचे. त्यामुळे ते परिसरात प्रसिद्ध होते. सर्वसामान्य लोक त्यांचा आदर करत. काही लोक मात्र ‘मारुतराव घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजताहेत’ म्हणून त्यांची चेष्टा करत. त्याच आटपाट नगरात एक बिलिंदर टोळकंपण होते. प्रत्येक गावात असतंच असं. कुठलीही निवडणूक जवळ आली, की हे टोळकं कार्यरत व्हायचं. कुणालातरी एकाला हेरून त्याला ‘काय आमदारसाहेब’ म्हणून टोमणा मारायचं. तो सुरुवातीला दुर्लक्ष करायचा. टोळकं ‘आता तुझाशिवाय लोकशाहीला पर्याय नाही,’ म्हणून त्याला वारेमाप खर्च करायला लावायचं. त्यांचे काही दिवस मजेत निघून जायचे.

विधानसभेची निवडणूक जवळ आली, तसं टोळकं कामाला लागलं. त्यांनी यावेळेस मारुतरावांना गाठलं. म्हणाले : ‘‘अप्पा, राजकारणाचं काही खरं राहिलं नाही. आता लोकशाहीला तुमच्यासारख्या सज्जन माणसाची गरज आहे.’’ अप्पा म्हणाले : ‘‘मला त्या चिखलात लोटू नका. आपल्यासारख्या दुबळ्या माणसाला लोकशाही स्वीकारत नाही. त्यावाचून आपलं काही अडत नाही. राजकारणी अधिकारवाणीनं कामं करून घेतात.’’

टोळक्यातला एकजण म्हणाला : ‘‘तुमच्यासारखी चांगली माणसं राजकारणापासून दूर राहतात म्हणून घराणेशाहीचं फावतं अप्पा. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्यांची गरज आहे. अहो, आपल्यातला ‘सर्वसामान्य माणूस वर गेला पाहिजे’ हीच आमची तळमळ आहे.’’
अप्पा विचारात पडलेले पाहून दुसरा म्हणाला : ‘‘ तुम्ही उभे राहत असाल, तर वर्गणी करून लढू; पण तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडून वर गेलाच पाहिजे.’’
अप्पा म्हणाले : ‘‘अहो, निवडणुकीत कोटीच्या कोटी उड्डाणं ऐकून आपलाच उर दडपतो. साधा फॉर्म भरायला पैसे नाहीत माझ्याकडे.’’
टोळीचा म्होरक्या म्हणाला : ‘‘तुम्ही उभे राहिलात, की लोक आपोआप वर्गणी गोळा करतील तुमच्यासाठी.’’
‘हो- नाही’ करताकरता अप्पा एकदाचे तयार झाले. त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरला. गावातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे काही वर्गणी गोळा केली. अप्पांनी ती प्रचारासाठी टोळक्याच्या हातात देऊन टाकली. ते स्वतः रात्रंदिवस प्रचार करू लागले. त्यांचा प्रामाणिकपणा माहीत असल्यानं माध्यमांनीही त्यांना ठळक प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली.अप्पांना वातावरण अनुकूल झालं.
निवडणुकीला तीन दिवस बाकी असताना टोळकं त्यांच्याकडं आलं. त्यातल्या एकानं सांगितलं : ‘‘शेवटच्या काही दिवसांत पैसा वाटावा लागतो. हा लोकशाहीचा अलिखित नियम आहे. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास जाईल. काही करा; पण पैशाची तरतूद करा.’’

अप्पा म्हणाले : ‘‘मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पैशाच्या बाबतीत मी दुबळा आहे.’’ म्होरक्या म्हणाला : ‘‘ चार एकर जमीन आहे ना तुमच्याकडे, ती विका.’’ अप्पा एकदम ओरडले : ‘‘अन् नंतर काय भीक मागून खाऊ? त्या चार एकर जिरायती जमिनीवर तर माझ्या कुटुंबाला दोन घास मिळतात. राजकारणासाठी जमीन विकणं म्हणजे, दुत्य खेळताना धर्मराजानं पत्नी पणाला लावण्यासारखं आहे.’’
म्होरक्या म्हणाला : ‘‘आजकाल लोकांचा थांग लागत नाही. ते प्रत्येक उमेदवाराला आपलेच वाटतात. हे वरकरणी दिसणारं प्रेम बनावट असतं. नाहीतर सभेला लाखोची गर्दी होणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं का? राजकारणात ना उमेदवाराचा चेहरा खरा असतो ना मतदारांचा. अप्पा रात्रीतून वातावरण फिरतं. अन् ती ताकद फक्त पैशात आहे.’’

अप्पा म्हणाले : ‘‘नीतिमत्ता कायम ठेवून लोकांची सेवा केली पाहिजे.’’ दुसरा म्हणाला : ‘‘आपल्याला त्यासाठी तर निवडून यायचंय. विजय जवळ आला आहे. आता जमीन विकून पैसे उपलब्ध करणं एवढाच मार्ग आहे.’’ अप्पांनी विचार केला. मग सुस्कारा सोडत त्यांनी विचारलं : ‘‘पण एवढ्या तातडीनं जमीन विकणार कशी?’’
दुसरा उत्साहानं म्हणाला : ‘‘तुम्ही त्याची काळजी करू नका. गिऱ्हाईक पाहून ठेवलं आहे. तुम्ही कागदपत्रं आमच्या ताब्यात द्या. कचेरीत येऊन फक्त सह्या करा. बाकी आम्ही पाहतो काय ते. तुमच्यासारखा ‘सर्वसामान्य माणूस वर गेला पाहिजे’ एवढीच आमची तळमळ आहे.’

‘हो-नाही’ करताकरता अप्पा तयार झाले. त्यांनी जमिनीची कागदपत्रं टोळक्याच्या ताब्यात देऊन टाकली. कचेरीत जाऊन ते म्हणतील तिथं सह्या केल्या. जमीन विकून मिळालेले पैसे टोळक्याच्या हातात देत म्हणाले : ‘‘हा प्रांत माझा नाही. कोणाला पैसे वाटायचे त्यांना वाटा. मला या पापात ओढू नका.’’
अन् ते पुन्हा उमेदीनं प्रचाराला लागले. मतदानाच्या आदल्या रात्री ते शांतपणे झोपले. या रात्रीच लोकशाही खऱ्या तारुण्यात असते याची त्या सरळसाध्या सामान्य माणसास काय कल्पना....

मतदानाचा दिवस उजाडला. अप्पा या-त्या बूथवर जाऊन मतदारांना भेटू लागले. लोकांचा प्रतिसाद पाहून मात्र ते भारावून गेले. आमदार झाल्यावर समाजसेवेच्या कशा रुंदावतील म्हणून त्यांना हुरूप आला. टोळक्याचा मात्र पत्ता नव्हता.
दोन दिवसांनी निकाल लागला. त्या संध्याकाळी मारुतराव पाटलांच्या घरापुढं प्रचंड गर्दी जमली. अनेकांच्या हातात हार होते. टोळकंही त्या गर्दीत मिसळून उभं होतं.
टोळक्याचा म्होरक्या कुजबुजत म्हणाला : ‘‘हे समाजसेवक वगैरे फारच संवेदनशील असतात बुवा. थोड्या मताच्या फरकानं पडले, तर...... लगेच आत्महत्या करून मोकळे झाले.’’

दुसरा म्हणाला : ‘‘आपण काय म्हणालो होतो? ‘सर्वसामान्य माणूस वर गेला पाहिजे.’ समाजसेवक वर निघून गेले. आपण आपला शब्द पाळला.’’
ते बोलत असताना टोळक्यातले बाकीचे दोघे, पुढच्या निवडणुकीत कुठल्या सर्वसामान्य माणसाला वर पोचवायचं, याचा शोध घेत त्या शोकाकुल गर्दीत उभे होते. आणि इतर दोघे विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत सामील व्हायला लगबगीनं निघाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com