गुरुजी...बे दुणे किती? (संजय कळमकर)

sanjay kalamkar
sanjay kalamkar

आटपाट नगर होतं. तिथं एक शाळा होती. शाळेत चार गुरुजी आणि एक हेडमास्तर होते. गुरुजींना खूप कामं होती. अहवाल तेच लिहायचे. टॉयलेटपण धुवायचे. प्रशिक्षणाला जायचे. मीटिंगला पळायचे. खिचडी शिजवायचे. शाळाखोल्यांचं बांधकाम करायचे. जनगणना करायचे. त्यासाठी गावभर फिरायचे. निवडणुका तर वेळोवेळी व्हायच्या. मतदार नोंदवण्यापासून ते निकाल लागेपर्यंत सारी काम गुरुजी करायचे. त्यात त्यांच्या वर्गातल्या पोरांचा निकाल लागून जायचा. तक्रारीला जागा नव्हती. ‘गुरुजी, तुम्ही सर्वात प्रामाणिक म्हणून ही कामं तुम्हीच करू शकता’ म्हणत गुरुजींना सारीच व्यवस्था राबवून घ्यायची. त्यांनी थोडा नकार दिला तरी ‘गुन्हे दाखल करू, सस्पेंड करू’ अशी भाषा वापरली जायची. आपल्याविषयी वाढत चाललेला असा आदर पाहून गुरुजी भारावून जायचे! सातवीला नागरिकशास्र शिकवताना गुरुजी एकदा म्हणाले : ‘‘अठरा वर्षं पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो; पण लाच घेऊन मतदान करणं ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे.’’ एका चाणाक्ष मुलानं घरी बापाला विचारलं : ‘‘तुम्ही घेता का मतदानाला पैसे?’’ तर बाप दोन-चार पुढाऱ्यांना घेऊन शाळेत आला. हेडमास्तरांना म्हणाला : ‘‘गुरुजींना समजून सांगा. हे काय शिकवून राहिले पोरांना? पुस्तकात दिलंय तेवढंच शिकवत चला. पुस्तकं काढणाऱ्यांपेक्षा तुम्ही जादा हुशार हे का?’’

हेडमास्तर गुरुजींना म्हणाले : ‘‘तुम्ही वरच्या वर्गात शिकवताना वरच्या गप्पा जास्त हाणता. वयात आल्याशिवाय पोरं कशाला शाने करता? आता तुम्ही खालचा वर्ग शिकवा. जादा कळणारे शिक्षक, न कळणाऱ्या पोरांपुढं बरे.’’ तेव्हा गुरुजींना कळलं की जादा कळणं वाईट असतं! गुरुजी खालच्या वर्गात आले. हसणारी-खिदळणारी चिमुकली पोरं पाहून त्यांना उत्साह आला. ते म्हणाले : ‘‘आधी ‘बे’चा पाढा शिकू. नंतर तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो.’’
मुलांनी पटापट पाट्या काढल्या. गुरुजी म्हणाले : ‘‘म्हणा माझ्या मागं, बे एकं बे...बे दुणे...’’
तेवढ्यात एक पोरगं दरवाजात येत म्हणालं : ‘‘हेडसरांनी बोलावलंय.’’
गुरुजी घाईनं ऑफिसात आले. हेडमास्तर म्हणाले : ‘‘अहो, शिकवायचं सोडा. गाव-आराखडा भरायचाय. तांदळाचा अहवाल लिहायचाय. मोफत गणवेशाची यादी करायचीये, नवीन दाखले नोंदवायचेत. हिशेबाची कीर्द लिहायचीये.’’
गुरुजी म्हणाले : ‘‘बाकीच्या शिक्षकांना सांगा की.’’

हेडमास्तर म्हणाले : ‘‘छे, छे... तुम्हीच पाहिजे. तुमचं अक्षर कसं टापटीप आणि छान आहे. बाकीचे चुकवून ठेवतात. बदली होऊन आलेले अजून सावरले नाहीत. पुढल्या वर्षी जाण्याच्या भीतीनं काहीजणांनी आतापासूनच अंग सोडून दिलंय. एक शिक्षकनेते आहेत, त्यांचं तर विचारूच नका. परवा त्यांना दारिद्र्यरेषेखालच्या मुलांची यादी सांगितली करायला तर त्यात स्वत:चंच नाव टाकून ठेवलं त्यांनी. तुमच्याशिवाय शाळेला पर्याय नाही. मीही मदत केली असती; पण चष्मा राहिला घरी चुकून.’’
गुरुजी म्हणाले : ‘‘तुम्ही चष्मा न चुकता आणता पगाराच्या दिवशीच.’’
यावर हेडमास्तर फरकासह पगार मिळाल्यासारखं मजेनं हसले. तासाभरात कामं उरकून गुरुजी वर्गात आले. मुलं मस्त हुंदडत होती. गुरुजींना पाहून त्यांनी निमूटपणे पाट्या काढल्या. फळ्यावर लिहीत गुरुजी म्हणाले : ‘‘म्हणा, बे एकं बे...बे दुणे...’ तेवढ्यात ‘आत येऊ का?’ असा मंजूळ आवाज आला. मागोमाग पांढरा कोट, गळ्यात स्टेथोस्कोप अशी डॉक्टर तरुणी, मागं हातात खोकं घेऊन नर्स असा लवाजमा आत आला. तिनं अंतर राखून मुलांना तपासायला सुरवात केली. शेंबडं पोरगं दिसलं की ती लांबूनच ‘ई ऽऽ’ असं ओरडायची. गुरुजी मनात म्हणाले, ‘ही काय सेवा करणार गरिबांची?’ नंतर इंजेक्शन सुरू झालं तसं पोरांनी भोकाड वासलं. वर्गात एकच आरडाओरडा, रडारड, पळापळ सुरू झाली. गुरुजींनी छडी टेबलावर आपटून वर्ग शांत केला. त्यातच भातासाठीची मधली सुटी झाली. मुलं गिल्ला करत बाहेर पळाली. पुन्हा वर्ग भरल्यानंतर ‘आज ‘बे’चा पाढा शिकवायचाच’ असा निर्धार करून गुरुजी वर्गात आले. वर्गाचं दार लावून घेत मोठ्यानं ओरडले : ‘बे एकं बे.’ तर कुणीतरी दरवाजा मोठमोठ्यानं वाजवला. वैतागून त्यांनी दार उघडलं. बाहेर एक ग्रामस्थ झिंगलेल्या अवस्थेत उभा. तो म्हणाला : ‘‘मतदारयादी पाह्याचीया.’’ गुरुजी म्हणाले : ‘‘मी शिकवतोय. नंतर या.’’
तो म्हणाला : ‘‘कशापाई शिकिवता? नौकऱ्या ना बिकऱ्या. मानूस शिकतो तेवढा हुकतो. मतदारयादीचंच घ्या ना. त्यात माझ्या मेलेल्या म्हतारीचं नाव आलंय.’’
गुरुजी म्हणाले : ‘‘काढून टाकू.’’

ग्रामस्थ म्हणाला : ‘‘नकं, राहूं द्या आता. तिच्या जाग्यावं दुसरीच म्हतारी आणंन मी मतदानाला. तेवढेच हजार-दोन हजार मिळतेल. म्हतारीला माझी किती काळजी. मेली तरी माझ्या दारूची सोय करून गेली.’’ त्याची बडबड सुरू असतानाच गणवेश शिवणारा आला. त्यानं मुलांची मापं घेईपर्यंत चार वाजत आले. मुलांना खेळायला सोडण्याऐवजी पाढा शिकवू असा विचार करून गुरुजींनी सुरवात केली : ‘बे एकं बे...बे दुणे...’ तेवढ्यात साक्षात् हेडमास्तर दारात येऊन ओरडले : ‘‘गुरुजी पळा, पळा.’’
गुरुजींनी घाबरून विचारलं : ‘‘काय झालं?’’
हेडमास्तर म्हणाले : ‘‘सिलिंडर संपलाय. उद्या खिचडी शिजवायचे वांधे. मला सरपणाची मोळीवाली दिसली. तिला पाच रुपयाला मोळी मागितली तर एकदम जोरात निघूनच गेली. पळा, तिला म्हणावं, दहा रुपये देतो. चष्मा घरी विसरला नाहीतर मीच पळालो असतो.’’
‘‘तोपर्यंत तुम्ही पोरांना ‘बे’चा पाढा शिकवा,’’ असं म्हणत गुरुजी पळाले.
हेडमास्तर मुलांना म्हणाले : ‘‘तुम्हाला ‘बे’चाच काय, एकोणीसचाही पाढा शिकवला असता; पण चष्मा घरी राहिला...’’
तोपर्यंत गुरुजी सरपण घेऊन आले. ऑफिसात तलाठी येऊन बसले होते. त्यांनी निवडणुकीच्या ऑर्डरी काढल्या. शिक्षकनेता सोडून सर्वांना दिल्या. गुरुजी वर्गात आले. वैतागून ओरडले : ‘बे एकं बे... बे दुणे...’ नंतर त्यांनाच काही आठवेना.
मुलं विचारू लागली : ‘‘बे दुणे किती?’’
व्यवस्था हसत होती. गुरुजी रडत होते. त्यातच घंटा झाली आणि पोरं ‘बे एकं बे’ ओरडत घराकडं पळाली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com