‘जगण्याच्या जवळचं लिखाण’ (सत्यजीत खांडगे)

satyajit khandge
satyajit khandge

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी येऊ घातली आहे. महाराष्ट्रातल्या साहित्यविश्वात बरीच चर्चेत असलेली आणि संदर्भसंपन्न आणि आशयमूल्य असलेली ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रेरणा, तिची प्रक्रिया, पार्श्वभूमी आणि अनुषंगिक विषयांवर पठारे यांच्याशी साधलेला संवाद.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी आकाराला येण्यामागील दीर्घ पार्श्वभूमी कोणती किंवा निर्मितीच्या केंद्रस्थानी असलेलं आशयसूत्र कोणतं?
रंगनाथ पठारे : कादंबरी एकाएकी लिहून होत नाही, ती दीर्घकाळ मनात घोळत असते. मनात असतं ते सर्व लिहिलंच जातं असं नाही. लिहिण्याच्या प्रवाहातच कादंबरी घडत जाते. ही कादंबरी गेली अनेक वर्षं माझ्या मनात होती. साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी मी लिहिण्याचा पहिला प्रयत्न केला. पूर्वजांबद्दल एक ऐकीव कुतूहल माझ्या मनात होतं. परंतु, लिहायला सुरवात केल्यानंतर असं लक्षात आलं, की लिहिणाऱ्याचं काम हे शोध घेण्याचं असतं. पुढं काही लिहायला जमलं नाही. त्यानंतर दोन-तीनदा लिहिण्याचा प्रयत्न केला. सन २००७ नंतर मात्र याविषयी गांभीर्यानं लिखाणाला सुरवात केली. हस्तलिखिताची दोनशे पानं लिहून झाली आणि काही वैयक्तिक कारणांमुळं अस्वस्थतेतून लिखाणात पुन्हा खंड पडला. मग सन २०१६मध्ये मात्र पूर्ण वेगळ्या पद्धतीनं या लिखाणाचा मी विचार करायला लागलो आणि साधारण रामदेवराय यादव याच्या काळापासून ते आजपर्यंत अशा सात टप्प्यांवर या कादंबरीचं लिखाण केलं. आपण जे जगतो, पाहतो, वाचतो, अनुभवतो या सगळ्यांचाच आपल्याला फायदा होत असतो. इतिहासात डोकावल्यावर काही संदर्भानुरूप महिकावतची बखर वाचनात आली आणि ‘पाठारे’ या क्षत्रिय कुळाबद्दलच्या कुतूहलातून कादंबरीची सुरवात झाली.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी म्हणजे कल्पना आणि वास्तव यांना स्पर्श करणारं आत्मनिवेदन आहे, की एका विशिष्ट समाजाविषयीच्या व्यक्त झालेल्या जाणिवा आहेत?
: कादंबरी हे मुळात कल्पित गद्यच असतं; पण लेखक ते वास्तवाच्या पातळीवर उभं करत असतो. हे लिखाण माझ्या जगण्याच्या जवळचं आहे, पूर्वजांच्या जवळचं आहे; पण ते पूर्वजांचं चरित्र मात्र नाही. ही नुसती मराठा समाजाविषयीची कादंबरी नाही, तर इतर अनेक जातींचे संदर्भही यात आहेत. आपण महाराष्ट्रातले लोक समाज म्हणून किती एकसंध आहोत, ही गर्भित भूमिका घेऊनच हे लिखाण केलं आहे. कादंबरीच्या शीर्षकामुळं एका विशिष्ट समाजासाठीची वाटू शकते; परंतु ते तसं नसून संदर्भानुरूप ती एक समग्र मांडणी आहे.

कांदबरी हा ‘परफॉर्मेटिव्ह ॲक्‍ट’ असेल, तर या कादंबरीत वास्तव, कल्पना आणि अद्‍भुतता यांची भूमिका कशी आहे?
: कल्पित हेसुद्धा एक प्रकारचं वास्तवच असतं. इथं आपण वास्तवाच्या बाबतीत विचार करू. वास्तव जरी समान भासत असलं, तरी त्याची रूपं, प्रक्षेपण या गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाला दिसणारं वास्तव, सत्य हे भिन्नच. कुठल्याही कादंबरीच्या लेखनासंबंधी मूळ प्रश्न हा वर्तमान काळातलाच असतो, मग या वर्तमानाच्या आकलनासाठी लेखक भूतकाळातही अनेक वर्षं मागं जाऊ शकतो. कारण तिथं आधाराचे काही स्रोत उपलब्ध असतात. भविष्यात डोकावणं थोडं अवघड असतं; पण अशक्‍य नसतं.
 
सामाजिक वास्तवाला छेदणाऱ्या अनेक संदर्भांचा समान धागा आपल्या लेखनात सापडतो. या पार्श्वभूमीवर ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरी कशी वेगळी आहे?
: सतत आपल्या भोवती घडणाऱ्या घटना पाहणं, समजावून घेणं, त्यांचे अर्थ लावणं आणि ते वेगवेगळ्या पातळ्यांवर तपासत जाणं हे लेखकाचं कामच आहे. यात मी काही वेगळं करतोय असं नाही. महाराष्ट्रीय समाज म्हणून आपण विविध जाती-धर्माचे लोक एकमेकांत मिसळलेलो आहोत. आपल्याकडे सांस्कृतिक घुसळण मोठ्या प्रमाणात आहे. भारताचं असं एक वैशिष्ट्य सांगता येईल, की जगातल्या सगळ्या वंशांची वैशिष्ट्यं भारतात दिसतात. लढाऊपणा हा आपल्या पूर्वजांच्या जगण्याचा धर्म होता, वेगवेगळ्या स्वरूपात तो आजही शिल्लक आहे. भारतीय भूमी ही अतिशय स्वागतशील, सुपीक अशी भूमी आहे. सर्वांना सामावून घेण्याची इथली संस्कृती आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक प्रकारच्या सोसण्याचा, सहिष्णुतेचा, सहजभावाचा आणि भ्रातृभावाचा संदेश या कादंबरीतून जावा असं मला वाटतं. बाकी वाचक ठरवतीलच.

वर्तमानकालीन गतिमान जीवनपद्धती, हरवत चाललेला निवांतपणा आणि अस्थिर जीवनशैली यांवर भाष्य करण्यासाठी मराठी कादंबरी कुठल्या टप्प्यावर उभी आहे असं वाटतं?
: वर्तमानाचं प्रतिबिंब तातडीनं कादंबरीत सहसा पडत नाही. जीवनानुभव मनात मुरणं आणि त्याची संगती लावण्याचा प्रयत्न करणं हे कादंबरीकार करतच असतो. वर्तमानकाळाचं प्रतिबिंब कादंबरीत यायला थोडा वेळ लागतो; पण आजची जी कादंबरी आहे, ती मात्र खूप लवकर ही मांडणी करण्यास समर्थ आहे असं मी ठामपणे सांगू शकतो. आजच्या काळातले काही तरुण लेखक अशा प्रकारचं लिखाण करत आहेत हे माझं निरीक्षण आहे. जागतिकीकरणाच्या आणि जीवनपद्धतीच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर, विशेषत खेड्यांत जे काही बदल झाले त्याचं अस्सल शब्दचित्रण आजचे काही तरुण कादंबरीकार समर्थपणे करत आहेत आणि ते अव्वल दर्जाचं आहे, असं मला वाटतं.

गेली चाळीस वर्षं आपण लिखाणातून, भाषणांमधून आणि मुलाखतींमधून मराठी कादंबरीविषयी बोलत आहात. या दीर्घ टप्प्यात कादंबरीच्या स्थित्यंतराविषयी कोणती निरीक्षणं नोंदवू इच्छिता?
: वि. स. खांडेकर, प्र. के. अत्रे, ना. सि. फडके यांच्या काळातही श्रेष्ठ कादंबरी लिहिली गेली नाही. त्या काळी साहित्याला वर्तमानपत्रांत भरपूर जागा होती. कादंबरीचे वाचक मात्र शहरांपुरते मर्यादित होते. कारण तत्कालीन बहुसंख्य समाज हा निरक्षर होता आणि शिकलेले लोक शहरापुरतेच मर्यादित होते. साधारण सत्तरच्या दशकात अठरापगड जातींतून लेखक पुढे येऊ लागले आणि ज्या प्रकारचं जीवन माहितीच नव्हतं ते साहित्यातून पुढे येऊ लागलं. सत्तरीच्या दशकात झालेला हा एक क्रांतिकारी बदल होता. नंतरच्या काळात दर्जेदार लेखनाला सुरवात झाली, ती या अठरापगड जातींतून आलेल्या लेखकांमुळंच. वाचकांचा भौगोलिक विस्तार होणं ही याच काळाची देणगी. अत्यंत कमी लोकवस्तीतल्या एखाद्या दूरच्या खेड्यातही एखादा प्रगल्भ वाचक सापडेल अशी आजची परिस्थिती आहे, ही कादंबरीच्या दृष्टीनं जमेची बाजू म्हणता येईल.

जागतिकीकरणामुळे महाराष्ट्रीय समाजाला काही नवीन पेचांना सामोरे जावे लागले का? यात दलित साहित्याची भूमिका कशी अधोरेखित करता येईल?
: दलित साहित्य हा स्वतंत्र प्रवाह अस्तित्वात येण्याअगोदरही अण्णा भाऊ साठे, किसन फागूजी बनसोड असे अनेक लोक ‘लिहिते’ होते. मात्र, सत्तरच्या दशकात नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्यामुळे त्याला एक आक्रमक, महत्त्वाचं स्वरूप प्राप्त झालं. साहित्यातील प्रस्थापितांना दणका देणारा पहिला हुंकार हा दलित साहित्यातून व्यक्त झाला. इतिहासात डोकावून याची कारणमीमांसा करता येते. मुंबईत कापड उद्योगाची सुरवात झाल्यानंतर ग्रामव्यवस्थेमध्ये तळाच्या परिस्थितीत जगणारा दलितवर्ग मुंबईत स्थिरावू लागला. मुंबईत गेल्यावरही त्यांची जात संपली नाहीच; पण जातीचा काच मात्र कमी झाला. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी तिथं उपलब्ध झाल्या. दलितांनंतर इतर जाती आणि मग मराठा शेतकरी असा तो स्थित्यंतराचा प्रवास आहे. त्यामुळे गावाकडे उरलेल्या मराठा समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तोपर्यंत दलित साहित्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अगोदर होऊन गेल्यानं त्याला भक्कम असा दार्शनिक पाया होता. सन १९७०च्या आधीपर्यंत साहित्यामध्ये जी जातीयता होती, ती आता राहिली नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास उशीर का होतोय? विलंबाची कारणं काय आहेत?
: मराठी भाषेच्या समृद्ध आणि प्राचीन इतिहासाचा आढावा घेऊन समितीनं आपला सकारात्मक अहवाल सरकारकडे सुपूर्द केला, याला आता बरीच वर्षं झाली आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंच्या प्रयत्नातून तो दर्जा आतापर्यंत मिळायला हवा होता. परंतु, सरकारदरबारी या प्रश्नाविषयी अनास्था असल्याचं दिसतं आणि याबद्दल मी नाराज आहे. हा दर्जा मिळण्याबाबत सरकारकडून पूरक भूमिकेचा आग्रह दिसत नाही. हा दर्जा मिळाला, तर खूप मोठं काम उभं करता येऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com