रागाची लक्षणे आणि वैशिष्ट्ये (भाग १) (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali
Updated on

प्रत्येक रागाची अनेक लक्षणं असतात, वैशिष्ट्यं असतात. ही सर्व लक्षणं प्रत्येक रागामध्ये असणं हे शास्त्र असलं तरी हे प्रत्येक लक्षण रागाचं सौंदर्य वाढवत असतं हे नक्की. रागसौंदर्य वाढवणाऱ्या अशाच काही रागलक्षणांविषयी...

‘भारतीय संगीताचं वैशिष्ट्य काय?’ असं विचारलं तर त्याचं उत्तर ‘रागसंगीत’ असं आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा समजून घेणं हे म्हणावं तितकं सोपं नाही. कुठल्या तरी मोठ्या गायकानं असं म्हटलं होतं : ‘आयुष्य संपायला आलं तेव्हा कुठं ‘यमन’ कळायला लागला.’ असं असता
सर्वसामान्य लोकांची गत ती काय? पण राजहंस डौलदारपणे चालतो म्हणून इतरांनी चालूच नये असं नाही, म्हणून प्रत्येकानं संगीताच्या महासागरात खुशाल डुंबावं आणि आपापल्या परीनं आनंद घ्यावा!

‘रंजयति इति राग: ’अशी रागाची व्याख्या केली जाते. रंजन करतो तो ‘राग’. मनाचं रंजन करणारी, विशिष्ट स्वरांची, नियमबद्ध रचना म्हणजे राग. मानवी भावनांचा परिपोष व नवरसांचा आविष्कार या रागरचनेत सामावलेला आहे. रागाचा अभ्यास करायचा म्हणजे केवळ त्याचं शास्त्र समजून चालत नाही. रागाला स्वतःचं असं एक व्यक्तिमत्त्व असतं.
ज्याप्रमाणे केवळ सोंड, चार पाय आणि शेपूट काढलं तर तो हत्ती होत नसतो...त्याची चाल, त्याचा डौल, त्याची ताकद, त्याचा रुबाब या सर्व बाबींची मिळून हत्तीची ‘पर्सनॅलिटी’ असते. रागाचंही तसंच आहे. तो कधी, किती वेळ, कसा गायचा, त्याची लय, भाव असे अनंत पैलू त्यात असतात. रागाचं नुसतं व्याकरण समजून घेतलं की राग कळला असं म्हणणं फार उथळपणाचं ठरेल. तरीसुद्धा एखादी रागनिर्मिती होताना कोणते नियम पाळले जावेत यासंबंधी संगीतशास्त्रात काही बंधनं आहेत. ती समजून घ्यायचा प्रयत्न आपण करू.
अर्थात्‌, या प्रत्येक नियमाला काही अपवादही आहेत हे लक्षात घ्यायला हवं.

थाट : बारा स्वरांचं वेगवेगळं संमिश्रण (Combination) केल्यास शेकडो राग निर्माण होऊ शकतात. या सर्व रागांचं ढोबळ वर्गीकरण (Classification) केलं गेलं आहे. सर्व रागांपैकी साधर्म्य असलेले राग, वेगवेगळ्या गटांत समाविष्ट केले जातात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात असे दहा गट आहेत. या प्रत्येक गटाला ‘थाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येक राग एखाद्या निश्चित थाटातूनच उत्पन्न झालेला असतो म्हणूनच ‘थाट ही रागाची जननी आहे’ असं म्हटलं जातं.

आरोह-अवरोह : संगीतात १२ स्वर असले तरी एका रागात सर्व स्वरांचा समावेश नसतो. एका रागात कमीत कमी पाच स्वर, तर जास्तीत जास्त सात स्वर असतात. रागात असलेले सर्व स्वर अनुक्रमे चढत्या आणि उतरत्या क्रमानं गायले जातात. स्वरांच्या चढत्या क्रमाला ‘आरोह' (Ascending order) व उतरत्या क्रमाला ‘अवरोह' (Descending order) असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ : भूप रागात पाच स्वरांचा समावेश असतो.
आरोह : सा रे ग प ध सा
आणि
अवरोह : सा ध प ग रे सा
असा आहे.
आरोह-अवरोह नीट समजणं ही रागाची पहिली पायरी असते.

वादी-संवादी : वादी स्वर म्हणजे रागातला मुख्य स्वर. हा स्वर रागात सर्वात जास्त वापरला जातो आणि इतर स्वर त्या स्वराभोवती फिरतात. थोडक्यात, रागातल्या स्वरसमूहाचा तो राजा असतो. त्या रागातल्या उपमुख्य स्वराला ‘संवादी’ असं म्हटलं जातं. मुख्य स्वराच्या खालोखाल संवादी स्वर वापरला जातो. प्रत्येक रागात एकच वादी आणि एकच संवादी स्वर असतो.

पकड : रागाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी रागामधले विशिष्ट स्वरसमूह वारंवार गायले जातात, त्याला रागाचं मुख्य अंग किंवा ‘पकड’ असं म्हटलं जात. रागांची विशिष्ट स्वरसंगती हीच त्या रागाची ओळख असते. ज्याप्रमाणे उंटाचं कुबड, जिराफाची उंची किंवा सिंहाची आयाळ या बाबी त्या त्या प्राण्याची विशिष्ट ओळख दर्शवतात, त्याप्रमाणे काही रागांतल्या विशिष्ट स्वरसंगतींवरून राग ओळखले जातात. या स्वरसंगती अर्थातच रंजक असतात आणि त्यातून त्या रागांचं सौंदर्य दिसतं.

जाती : रागात किती स्वर आहेत यावरून त्या रागाची जाती ठरते. पाच स्वरांच्या रागाला ‘ओडव’, सहा स्वरांच्या रागाला ‘षाडव’, तर सर्व स्वर असलेल्या रागाला ‘संपूर्ण’ जातीचा राग असं म्हटलं जातं.

वर्ज्य स्वर : रागामध्ये अजिबात न लागणारा स्वर म्हणजे वर्ज्य स्वर. उदाहरणार्थ: वर दिलेल्या भूप रागाच्या आरोह-अवरोहात ‘म’ व ‘नी’ स्वर वर्ज्य आहेत. कुठल्याही रागात दोनपेक्षा अधिक स्वर वर्ज्य नसतात. हे पाठोपाठ येणारे स्वर कधीच नसतात. कोणत्याही रागात ‘सा’ हा स्वर वर्ज्य नसतो, तसेच मध्यम आणि पंचम दोन्ही स्वर एकत्रितपणे वर्ज्य असलेला एकही राग अस्तित्वात नाही.

ग्रह स्वर : ज्या स्वरापासून रागगायनाचा आरंभ होतो त्या स्वराला ग्रह स्वर असं म्हटलं जातं.

अंश स्वर : जो स्वर इतर स्वरांच्या तुलनेत जास्त वापरला जातो त्याला अंश स्वर असं म्हटलं जातं. या स्वरालाच ‘वादी’ किंवा ‘जीव स्वर’ असंही संबोधलं जातं.

न्यास स्वर : रागातल्या पाच किंवा जास्त स्वरांपैकी दोन स्वर मुख्य-उपमुख्य असतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांना ‘वादी-संवादी’ असं म्हटलं जातं. याव्यतिरिक्त उर्वरित स्वरांनादेखील कमी-अधिक महत्त्व असतं. प्रत्येक रागात कोणते स्वर कमी-जास्त घ्यायचे याबरोबरच कुठले स्वर लांबवायचे व त्यावर ठहराव करायचा हे ठरलेलं असतं. त्या स्वरांना ‘न्यास स्वर’ असं म्हटलं जातं.

दुर्बल स्वर : रागातल्या ज्या स्वरांना कमी महत्त्व असतं त्यांना ‘दुर्बल स्वर’ असं म्हटलं जातं. या स्वरांना कमी महत्त्व असलं तरी त्यांच्याशिवाय राग पूर्ण होऊ शकत नाही.

विवादी स्वर : काही वेळा रागामध्ये न लागणाऱ्या स्वराचा वापर करून रागसौंदर्य वाढवलं जातं. त्याला ‘विवादी स्वर’ असं म्हटलं जातं.

अल्पत्व : ज्या स्वरांचा रागामध्ये खूप कमी उपयोग केला जातो त्याला ‘अल्पत्व’ असं म्हटलं जातं.

बहुत्व : ज्या स्वरांना रागामध्ये प्राधान्य दिलं जातं किंवा ज्या स्वरांचा सारखा उपयोग केला जातो त्याला ‘बहुत्व’ असं म्हटलं जातं.
वादी-संवादी स्वर यात येतातच; पण काही वेळा
वादी-संवादीव्यतिरिक्त इतरही स्वर ‘बहुत्व’ या संज्ञेत येतात.

रंजकता : राग शास्त्रीय चौकटीत बांधलेला असला तरी रागाचा मूळ हेतू हा रंजनाचा आहे, त्यामुळे रंजन हे रागाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रागातून वेगवेगळी रसनिष्पत्ती होत असते.

वरील सर्व लक्षणं प्रत्येक रागामध्ये असणं हे शास्त्र असलं तरी हे प्रत्येक लक्षण रागाचं सौंदर्य वाढवत असतं हे मात्र नक्की. या लक्षणांव्यतिरिक्त रागाची अजूनही काही वैशिष्ट्यं असतात. त्यांचा आढावा आपण पुढच्या लेखात घेऊ.

आम्ही गाणाऱ्या मुली!
गाणं हे कुणाचं करिअर असू शकतं याला आता कुठं मान्यता मिळायला सुरुवात झाली आहे. नाहीतर अगदी आत्ता आत्तापर्यंत लोक विचारत असत : ‘गाता ते ठीके; पण बाकी काय करता...?’ यावर काय उत्तर द्यायचं हा प्रश्न प्रत्येक गायिकेला पडत असेल हे नक्की! लहानपणापासून मुलीला गाण्याच्या क्लासला पाठवायचं; पण मुलीचं किंवा सुनेचं करिअर मात्र गाण्याचं नको, यामागची मानसिकता अनाकलनीय आहे.
आज अनेक मुली संगीत हे करिअर म्हणून निवडतात. लोक कौतुक करतात, प्रसंगी प्रोत्साहनही देतात; पण ही कला जोपासणं तितकंही सोपं नसतं प्रत्येक मुलीला.
आजच्या महिलादिनाचं निमित्त साधून, गाणाऱ्या मुलींच्या करिअरचा हा ओझरता आढावा...

लग्नाआधी सगळ्याच गोष्टींचं कौतुक होत असतं, तसं या ताज्या, होऊ घातलेल्या करिअरचंही होतं. आमच्या मुलीला अनेक कार्यक्रम असतात, लोकांना तिचं गाणं आवडतं, कौतुक होतं, बिदागीही पुरेशी मिळते...सगळंच कसं कौतुकास्पद. आजूबाजूला चांगले काळजी घेणारे वादकमित्र असतात, रात्री-अपरात्री उशीर झाला तर घरापर्यंत सोडणारे असतात. घरच्यांना या सगळ्या बाबींचं कौतुक असतं. क्वचित शेजारपाजारच्यांना, नातेवाइकांना काहीतरी खटकतंही; पण घरची मंडळी त्यांना उत्तरं द्यायला खंबीर असतात...आणि अशातच ठरतं लग्न! सुरळीत चाललेलं सगळं बदलतं आणि नव्यानं सगळा डाव मांडावा लागतो, जो कधी पुन्हा नीटपणे जमतो आणि कधी साफ बुडतोही.
सूनबाई गातात याचं थोडे दिवस कौतुक होतं. कार्यक्रम लांबून बघायला बरे वाटतात; पण खरी पंचाईत होते ती गाणारी सून घरात आली की! ‘रियाज म्हणजे काही नोकरी नव्हे, तो हवा तेव्हा सोईनं केला जाऊ शकतो’ असा लोकांचा गैरसमज असतो; पण नोकरीपेक्षाही चिकटीनं आणि नियमितपणे केला जातो त्यालाच रियाज म्हणतात खरं तर! हा सगळा प्रकार घरच्यांना नवीन असतो आणि नवीन घरात त्याचं तंत्र जमवणं सुनेलाही अवघडंच. कलाकार सांभाळणं घरच्यांना सोपं नसतं आणि नव्या घरात बस्तान बसवणं सुनेला सोपं नसतं!

कार्यक्रमाला जातानाची मानसिकता, कार्यक्रमाची पूर्वतयारी, डोक्यात आणि मनात कार्यक्रमापूर्वीच सुरू असलेलं गाणं, त्याबद्दल चाललेला विचार...हे सगळं सासरच्या लोकांना कसं बरं समजावं? आणि समजवावं?
कार्यक्रमाआधी कसं जेवण जात नाही, उशिरा जेवून कशी अॅसिडिटी होते, जागरणामुळे काय काय त्रास होतात, कार्यक्रम झाल्यावरही वाढलेल्या अँग्झायटीमुळे कशी झोप लागत नाही, सकाळी डोळा का उघडत नाही याबद्दल सून तरी काय खुलासा देणार? रात्री-बेरात्री कार्यक्रमानंतर कुणीतरी परकं आपल्या सुनेला घरी सोडायला येतं हे न आवडणंही साहजिकच आहे; पण यावर तोडगा काय? बरं, नवऱ्यानं बरोबर जावं तर सुनेबरोबर त्याचंही रुटीन डिस्टर्ब होणार...रोज मरे त्याला कोण रडे!
एकदा थोडं ग्लॅमर आलं, लोक ओळखू लागले आणि सासरच्यांना सुनेचा अभिमान वाटू लागला तर आनंदच आहे; पण निवृत्त व्हायच्या वयात आपली ओळखच जर सुनेमुळे होऊ लागली तर ते कुणाला आवडेल? ५० वर्षं ज्या घरात आपण राहत आहोत ते घरही आता ‘अमुक अमुक गाणारीचं घर’ म्हणून लोक ओळखायला लागले तर थोडा त्रास होणारच की! नवीन सुनेनं सणांना घरी असावं ही माफक अपेक्षा सूनबाई कशी पूर्ण करणार? कार्यक्रम तर दिवाळीत-गणेशोत्सवातच असणार; मग ऐन सणांच्या काळात आपल्यामुळे घर सुनं आहे आणि तरी आपल्याशिवाय सगळे सण पार पडतात याची खंत सून तरी कुठं व्यक्त करणार?

अशासारख्या असंख्य छोट्या-मोठ्या अडचणी पार करत आणि अॅडजस्टमेंट्स करत कुठलीही गाणारी मुलगी आपलं करिअर घडवत असते. कलाकारांचं ग्लॅमर दिसतं; पण त्यामागचे त्यांचे कष्ट लोकांसमोर येत नाहीत आणि हे कष्ट सुकर होण्यासाठी माहेराबरोबरच सासरचा खंबीर पाठिंबा असेल तर यशाकडे जाण्याचा मार्ग अधिक सोपा होतो आणि एक कलाकार पूर्णपणे खुलतो हे नक्की.

स्त्रीकलाकार यशस्वी होण्यामागं त्या स्त्रीचे कष्ट तर असतातच; पण तेवढंच श्रेय असतं तिच्या घरच्यांनाही. तिला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळेच ती संसार आणि करिअर ही दोन्ही चाकं एकाच वेळी ओढत आली आहे. मुला-बाळांसाठी करिअरमध्ये ब्रेक घेणं, सगळं सोडून कार्यक्रमासाठी परदेशी जाणं, आजीनं नातवंडांना आईसारखं सांभाळणं अशा असंख्य अॅडजस्टमेंट्स करत असंख्य मुली आज संगीतक्षेत्रात यशस्वीरीत्या काम करत आहेत ते केवळ घरच्यांच्या पाठींब्यामुळेच. त्या अनेकांचा आदर्श आहेत आणि समाजात मानाचं स्थान मिळवत आहेत. अशा सर्व स्त्रीकलाकारांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या घरच्यांना आजच्या महिलादिनानिमित्त मानाचा मुजरा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com