संगीतातली सौंदर्यस्थळं : भाग १ (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali
sayali

ज्या गायनामुळे चित्तवृत्ती तरल होऊन मन आर्द्र होतं ते गायन सौंदर्यपूर्ण आहे असं म्हणता येईल. अशा सौंदर्यपूर्ण गायनातली सौंदर्यस्थळं अनेक घटकांनी खुलत असतात. आवाज, सुरेलपणा, लय-ताल, विराम इत्यादी...सुरेल संगीताचे आवश्यक घटक म्हणजे सूर व लय. या दोहोंच्या संयोगातून सौंदर्याकृती निर्माण होत असते; पण अशी सौंदर्यानुभूती प्रत्येकाला निश्चितपणे एकाच क्षणी येईल असं नाही.

सौंदर्य म्हणजे एक जाणीव किंवा अनुभूती असते, जिचा शरीरावर व मनावर अत्यंत हितकारक परिणाम होत असतो; मग ते सौंदर्य आकाशातल्या रंगांच्या विविध छटांमध्ये असेल किंवा ट्वेंटी-२० च्या क्रिकेटसामन्यामधल्या शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचं असेल. संगीतातही अनुभूतीनं शरीर, मन व बुद्धी यांचा समतोल साधला जातो व चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. अनुभूतीमुळे शरीरातल्या ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत गायक आणि श्रोता पोहोचत असतो. अनुभूती ही नेहमी शब्दातीत असते व ती मैफलीत प्रत्यक्ष अनुभवायची असते. ज्या गायनामुळे चित्तवृत्ती तरल होऊन मन आर्द्र होतं ते गायन सौंदर्यपूर्ण आहे असे म्हणता येईल. सौंदर्याच्या अनुभूतीचे निश्चित ठोकताळे नसतात, ते कलावंतावर व रसिकांवर अवलंबून असतात. त्याचा निकष लावणं अवघड असतं. कारण, सौंदर्य हे व्यक्तिसापेक्ष असतं. या सौंदर्यसिद्धान्तांमध्ये अपेक्षित असलेली सौंदर्यतत्त्वं म्हणजे नावीन्य, सुसूत्रता, चैतन्य इत्यादी. याशिवाय गायकाचा आवाज, व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, क्षमता, आवड, संस्कार, शिक्षण आदी घटकांमुळे प्रत्येक कलाकाराच्या आविष्कारात भिन्नता दिसून येते. सादरीकरणाच्या संकल्पना काळानुरूप बदलत असतात. तरीसुद्धा सामान्यपणे मैफलीत अनुभूती देणाऱ्या सौंदर्यस्थळांच्या निकषांचा आपण इथं विचार करू. सुरेल संगीताचे आवश्यक घटक म्हणजे सूर व लय. या दोहोंच्या संयोगातून सौंदर्याकृती निर्माण होत असते; पण अशी सौंदर्यानुभूती प्रत्येकाला निश्चितपणे एकाच क्षणी येईल असं नाही.

आवाज : गायकाच्या आवाजाच्या जातीनुसार गायनाचा प्रभाव अंशात्मक व गुणात्मकरीत्या बदलू शकतो. उदाहरणार्थ : मैफल सुरू असताना सभागृहात शिरल्यावर चांगल्या आवाजाचा परिणाम तत्क्षणी जाणवतो. उत्तम आवाज हे गायकाचं प्रभावी माध्यम व साधन आहे. उत्तम आवाज म्हणजे नुसता गोड, मधुर आवाज नसून स्वरसाधनेमुळे ज्या आवाजाला लवचिकता, धार व तेज प्राप्त झालेलं आहे असा आवाज. खर्जसाधनेमुळे आवाजात धीरगंभीरता येते व आवाजाला घनता प्राप्त होते. असा आवाज कधीही चोरून, रेकून काढलेला नसतो. रचनात्मक सौंदर्य बघण्यात नादमाधुर्याकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. आवाज मूलतः उत्तम असेल तर मैफल अधिक यशस्वी होते. सर्वसामान्य श्रोत्यांना शास्त्रीय संगीताकडे आणि स्वतःकडे अधिक आकृष्ट करता येतं. यामुळे शास्त्रीय संगीताचा अधिकाधिक प्रसार होण्यासही मदत होते.

सुरेलपणा : सुरेलपणा हा कंठसंगीतातला महत्त्वाचा घटक आहे. गायकाचा कंठस्वर हा स्वच्छ, सुरेल, मोकळा व अविकृत असला पाहिजे. तो स्निग्ध, स्थिर, कर्णमधुर, टोकदार, धारदार व श्रोत्यांचं रंजन करणारा असावा. कारण, स्वराला एक चैतन्यमय अस्तित्व आहे. धारदारपणामुळे स्वर तेजस्वी बनतो. स्वरसाधनेमुळे स्वर अधिक रुंद, भरीव, दमदार व कसदार बनतो. स्वरात आस असल्यास गायनातलं गांभीर्य व उदात्तता वाढते. आसयुक्त आवाज शांतरसाला उपयुक्त असतो व तो श्रोत्यांना खिळवून ठेवतो. या सर्व गुणांनी युक्त असलेल्या आवाजात, खटका, मुर्की, मिंड, गमक, कणस्वर इत्यादी अलंकार सौंदर्यपूर्ण वाटतात. एखादी बाळबोध रचनाही श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते ती सुरेलपणामुळेच.

लय व ताल : स्वराचा संबंध हृदयाशी, तर लयीचा संबंध मेंदूशी असतो असं म्हणतात. लयतत्त्वाचा समावेश सर्वच कलांमध्ये मानला जातो. ख्यालगायनाच्या सुरुवातीला मोजक्या स्वरांमध्ये आलापगायन केलं जातं. नंतर बंदिश गाऊन आलापी सुरू होते, मग बोल-आलाप, ताना या सर्वांमध्ये अंतर्गत लय असतेच. लय ही फक्त तालात नसून प्रत्यक्ष गायनक्रियेत अपेक्षित असते व ती सादरीकरणादरम्यान वाढवली जाते. विलंबित गायनापासून द्रुतगतीपर्यंत लयीचा उत्कर्ष होत असतो, जो लयीचं सौंदर्य वाढवत नेतो. भारतीय संगीत ऐकताना श्रोता वेळोवेळी मान डोलवताना दिसतो तो या लयतत्त्वामुळेच. काही कलाकार अती द्रुतलयीचादेखील वापर करतात व एक वेगळा सौंदर्याविष्कार घडवतात.

विराम : संगीतातला विराम म्हणजे गायनक्रिया सुरू असताना गायकाची काही क्षण विश्रांतीची जागा. संगीतात सातत्याला जेवढं महत्त्‍व आहे तेवढंच विरामालादेखील आहे. समानता आणि असमानता याप्रमाणेच गायन आणि विरामाचंही असतं. विरामामुळे गायनाचं सौंदर्य वाढत असतं. या विरामात केवळ तानपुरा वाजतो किंवा सहवादकांचं सादरीकरण होत असतं, ज्यामुळे कलाकृती अधिक सौंदर्यपूर्ण होते. या विरामाच्या क्षणी संगतकारांच्या वादनामुळे किंवा स्वरसाथ करत असणाऱ्या शिष्याच्या आवाजामुळे एक हवाहवासा बदल होतो.

बंदिश : स्वर, लय, शब्द व एखाद्या रागात निर्माण केलेली सौंदर्यपूर्ण रंजक आकृती म्हणजे बंदिश होय. बंदिशीत वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य असू शकतं. उदाहरणार्थ : वेगवेगळ्या मात्रेपासून किंवा स्वरापासून सुरू होणारी बंदिश...आडलयीनं जाणारी बंदिश...रचनेचं, विषयाचं, अर्थाचं आणि शब्दांचं सौंदर्य असणारी बंदिश. कधीतरी बंदिशीत तबल्याच्या बोलांचा उपयोग केला जातो, तर कधी तराण्याचे शब्द वापरले जातात. बऱ्याच बंदिशींमध्ये ही सौंदर्यतत्त्वं सहज दिसून येतात, तर काही बंदिशींमध्ये गायकाला ती उलगडून दाखवावी लागतात. उदाहरणार्थ : सुंदर अर्थ असलेली भैरवी रागातली ही बंदिश पाहा :

भैरवी प्रियदर्शिनी रंजनी रागिनी मोहिनी
हे माते वर दे शक्ती दे
हम कला उपासक माँगे तुम्ही सो दान आज
नृत्य गीत वाद्य संगीत की सेवा करे
यही कामना मनोभावना।।

सादरणीकरणातली ही सौंदर्यस्थळं सर्वसामान्यपणे श्रोत्यांना अनुभवता येतात. याव्यतिरिक्तही अनेक सौंदर्यस्थळं सादरीकरणात असतात. त्यांचा आढावा पुढच्या लेखांमधून...

(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com