esakal | संगीतातली सौंदर्यस्थळं : भाग ४ (सायली पानसे-शेल्लीकेरी)
sakal

बोलून बातमी शोधा

sayali

आवाज, सुरेलपणा, लय, ताल, विराम, बंदिश, सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, स्वरसाथ हे घटक तर संगीतातली सौंदर्यानुभूती देतातच; पण याशिवाय, संवादिनीची संगत, तबल्याची संगत, स्वरमंडल, आभासी वातावरण, एकत्रित सादरीकरण, जुगलबंदी, दृश्यस्वरूप हेही घटत सौंदर्यानुभूतीसाठी महत्त्वाचे असतात.

संगीतातली सौंदर्यस्थळं : भाग ४ (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sakal_logo
By
सायली पानसे-शेल्लीकेरी sailyshellikeri@gmail.com

आवाज, सुरेलपणा, लय, ताल, विराम, बंदिश, सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, स्वरसाथ हे घटक तर संगीतातली सौंदर्यानुभूती देतातच; पण याशिवाय, संवादिनीची संगत, तबल्याची संगत, स्वरमंडल, आभासी वातावरण, एकत्रित सादरीकरण, जुगलबंदी, दृश्यस्वरूप हेही घटत सौंदर्यानुभूतीसाठी महत्त्वाचे असतात.

सौंदर्यशास्त्र ही एक स्वतंत्र आणि व्यापक अभ्यासशाखा आहे. मनुष्याच्या सौंदर्यविषयक अनुभूतींचा रीतसर अभ्यास म्हणजे सौंदर्यशास्त्र. हे शास्त्र लोकप्रिय असलं तरी त्याचा अभ्यास ही एक कठीण प्रक्रिया आहे. कारण, सौंदर्याची कल्पना ही व्यक्तीनुसार बदलत असते. सौंदर्याचं स्वरूप मानसिक आहे. प्रत्येक माणसाकडं
कमी-अधिक सौंदर्यदृष्टी असते; परंतु पाहणाऱ्याच्या दृष्टीनुसार सौंदर्याचे निकष बदलत असतात. मैफलीत येणाऱ्या सौंदर्यानुभूतीचा आपण आढावा घेत आहोत. आवाज, सुरेलपणा, लय, ताल, विराम, बंदिश, सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, स्वरसाथ अशा अनेक, सौंदर्यानुभूती निर्माण करणाऱ्या, घटकांचा विचार आपण मागच्या काही लेखांमधून केला. याही लेखात अन्य काही घटकांचा विचार करू या.

संवादिनीची संगत : संवादिनीवर एखादं आवर्तन भरल्यास मैफलीत सौंदर्यानुभूती होत असते. सारंगीच्या तुलनेत संवादिनीचा ध्वनी गायकाच्या आवाजाला Contrast असा असतो, त्यामुळे कानाला सुखद वाटतो. संवादिनीची साथ ही गायकाला पूरक अशी असते. गायकाचे विचार पुढं नेण्याचं काम संवादिनीवादक करत असतो. या विचारांमधली देवाण-घेवाण सौंदर्यपूर्ण असते. कधीतरी संवादिनीवादक गायकाला अनुसरत असतो. तोच विचार आपल्या वाद्यामधून परत एकदा श्रोत्यांसमोर ठेवत असतो. अशा वेळी पुनरावृत्तीचाही आनंद श्रोत्यांना मिळतो.

तबल्याची संगत : मुख्य कलाकाराच्या सादरीकरणाला पूरक अशी तबल्याची संगत असते. अशा संगतकारांमुळे संपूर्ण मैफलीचं सौंदर्यमूल्य वाढत असतं. याव्यतिरिक्त संधी मिळेल तेव्हा आवर्तन सौंदर्यपूर्ण भरणं हीदेखील महत्त्वाची जबाबदारी संगतकारांवर असते. सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक उठाण वाजवून तिहाई घेत सम गाठल्यावर कायमच श्रोत्यांना सौंदर्यानुभूती होताना दिसते. टाळ्यांच्या कडकडाटातून श्रोत्यांना झालेला आनंद कलाकारांपर्यंत पोहोचतो.

स्वरमंडल : मैफलीत स्वरमंडलाचा वापर कसा, किती केला जातो आणि त्यामुळं मैफल कशी अधिक सौंदर्यपूर्ण वाटते हा मुद्दा तर आहेच; पण त्याव्यतिरिक्त स्वरमंडल घेऊन गायला बसलेला कलाकार अतिशय भारदस्त आणि सुंदर दिसतो. रागाची बढत करताना स्वरमंडलावर वाजणारे रागातले स्वर अतिशय आल्हाददायक वातावरण तयार करतात. स्वरांचा भरणा त्यातून मिळतो आणि वातावरण अधिक उल्हसित होतं. याच कारणामुळे अनेक गायकमंडळी आज स्वरमंडल घेऊन गायला बसण्याला प्राधान्य देतात.

आभासी वातावरण : संगीतात इतकी ताकद असते की रागाच्या वेळेला अनुसरून ठराविक राग गायल्यास त्या वेळेचा आभास निर्माण होतो. उदाहरणार्थ : सकाळच्या वेळेत तोडी रागाचे प्रकार ऐकले की क्षितिजावरती सूर्योदय झालेला आहे...गोप आपल्या गाय-वासरांना घेऊन वनाकडं निघाले आहेत...गाय व वासरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा नाद वातावरणात भरून राहिला आहे असा आभास हमखास निर्माण होतो. सादरीकरणातून असा आभास श्रोत्यांच्या मनात निर्माण करणं हे कलाकाराचं कौशल्य आणि स्वरांची किमया असते व हे सौंदर्यानुभूतीचंच लक्षण आहे.

एकत्रित सादरीकरण : मैफल यशस्वी होणं हे सर्व कलाकार एकमेकांना पूरक असल्याचं लक्षण आहे. मैफलीचं यश हे गायककलाकार व साथीदार यांच्या एकत्रित सादरकरणामुळं असतं. केवळ मुख्य कलाकार उत्तम असला तर मैफल यशस्वी होतेच असं नाही. त्या सर्वांचं परस्परांमधलं ट्यूनिंग (Team Effort) मैफल जिवंत करतं. त्यांच्यातली देवाण-घेवाण, एकमेकांना दिलेली किंवा स्वीकारलेली दाद, त्यांचं एकमेकांशी असलेलं सांगीतिक नातं हे सर्व मैफलीत अनुभवण्यासारखं असतं. त्याच मैफलीचं रेकॉर्डिंग घरी ऐकताना हा आनंद मिळत नाही. याच जिवंतपणामुळे मैफल रंगते आणि त्यातून सौंदर्यानुभूती निर्माण होते.

जुगलबंदी : दोन कलाकारांच्या एकत्रित सादरीकरणाला ‘जुगलबंदी’ असं म्हटलं जातं. ही जुगलबंदी दोन गायकांमध्ये असू शकते. उदाहरणार्थ : भीमसेन जोशी व बालमुरलीकृष्ण किंवा कधीती दोन वादकांमध्येही असते. उदाहरणार्थ : बासरी व सारंगी. एक गायक आणि एक वादक कलाकारामध्येदेखील जुगलबंदी केली जाते. अशा वेळी त्यांच्यातली खेळीमेळीची चुरस, सवाल-जबाब, एकत्रित सादरीकरण आणि वादन या सर्वांमधून सौंदर्यानुभूती होत असते. दोन कलाकारांचे वेगळे आवाज, त्यांचे सांगीतिक विचार एकत्र ऐकणं हेदेखील सौंदर्य निर्माण करत असतं.

दृश्यस्वरूप : या सर्व सांगीतिक घटकांव्यतिरिक्त आजकालच्या मैफलींच्या दृश्यस्वरूपालाही महत्त्व प्राप्त झालेलं आहे. फुलांनी सजलेला रंगमंच, जागोजागी ठेवलेली फुलझाडं, आकर्षक सजावट, प्रदर्शनीय व्यवस्था, सुंदर वेशभूषा परिधान केलेले कलाकार या सर्व गोष्टींमुळे मैफलीच्या आधीच प्रसन्न वातावरणाची निर्मिती होऊन या प्रत्येक घटकामुळे सौंदर्यनिर्मिती होते. हे सर्व नसलं तरी मैफल यशस्वी होतेच; पण या सर्व गोष्टी असल्यास अधिक प्रसन्न वाटतं एवढं नक्की.

आजच्या व मागच्या काही लेखांमधून उल्लेखिलेले सर्व घटक मैफलीत सौंदर्य निर्माण करतात. हे सौंदर्य अनुभवायला त्याचा अभ्यास करावा लागतो असं नाही. कारण, सौंदर्य ही मानवी जाणीव अथवा भावना आहे. सौंदर्य हा वस्तूचा गुण नसून अनुभूती आहे. संगीतकलेचा आस्वाद कसा घ्यायचा यासाठी आपण मैफलीतल्या सौंदर्यस्थळांचा आढावा घेत आहोत. आत्तापर्यंत ऐकलेल्या मैफलींचा आढावा घेतल्यास श्रोत्यांना वरील सर्व घटकांमधून आनंदनिर्मिती झालेली दिसून आलेली आहे. यापुढच्या मैफलींमधून आपणही या सर्व सौंदर्यस्थळांचा अनुभव घेऊन बघा...

यापुढच्या लेखात आपण ‘नवनिर्मिती’ याविषयी जाणून घेऊ या...

loading image