ललित कलांचं सादरीकरण (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

जेव्हा कलाकार चित्र, शिल्प, संगीत किंवा नृत्याद्वारे आपली कलाकृती प्रस्तुत करतो तेव्हा संवेदनशील श्रोत्यांना-प्रेक्षकांनादेखील त्या आनंदाची अनुभूती होते, म्हणूनच ललित कलांचं प्रदर्शन किंवा प्रस्तुतीकरण महत्त्वाचं असतं. चित्र किंवा शिल्प या दृश्यकला आहेत, ज्यांमध्ये कलाकृती निर्माण झाल्यानंतरदेखील त्यांचा आनंद घेता येत राहतो. या कलांचा आनंद लुटण्यासाठी कलाकाराची उपस्थिती आवश्यक नसते; परंतु संगीत ही श्राव्यकला आहे आणि गायककलाकार जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा आनंदनिर्मिती होते; पण सादरीकरण पूर्ण होताच त्या कलाकृतीचा विलय होतो. याच कारणासाठी सतत वेगवेगळ्या मैफलींचं आयोजन केलं जातं. अशा मैफलींत कलाकार आणि रसिकश्रोता हे दोघंही महत्त्वाचे असतात.

सौंदर्याचं एक अनोखं विश्व तयार करून श्रोत्यांना त्यात सहभागी करून घेणं आणि स्वतःसकट सर्वांना आनंद देणं हा ललित कलांचा मुख्य उद्देश असतो. सौंदर्याची मूलभूत प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात निसर्गत: असतेच; पण तरीसुद्धा प्रत्येकात कलेच्या माध्यमातून प्रकट होण्याची क्षमता असतेच असं नाही. मात्र, एक सृजनशील किंवा सिद्ध कलाकार हे लीलया करू शकतो. जेव्हा कलाकार चित्र, शिल्प, संगीत किंवा नृत्याद्वारे आपली कलाकृती प्रस्तुत करतो तेव्हा संवेदनशील श्रोत्यांना-प्रेक्षकांनादेखील त्या आनंदाची अनुभूती होते, म्हणूनच ललित कलांचं प्रदर्शन किंवा प्रस्तुतीकरण महत्त्वाचं असतं. चित्र किंवा शिल्प या दृश्यकला आहेत, ज्यांमध्ये कलाकृती निर्माण झाल्यानंतरदेखील त्यांचा आनंद घेता येत राहतो. या कलांचा आनंद लुटण्यासाठी कलाकाराची उपस्थिती आवश्यक नसते; परंतु संगीत ही श्राव्यकला आहे आणि गायककलाकार जेव्हा कलाकृती सादर करतो तेव्हा आनंदनिर्मिती होते; पण सादरीकरण पूर्ण होताच त्या कलाकृतीचा विलय होतो. याच कारणासाठी सतत वेगवेगळ्या मैफलींचं आयोजन केलं जातं. संगीत ही अशी कला आहे की जीमध्ये कलाकृती रसिकांसमोरच निर्माण केली जाते. अशा अभिव्यक्तीसाठी सादरीकरणात कलाकार आणि श्रोता दोघांनाही तेवढंच महत्त्व असतं.
संगीतकलेच्या सादरीकरणाचे वेगवेगळे उद्देश असू शकतात.

आध्यात्मिक : संगीत हा परमेश्वराजवळ जाण्याचा अत्यंत सोपा मार्ग समजला जातो. मन एकाग्र होण्यासाठी संगीत हे अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे असं, पूर्वीच्या काळी साधना करत असताना, ऋषी-मुनींच्या लक्षात आलं म्हणून परमेश्वराची आराधना करण्यासाठी या कलेचा उपयोग केला गेला. सूरदास, मीराबाई, तुलसीदास अशा किती तरी संतांनी संगीताच्या माध्यमातून आराधना केली. आजच्या काळातही अनेक जण संगीताच्या माध्यमातून आराधना करताना दिसतात. देवळात चालणारी कीर्तनं, भजनं ही त्याचीच उदाहरणं होत. अशा संगीतातून केवळ गायककलाकारांनाच नव्हे, तर श्रोत्यांनाही ब्रह्मानंदप्राप्ती होताना दिसते. आध्यात्मिक साधनेत संगीताचं कायमच महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे.

भावनिक : संगीतकलेच्या निर्मितीतून कलाकार स्वतः आनंद घेतच असतो. अशी कलाकृती रसिकांसमोर सादर करूनही कलाकाराला समाधान मिळत असतं. कलाकृतीच्या माध्यमातून श्रोत्यांना त्या कलेचा पुरेपूर आनंद मिळाला की कलाकाराला पूर्ण समाधान मिळत असतं. अशा प्रकारे कला केवळ ‘स्वान्त: सुखाय’ राहत नाही. रसिकांच्या आनंदात कलाकाराचाही आनंद सामावलेला असतो. अशा कलेच्या सादरीकरणात कलेचा भावनिक उद्देश सफल होत असतो.

व्यावहारिक : एकेकाळी कलेचा उद्देश केवळ आनंदनिर्मिती हा होता. कलेच्या माध्यमातून स्वतः कलाकार रसिकांचं मनोरंजन करत असत. सादरीकरणाची बिदागी मिळत असे; पण तिचं स्वरूपही बक्षिसासारखं असे. दरबारात झालेल्या सादरीकरणानं आनंद झाल्यास राजा गळ्यातला मौल्यवान हार काढून देत असे; पण तो मिळवण्याच्या हेतूनं मात्र कलेचा उपयोग कलाकाराकडून केला जात नसे. धनिक, रसिक, सरदार, श्रीमंत, राजे-महाराजे कलाकारांना मदत करत असत. आज हे चित्र पूर्णतः बदललेलं आहे. आज कलेला व्यावसायिक रूप प्राप्त झालेलं दिसतं. तसं पाहता, आजही कलाकृतीतून मनोरंजनाचा आणि आनंदप्राप्तीचा हेतू असतोच; पण तो आनंद मिळवण्यासाठी श्रोत्यांना तिकिटासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. जेवढा कलाकार मोठा तेवढी तिकिटाची रक्कम मोठी. आज अनेक कलाकारांचा हा व्यवसाय आहे. कलेच्या सादरीकरणाबरोबरच इतरही अनेक व्यवसाय निर्माण झाले. संगीतशिक्षक, शास्त्रकार, समीक्षक, वाद्य तयार करणारे इत्यादी.
आज शास्त्रीय संगीताचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. शाळांमधून, क्लासेसमधून अनेक विद्यार्थी संगीत शिकत आहेत. हे सर्वजण जरी पुढच्या काळात गायक झाले नाहीत तरी उत्तम श्रोते नक्कीच होतात.

पूर्वीच्या तुलनेत आजच्या मैफलींची संख्याही बरीच जास्त आहे. कुणा एकाच्या घरी होणाऱ्या छोटेखानी मैफली आज जवळजवळ बंद झालेल्या दिसतात. आवड, उत्सुकता, पद्धत, फॅड अशा अनेक कारणांनी मैफलींना गर्दी होताना दिसते. वाढलेल्या श्रोत्यांमुळे सादरीकरणाचंही स्वरूप बदलत चाललं आहे. श्राव्याबरोबरच दृश्य स्वरूपालाही तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं दिसतं. कलाकारांची हजारांच्या आणि लाखांच्या घरातली बिदागी, संगतकारांचा खर्च, कार्यक्रमाचं ठिकाण, कलाकाराचा येण्या-जाण्याचा, राहण्याचा खर्च, मंचव्यवस्था अशा अनेक खर्चांमुळे व्यक्तिगत स्तरावर कार्यक्रम करणं केवळ अशक्य होऊन बसतं. तरीसुद्धा एखाद्या घरगुती समारंभात किंवा परिचितांच्या घरी एखाद्-दुसरी मैफल होत असते; पण हे प्रमाण अत्यल्प असतं.

सार्वजनिक कार्यक्रम, पुण्यतिथी-समारोह, संगीतमहोत्सव, गुरुपौर्णिमा-उत्सव, संगीतसंमेलन आदींद्वारे मैफलींचं आयोजन होताना दिसतं. याव्यतिरिक्तही अनेक वेगवेगळ्या कारणांनी मैफलींचं आयोजन होत असतं. अशा कार्यक्रमांचं स्वरूप थोडंबहुत वर उल्लेखिल्याप्रमाणेच असतं. संगीताच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ : संयोजक, मैफलीचं ठिकाण, कलाकार व संगतकार, श्रोते, प्रसिद्धी...इत्यादी.

या सर्व घटकांचा विचार आपण पुढच्या लेखात करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com