गुरू-शिष्यपरंपरेची सद्यस्थिती (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

पूर्वीची गुरू-शिष्यपरंपरा आज जवळजवळ संपुष्टात आली असली तरी काही मोजके गुरू आजही गुरुकुलपद्धतीनं विद्यार्थी घडवतात. जी मुलं मनापासून संगीत शिकण्यासाठी गावाहून, परगावाहून येतात ती अशा गुरूंकडे विद्या घेतात. हे विद्यार्थी गुरूंवर श्रद्धा ठेवून गुरू सांगतील त्या मार्गानं चालत राहतात. आयुष्यातली ठराविक वर्षं केवळ गाणं शिकण्यात व्यतीत करतात.

पूर्वीच्या काळी बालपणी गुरुगृही राहून शास्त्र, कला आणि विद्या ग्रहण केली जात असे. त्यासंदर्भात तत्कालीन गुरू-शिष्यपरंपरेचा आढावा आपण मागच्या काही लेखांमधून घेतला. शिक्षणपद्धतीत काळाच्या ओघात आता कमालीचा बदल झालेला आहे. आवड म्हणून गुरुगृही राहून शिकणाऱ्यांची आणि शिक्षण देणाऱ्या गुरूंची संख्या आज बोटावर मोजण्याइतकीच असावी. सध्याचं जग हे फास्ट ट्रॅकचं जग आहे. झटपट प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळवून देणाऱ्या या क्षेत्राकडे आकृष्ट होणाऱ्या मुलांची आणि पालकांची संख्या वाढलेली दिसते. त्यासाठी पालकसुद्धा मुलांना क्लासेसना आवर्जून पाठवतात. अभ्यासाच्या बरोबरीनं आपलं मूल सर्वगुणसंपन्न व्हावं या हेतूनं संगीत, नृत्य, अभिनय, चित्रकला अशा अनेक क्लासेसना हेलपाटे मारताना मुलांची मात्र दमछाक होते. मुलं अनेक गोष्टी एकाच वेळी करत असल्यानं त्यांची साधारणच प्रगती होताना दिसते. अनेक वेळा तर ‘नक्की किती दिवसात गाणं येईल?’ असा भाबडा प्रश्न पालकांना पडलेला असतो. एखाद्या शाळेच्या स्पर्धेत किंवा कॉलनीच्या गणेशोत्सवात आपल्या मुलाला/मुलीला एक गाणं म्हणता आलं, चार लोकांनी कौतुक केलं की मुलाला/मुलीला गाणं आलं याचंही समाधान त्यांना लगेच मिळतं हे एक बरं! इन्स्टन्टच्या या जमान्यात मुलांना संगीतात तयार करणारे क्रॅश कोर्सही निर्माण झाले. चॅनलवरच्या स्पर्धांमधलं ग्लॅमर, सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स, कौतुकाचा वर्षाव यांसारख्या अनेक गोष्टींमुळे मुलांमध्ये दीर्घ काळ कष्ट करण्याची प्रवृत्ती दिसत नाही. गुरूंविषयी समर्पणभाव कमी झाला, विश्वास कमी झाला. सध्याचा काळ, सध्याची जीवनशैली आणि पालकही काही अंशी याला जबाबदार असावेत. ठरलेल्या तासांची पूर्तता करून घेणं, क्लास बुडला तर भरून काढणं वगैरे हे गुरूंवरची श्रद्धा कमी झाल्याचंच लक्षण आहे.

आज गुरूंची जागा शिक्षकांनी घेतलेली आहे. गुरू ही संज्ञा अत्यंत व्यापक आणि श्रेष्ठ आहे. खरं सांगायचं झाल्यास पूर्वीची गुरुकुलपद्धती, ऋषितुल्य गुरू आणि आजचे करिअरशोधक शिक्षक यांची तुलनाच होऊ शकत नाही. गुरूंच्या सहवासात गुरुकुलातल्या वास्तव्यात ज्ञान, कला तर प्राप्त होईच होई; पण त्याखेरीज व्यक्ती म्हणूनही तो शिष्य घडत असे, अनेक सुसंस्कार त्यावर होत असत. शिष्याचं पूर्ण आयुष्य गुरूंच्या सहवासामुळे तेजोमय होऊन जात असे. गुरूंच्या प्रत्यक्ष शिकवण्यातून जेवढं शिकायला मिळत असे त्यापेक्षा अधिक त्यांच्या सहवासात राहून शिकायला मिळत असे. आजच्या युगात शिष्याला असे गुरू लाभणं आणि तेही योग्य वेळी लाभणं हे शिष्याचं अहोभाग्यच!

शिक्षा देणारा : शिक्षक
शिक्षण आणि ज्ञान देणारा : अध्यापक
कौशल्य प्रदान करणारा : आचार्य
सखोल अंतर्दृष्टी देणारा : पंडित
दृष्टी तयार करणारा : द्रष्टा
हे सर्व शिकवून अंतःप्रेरणा जागृत करणारा : गुरू


आजच्या शिक्षणपद्धतीनुसार क्लासमधून अधिकाधिक कानसेन तयार होत आहेत. तासिका पद्धतीत हजेरी लावून सखोल ज्ञान मिळवणं अवघड आहे. अशा वर्गांमध्ये एका वेळी अनेक विद्यार्थी शिकताना दिसतात. आवाजाची पट्टी वेगवेगळी असणारे, बुद्धीचा स्तर कमी-अधिक असणारे, वेगवेगळ्या कुवतीचे, कमी-जास्त ऊर्मी असणारे सर्व जण एकाच वर्गात शिकताना दिसतात. सुरुवातीला काही काळ कलेचं प्राथमिक शिक्षण असं घेणं थोड्याफार प्रमाणात योग्य असलं तरी अशा परिस्थितीत हुशार विद्यार्थ्याचं नुकसान होतं. कुवत असून, शिकण्याची तयारी असून अशा विद्यार्थ्याच्या बुद्धीला पुरेसं खाद्य मिळालं नाही की गुरूंवर टीका सुरू होते. गुरू बदलण्याची प्रवृत्ती बळावते. विद्यार्थ्याच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं वाया जातात, शिकण्यातलं स्थैर्य निघून जातं व या धरसोडवृत्तीमुळे शिष्याचंच नुकसान होतं.

‘प्रथितयश किंवा ग्लॅमर असलेले कलाकार गुरू म्हणून हवेत’ या हट्टापायीदेखील, थोडंफार प्राथमिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी गुरू बदलताना दिसतात. गुरू हे परफॉर्मिंग आर्टिस्ट असतील तर त्यांच्या अनुभवाचे अनेक फायदे शिष्याला मिळतात. उदाहरणार्थ : कार्यक्रमाचं सादरीकरण कसं असावं, मैफल रंगवण्याची कला, वेगवेगळ्या ठिकाणी दौरे, अनेक महत्त्वाच्या ओळखी, प्रवासातला गुरूंचा सहवास, गुरूंच्या मागं गायला बसण्याचा अनुभव वगैरे. मात्र, याच्या उलट गुरू कार्यक्रमांमध्ये व्यग्र असले तर शिष्याकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता जास्त असते.
गुरू परफॉर्मर असतील तर कार्यक्रमांच्या दौऱ्यांमुळे शिक्षणात खंड पडतो. याउलट जे गुरू परफॉर्मर नसतात अशा गुरूंकडे नियमित शिक्षण होतं, त्यात विशेष खंड पडत नाही.
याशिवाय गुरू बदलल्यानं गायकी, गाण्यातली शिस्त, आवाजलगाव, बैठक, सादरीकरण अशा अनेक गोष्टी बदलतात. शिष्याला मुळात लागलेल्या सांगीतिक सवयीही सहज बदलत नाहीत आणि नवीन संस्कारही सहज होत नाहीत. अशानं परत शिष्याचंच नुकसान होतं.

पूर्वीची गुरू-शिष्य परंपरा आज जवळजवळ संपुष्टात आली असली तरी काही मोजके गुरू आजही गुरुकुलपद्धतीनं विद्यार्थी घडवतात. जी मुलं मनापासून संगीत शिकण्यासाठी गावाहून, परगावाहून येतात ती अशा गुरूंकडे विद्या घेतात. हे विद्यार्थी गुरूंवर श्रद्धा ठेवून गुरू सांगतील त्या मार्गानं चालत राहतात. आयुष्यातली ठराविक वर्षं केवळ गाणं शिकण्यात व्यतीत करतात. शिकणं, प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवणं, रियाज करणं, संगीतात पदवी मिळवणं, इतर ज्येष्ठ कलाकारांचे कार्यक्रम ऐकणं, स्वतः छोटे-मोठे कार्यक्रम करणं या सगळ्यामधून शिष्याची प्रगती दिसू लागते. या खडतर मार्गातून एक कलाकार नक्की घडतो; पण त्याला वेळोवेळी संधी मिळणं हीदेखील एक महत्त्वाची पायरी असते. तो गुणी विद्यार्थी यशस्वी होतोच असं नाही. कारण, आजच्या काळात टिकाव लागण्यासाठी गाण्याबरोबर इतर अनेक गोष्टी अवगत असाव्या लागतात. त्याचा आढावा आपण पुढच्या लेखात घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com