संगीत आणि बरंच काही... (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

उद्याचे दरवाजे उघडायचे असतील तर अन्य दरवाजे आज बंद करावेच लागतात हे निश्चित. लोकांना या क्षेत्रात ग्लॅमर दिसतं; पण ‘मुखडा’ आणि ‘मुखवटा’ या दोन्हींत फरक असतो. मैफलींत घातले जाणारे छान छान कपडे, दागिने आणि चेहऱ्यावर दिसणारा मेकअप्‌ हा ‘मुखवटा’ असतो; पण खरं महत्त्व कलाकाराच्या आतल्या ‘मुखड्या’ला असतं, त्याच्यातल्या माणूसपणाला असतं. त्याचे पाय जमिनीवर असण्याला असतं.

गुरूंच्या योग्य मार्गदर्शनातून आणि तालमीतून शिष्य तयार झाल्यावर आणि श्रवण-मनन-चिंतनातून त्याचा पुरेसा रियाज झाल्यावर तो गुरूंच्या परवानगीनं मैफलीतल्या स्वतंत्र सादरीकरणाला सुरुवात करत असे. गुरुपौर्णिमा, वर्धापनदिन, समारोह, स्मृतिदिन अशा निमित्तांनी संगीतमैफलींचं आयोजन केलं जाई. पूर्वी अशा कार्यक्रमांची संख्या तुलनेनं कमी असायची. आता कार्यक्रमांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसते. प्रत्येक सण, समारंभ हा शास्त्रीय गायन ऐकून साजरा करण्याची पद्धत गेल्या एक-दोन दशकांपासून रूढ झाली आहे. गायककलाकारांसाठी ही नामी संधी असते. वेगवेगळ्या अभिरुचीचे, लहान-मोठ्या स्वरूपाचे अनेक कार्यक्रम सर्वत्र होत असतात. त्यामुळे हौशी कलाकारांपासून, तयारीच्या व्यावसायिक गवयांपर्यंत सर्व कलाकारांना पुरेशी संधी वर्षभर उपलब्ध असते. काळानुरूप श्रोत्यांच्या अभिरुचीप्रमाणे या सादरीकरणांमध्येही अनेक बदल झालेले दिसतात. अनेक नवनवीन प्रयोग सादरीकरणात केले जातात. कार्यक्रम सतत आयोजिले जात असल्यामुळे कार्यक्रमांना स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालं आहे. आपली कला व तिचं सादरीकरण इतरांपेक्षा वेगळं आणि वरचढ आहे हे सतत पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. स्पर्धेच्या युगामुळे कलाकाराला नुसत्या तालमीवर किंवा उत्तम सादरीकरणावरच केवळ थांबून चालत नाही, तर स्वतःचं मार्केटिंग करणंही क्रमप्राप्त झालं आहे.

कार्यक्रम आयोजिणाऱ्यांच्या सतत संपर्कात राहणं, स्वखर्चानं सीडी काढणं, स्वतःच्या बातम्या प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांकडे पाठवणं, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम इत्यादी समाजमाध्यमांद्वारे स्वतःची जाहिरात करणं, स्वतःची संस्था काढणं, संस्थेद्वारे इतरांचे कार्यक्रम ठरवून स्वतःचं नाव चर्चेत ठेवणं, अन्य गायकांच्या संस्थेद्वारे स्वतःचा कार्यक्रम घडवून आणणं यांसारख्या आनुषंगिक गोष्टी कराव्या लागतात.
मात्र, हे सगळं करताना स्वतःच्या रियाजाकडे गायकाचं दुर्लक्ष होऊ शकतं. आज कलाकारांची संख्या इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला सतत प्रयत्नशील राहावं लागतं. सतत लोकांसमोर राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. गायकाला रियाज सांभाळून वरील सर्व कामं स्वतः करणं खूप जिकिरीचं होऊन बसतं. मग अशा वेळी ही कामं करण्यासाठी, दुसरी कुणी व्यावसायिक व्यक्ती असेल तर मात्र हा त्रास खूप प्रमाणात कमी होतो. आजकाल संगीत क्षेत्रात ‘पीआर’ हा एक महत्त्वाचा व्यवसाय अस्तित्वात आला आहे.
मार्केटिंग ही एक कला असून ती प्रयत्नपूर्वक अवगत करावी लागते. यश मिळवायचं असल्यास कौशल्यविकास महत्त्वाचा ठरतो. अफाट संवादकौशल्य व संयोजकाची मानसिकता समजून घेण्याची क्षमता विकसित करावी लागते. श्रोत्यांची आवड-निवड, स्वतःची देहबोली या बाबीदेखील महत्त्वाच्या ठरतात. यशस्वी कलाकार म्हणून वाटचाल करताना श्रोत्यांच्या आणि संयोजकांच्या अपेक्षा काय आहेत, तसंच काळानुसार होणारे बदल यांचं मूलभूत ज्ञान कलाकाराला असणं महत्त्‍वाचं ठरतं. यश मिळवण्यासाठी व्यावसायिक संबंध महत्त्वाचे असतात, त्यासाठी आवश्यक कौशल्यं शोधून त्यांचा विकास करण्यावर भर द्यावा लागतो.

प्रत्येक गायक, संगीतक्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतो आणि त्या दिशेनं मेहनत घेत असतो. हे जरी खरं असलं तरी पूर्ण वेळ शास्त्रीय गायककलाकार म्हणून नावारूपाला येणं हे कठीण असतं. मार्केटिंग स्किल हे आजच्या युगात ज्याला जमलं तो कलाकार यशस्वी, असं समीकरण होऊन बसलं आहे. ज्याला हे गणित जमलं नाही त्याला नाइलाजास्तव निश्चित स्वरूपाचं उत्पन्न मिळवण्यासाठी पर्यायी मार्ग निवडावे लागतात. सध्याच्या काळात संगीतशिक्षक हा सर्वात जास्त प्रचलित असलेला मार्ग आहे आणि संगीतातली पदवी घेतलेल्यांनी या पर्यायाचा सर्वात जास्त वापर केलेला आढळतो. स्वतःची शास्त्रीय संगीताची तालीम कशा प्रकारे वापरता येईल याचं कौशल्य संगीतशिक्षकाकडे असावं लागतं. शाळांमध्ये संगीताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते संगीताच्या तासिकेत शिकवायचं, विद्यार्थ्यांच्या कलानं संगीताचा रंजकपणा अधिक कसा वाढवायचा, विविध शालेय स्तरांवरच्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, गायन शिकवणं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं यांसारख्या अनेक कौशल्यांचा अंतर्भाव होतो.

याव्यतिरिक्त स्वतःच्या संगीत अकादमीत गुरू म्हणून कार्य करणं हीदेखील एक मोठी संधी कलाकारांना उपलब्ध असते. ते करताना प्रत्येक वयातल्या शिष्याच्या प्रश्नांना उत्तरं देणं, विद्यार्थ्यांमध्ये संगीताची गोडी रुजवणं, तसंच विद्यार्थी दीर्घ काळ गायन शिकेल अशा दृष्टीनं अभ्यासक्रमाची दिशा ठरवणं अशी अनेक आव्हानं असतात. स्वतःच्या विद्यालयात गुरू म्हणून कार्य करताना शिकवण्यातील नावीन्य, विद्यार्थ्याची आणि पालकांची मानसिकता, आजच्या काळाची गरज आणि योग्य तालीम या सगळ्याचा समतोल राखणं आवश्यक असतं. मात्र, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण घेतलेल्या तालमीचा, अनुभवाचा पुरेपूर वापर शिकवताना करता येतो, निर्णयस्वातंत्र्य असतं. स्वतःचा रियाजही सुरू ठेवता येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बाजू सांभाळता येते.

शास्त्रीय गायन हे क्षेत्र लोकाभिमुख असल्यानं रसिकांना काय ऐकणं अपेक्षित आहे, याचाही विचार करणं प्राप्त असतं. आपल्याला मिळालेली अभिजात गायकीची घराणेदार तालीम आणि रसिकांची आवड यांचा मेळ घालून स्वतःची गायकी किंवा पर्यायानं स्वतःचं करिअर घडवता येऊ शकतं. जनसंपर्क, सांगीतिक विचारांची देवाण-घेवाण, प्रत्यक्ष कार्यक्रमाचा अनुभव, स्वतःचा शिष्यवर्ग, रसिकवर्ग या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होणं आवश्यक असतं. शास्त्रीय संगीत शिकून गाण्यात खरंच काही तरी चांगलं करण्याची इच्छा आणि गांभीर्य असेल तर अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत; पण त्यासाठी विद्यार्थ्याला किमान पंधरा ते वीस वर्षं बंद दरवाज्याच्या आत तासन्‌तास कठोरपणे रियाज करण्याची तयारी असावी लागते!

आसपासची इतर सगळी व्यवधानं टाळून संगीतसाधनेत स्वतःला गुंतवून घेतलं तरच ती साधना गुणवत्तेचा परमोत्कर्ष साधते. उद्याचे दरवाजे उघडायचे असतील तर अन्य दरवाजे आज बंद करावेच लागतात हे निश्चित. लोकांना या क्षेत्रात ग्लॅमर दिसतं; पण ‘मुखडा’ आणि ‘मुखवटा’ या दोन्हींत फरक असतो. मैफलींत घातले जाणारे छान छान कपडे, दागिने आणि चेहऱ्यावर दिसणारा मेकअप्‌ हा ‘मुखवटा’ असतो; पण खरं महत्त्व कलाकाराच्या आतल्या ‘मुखड्या’ला असतं, त्याच्यातल्या माणूसपणाला असतं. त्याचे पाय जमिनीवर असण्याला असतं. असे गुण असलेला सद्‌शिष्य कसा असतो हे पुढच्या लेखात बघू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com