कलाकाराचं आयुष्य (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

खरा कलाकार आपल्या कलेतच आकंठ बुडालेला असतो! एकसारखं प्रकाशझोतात असणं म्हणजेच काही ‘कलाकारपण’ सिद्ध होणं असं नसतं. कलाकार स्टेजवर गात नसला तरी तो सततच संगीताच्या कोषात असतो. तो रोज गात असतो, कधीतरी लोकांसाठी आणि रोजच्या रोज स्वतःसाठी! कारण, कलाकाराला खरा आनंद त्यातच मिळत असतो.

लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या किंवा त्या दिशेनं मार्गक्रमण करत असणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्याचा प्रवास, अडीअडचणी, कौटुंबिक माहिती, आर्थिक परिस्थिती, दैनंदिन जीवन यांबाबत रसिकांना नेहमीच कुतूहल वाटत असतं. कारण, कलाकाराचं आयुष्य सर्वसामान्य माणसांपेक्षा खूप वेगळं असतं. ते कधीच आखीव-रेखीव नसतं. कलाकाराची प्रतिभा, सौंदर्यदृष्टी, ऊर्मी, जिद्द, हट्ट, लहरीपणा, वागण्या-बोलण्यातलं वैचित्र्य, त्याचं रूटीन, मूड...सगळं निराळंच! एवढंच नव्हे तर, त्याची वेशभूषा, राहणी यांवरूनदेखील कलाकाराचं वेगळेपण दिसून येतंच.

सर्वसामान्य लोकांपेक्षा कलाकार वेगळा उठून दिसतो तो त्याच्या प्रतिभेमुळे. कलाकारामधली प्रतिभा ही एक अशी गोष्ट असते, जिला घड्याळ कुणी शिकवलेलंच नसतं! आणि तो तर त्या प्रतिभेचा गुलाम असतो. प्रतिभा कलाकाराला आयुष्यभर आपल्या बोटांवर नाचवत असते. तिच्या मनात असेल तेव्हा गायकाला तानपुरा, चित्रकाराला कुंचला, तर लेखकाला लेखणी हाती घ्यावीच लागते. म्हणूनच घड्याळ न बघता हे लोक कलेत वेळी-अवेळी रममाण झालेले दिसतात. सुचलेली एखादी लकेर किंवा रंगाचा एखादा स्ट्रोक त्यांना अत्यंत आनंद देऊन जातो, तर मनात असूनही व्यक्त न होणारी प्रतिभा अस्वस्थ करते तेव्हा कलाकाराची तहान-भूक हरपून जाते, तो बेचैन होतो. कारण, त्याच्या डोक्यात फक्त कलेचा विचार असतो. अशा वेळी हवं ते जमलं तर ठीक, नाहीतर सगळा हिरमोड! घरातल्या लोकांना हे सगळं परिचित असतं; पण बाहेरच्या लोकांना हे वागणं खटकतं आणि मग कलाकाराला ‘मूडी’ असल्याचं लेबल हमखास चिकटवलं जातं! कधी अस्वस्थ, कधी अत्यंत आनंदी, कधी दुःखी, कधी आत्ममग्न, तर कधी दिलखुलास अशा कलाकाराला लोकांनी ‘मूडी’ म्हटलं तर त्यांचं तरी कुठं चुकलं!

‘कलाकार म्हणजे सतत कार्यक्रमात व्यग्र’ असं लोकांना वाटत असतं. प्रत्यक्षात मात्र सतत श्रोत्यांच्या नजरेसमोर असणं, सारखे कार्यक्रम, अखंड दौरे असं नसतं; किंबहुना तसं नसतं तेव्हाच कलाकाराच्या दृष्टीनं रियाजाला आणि नवीन सृजनात्मक काहीतरी करायला वाव असतो. गाणाऱ्या लोकांना हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधला एक चिकित्सक प्रश्न असतो : ‘सध्या तुम्ही काय करता? खूप दिवसांत तुमचं काही ऐकलं नाही कुठं...’ असं विचारण्यामागचा उद्देश कलाकाराला मात्र कधीच कळत नाही. खूप दिवसांत गाणं ऐकलं नाही याचं विचारणाऱ्यांना दुःख असतं की ‘अजिबात कार्यक्रम नाहीत हं सध्या तुम्हाला’ असा शालजोडीतला टोमणा असतो की ‘तुम्ही आता काही तरी करायला हवं हं ’ असा प्रेमळ सल्ला असतो...!?

या प्रश्नाचं उत्तर असं की खरा कलाकार आपल्या कलेतच आकंठ बुडालेला असतो! एकसारखं प्रकाशझोतात असणं म्हणजेच काही ‘कलाकारपण’ सिद्ध होणं असं नसतं. कलाकार स्टेजवर गात नसला तरी तो सततच संगीताच्या कोषात असतो. तो रोज गात असतो, कधीतरी लोकांसाठी आणि रोजच्या रोज स्वतःसाठी! कारण, कलाकाराला खरा आनंद त्यातच मिळत असतो. एखादी मैफल जेव्हा यशस्वीरीत्या जमते तेव्हा त्यामागं कलाकाराची अनेक वर्षांची मेहनत असते. रियाज असतो. मनासारखी मैफल जमेपर्यंतच कलाकाराचे अर्धेअधिक केस पांढरे झालेले असतात आणि तरीसुद्धा त्याच्या कलाकृतीबद्दल तो क्वचितच पूर्णतः समाधानी असतो. श्रोत्यांना कलाकाराच्या एखाद्या मैफलीतून आनंद मिळतो तेव्हा त्या यशामागं कलाकाराचं संपूर्ण आयुष्य खर्ची पडलेलं असतं. कलाकाराच्या यशात त्याचा स्वतःचा आणि त्याच्या कुटुंबाचा केवढा तरी त्याग असतो. यशाची वाट चोखाळत असताना कलाकारानं अनेक नवीन प्रयोग केलेले असतात. कधी फसलेले, तर कधी जमलेले! त्यामागं चिंतन असतं, मनन असतं, सखोल अभ्यास असतो. अनेक चढ-उतार त्यानं बघितलेले असतात, तरीसुद्धा या प्रवासात फक्त आनंदच असतो.
मल्लिकार्जुन मन्सूर यांना एकदा कुणीतरी प्रश्न केला : ‘‘अण्णा, गाण्याच्या विद्येत कष्ट असतात का हो?’’ त्यावर अण्णा म्हणाले : ‘‘कष्ट? अहो, गाण्याचे कधीच कष्ट होत नसतात. आमचं भाग्य म्हणून आम्ही गवई झालो. आमच्या दुनियेत कष्ट नसतात, असतो तो फक्त आनंद!’’

कलाकाराला दिवसागणिक कार्यक्रम नसले तरी रोजचा रियाज असतो. गमतीत असं म्हटलं जातं की ‘कलाकाराचा एक दिवस रियाज चुकला तर त्याला स्वतःला फरक जाणवतो, दोन दिवस चुकला तर घरातल्यांना फरक जाणवतो आणि आठवडाभर चुकला तर चाणाक्ष श्रोत्यांना फरक जाणवतो.’ रियाज म्हणजे कलकाराचं व्रत असतं. आजन्म घेतलेलं. शिष्य घडवण्याचं, विद्यादानाचं काम कलाकार करत असतो. अनेक शिष्यांचं भविष्य त्याच्या हातात असतं, त्यामुळे अत्यंत जबाबदारीचं काम तो करत असतो. कलाकाराला नावीन्याचा सतत ध्यास असतो. सतत नवीन प्रयोग करून नवीन काही तरी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एखाद्या संगीतविषयक गोष्टीचा त्याला विशेष अभ्यास करायचा असतो. कारण, कलाकार नेहमीच कलासमृद्ध होण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असतो. तो सतत नवीन शिकत असतो, नवीन ऐकत असतो. कितीही मोठा कलावंत झाला तरी तो कायम विद्यार्थीच असतो. कधी रेकॉर्डिंग्ज्, कधी घरगुती मैफली, कधी कुठं सांगीतिक चर्चा, सप्रयोग व्याख्यानं, मुलाखती, रंगीत तालमी, कधी कार्यक्रमासाठी प्रवास, दौरे अशा अनेक गोष्टी कलाकाराला सतत कराव्या लागत असतात.

कलाकाराला अपयशालाही तोंड द्यावं लागतं, मग ते अपयश कधी कलेतलं असतं, ज्यामुळे त्याच्या सांगीतिक प्रवासात अडथळे निर्माण होतात, कधी संसारातलं असतं, ज्यामुळे त्याचं भावनिक विश्व कोलमडून पडतं किंवा कधी आर्थिकही अपयश येतं, ज्यामुळे संसारातली गणितं चुकतात! कुठल्याच कलेत आर्थिक शाश्वती नसते, निश्चित उत्पन्न नसतं, त्यामुळे आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न भेडसावत असतात, तरी या सगळ्यातून कलाकार आपली कला जिवंत ठेवत असतो. एक कलाकार म्हणून रंगमंचावर बसताना तो हे सगळं विसरून श्रोत्यांना अवर्णनीय आनंद मुक्त हस्तानं देण्याचा प्रयत्न करत असतो. याशिवाय कलाकाराला एक सामाजिक प्रतिष्ठा असते, त्यामुळे कधी कुठं प्रमुख पाहुणा म्हणून, तर कुठं उद्घाटक म्हणून, तर कुठं परीक्षक म्हणून वेळ त्याला द्यावा लागतो. अशा अनेक जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो आणि हे सगळं करत असताना त्याला प्रपंचही असतो. संसार, मुलं-बाळं, आजारपणं, अपघात हे सगळं त्यालाही चुकलेलं नसतं. कारण, कलाकार असला तरी त्याआधी तो सर्वसामान्य माणूसच असतो.

यापुढच्या लेखात आपण संगीतातल्या बदलांबद्दल जाणून घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com