कोरोनाच्या आद्य संशोधिका (शहाजी मोरे)

शहाजी मोरे shahajibmore1964@gmail.com
रविवार, 5 जुलै 2020

सध्या जगभरात हाहाकार माजवणारा विषाणू हा त्याच्यासारख्या काही विषाणूंच्या कुटुंबातील किंवा समूहातील एक विषाणू आहे. या विषाणूंच्या कुटुंबाला ‘कोरोनाविषाणू’ असं म्हटलं जातं. यामध्ये सार्स, मर्स हे आजार आणणारे व सध्या चर्चेत असलेला ‘सार्स कोव्ह-२’ हा विषाणूही आहे.

सध्या जगभरात हाहाकार माजवणारा विषाणू हा त्याच्यासारख्या काही विषाणूंच्या कुटुंबातील किंवा समूहातील एक विषाणू आहे. या विषाणूंच्या कुटुंबाला ‘कोरोनाविषाणू’ असं म्हटलं जातं. यामध्ये सार्स, मर्स हे आजार आणणारे व सध्या चर्चेत असलेला ‘सार्स कोव्ह-२’ हा विषाणूही आहे. हे विषाणू त्यांच्याभोवती असलेल्या मुकुटासारख्या (क्राऊन) आवरणामुळे ‘कोरोना’ या शब्दानं ओळखले जातात. या प्रकारातला विषाणू सर्वप्रथम एका महिला-शास्त्रज्ञानं शोधला व या विषाणूकुटुंबातील एक विषाणू पहिल्यांदा वेगळा केला तोही दुसऱ्या एका महिला-शास्त्रज्ञांनंच. या दोन महिला-शास्त्रज्ञांचा हा परिचय...

कोरोनाविषाणू प्रकारातील एक विषाणू प्रथम शोधला तो जून अल्मैडा या स्कॉटिश महिला शास्त्रज्ञानं.
जून यांचा जन्म ता. पाच ऑक्टोबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील बसचालक होते. परिस्थितीमुळे शिक्षण परवडत नसल्याने सोळाव्या वर्षी जून यांना शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. गरीब कुटुंबातील याच मुलीनं पुढं केवढं मोठं व महत्त्वपूर्ण संशोधन केलं हे पाहून अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. शिक्षण सोडून जून या ‘ग्लासगो रॉयल इन्फर्मरी’ या रुग्णालयातील प्रयोगशाळेत तंत्रसहाय्यक म्हणून काम करू लागल्या; परंतु काही काळातच व्हेनेझुएलिअन नागरिकाशी विवाह करून त्या जून हार्टच्या जून अल्मैडा बनल्या व कॅनडात स्थायिक झाल्या. त्या काळी कॅनडात संशोधन करण्यासाठी पदवीची अट नव्हती, त्यामुळे टोरोंटो इथल्या ‘ओंटारिओ कॅन्सर इन्स्टिट्यूट’मध्ये त्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तंत्रसहाय्यक म्हणून रुजू झाल्या. नियमित कामाबरोबरच त्या तिथं संशोधनही करू लागल्या. तिथं त्यांनी सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या प्रतिमांमधील विरोधी रंग गडद ( कॉन्ट्रास्ट) करण्यासाठी टंगस्टनसारखा जड धातू असलेले फॉस्पोटंगस्टिक अॅसिड असलेला द्रव वापरून विषाणूंच्या प्रतिमा मिळवण्याचं तंत्र (निगेटिव्ह स्टेनिंग) आत्मसात केलं व कोरोनाविषाणूंच्या शोधासाठी ते वापरलं. या तंत्राच्या साह्यानं त्यांनी त्या काळी नवीन असलेल्या विषाणूंच्या रचनेविषयी सहकाऱ्यांसमवेत अनेक शोधनिबंध लिहिले.

त्या काळी पेशीसमुदायातून (सेलकल्चर) विषाणूंचा शोध घेणं फार जिकिरीचं होतं. पेशीचे किंवा उतीचे जे काही नमुने मिळायचे ते सामान्य स्थितीतील नसायचे. विषाणूंचे कण पेशींमध्ये इतस्ततः विखुरलेले असायचे. एकेक नमुना अभ्यासण्यासाठी काही तास लागत. पुढं त्या लंडनमधल्या ‘सेंट थॉमस हॉस्पिटल-मेडिकल स्कूल’मध्ये दाखल झाल्या. विषाणूंचा इलेक्ट्रॉन
सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं अभ्यास व संशोधन करणाऱ्या संशोधकांमध्ये त्या अग्रणी होत्या. त्यांनी विषाणूविरोधी जी पिंडे प्राण्यांच्या व मानवांच्या शरीरात निर्माण होतात त्यांचा वापर करून व ते विषाणूंच्या नमुन्यासोबत वापरून संबंधित विषाणू इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं दिसू शकतात किंवा त्यांची प्रतिमा मिळवता येते हे सिद्ध केलं.
लंडनमध्ये त्या डेव्हिड टायरेल यांच्यासोबत संशोधन करू लागल्या. टायरेल हे त्या काळी कार्यरत असलेल्या ‘कॉमन कोल्ड रिसर्च सेंटर’चे संचालक व नामवंत शास्त्रज्ञ होते. टायरेल हे सन १९६० च्या दशकात, संशोधनासाठी असलेल्या स्वयंसेवकाच्या नाकातील द्रवामधील सर्दीस कारणीभूत असणाऱ्या विषाणूंची वाढ करण्याविषयी संशोधन करत होते; परंतु काही विषाणूंची वाढ काही होत नव्हती. त्यामध्ये ‘बी-८१४’ असा ओळखला जाणारा विषाणूही समाविष्ट होता. तो विषाणू सजीवांपासून वेगळ्या केलेल्या पेशीसमुदायात वाढू शकत नव्हता. टायरेल यांनी कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या उती व अवयवांमध्ये त्यांना वाढवण्यात यश मिळवलं व त्यांचे नमुने जून यांच्याकडे पाठवले व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं हे विषाणू किंवा विषाणूंच्या प्रतिमा दिसतात का ते पाहायला सांगितलं.

जून यांनी त्यातील विषाणूंच्या प्रतिमा मिळवल्या व जे विषाणू कोरोनाविषाणू म्हणून ओळखले जात आहेत ते त्यांनी प्रथम ओळखले. मात्र, जून यांचं हे संशोधन प्रथम नाकारण्यात आलं व नंतर सन १९६५ मध्ये ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये ते प्रसिद्ध झालं. त्यांनी मिळवलेल्या कोरोनाविषाणूंच्या प्रतिमा ‘जर्नल ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाल्या व जून अल्मैडा या कोरोनाविषाणू शोधणाऱ्या प्रथम शास्त्रज्ञ ठरल्या.
जून यांनी ‘इम्युन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ तंत्र विकसित केलं. त्यात विषाणूंचा प्राण्यांच्या किंवा
मानवाच्या शरीरात शिरकाव झाल्यानंतर जी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज्) निर्माण होतात, ती प्रतिपिंडे विषाणूसोबत मिश्रण करून वापरली जातात व संबंधित विषाणू शोधले जातात. त्यांचं हे तंत्र पुढं अनेक शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनासाठी वापरलं. कोरोनाविषाणूवरील संशोधनाशिवाय त्यांचं इतरही संशोधन महत्त्वाचं आहे. त्यांनी रुबेला विषाणूंच्याही प्रतिमा सर्वप्रथम मिळवल्या, त्याचबरोबर बी-कावीळ ज्या विषाणूंमुळे होते त्या विषाणूंची रचनाही अभ्यासली.

आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्या नामवंत अशा ‘वेलकम रिसर्च लॅबोरेटरीज्‌’मध्ये संशोधन करत होत्या.
निवृत्तीनंतरही त्या कार्यरत राहिल्या. पतीसमवेत प्राचीन वस्तूंचा व्यापार व चिनी मातीच्या जुन्या
वस्तूंच्या दुरुस्तीत त्या रमल्या. त्या योगाच्या प्रशिक्षिकाही होत्या. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांना ‘सेंट थॉमस हॉस्पिटल’मध्ये सल्लागार म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. ‘एड्स’ला कारणीभूत असणाऱ्या विषाणूंच्या ( एचआयव्ही) उत्तम प्रतीच्या प्रतिमा त्यांच्यामुळेच मिळू शकल्या. अशा या अल्पशिक्षित; परंतु महान महिला-शास्त्रज्ञाचं ब्रिटनमधील बेक्सहील इथं ११ डिसेंबर २००७ रोजी निधन झालं.
***

साधारणपणे जून अल्मैडा यांच्याच संशोधनाच्या काळातच दुसऱ्या एक महिला-शास्त्रज्ञ अशा
प्रकारच्या संशोधनात गुंतल्या होत्या. डोरोथी हॅम्रे त्यांचं नाव. विषाणूतज्ज्ञ व साथरोगतज्ज्ञ असलेल्या डोरोथी या शिकागो विद्यापीठातील औषध विभागात संशोधन करत. कोरोनाविषाणूंचा एक प्रकार (स्ट्रेन ) वेगळा करण्याचं काम पहिल्यांदा केलं ते डोरोथी यांनी. त्या काळी नवीन असलेल्या विषाणूंचं वर्णन करणारा शोधनिबंध जॉन प्रॉक्नॉऊ यांच्यासोबत त्यांनी लिहिला होता. विषाणूंचा हा प्रकार ‘२२९ ई’ असा ओळखला जातो. त्यानंतर सन १९७५ मध्ये या प्रकारच्या विषाणूंचं नामकरण करण्यात आलं.

काटेरी मुकुटासारखं किंवा तत्सम स्वरूप असणाऱ्या समूहातील सर्व विषाणूंना ‘कोरोनाविषाणू’ असं संबोधलं जावं असं विषाणूतज्ज्ञांच्या समूहानं ठरवलं.
विषाणूतज्ज्ञांच्या या समूहात डोरोथी यांचा समावेश नव्हता. मात्र, जून अल्मैडा व डेव्हिड त्यारेल यांचा समावेश होता. ‘नेचर’ या प्रख्यात शोधपत्रिकेत सन १९६८ मध्ये डोरोथी यांच्या नावाचा स्वीकार केला गेला व तसा उल्लेखही करण्यात आला.
डोरोथी यांचा जन्म अमेरिकेतील सिॲटल इथं सन १९१५ मध्ये झाला. सन १९३७ मध्ये विशेष
प्रावीण्यासह विज्ञानातील पदवी व पुढं पदव्युत्तर शिक्षण त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून पूर्ण केलं. सन १९४१ मध्ये कोलॅराडो विद्यापीठातून विषाणूशास्त्रातील पीएच.डी. त्यांनी संपादित केली; परंतु त्यांनी प्रथम जीवाणूशास्त्रज्ञ(बॅक्टेरिऑलॉजिस्ट) म्हणून काम पाहिलं. त्यानंतर काही संशोधनसंस्थांमध्ये काम केल्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांची नियुक्ती शिकागो विद्यापीठातील औषध विभागात संशोधन सहाय्यक म्हणून झाली. सन १९६८ पर्यंत त्या तिथं कार्यरत होत्या. कोरोनाविषाणूवरील संशोधनासाठी आपलं आयुष्य व्यतीत केलेल्या डोरोथी यांचं १९ एप्रिल १९८९ रोजी निधन झालं.
तसं पाहिलं तर हे विषाणू १९३० पासूनच मानवाला माहीत आहेत; परंतु ते पाळीव प्राण्यांत व पक्ष्यांमध्ये श्वसनासंबंधी आजार निर्माण करत. मानवी शरीरात असा आजार आणणाऱ्या विषाणूंचा शोध घेण्याचं फार मोठं श्रेय या दोन महिला-शास्त्रज्ञांना जातं हे निश्चित.
मात्र, जून अल्मैडा यांचं संशोधन व त्यांचं श्रेयही प्रथम नाकारण्यात आलं होतं, तर डोरोथी हॅम्रे
यांची पुरेशी माहिती सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही उपलब्ध होत नाही. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे या दोघी पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यानिमित्त दोघींचं स्मरण उचित ठरतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang shahaji more write corona virus article