क्रीडा संस्कृती : आजची, उद्याची! (शैलेश नागवेकर)

shailesh nagvekar
shailesh nagvekar

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार झालेल्या एका फुटबॉल स्टेडियमच्या उद्‍घाटन समारंभात क्रीडामंत्री किरण रिजूजू यांनी देशात क्रीडा संस्कृतीचा अभाव असल्याचं विधान केलं. त्याचवेळी क्रीडा क्षेत्रातला मातब्बर देश म्हणून भारताचं नाव करायचं आहे, असंही मत त्यांनी मांडलं. ही दोन टोकं जोडणार कशी आणि कधी हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी; पण सर्वाधिक लोकप्रिय खेळ क्रिकेट. भारताचं पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक कुस्तीचं, ऑलिंपिक एकमेव वैयक्तिक सुवर्ण नेमबाजीतलं. मेरी कोमची मुष्टियुद्धातली सर्वाधिक जागतिक अजिंक्यपदं; बुद्धिबळात विश्वविजेता विश्वनाथन आनंद, हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद. असे एक ना अनेक विख्यात आणि प्रख्यात खेळाडू आपल्या भारतात घडले, तरीही २०२० मध्येही आपण क्रीडा संस्कृतीच्या अभावाचा विचार करत आहोत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार झालेल्या एका फुटबॉल स्टेडियमच्या उद्‍घाटनाकरिता क्रीडामंत्री किरण रिजूजू गोव्यात गेले होते. देशात क्रीडा संस्कृतीचा अभाव असल्याचं विधान केल्यानं ही चर्चा सुरू झाली. त्यामुळं सहाजिकच क्रीडा संस्कृती म्हणजे नेमकं काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभाविक आहे. ही क्रीडा संस्कृती नेमकी कशी सुरू होते त्यासाठी काय करायला पाहिजे हा पुढचा प्रश्न. आपल्या देशात काही काही ठिकाणी काही काही खेळांची क्रीडा संस्कृती भक्कम असल्याचंही क्रीडामंत्री म्हणतात. खरंय ते, आपला देश विविध प्रांत, विविध भाषा आणि संस्कृतींनी तयार झाला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते मुंबई! मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी तर पूर्व भारत फुटबॉलची भूमी; पण क्रिकेटचा अपवाद वगळता आपल्या देशात इतर खेळांची संस्कृती नाही असं कोणीही म्हणू शकेल. मात्र, जेव्हा ध्यानचंद, मिल्खासिंग, विश्वनाथन आनंद आणि हल्लीच्या युगात पी. व्ही. सिंधू यांचा विचार करतो, तेव्हा नक्कीच आशादायी चित्र दिसून येतं. प्रश्न ते टिकवण्याचा किंवा पुढची पिढी तयार करण्याचा असतो.
मुळात अशा प्रकारची क्रीडा संस्कृती तयार करण्यासाठी मानसिकतेची, वातावरणाची आणि अथक प्रयत्नांची गरज असते. एखादी घटना आमूलाग्र बदल घडवू शकते. क्रिकेट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ब्रिटिश भारत सोडून गेले; पण क्रिकेट इथंच ठेवून गेले. सन १९८३ चा विश्वकरंडक कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जिंकला; पण त्या विजेत्या संघाचा सत्कार करायला बीसीसीआयकडे पैसे नव्हते, असं सांगितलं जातं. आता सन २०२० सुरू आहे. विराट कोहलाची संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मुख्य प्रायोजकांसह अन्य चार प्रायोजक भारतीय आहेत. त्यांचा न्यूझीलंडमधल्या मार्केटशी संबंध नाही, गरज आहे भारतीय मार्केटची. गेल्या वर्षात आठ लाख २५ हजार डॉलरचं नुकसान झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला भारताच्या या दौऱ्यातून आर्थिक स्थैर मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काळाचं चक्र बदललं आहे. भारतीय क्रिकेट संघ जिथं जिथं जातो, तिथं तिथं पैशाची गंगा वाहत जाते, ही गोष्ट आधीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लक्षणीय आहे.

काळानुसार बदल हवा
अर्थात क्रिकेटच्या अगोदर हॉकीची संस्कृती भारतात होतीच की! ध्यानचंद यांनी अख्ख्या हॉकी क्षेत्राला गवसणी घातली होती; पण आज हॉकी जगताच्या नकाशावर आपली हॉकी कुठं आहे? आठ ऑलिपिंक सुवर्णपदकं असं सुवर्णयुग एके काळी असणारा आपला संघ हल्ली कधी कधी पात्रतेसाठीसुद्धा शर्थ करताना दिसतोय. ग्रासवरची हॉकी टर्फवर गेली. युरोपियन देशांनी ती लगेचच आत्मसात केली आणि आपण या बदलात मागं पडलो. याचा अर्थ काळानुसार बदल करत राहणं आणि नवनव्या पद्धती, तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. केवळ संस्कृतीच्या चर्चा करून काहीच साध्य होणार नाही.

प्रसिद्धी आणि पैसा
बीसीसीआयचं आर्थिक सामर्थ्य सर्वश्रुत आहे. हाच धागा पकडून रिजिजू यांनी म्हटलं आहे : ‘‘लोकांनी विविध खेळ जास्तीत जास्त पाहिले, की टीआरपी वाढेल आणि आपोआप प्रायोजक येतील. त्या त्या खेळासाठी पैसाही येईल. जर तुम्ही स्पर्धात्मक फुटबॉल खेळलात, तर पैसाही त्याच वेगात येईल.’’ या बाबतीत दोन उदाहरणं देता येतील. वर्षभरापूर्वी मुंबईत अंधेरीत फुटबॉल संकुलात भारताची एका परदेशी संघाविरुद्ध मालिका सुरू होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच कमी होता. साहजिक भारतीय कर्णधार सुनील छेत्री निराश झाला. ‘‘हवं तर आम्हाला शिव्या द्या, टीका करा; पण आमचे सामने पाहायला स्टेडियममध्ये या,’’ असं मन हेलावणारं आर्जव त्यानं केलं. विराट कोहलीसह अनेक दिग्गजांनी त्याची दखल घेतली. त्यांनीही समाजमाध्यमांतून लोकांना विनंती केली आणि फरक पडला. त्यानंतरच्या सामन्यांसाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं. आता दुसरं उदाहरण पाहू या. मध्यंतरी कोल्हापूरमध्ये स्थानिक क्लबची फुटबॉल स्पर्धा होती. त्यात कोणी स्टार खेळाडू नव्हते- तरीही क्रिकेटला होणार नाही एवढी गर्दी स्टेडियममध्ये झाली होती. असा प्रतिसाद तिथं नित्याचाच असल्याचं सांगितलं जातं. ही दोन्ही उदाहरणं पाहिली, तर आपल्याकडं जे आहे ते विकता आलं पाहिजे. एवढंच नाही तर ते विकण्याजोगं तयार करता आलं पाहिले.

व्यापक प्रतिसाद आहे का?
फुटबॉल हा भूतलावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन्स लीग यांचे युरोपात फारच अधिक चाहते असतील; पण भारतातही चाहत्यांची कमी नाही. त्यामुळं त्यांना भारतीय मार्केटची भुरळ पडलेली आहे. स्पॅनिश लीगनं काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेट स्टार रोहित शर्माला भारतातला सदिच्छा दूत म्हणून निवडलं. ही एक गंमतच आहे. फुटबॉलची लोकप्रियता अधिक असली, तरी ती वाढवण्यासाठी त्यांनी क्रिकेटचा सहारा घेतला. युरोप आणि भारत यांच्यातल्या टाईमझोनमध्ये फरक असला, तरी ‘एल क्लासिको’ ही बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यातली एक लढत भारतीय प्राईमटाईमला योग्य ठरेल अशा वेळेत खेळवण्यात आली. थोडक्यात काय तर भारतातली नवी पिढी फुटबॉलच्या प्रेमात आहे; पण ती केवळ टीव्हीवर सामने पाहण्यापुरतीच असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. असे असंख्य युवक मैदानात प्रत्यक्ष येतील तेव्हा क्रांती घडेल आणि संस्कृतीही तयार होईल. प्रयत्न झाले नाहीत, होत नाहीत असं नाही. १७ वर्षांखालची विश्वकरंडक फुटबॉल गेल्या वर्षी भारतात झाली आणि पुढील वर्षी २१ वर्षांखालची महिलांची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतात होणार आहे. अशा स्पर्धांमुळं वातावरणनिर्मिती होत असते; पण गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताचा विचार करता फुटबॉल व्याप्ती वाढलेली नाही, ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही.

पिढी घडणं आवश्यक
केवळ एक महान खेळाडू घडल्यानं संस्कृती तयार होत नसते. विजय अमृतराज, रामनाथन कृष्णन आदी भारताचे महान टेनिसपटू; पण लिअँडर पेसनं सन १९९६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवलं आणि भारताच्या टेनिसमध्ये क्रांती झाली. त्यानंतर महेश भूपतीसह दुहेरीत आणि त्यानंतर या दोघांनी परदेशातील विविध साथीदारांसह अनेक ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवली. महिलांमध्ये सानिया मिर्झानं आदर्श निर्माण केला; पण त्यानंतर पेस-भूपती-सानिया या तिघांपेक्षा एक पाऊल पुढं जाणारा खेळाडू घडला नाही. टेनिसचा चाहतावर्ग मोठा आहे, मोठ्या शहरांमध्ये अकादमींत जाणारा तरुणवर्ग मोठा आहे. चांगले प्रशिक्षकही आहेत. आर्थिक पाठबळही मिळत आहे; पण पेसचा अपवाद वगळता अजून एकही ऑलिंपिक पदक हाती लागलेलं नाही.

अशी तयार होते संस्कृती
नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद ही भारताच्या बॅडमिंटनमधली प्रसिद्ध नावं. मात्र, साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी क्रांती घडवली. जगाच्या नकाशावर भारताचं स्थान निर्माण केलं. ऑलिंपिक पदकं त्यांनी आपल्या कर्तृत्वानं आणि जिद्दीनं मिळवली. गतवेळच्या म्हणजेच रिओ ऑलिंपिक स्पर्धेतल्या सिंधूचा सुवर्णपदकासाठीचा सामना संपूर्ण देशानं बघितला होता. इथूच तयार होते क्रांती आणि संस्कृती! ऑलिंपिकनंतर सिंधूला आदर्श मानत अनेक तरुणांनी बॅडमिंटनच्या रॅकेट्स हाती घेतल्या. हैदराबादमध्ये गोपीचंद यांच्या दोन अकादमी आहेत. बंगळूरमध्ये प्रकाश पदुकोण यांची अकादमीही तेवढीच प्रतिष्ठेची आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई सारख्या महानगरांमधल्या छोट्या-मोठ्या अकादमींत अनेक बॅटमिंटनपटू तयार होत आहेत; पण जेव्हा दुसरी सानिया, सिंधू तयार होईल, तेव्हाच हे प्रयत्न सार्थकी लागलेले असतील. मात्र, सध्या तरी तसं कोणतं नाव लगेचच समोर येताना दिसत नाही.
या सर्व मुद्द्यांचा परामर्श घेतला, की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्या देशात गुणवत्ता आणि तंत्र कमी नाही. त्या त्या खेळांना पोषक वातावरण त्या त्या राज्यांमध्ये आहेच (भले ते क्रिकेटप्रमाणं संपूर्ण भारतातलं नसेल); पण जागतिक स्तरावर कुठंतरी यशापयशाचा केवळ उंबरठा पार करण्यात अपयश येत आहे. पी. टी. उषा किंवा मिल्खासिंग यांनी भले ऑलिंपिक पदकं मिळवली नसतील; पण अॅथलेटिक्समध्ये आदर्श निर्माण केला. धावपटू हिमा दास, नेमबाज मनू भाकर हे ‘खेलो इंडिया’तून पुढे आले आहेत. ‘खेलो इंडिया’चा उपक्रम संस्कृती आणि जागृती निर्माण करण्यासाठी स्तुत्य आहे; पण त्यातून पुढं येणाऱ्या खेळाडूंचा आलेख वर चढत गेला तरच त्याचा उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com