esakal | ‘मुलांबरोबर कायम असणं महत्त्वाचं’ (शिल्पा तुळसकर)
sakal

बोलून बातमी शोधा

shilpa tulaskar

मी मुलांना ती लहान असताना शूटिंगला घेऊन जायचे. कारण ती माझी जबाबदारी होती आणि मला हवी होती म्हणूनच मी ती स्वीकारली होती. काही जबाबदाऱ्या या तुमच्याच असतात, त्या तुम्हाला पार पाडाव्याच लागतात, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

‘मुलांबरोबर कायम असणं महत्त्वाचं’ (शिल्पा तुळसकर)

sakal_logo
By
शिल्पा तुळसकर

मी मुलांना ती लहान असताना शूटिंगला घेऊन जायचे. कारण ती माझी जबाबदारी होती आणि मला हवी होती म्हणूनच मी ती स्वीकारली होती. काही जबाबदाऱ्या या तुमच्याच असतात, त्या तुम्हाला पार पाडाव्याच लागतात, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पालकत्वाबरोबर येणारी जबाबदारी मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. मुलांबरोबर कायम असणं हे पालकत्वाच्या दृष्टीनं मला खूप महत्त्वाचं वाटतं. ते प्रत्यक्ष असो, फोननं वा मनानं असो- मुलांना आपण कायम जवळ आहोत असं वाटलं पाहिजे.

आर्थिक आणि भावनिक स्वावलंबन आणि दुसऱ्याला मनापासून मदत करणं, मग ती व्यक्ती ओळखीची असो अथवा नसो या गोष्टी मी माझ्या पालकांकडून शिकले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवताधर्म जाणून गरजवंताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे माझ्या पालकांचं सांगणं होतं. अर्थात त्यावेळचा काळही वेगळा होता, पण त्याचबरोबर बदलत्या काळानुसार या तत्त्वात कसा बदल करायचा, हेदेखील मी त्यांच्याकडूनच शिकले. उदाहारण सांगते, मी खूप लहापणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करू लागले, त्यामुळे माझ्या कामाबरोबर येणारा प्रवास माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट होती. कारण सोळाव्या-सतराव्या वर्षी काम करणं ही त्यावेळी मोठी गोष्ट होती. मी बंगळूरला जाहिरातीच्या शूटिंगसाठी गेले होते आणि परत येताना माझे आई-बाबा विमानतळावर मला घ्यायला आले होते. मी बाहेर आले, तेव्हा बाबांच्या लक्षात आलं, की माझ्याकडे एकच ट्रोलर होता पण माझ्या बोर्डींग कार्डवर सामानाच्या ओळखीसाठी चिकटवलेले बॕगेज टॕग्ज साधारण चार-पाच होते. ते बघून बाबा म्हणाले, ‘‘इतके टॕग्ज कसे काय? बॕग तर एक दिसतेय, मग बाकीचं सामान राहिलं का?’’ मी सांगितलं, की माझ्याबरोबर एक बाई होत्या, त्यांच्याकडे लहान मूल होतं आणि बॕगेज जास्त होतं. म्हणून त्यांनी मला विचारलं, की तू हे सामान माझ्यासाठी चेकइन करशील का? मी सहज हो म्हणाले होते. ते बघून बाबा म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी असं करायचं नाही. त्यांना सांगायचं की तुमच्या बाळाला वाटलं तर मी धरते, पण बॕगेज तुम्हीच घ्या. कारण बॕगेजमधून काहीही आणलं जाऊ शकतं. तुमच्याकडे बॕगेजटॕग आहे म्हणजे ते सामान तुमचं आहे असं समजलं जातं.’’ हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा होता. त्यातूनही बाबा मदत करायची नाही असं नाही म्हणाले, तर त्यांनी त्यातला सुरक्षित मार्ग सांगितला.

दुसरी आठवणारी गोष्ट म्हणजे मी अठरा वर्षांची असतानाच गाडी घेऊन शूटिंगला जायचे. एकदा रात्री दीड- पावणेदोन वाजता परत येताना एक माणूस रस्त्यावर पडलेला दिसला. अशा वेळी उतरून मदत करण मला एकटीला तितकंसं सुरक्षित वाटलं नाही. मी लगेच बाबांना फोन केला, की मी काय करू? तेव्हा ते म्हणाले, ‘तू शंभर नंबर लावून पोलीसांना फोन कर आणि त्यांना त्या माणसाबद्दल सांग. पण तू मात्र गाडीतून खाली उतरू नकोस.’ अशा प्रकारे स्वावलंबनाबरोबर स्वतःची सुरक्षितता कशी ठेवायची आणि कोणाला मदत करताना मधला मार्ग कसा काढायचा याची शिकवण मला माझ्या पालकांनी वेगवेगळ्या प्रसंगातून दिली. मदत करणं थांबवायचं नाही हा माझा पहिला धडा होता. मात्र, त्याबरोबर स्वतःची सुरक्षिततापण बघीतली पाहिजे हे त्यांचं सांगणं होतं.

भावनिक स्वावलंबन पालकांनी मला शिकवलं, तरी भावनिक पातळीवर मी बऱ्यापैकी माझ्या आईवर अवलंबून होते. आर्थिक स्वावलंबनाचे संस्कार खूप लहानपणीच माझ्यावर झाले. मुलगी आहे म्हणून तू हे कर आणि ते करू नकोस असं बाबांनी कधी सांगितलं नाही, पण आई एक गोष्ट सांगायची, की ‘तुला करिअर करायचं असेल, तर त्याचा बॅलन्स तुझ्या कौटुंबिक जीवनात असणं खूप गरजेचं आहे. तो राखताना आई म्हणून किंवा पत्नी म्हणून असणारी जबाबदारी सांभाळूनच ती गोष्ट केली पाहिजेस. हा समतोल साधता आला तर तुझं करिअर चांगल्याप्रकारे पुढे जाईल.’ आर्थिक स्वावलंबनाचा संस्कार मला पुढील आयुष्यातही खूप उपयोगाचा ठरला.
दुसरी गोष्ट म्हणजे ‘हे मला येत नाही,’ असं म्हणायचं नाही. ती करताना मला त्रासही झाला. कारण ‘कमी तिथे आम्ही’ असं म्हणून आपण खूप गोष्टी अंगावर घेतो आणि आसपासची माणसं त्यामुळे फारच निष्काळजी होतात. हा प्रकार कामाच्या किंवा कुटुंबाच्या दोन्ही ठिकाणी बघायला मिळतो, पण तरीही माझं नुकसान यामुळे झालं नाही.

कामासाठी माझ्या कुटुंबाचा नेहमीच मला पाठिंबा मिळालेला आहे. ‘‘आई तू आज कामावर जाऊ नकोस,’’ असं माझ्या मुलांनी कधी म्हटलं नाही. मुलांना मी नेहमी सांगितलं आहे, की तुम्ही काहीतरी व्हावं म्हणून आई आणि पपा इतकं काही करत आहेत, तुम्ही छान मोठी माणसं झालेलं बघायला आम्हाला आवडेल. माझ्या आई-पपांनीही हे केलं आहे. प्रत्येकानं काम केलं पाहिजे, हे मुलांना यातून शिकवलं आहे. त्यामुळे आमच्या घरात रोल प्ले नाहीये. मी जे घरासाठी, मुलांसाठी केलंय तेच माझ्या पतीनं विशालनंही केलं आहे. त्याला कधी हा प्रश्न कधी पडला नाही, की मूल आजारी आहे, तर आपणच का थांबावं घरी? कारण माझं त्यावेळी शूटिंग ठरलेलं असेल, तर मी एक दिवस न जाणं म्हणजे निर्मात्याचं काही लाखांचं नुकसान होतं, हे तो जाणून होता. त्यामुळे ती जबाबदारी त्या त्या वेळी विशालनं खूप जबाबदारीनं घेतली. मुलं लहान असताना त्याला हे खूप अवघड व्हायचं; पण त्याने ते केलं. तसंच मुलांनी कधी मी जवळ असलंच पाहिजे असा हट्ट केला नाही. मात्र, आई म्हणून मूल आजारी असताना कामावर जाणं खूप अवघड असतं. मी असे अनुभव घेतले आहेत. अगदी मुलाचं ऑपरेशन ठरल्यानंतर त्या दिवसापर्यंत मला काम करावं लागलं होतं. शेवटी हा आपण घेतलेला निर्णय असतो, त्यामुळे मनात कोणतीही अपराधी भावना ठेवता तो पुढे न्यावाच लागतो. अर्थात त्यासाठी घरच्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ही गोष्ट घरच्या आधाराशिवाय, पाठिंब्याशिवाय शक्य नसते.

माझ्या आईपेक्षा पालक म्हणून मी जास्त भित्री आहे. आईनं मला जितकं स्ट्राँग आणि सक्षम केलंय तितकं मी करू शकेल का? असं काही वेळा मला वाटतं. अर्थात मी मुलांना तसं करण्याचा प्रयत्न करते आहे, पण मनातून प्रचंड भीती वाटत असते. माझा मुलगा विवान खूप लहानपणापासून लोकलनं जातो. विशालनं त्याला तसं शिकवलं आहे. घरात गाड्या वगैरे सगळं आहे; पण दहावीचे क्लासेस वगैरे सगळं विवाननं लोकलनंच केलं- कारण वेळ वाचायचा. विवानच्या बाबतीत विशालमुळे मी या निर्णयावर येऊ शकले हे नक्की. मुलांना वाढवताना आपल्या आई-वडिलांची आठवण जास्त येते. त्यांनी मला जसं वाढवलं ते सगळं करण्याचा प्रयत्न मी पालक म्हणून माझ्या मुलांना वाढवताना करते. महत्त्वाचं म्हणजे माझी मुलंही त्याप्रमाणे मोल्ड होत आहेत. काळाचा फरक मला बऱ्याच ठिकाणी जाणवतो. खासकरून सुरक्षिततेच्या बाबतीत तो जाणवतो. आम्हाला आमच्या पालकांनी सार्वजनिक वाहतुकीचाच वापर करायला शिकवलं. आम्हीही तसंच केलं. मुंबईत तेच जास्त सोयीचं असतं. विवान या सगळ्यातून गेला- कारण तो आता सतरा वर्षाचा झाला आहे. मात्र, शायवा आजून लहान आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. अर्थात विवानलाही काही अनुभव आले. माझ्यासाठी तो धक्का होता. आता फक्त मुलीचीच काळजी करायची आणि मुलाची नाही असा काळ राहिलेला नाही. दोघांची सारखीच काळजी घ्यावी लागते.

दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई-वडील भाबडे होते. आज त्या गोष्टीचाही लोक गैरफायदा घेतात. आपल्या भावनिक स्वभावाचा लोक फायदा घेतात. त्यातून मी माझ्या मुलांना जाताना मी बघते. त्या मानानं माझी मुलं भावनिक दृष्टीनं बऱ्यापैकी स्ट्राँग आहेत असं म्हणता येईल. कदाचित अनुभवांनी ती तयारही झाली असतील. म्हणजे एखाद्याला मदत हवी आहे, तर तुम्हाला शक्य असेल तेवढी करा आणि पुढे चला, किंवा मदत करताना कोणाला त्याचा फायदा घेऊ न देणं असा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. या बाबतीत मी मात्र खूप फसवले गेले आहे. माझ्या अनुभवातून मी मुलांना सतत शिकवत राहिले, नाही तर तीही त्याच वाटेवर गेली असती.

एकूणच पालकत्वाचा माझा अनुभव खूप आनंद देणारा आहे. मला वाटलं होतं तितका तो सोपा नाही आणि वाटलं होतं तेवढा कठीणही नाही. काही बाबतीत शिस्त असायलाच पाहिजे, त्यात तडजोड नाही चालत. जिथं त्यांना मोकळीक गरजेची आहे ती आहेच. आई माझ्या नकळत माझ्यावर लक्ष ठेवायची. मीही काही बाबतीत ही गोष्ट करते. आताच्या काळात सोशल मीडियासारख्या गोष्टी आहेत जिथं लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मी विवानच्या नकळत त्याच्यावर लक्ष ठेवत असते. तो दहावीत होता तेव्हा सहा महिने मी सगळं बंद केलं होतं. त्याच्याजवळ थांबले होते आणि हे मी माझ्या आनंदासाठी केलं होतं. शिवाय विवानही खूप जबाबदार आहे. ‘‘तू जागू नकोस, जाऊन झोप, मी करतो माझा अभ्यास,’’ असं तो नेहमी सांगायचा. माझी मुलगी शायवाही तेवढीच जबाबदार आणि समजूतदार आहे.

विवान मोठा असल्यामुळे त्याच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आम्ही आधी जिथं राहायचो, तिथं विवानपेक्षा लहान मुलगा राहायचा. त्यांची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. आमच्याकडे मात्र विवान एकटाच आणि पहिलं मूल असल्याने त्याच्याकडे भरपूर खेळणी, कपडे शूज वगैरे होतं. मला जाणवायचं, की विवानला इतक्या कपड्यांची, वस्तूंची गरज नाही शिवाय मुलं भरभर वाढतात. त्यावेळी माझे दीर दुबईला होते. तेही भरपूर कपडे आणायचे. बरेचदा त्यांच्या लक्षात न राहिल्यानं सारखेच कपडे आणले जायचे. तेव्हा मी बरेच नवे कपडे त्या मुलाला देऊन टाकायचे. मी विवानची खेळणी आणि त्याच्या सर्व सायकलीसुध्दा त्या मित्राला दिल्या. विवान चार वर्षांचा होता, तेव्हाची गोष्ट आहे, एकदा स्वतःचा एक ड्रेस त्या मुलानं घातलेला विवाननं बघीतला आणि त्यानं चमकून माझ्याकडे पाहिलं. अरे आपल्यासारखाच ड्रेस आहे, असे त्याच्या चेहऱ्यावर भाव होते. मी त्याला चटकन बाजूला घेतलं आणि सांगितलं, की, ‘‘आपण ते अरबाजला गिफ्ट दिलं आहे ना, मग ते आता त्याचं आहे.’’ त्यानंतर विवाननं मला त्याबद्दल कधीच कुठलाच प्रश्न विचारला नाही. सायकल ही मुलांना किती प्रिय असते; पण त्याबाबतही विवाननं कुठला प्रश्न विचारला नाही की तक्रार केली नाही. इतक्या लहान वयात त्याची ही समज, संयम या गोष्टींचं मला खरोखरच खूप कौतुक वाटलं होतं आणि अजूनही वाटतं. पाच वर्षांचा असताना तो दुबईला गेला होता, तेव्हा आमच्या खाली राहणाऱ्या सगळ्या मुलांना गिफ्ट घेऊन आला होता. लहानपणापासूनची ही उदार वृत्ती मला खूप सुखावून जाते. त्याची सहनशक्तीही खूप आहे. आमच्याकडे रविवारी फॕमिली डिनर असतं. मी शूटिंगला असताना एकदा विशाल मुलांना घेऊन बाहेर गेला होता. विवानला एक-दोनदा हायपर अॕसिडीटीचा त्रास झाला होता. मी त्याला नेहमी सांगायचे, की आपल्याला चालतं तेच फूड खात जा. तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही औषध घेऊन बरे होता; पण आईला त्याचा खूप मानसिक त्रास होतो, ते लक्षात ठेऊन त्या दिवशी त्यानं पोट दुखत असताना मला काही सांगितलं नाही. मध्ये एकदा येऊन थोडं दुखतंय असं म्हणाला. मी त्याला अॕन्टासिड दिली. थोडं बरं वाटलं असेल म्हणून तो झोपायला गेला. मी खूपच थकलेली होते त्यामुळे मी लगेच गाढ झोपले; पण त्याला रात्रभर त्रास होत होता, तो सहन करत राहिला. सकाळी मी उठण्याच्यावेळी मला सांगितलं, की मला सहन होत नाहीये आता, खूप दुखतंय. विशालनं त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं आणि ते दुखणं अपेंडिसायटिसचं निघालं. इतक्या तीव्र वेदना त्यानं ज्या प्रकारे सहन केल्या ते नवलच होतं. पुढे ऑपरेशनच्या वेळीही तो मला म्हणाला, ‘‘आई तू टेन्शन घेऊ नकोस आणि रडू नकोस. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, तरच तू ये नाहीतर नको येऊ.’’ त्याची ही लढण्याची, सामंजस्याची वृत्ती मला विलक्षण वाटते.

विवानचे दात काही कारणामुळे पुढं आल्याने दातांना ब्रेसेस लावण्याची गरज होती. डॉक्टर थोडा मोठा झाल्यावर लावू असं म्हणत होते आणि हा लवकर लाव असं सारखा मागं लागत होता. काही दिवसांनी त्यानं टेनिस खेळायला जाणं बंद केलं. मी कारण विचारल्यावर सुरूवातीला सहजच जात नाही असं म्हणाला. मला काहीतरी कारण असल्याचं जाणवलं. मग मीच ‘‘मित्र दातावरून चिडवतात का?’’ असं विचारल्यावर तो ‘हो’ म्हणाला. तोपर्यंत तो त्याच्याच पातळीवर परिस्थिती हाताळत होता. त्याचं भांडवल करून माझ्याकडे तो तक्रार घेऊन रडत आला नाही, याचं मला विशेष वाटलं. नंतर मी लगेच त्याला दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले; पण या प्रसंगातूनही स्वतः गोष्टी हाताळणं हा गुण मला जाणवला.

पालकांनी मुलांना शिस्तीचं महत्त्व, एखादी गोष्ट वेळेवर करणं, एखाद्या ठिकाणी वेळेवर जाणं, एखाद्या गोष्टीसाठी शंभर टक्के प्रयत्न करणं या गोष्टी शिकवायलाच पाहिजेत. आपल्या क्षमता पूर्ण वापरणं शिकवायला हवं. माझा मुलगा वर्गात पहिला आला नाही तरी चालेल; पण त्यानं शंभर टक्के प्रयत्न करणं आई म्हणून मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ‘चलता है’ हा दृष्टिकोन मुलांच्या बाबतीत ठेवून चालत नाही. विवानला अॕथलेॕटिक्सची आवड आहे, कुकिंगची आवड आहे. दहावीत शाळेत त्यानं टॉप केलं होतं, आता त्यानं शेफ व्हायचं स्वतःच ठरवलेलं आहे. मी त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःला काही पदार्थ बनवता यावेत, कुठं अडायला नको म्हणून कुकिंग थोडफार शिकवलं होतं. आता ती त्याची आवड बनली आहे. शायवाचं मात्र वेगळं आहे. ती कथक करते, तिच्या आवडीनं ती अॕथलेटिक्समध्ये आहे, ती फुटबॉल खेळते, बास्केटबॉल खेळते, अभ्यासात छान आहे, वाचनाची आवड आहे. मुलांना गॕजेटपासून लांब ठेवणं माझ्या हातात आहे, तोपर्यंत ते मी करू शकते; पण पुढे कठीण आहे. कारण आता विवानचा अभ्यास पूर्णपणे लॕपटॉपवर आहे. आता मी गॕजेट वापरताना वेळेचं बंधन घालू शकते; पण बाहेर शिकायला गेल्यानंतर या गोष्टी आपल्या हातात राहत नाही. त्यामुळे आता जे हातात आहे ते मी करते.

मुलांमध्ये मूलभूत कोणते गुण आहेत आणि त्यांची आवड काय आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यानुसार मुलांना घडवणं हे खूप आव्हानात्मक असतं. म्हणजे कसं? तर समजा शायवाला ऍक्टिंग आवडते; पण तिच्यामध्ये अभिनयाचे गुण आहेत का हे ओळखणं आणि तिच्या मूलभूत गुणांकडे वळवणं हे जास्त कठीण असतं. आतापर्यंत असा प्रसंग माझ्यासमोर आला नाही; पण पालक म्हणून हा विचार मला महत्त्वाचा वाटतो.

माझ्या दैनंदिननीत मुलांसाठी खास वेळ असतोच आणि तो त्यांचाच असतो. मुलांच्या वेळेनुसारच इतर सर्व शेड्युल आखलं जातं. तसं पाहिलं, तर मुलं कुठंही, कशीही वाढू शकतात; पण ती कशी वाढतात, हे पालकांच्या हातात असतं. ते मला गमवायचं नाहीये. कारण मला मुलं, ते वाढवण्याचा आनंद, त्यांच प्रेम, त्यांच यश हे सगळं हवं होतं म्हणून मी ते केलंय. हे करत असताना सगळं प्रत्येकवेळी सुरळीत असतं असं नाही. मी मुलांना ती लहान असताना शूटिंगला घेऊन जायचे. कारण ती माझी जबाबदारी होती आणि मला हवी होती म्हणूनच मी ती स्वीकारली होती. काही जबाबदाऱ्या या तुमच्याच असतात, त्या तुम्हाला पार पाडाव्याच लागतात, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आई होण्यासाठी मुलाला जन्मच दिला पाहिजे असं नाही. मुलांचं प्रेम मिळणं, आपल्याला हवं म्हणून मूल होऊ देणं हे सगळं ठीक आहे; पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. मला बरेचदा असं वाटतं, की मी शंभर टक्के मुलांना नाही देऊ शकले. पुढे कदाचित मुलं म्हणतीलही, की आई इकडे चुकली वगैरे; पण एक गोष्ट नक्की, की मी त्यांच्याबरोबर नेहमी होते, हे ती नाकारू शकणार नाहीत. मुलांबरोबर कायम असणं हे पालकत्वाच्या दृष्टीनं मला खूप महत्त्वाचं वाटतं. ते प्रत्यक्ष असो, फोननं वा मनानं असो- मुलांना आपण कायम जवळ आहोत असं वाटलं पाहिजे. शिवाय मुलांसाठी काहीही करताना त्यात खूप मोठा त्याग केला वगैरे भावना नसावी. खूप सुंदर पद्धतीनं या गोष्टी झाल्या पाहिजेत.
(शब्दांकन : मोना भावसार)