पोटच्या गोळ्याची गोष्ट (शिरीष देशमुख)

shirish deshmukh
shirish deshmukh

जनरल वॉर्डात आबा अॅडमिट होते त्याच्या समोरच्या व्हरांड्यात दोन सख्खे भाऊ बापाच्या ऑपरेशन खर्चावरून भांडत होते. आतल्या बेडवर पोटातल्या असह्य वेदना सहन करत आबा हे सगळं ऐकत होते. पोटातल्या वेदनांपेक्षा पोटच्या गोळ्यांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांच्या वेदना जास्त असह्य होत्या. आज आबांना त्यांच्या कारभारणीची खूप आठवण येऊ लागली. वर बघत म्हणाले : ‘‘तुला भविष्य कळालं होतं का?... माझ्याआधी जाऊन बसलीस.. मुक्त होऊन.. मला ठेवलंस अडकवून इथं... कर्माचे भोग भोगायला.’’

‘‘काय झालं रे दादा? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस?’’ हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकताच श्यामनं पहिला प्रश्न विचारला.
‘‘अरे काही नाही.. आबांची तब्येत जरा जास्तच...’’
‘‘घ्यायचंस की रे दादा सांभाळून.. ’’ रामचं बोलणं पूर्णही होऊ न देता श्याम मध्येच बोलला : ‘‘तुला तर माहितीये ना मला किती मुश्कीलीनं सुट्टी मिळते ती... तू आहेस ना रिकामा!’’
‘‘हो मी तर आहेच रे..’’ राम समजावू लागला, ‘‘पण डॉक्टर म्हणाले, जरा गंभीर बाब आहे. म्हणून तुला बोलावून घेतलं.’’
‘‘अच्छा.. काय प्रॉब्लेम आहे?’’
‘‘तीन-चार दिवसांपासून सारखं पोट दुखतंय आबांचं... काल इथं आणलं, तर डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करावं लागेल. म्हणून मग लगेच अॅडमिट केलं.. ’’ रामनं झाला प्रकार सविस्तर सांगितला.
‘‘हो... पण मग मी ऑपरेशन करणार आहे का? मला का बोलावलंस?’’ श्यामला बापाच्या आजारपणाशी काहीच देणं घेणं नव्हतं. आता रामही चिडला.
‘‘म्हणजे? तुझे वडील नाहीत का ते?’’
‘‘अरे आहेत ना...’’
‘‘ मग... मी सगळे कामधंदे सोडून त्यांची काळजी घेतोय आणि इथं अॅडमिट केल्यानंतरही तुला साधं भेटावंसंही वाटत नाही?’’ राम चांगलाच संतापला.
‘‘तसं नाही रे दादा... ’’
‘‘मग कसं? सगळ्यांनाच कामं असतात. कामापायी नाती विसरायची? आपली माणसं मरू द्यायची?’’
‘‘ओके ओके.. सॉरी... प्रवासाच्या दगदगीनं डोकं ताळ्यावर नाही माझं.. चुकून बोलून गेलो मी... आय अॅम सॉरी..!!’’ श्यामनं माघार घेतली. त्यानंतर रामही काही बोलला नाही. दोघंही बराच वेळ गप्पच राहिले.
काही वेळ शांत राहिल्यानंतर राम म्हणाला : ‘‘डॉक्टर म्हणालेत ऑपरेशनसाठी लाख-दीड लाखापर्यंत खर्च येईल..’’
‘‘दीड लाख?’’ ऐकून श्यामला जणू धक्काच बसला. तो पुन्हा फणफणत बोलला : ‘‘दादा, तुला जर असं वाटत असेल, की मी पैसे दिले पाहिजेत, तर माफ कर... मी आठच दिवसांपूर्वी नवीन बाईक घेतलीय. आता माझ्याकडे दमडीही नाही...’’ त्यानं अंग काढून घेतलं.
‘‘आणि माझ्याकडं झाड आहे का पैशांचं? दहा वर्षांपासून मीच सांभाळतोय आबांना... दुखणी-खुपणी, कपडेलत्ते, खाणंपिणं.. सगळा खर्च करतोय... तू कधी एक रुपया तरी दिलास का?’’ रामनं सगळा हिशेब मांडला.
‘‘हो, मग त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्याच ताब्यात आहे की... घर.. आयुष्यभराची कमाई तुलाच दिली त्यांनी..’’
‘‘काय कमाई आहे रे त्यांची? एक मोडकं घर.. तेही मी सोडणार आहे लवकरच... बाकी कधी एक रुपयाही त्यांनी दिला नाही मला.’’

जनरल वॉर्डात आबा अॅडमिट होते त्याच्या समोरच्या व्हरांड्यात दोन सख्खे भाऊ बापाच्या ऑपरेशन खर्चावरून भांडत होते. आतल्या बेडवर पोटातल्या असह्य वेदना सहन करत आबा हे सगळं ऐकत होते. पोटातल्या वेदनांपेक्षा पोटच्या गोळ्यांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांच्या वेदना जास्त असह्य होत्या. आज आबांना त्यांच्या कारभारणीची खूप आठवण येऊ लागली. वर बघत म्हणाले : ‘‘तुला भविष्य कळालं होतं का?... माझ्याआधी जाऊन बसलीस.. मुक्त होऊन.. मला ठेवलंस अडकवून इथं... कर्माचे भोग भोगायला.’’ आबांचे डोळे पाणावले होते. त्यांनी त्यावरून मनगट फिरवलं.
बाजूच्या बेडजवळ एक नर्स पेशंट तपासत उभी होती. आबांनी तिला हाक मारली. तिचा पेशंट बघून झाला, की ती आबांजवळ आली. ‘‘काय म्हणता बाबा?’’
‘‘पोरी, तू माझ्या लेकीसारखी आहेस,’’ आबांनी तिच्यापुढे हात जोडले. ‘‘माझं एक काम करशील..?’’
नर्स भारावून गेली. तिनं आबांचे सुरकतलेले हात हातात घेतले आणि म्हणाली : ‘‘मुलगी मानताय ना.. मग नक्कीच करीन.. सांगा..’’
आबांनी आवंढा गिळला. ‘‘या शहरातल्या एखाद्या साधारणशा वृद्धाश्रमात माझं नाव नोंदवून दे बेटा... या दवाखान्यातून बाहेर पडलो, की तिकडेच अॅडमिट होईन म्हणतोय.’’

नर्स क्षणभर शांत बसली. तिचेही डोळे भरून आले होते. ‘‘नक्कीच बाबा.. आजच एका चांगल्या वृद्धाश्रमात, जिथं तुमची खूप चांगली काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी तुमचं नाव रजिस्टर करते.’’ ती क्षणभर थांबली. मान वळवून तिनं बाहेर बघितलं : ‘‘पण खरं सांगू का... ज्या पद्धतीनं तुमची मुलं ऑपरेशन खर्चावरून भांडत आहेत, ते पाहून असं वाटतंय, की तुम्ही इथून बाहेरच पडणार नाहीत..’’ ती पुढे बोलली नाही. आबांजवळून उठली आणि तिथून बाहेर पडली.
या गोष्टीची जाणीव आबांनाही होती. कदाचित ऑपरेशनविनाच मरावं लागेल त्यांना.
‘‘राम...’’ कापऱ्या आवाजात आबांनी हाक मारली. पहिली हाक अर्थातच पोरांनी ऐकली नाही. आठ-दहा हाका मारल्यानंतर राम आबांजवळ गेला. मागोमाग श्यामही.
‘‘अरे श्याम तू कधी आलास?’’ आबांनी नवलानं विचारलं.
‘‘हा काय आत्ताच येतोय आबा..’’ श्यामचं उत्तर.
‘‘अरे, बरं झालं दोघं भाऊ एकत्र आलात.. मला तुम्हाला काही सांगायचंय.’’ पोटातली कळ अगदीच असह्य झाली. आबांनी पोटाला हात लावला. कण्हतकण्हत बोलू लागले : ‘‘पोरांनो, मी चाळीस वर्षं एका हिरे व्यापाऱ्याकडे खर्डेघाशी केली. कंजूष होता अगदी. खूप कमी पगार द्यायचा. मी खूपदा पगारवाढीसाठी त्याच्याकडे विनवणी केली; पण नाही वाढवला चेंगटानं.. मग काय.. ठरवलं... आता आपणच याला झटका द्यायचा... दिवाळीला आमचा वर्षभराचा हिशेब व्हायचा.. मी त्याआधी एक हिरा काढून घेतला... त्यानंतर सेठपुढे हिशेब मांडला. माझी चोरी त्याला कळली नाही. मग काय दरवर्षी एक हिरा चोरायला लागलो. चाळीस वर्षांत चाळीस हिरे दाबले...’’ बापाची ही चौर्यकथा मुलं मोठ्या कौतुकानं ऐकत होती. न राहवून श्याम बोललाही : ‘‘उभ्या आयुष्यात एवढं एकच काम आम्हाला अभिमान वाटावा असं केलंय तुम्ही आबा...’’
‘‘नुसता अभिमान?’’ आबा गालातल्या गालात हसले : ‘‘काय वाटतं? आजचा मार्केट रेट काय असेल त्या हिऱ्यांचा?’’
राम हिशेब लावू लागला. श्याम अडखळत बोलला : ‘‘पाच.. सहा.. लाख...??’’
‘‘अरे मूर्खांनो,’’ आबा उसळले : ‘‘हिरा जितका लहान त्याची किंमत तितकीच जास्त असते. एकेक हिरा पाच पाच लाखांचा आहे तो.’’
‘‘क.. क.. क.. काय??’’ दोन्ही पोरांची बोबडीच वळली. एकेक हिरा पाच लाखांचा... चाळीस हिरे.. पाच चोक वीस.. म्हणजे दोन कोटी?? हिशेब लावताच श्यामला जणू फेफरंच आलं.. एवढे पैसे... आबाजवळ? रामचेही डोळे जणू पांढरेच पडले..
‘‘कुठं.. कुठं.. कुठं आहेत ते हिरे आबा??’’ स्वतःला सावरत रामनं विचारलं.
या प्रश्नावर आबा काहीच बोलले नाहीत. मान वळवून गप्प राहिले. आता श्यामही शुद्धीवर आला. ‘‘हिरे.. दोन कोटी.. हिरे.. कुठेत??’’ असं बरळू लागला.
आबा जरा वेळ शांत राहिले. एक दीर्घ श्वास घेतला. म्हणाले : ‘‘पोरांनो, मी तेव्हा एका झोपडीवजा घरात राहत होतो. हिरे लपवून ठेवावेत अशी सुरक्षित जागा कुठेच नव्हती. कुणाकडे सांभाळायला द्यावेत असा विश्वासातला कुणी मित्र- नातेवाईकही नव्हता. मग...’’

‘‘मग कुठं ठेवलेत..’’ पोरांच्या उत्सुकतेची लाळ टपटपायला लागली होती.
‘‘मग...’’ आबांनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला : ‘‘मी.. दरवर्षी चोरलेला हिरा गिळून घेतला. पोटात लपवून ठेवला.’’
‘‘पोटात?’’ श्यामला विश्वास वाटेना : ‘‘काहीतरीच सांगताय आबा तुम्ही.. हिरा विषारी असतो. पोटात जाताच तुम्ही स्वर्गवासी झाला असतात..’’ रामची प्रतिक्रियाही तीच होती. आबा आपल्याला पैशांची लालूच दाखवून फसवत आहेत.
आता आबा संतापले. उसळून बोलले : ‘‘तुम्हाला काय वाटलं.. घेतला आणि तोंडात टाकून गिळला हिरा?? गाढवच राहिलात रे तुम्ही दोघंही.. थोडं थोडंही व्यवहारज्ञान नाही... आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्जची तस्करी कशी करतात माहितीये का?’’ आबा जरा थांबले. दोन्ही पोरांकडे बघितलं. दोघांच्याही डोळ्यांत भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. भाबड्या मुद्रेनं ते आबांकडे बघत होते. आबांनी डोक्यावर हात मारला : ‘‘अरे, प्लॅस्टिक कोटेड कॅप्सूल्स असतात. न विरघळणाऱ्या. त्यात हिरा पॅक करून गिळला. चाळीस कॅप्सूल असतील माझ्या पोटात... त्यामुळेच मागे लागलीय रे ही जीवघेणी पोटदुखी...’’ एवढं बोलताच त्यांच्या पोटात एक जोराची कळ उठली. ते आर्तपणे विव्हळले. राम आणि श्याम एकमेकांकडे बघत होते. काहीतरी खाणाखुणा झाल्या आणि दोघं वॉर्डरूमच्या बाहेर आले. एका कोपऱ्यात जाऊन दोघांत चर्चा सुरू झाली.
‘‘काय वाटतं दादा, आबा खरं बोलत असतील?’’ श्यामचा प्रश्न.

‘‘कुणास ठाऊक? पण विश्वास ठेवावासा वाटतोय..’’ रामचं विवेचन : ‘‘म्हणजे बघ ना, त्यांच्या पोटात साठलेल्या कॅप्सूलवर मांसाचा थर साचला असेल. त्याचा गोळा होऊन तोच सोनोग्राफीत दिसत असेल. त्यामुळेच आबांचं पोट वारंवार दुखत असेल.. असं होऊ शकतं..’’
‘‘मलाही तेच वाटतंय... आबांच्या पोटातला हा गोळा आपल्याला करोडपती बनवू शकतो.’’ श्यामची लालसा पुन्हा जागी झाली.
‘‘मग काय म्हणतोस? करूयात ऑपरेशन..?’’
‘‘हो... खर्च.. फिफ्टी फिफ्टी... हिरे फिफ्टी फिफ्टी..’’
‘‘डन..!!’’
दोन्ही भावांत सौदा ठरले. दोघंजण मिळून डॉक्टरांकडे गेले. ऑपरेशन करा म्हणाले. फी जमा केली. त्याच रात्री ऑपरेशन झालं. आबांच्या पोटात चांगला अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचा मांसाचा गोळा निघाला.
राम-श्याम ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच उभे होते. डॉक्टर बाहेर येताच श्यामनं प्रश्नावली मांडली : ‘‘काय झालं डॉक्टर? काय निघालं पोटात.. गोळा निघाला की गोळ्या?’’
डॉक्टरांनी प्रश्नार्थक मुद्रेनं श्यामकडे बघितलं. रामनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. श्यामला थांबवत तो बोलला : ‘‘आबांची तब्येत कशीय आता डॉक्टरसाहेब?’’
‘‘ही इज फाईन.. दोन दिवसांत तुम्ही त्यांना घरी नेऊ शकता.’’ डॉक्टरांनी सांगितलं.
‘‘काय निघालं पोटात?’’
‘‘६५० ग्रॅमचा वेस्टेज पार्ट आहे.. गोळा.’’
‘‘आम्हाला तो बघता येईल?’’
‘‘हो.. पण आता तो लॅबमध्ये ठेवलाय.. उद्या दुपारी तुम्हाला बघायला मिळेल.’’
‘‘थँक्यू डॉक्टर.’’ रामनं डॉक्टरचे आभार मानले. डॉक्टर गेले. श्यामनं तोंड वेडंवाकडं केलं : ‘‘दोन कोटींचा गोळा बघण्यासाठी दीड लाख रुपये घालवलेत.. अन् हा डॉक्टर..’’
‘‘उद्या आपल्यालाच देणार आहेत रे. तू शांत राहा जरा.’’ रामनं समजावलं : ‘‘चल, खूप भूक लागलीय आता.. जेवून येऊ कुठेतरी.’’
‘‘कुठंतरी?’’ श्यामला प्रश्न पडला : ‘‘अरे, वहिनी असेल ना घरी.. घरीच जाऊ ना जेवायला..’’
‘‘नको रे.. उगाच तिला बिचारीला त्रास...’’ रामला बायकोची खूपच काळजी. ‘‘तिला दगदग नको म्हणून आबांसोबतही मी एकटाच आलो रे....चल इकडे हॉटेलातच जेवू मस्त... छोट्या भावाला मोठ्या भावाकडून ट्रीट आज... बिल फिफ्टी फिफ्टी करून भरू...!!’’
‘‘बरं चल.. तू म्हणतोस तसं... आणि रात्री झोपायला?’’
‘‘म्हणजे? इथं हॉस्पिटलमध्ये झोपावं लागेल ना तुला.. आबांजवळ.. मी जाईन घरी... तिला झोप लागत नाही रे मी नसलो की... नाहीतर मीच थांबलो असतो...’’ श्याम आपल्या मोठ्या दादाकडे पाहतच राहिला. दोघं हॉस्पिटलबाहेर पडले.
नुकतंच ऑपरेशन झालेल्या, बेडवर बेशुद्ध पडलेल्या बापाला बघून यावं असंही वाटलं नाही.. दोघांनाही..!

दुसऱ्या दिवशी लॅब उघडताच दोघे भाऊ जाऊन भिडले. ‘आम्हाला आबांच्या पोटात निघालेला गोळा हवा आहे,’ असा एक अर्ज तिथं दिला. तिथल्या ऑपरेटरनं जरा वेळ थांबायला सांगितलं.
तासाभरानं लॅब अटेंडंट आला. तोवर यांच्या अगदी अस्वस्थ येरझाऱ्या चालूच होत्या. तो येताच हे दोघेही धावत त्याच्यापुढे गेले.
‘‘आम्हाला आबांच्या पोटात निघालेला गोळा हवा आहे..’’ आतुरलेला श्याम बोलला.
त्याचं बोलणं ऐकून अटेंडंट हसला : ‘‘काय करता? शोकेसमध्ये ठेवता काय शोपीस म्हणून..’’
‘‘नाही. देवघरात ठेवणार आहोत. शाळिग्राम म्हणून...’’ राम पुरता वैतागला होता :‘‘तुम्हाला काय करायचंय? आमच्या बापाच्या पोटातला गोळा आहे. आम्हाला देऊन टाका.’’
लॅब अटेंडंट खळखळून हसला. त्यानं दोन-तीन फायली चेक केल्या. एक फाईल नीट वाचून बोलला : ‘‘तुमचा तो गोळा पुढच्या डायग्नोसिससाठी मोठ्या लॅबला पाठवलाय हो...’’
‘‘काय?’’
‘‘हो... म्हणजे कॅन्सर वगैरेचा प्रकार तर नाही ना ते चेक करण्यासाठी...चोवीस तासांत रिपोर्ट येईल त्याचा. तोपर्यंत डिस्चार्ज मिळालेला असेल पेशंटला..’’ त्यानं स्पष्ट केलं.
‘‘अहो काही कॅन्सर बिन्सर नाही..’’ श्याम चिडून बोलला : ‘‘कुठल्या लॅबला पाठवलाय ते सांगा..’’
लॅब अटेंडंटला या दोघांची तडफड काही कळेना. त्यानं मोठ्या लॅबचं व्हिजिटिंग कार्ड श्यामकडे दिलं.

श्याम घाईघाईनं हॉस्पिटलबाहेर पडला. राम तिथंच थांबला. तासाभरानं श्यामचा रामला फोन आला : ‘‘इथले लोक गोळा देत नाहीत. हॉस्पिटललाच पाठवू म्हणतात.’’
आता मात्र दोघांच्याही संयमाचा बांध फुटला होता. फणफणत दोघं ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. आबा शुद्धीवर आले होते. दोन्ही पोरांना बघून त्यांना खूप बरं वाटलं. राम-श्याम आबांच्या जवळ गेले. थकलेल्या तुटक तुटक आवाजात आबांनी विचारलं : ‘‘काय निघालं रे पोटात?’’
‘‘गोळा निघाला मांसाचा..’’
‘‘हिरे गोळा झाले असतील पोटात... ’’
‘‘हो, पण तो दोन कोटींचा गोळा नुसताच फिरतोय इकडून तिकडे... आमच्या हाती काही लागेना...’’
‘‘लागेल रे... दम धरा जरा..’’ आबा बोलले आणि त्यांनी डोळे मिटले. थकल्यानं त्यांना बोलताबोलताच झोप लागली.
दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आबांना डिस्चार्ज दिला. ‘थोडे दिवस काळजी घ्या’ म्हणाले. दोन्ही भावांनी बापाच्या दोन्ही बाजूंनी आधार दिला. हॉस्पिटलबाहेर आणलं. टॅक्सी बोलावू लागले, तेव्हा आबा म्हणाले : ‘‘पोरांनो, तुम्ही तुमच्या कुटुंबात जा आता निवांत... मी माझ्यासाठी नवं घर शोधलंय.. माझं आणखी ओझं नको तुमच्यावर.’’
‘‘काय बोलताय आबा तुम्ही... ओझं कसलं?’’ राम.
‘‘मला सगळं कळतं रे पोरांनो...’’ आबांनी डोळ्यांना रुमाल लावला : ‘‘पण मी तुमच्यावर आजिबात नाराज नाही... जित्या जिंदगीत या गोष्टी चालायच्याच... चांगल्या वृद्धाश्रमात अॅडमिशन मिळालंय... निश्चिंत राहा.’’
‘‘पण आबा... ’’

‘‘अरे हो... आणि त्या गोळ्याच्या भरवशावर राहू नका...’’ आबांनी डोळा मिचकावला : ‘‘चुकून खेळायची गोटी गिळली, तर पहाटच्याला बाहेर पडती... हिरे चाळीस वर्षं पोटात राहत असतात व्हय रे गधड्यांनो..?’’
राम आणि श्याम एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. एका टॅक्सीला आबांनी हात केला. टॅक्सीत बसले. टॅक्सी सुरू झाली. आबांनी काचेतून डोकं बाहेर काढलं. पोरांना म्हणाले : ‘‘अन् मी तुमचा बाप आहे.. हे नेहमी लक्षात ठेवायचं!!’’
आबा दोन्ही पोरांना हात दाखवत, टाटा करत निघून गेले..!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com