वाचनाचा तास! (शोभा बोंद्रे)

shobha bondre
shobha bondre

घरकाम करणारी ती बाई जिथं काम करत होती तिथल्या घरी तिनं मे महिन्याच्या सुटीत एक वेगळीच मागणी केली. ‘स्वतःच्या मुलांसाठी
वाचायला काही पुस्तकं द्या’ ही ती मागणी. आपल्या मुलांना वळण लावण्याविषयी जागरूक असणाऱ्या त्या आईच्या मागणीमुळं वस्तीत मोफत वाचनालय सुरू करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली आणि निरनिराळे भले-बुरे अनुभव घेत ‘वाचनाचा तास’ या अनोख्या प्रयोगावर स्थिरावली. आजच्या (ता. आठ सप्टेंबर) ‘जागतिक साक्षरता दिना’निमित्त या वेगळ्या प्रयोगाविषयी...

अभिजात मराठी शाळेतला आठवीचा वर्ग. आमचा वाचनाचा तास सुरू झाला. नेहमीच्या गोष्टींच्या पुस्तकांमध्ये एक जाडजूड नवीन पुस्तक. ‘शेरलॉक होम्स’. मराठीत अनुवादित समग्र कथासंग्रह. एक मुलगी कुतूहलानं ते पुस्तक चाळायला लागली.
‘‘शेरलॉक होम्स? म्हणजे काय, मॅडम? मला वाचता येईल का?’’
‘‘हो. जरूर वाच. खूप छान पुस्तक आहे.’’
तिच्या मनातलं प्रश्नचिन्ह अजून दूर झालं नव्हतं. म्हणून मग मी तिला माहिती पुरवली.
‘‘शेरलॉक होम्स हा आहे गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढणारा एक अत्यंत हुशार, कल्पक असा डिटेक्टिव्ह. सर आर्थर कॉनन डॉयल
या प्रतिभावंत ब्रिटिश लेखकानं शेरलॉक होम्सच्या गोष्टी इतक्या बहारदार रीतीनं लिहिल्या आहेत की आज सुमारे सव्वाशे वर्षांनंतरही शेरलॉक होम्स वाचकांना भुरळ पाडतो आहे.’’
त्या मुलीनं पुस्तक उचललं आणि उत्साहानं वाचायला लागली. पुढचे तीन-चार महिने दर आठवड्यात वाचनाच्या तासाला ती शेरलॉक होम्सच्या गोष्टींचं तेच पुस्तक मागून घ्यायची. काहीतरी वेगळं, चांगलं वाचणारी मुलगी म्हणून मला तिचं कौतुक वाटत होतंच; पण विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे, वर्षाच्या शेवटी आम्ही जेव्हा निबंधस्पर्धा घेतली तेव्हा तिनं याच पुस्तकावर निबंध लिहिला. शेरलॉक होम्स या व्यक्तिमत्त्वाचे सर्व कोने-कंगोरे, गुन्हेगार शोधण्याचं त्याचं
अजब-गजब तंत्र, लेखकाची लेखनशैली असे सर्व मुद्दे तिनं मांडले होते. शेवटी, लेखकाला ही व्यक्तिरेखा सुचली कशी हा रहस्यभेदही तिनं केला आणि पुस्तकाच्या अखेरपर्यंत जात शेवटच्या पानावरची लेखकाची माहितीही आपण बारकाईनं वाचली आहे हे तिनं सिद्ध केलं. निबंधस्पर्धेत तिला पहिलं बक्षीस मिळालं हे वेगळं सांगायला नकोच.
***

आणखी एका मराठी शाळेतला आमचा अवांतर वाचनाचा वर्ग. दृश्य नेहमीचंच. बहुतेक मुलं आपापल्या आवडीचं पुस्तक घेऊन वाचतायत, तर काही मुलं मात्र टिंगल-टवाळी करण्यात आणि
हसण्या-खिदळण्यात मग्न. त्यांच्यामुळे वाचणाऱ्या मुलांचंही लक्ष उडतंय. मी त्या गडबड करणाऱ्या मुलांजवळ गेले. सहज गप्पा मारल्यासारखी त्यांच्याशी बोलायला लागले.
‘‘काय वाचताय तुम्ही? तुम्ही घेतलेली पुस्तकं तुम्हाला आवडतायत का?’’ संदीप नावाच्या एका मुलानं मान हलवून स्वच्छ नकार देत सांगितलं : ‘‘मॅडम, आम्हाला गोष्टींची पुस्तकं वाचायला आवडत नाहीत.’’
‘‘बरं, मग तुला कुठली पुस्तकं वाचायला आवडतील?’’ हा प्रश्न त्याला अपेक्षित नव्हता. क्षणभर तो गप्प राहिला आणि मग म्हणाला : ‘‘मला शिवाजीमहाराजांच्या गड-किल्ल्यांची माहिती असलेलं पुस्तक हवं आहे.’’
मी म्हणाले : ‘‘पुढच्या वेळी मी असं पुस्तक नक्की घेऊन येईन; पण त्याआधी आज तू शिवाजीमहाराजांच्या गोष्टींचं पुस्तक तर वाच. त्यातून तुला बरीच माहिती मिळेल आणि प्रत्येक गडाची गोष्टही समजेल.’’
गडबड करणाऱ्या त्या कंपूसमोर मी शिवाजीमहाराजांच्या गोष्टींचं एक चित्रमय पुस्तक ठेवलं. त्या मुलांनी पुस्तक उघडलं आणि वाचण्याचा प्रयत्न केला. हवं होतं ते पुस्तक मला माझ्या मुलीच्या घरीच सापडलं.
‘महाराष्ट्र देशा’ हे उद्धव ठाकरे यांनी एरिअल फोटोग्राफी करून टिपलेली शिवाजीमहाराजांच्या गड-किल्ल्यांची उत्कृष्ट छायाचित्रं आणि सोबतच्या पानावर त्या त्या किल्ल्याची माहिती हे ते पुस्तक.
पुढच्या आठवड्यात वाचनाच्या तासाला मी हे जाडजूड पुस्तक घेऊन गेले.
‘‘संदीप, हे बघ, तुला हवं असलेलं पुस्तक,’’ असं म्हणत मी हात पुढं केला. एरवी गडबड करणाऱ्या त्या पोरांचं टोळकं आधी अवाक् झालं आणि मग मात्र आनंदानं त्यांचे डोळे लकाकले.
‘‘वाचा रे’’ असं मी म्हणायच्या आतच मुलांनी पुस्तकाचा कब्जा घेतला आणि एकत्र डोकी खुपसून सगळेजण पुस्तकात बुडून गेले. त्यानंतर वर्षभर त्या पुस्तकाला इतकी मागणी, की पुस्तकाचं कपाट उघडल्यावर मुलांची पहिली उडी त्या पुस्तकावर पडायची आणि या बाकावरून त्या बाकावर असा त्या पुस्तकाचा प्रवास सुरू राहायचा.
***

‘वस्ती तिथं वाचनालय’ या आमच्या उपक्रमामुळे गेल्या सात वर्षांत पुणे आणि परिसरातल्या शेकडो मुलांना अवांतर वाचनाचा आनंद मिळाला. आम्ही त्यांना हा आनंद देऊ शकलो, त्यांना वाचनाची गोडी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि ‘पुस्तक’ या ‘बेस्ट फ्रेंड’ची मुलांना ओळख करून दिली याचं आम्हा सर्वांना समाधान आहे.
आम्ही सर्व म्हणजे ‘अक्षर सरिता फाउंडेशन’चा परिवार. आम्ही आहोत वेगवेगळे व्यावसायिक किंवा आपापल्या व्यवसायातून निवृत्त झालेले ५० ते ७५ या वयोगटातले २५-३० वाचनप्रेमी. आमचं ध्येयवाक्य आहे ‘वस्ती तिथं वाचनालय’ आणि उद्देश आहे
‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या वस्तीतल्या मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देणं, त्यांना वाचनाची गोडी लावणं.’
या उपक्रमाची कल्पना रुजली ती एका छोट्याशा प्रसंगातून. माझ्या घरी काम करणाऱ्या बाईनं एका उन्हाळ्याच्या सुटीत एक अनपेक्षित मागणी केली : ‘ताई, पोरांना वाचायला थोडी गोष्टींची पुस्तकं द्येता का?’ मी काही बोलायच्या आत ती घाईघाईनं म्हणाली :‘‘सुटीत दंगा करून निसता उच्छाद मांडत्यात वं. नाह्यतर मंग उन्हात भाईर फिरत ऱ्हात्यात. त्यान्ला पुस्तकं दिली तं येळ तरी चांगला जाईल आन् चार चांगल्या गोष्टी बी समजत्याल.’’
एका अशिक्षित आई पोरांसाठी किती चांगला विचार करत होती...
मी उत्साहानं उठले आणि माझ्या नातींच्या संग्रहातली आठ-दहा छान मराठी पुस्तकं शोधून तिला दिली आणि तिला म्हणाले :‘‘पोरांना म्हणावं, लवकर लवकर वाचा. आवडली का सांगा आणि नंतरही नवीन पुस्तकं घेऊन जा.’’
बाई पुस्तकं घेऊन गेली; पण दोन-तीन आठवडे झाले तरी पुस्तकांबद्दल काही कळलं नाही आणि पुस्तकं परतही आली नाहीत. शेवटी मीच न राहवून विचारलं : ‘‘अगं, मुलांना पुस्तकं आवडली का? त्यांनी वाचली का?’’
‘‘तर वं? निसता सपाटा लावलाया वाचायचा. ह्ये मला, त्ये तुला म्हून भांडलीबी.’’
‘‘मग वाचून झाली असतील तर ती परत आण आणि दुसरी घेऊन जा,’’ तिनं मान हलवली आणि म्हणाली : ‘‘आवो ताई, काय झालं,
बगा. शेजारणीची सून हाय धाव्वी पास आन् एका मुलाचा भाऊ हाय नोकरीवाला. त्या दोघांनी पुस्तकं मागून नेली हायेत वाचाया.
‘लवकर वाचा’ म्हून माझी पोरं बी त्येंच्या मागं लागली हायेत. त्येंनी वाचली की येते घिऊन. काय?’’
मी मान डोलावली. पुस्तकांची ही देवाण-घेवाण सुटी संपेपर्यंत सुरू राहिली.
मी विचार करायला लागले...‘वस्तीतल्या या मुलांच्या हातात पुस्तकं मिळाली तर ती वाचतात. इतकंच नाही तर, त्यांच्या आसपासचा नवशिक्षित वर्गही विनासायास समोर आलेल्या पुस्तकांचा आनंद घेतो. तर मग त्यांना पुस्तकं मिळवून देण्यासाठी आपण काय करू शकू?’
उत्तर सोपं होतं...वस्तीतल्या मुला-माणसांसाठी मोफत वाचनालय चालवायचं.
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या अगदी प्राथमिक गरजा झाल्या; पण त्याचबरोबर माणसाला आणखी एका गोष्टीची नितांत गरज असते व ती म्हणजे बुद्धीला चालना देण्याची. म्हणून तर तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे. शाळेत शिक्षण मिळतं. अगदी गरिबातल्या गरीब मुलासाठीही आपल्या देशात ही सोय आहे; पण अवांतर वाचनामुळे मनोरंजनाबरोबर ज्ञानही मिळतं.
***

माझी वाचनप्रेमी मैत्रीण विजया जोशी हिच्याशी मी बोलले. आमचा विचार पक्का झाला आणि आम्ही ठरवलं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या वस्तीत तिथल्या मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू करायचंच. आम्ही वस्तीही शोधली. पुण्यात कोथरूडमध्ये हॅपी कॉलनीजवळची गोसावी वस्ती. उज्ज्वल केसकर यांनी त्यांच्या कार्यालयाची जागा वाचनालयासाठी वापरण्याची परवानगी दिली. आता कपाटाची आणि पुस्तकांची सोय. माझ्या जावयानं त्याच्या
ऑफिसमधलं एक कपाट आम्हाला दिलं. आमच्या घरातली आणि इतर काही वाचनप्रेमी मित्र-मैत्रिणींनी दिलेली सुमारे १५० पुस्तकं सहज गोळा झाली. शिवाय, नवीन पुस्तकांसाठी पाच हजार रुपयेही जमले. आम्ही खूश. आता पुस्तकं विकत घेण्यासाठी जाणार, त्याच दिवशी माझ्या मुलीनं निरोप दिला : ‘आमचे एक मित्र दिलीप मोहिते तुम्हाला नवीन पुस्तकं देणार आहेत.’
मी दिलीपशी बोलले तेव्हा तो म्हणाला : ‘‘अत्रे सभागृहात पुस्तकांचं प्रदर्शन सध्या सुरू आहे. तिथून आजच पुस्तकं घेऊ या.’’
अत्रे सभागृहात मी आणि विजया पोचलो. दिलीपही आला. आम्ही पुस्तकं पाहत होतो. ‘एका पुस्तकावर दोन पुस्तकं मोफत’ अशी एक योजना तिथं होती.
‘‘या यादीतली काही पुस्तकं घेऊ या,’’ असं मी आणि विजया ठरवत असताना दिलीप ती यादी बारकाईनं पाहत होता. आम्ही त्याला आमची निवड सांगितली तर तो म्हणाला : ‘‘यादीतली सर्वच पुस्तकं घेऊ या.’’ मी थक्क झाले. कारण, यादीत विकत घेण्यासाठी २६८ पुस्तकांची नावं होती. त्या प्रत्येकाची किंमत खूप मोठी होती. मात्र, ती सर्व पुस्तकं घेतली असती तर त्यावर ५३६ पुस्तकं मोफत मिळाली असती. आमच्या कल्पनेपेक्षा फारच मोठी उडी होती ही. मी संकोचानं नकार द्यायला मान हलवत होते तर दिलीप ठामपणे म्हणाला :‘‘शोभाताई, वाचनालय सुरू करायचं तर त्यासाठी सर्व प्रकारची पुस्तकं घ्यायला हवीत. कथा-कादंबऱ्या हव्यात, तसंच कवितासंग्रह, चरित्र आणि सामान्यज्ञानाची पुस्तकंही हवीत. इतकंच नाही तर, व्यायामाची-खेळांची आणि स्वयंपाकाची पुस्तकही हवीत. या यादीत अशी सर्व पुस्तकं आहेत. मग काय करू या?’’
यावर मी ‘हो’ म्हणेपर्यंत त्यानं क्रेडिट कार्डनं सर्व पैसे भरूनही टाकले आणि त्यानं आमचा निरोप घेतला.
***

सन २०११ मध्ये गोसावी वस्तीत आमचं पहिलं मोफत वाचनालय सुरू झालं. सुरवातीला पोरं जरा बिचकत यायची. दारातून हळूच आत डोकावून पाहायची. त्यांना दिसायचा टेबलावरचा गोष्टींच्या पुस्तकांचा रंगीबेरंगी ढीग. त्यांचे डोळे चमकायचे. आम्ही नुसतं ‘या रे’ म्हणायचा अवकाश की पोरं आत घुसून मोठ्या लगबगीनं पुस्तकं चाळायला लागायची आणि मग आपापलं आवडीचं पुस्तक घेऊन जायची. वर्ष संपेपर्यंत आमच्या बालसभासदांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाली. आता माझी मुलगी शलाका आणि आणखी काही वाचनप्रेमी मैत्रिणी आमच्या कामाला हातभार लावायला लागल्या. आम्ही उत्साहानं आणखी एक वाचनालय सुरू केलं. अनाथ मुलींसाठी आणि बायकांसाठी चालवलेल्या एका वसतिगृहात आम्ही पुस्तकं घेऊन जायला लागलो. तिथंही प्रतिसाद खूप चांगला मिळाला. शंभरहून अधिक मुली आणि बायका ठरलेल्या दिवशी मोठ्या संख्येनं जमू लागल्या. आवडीनं पुस्तकं वाचू लागल्या आणि हक्कानं नवनवीन पुस्तकं मागूही लागल्या.

सर्व छान चाललं होतं. मात्र, दोन वर्षं झाल्यावर आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा आमच्या नोंदवहीतल्या आकड्यांमुळे आम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. दोन वर्षांत आमच्या वाचकांनी पुस्तकं भरपूर वाचली होती; पण त्याचबरोबर मोठ्या संख्येनं पुस्तकं गहाळही झाली होती. ही गोष्ट आम्हाला नक्कीच परवडणारी नव्हती. एव्हाना, ‘अक्षर सरिता फाऊंडेशन’ ही आमची सेवाभावी संस्था स्थापन झाली होती आणि आम्ही १०-१२ मंडळी संस्थेचा सर्व कारभार चोखरीत्या चालवत होतो. संधी मिळाली तर वस्त्यांमधली मुलं-मुली अगदी मन लावून पुस्तकं वाचतात हेही सत्य होतं; पण त्याच बरोबर पुस्तकं हरवणं, फाटणं आणि चोरीला जाणं हे गैरप्रकार घडतात हेही सत्य होतं. यावर उपाय शोधण्यासाठी आम्ही एक बैठक घेतली आणि बराच ऊहापोह करून एक अत्यंत गुणकारी, नामी कल्पना सत्यात उतरवायची असं ठरवलं. ती कल्पना म्हणजे ‘वाचनाचा तास!’ वस्त्यांमधली मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये वाचनाचा तास घ्यायचा. चित्रकला, शारीरिक शिक्षण, गायन या व्यक्तिमत्त्वविकास साधणाऱ्या इतर तासांसारखाच दर आठवड्याला हा ‘वाचनाचा तास’!
***

आता आम्ही वेगवेगळ्या मराठी शाळा आणि पुणे महानगरपालिकेच्या शाळा अशी यादी तयार केली आणि त्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली.
‘आम्ही पुस्तकं आणू, ती ठेवायला कपाट आणू आणि वाचनाचा तासही आम्हीच घेऊ. तुम्ही तुमच्या वेळापत्रकात आमच्यासाठी एक तास राखून ठेवावा,’ असं त्यांना सुचवलं.
सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्साहानं ही नवी कल्पना उचलून धरली आणि आम्हाला सहकार्य केलं.
अभिजात माध्यमिक शाळा, दीनदयाळ मराठी आणि इंग्लिश शाळा, जगताप शाळा, खडकवाडीची नेर्लेकर शाळा अशा अनेक शाळांमधून आमचा ‘वाचनाचा तास’ सुरू झाला. इथंही वस्तीतलीच मुलं
मराठी-इंग्लिश गोष्टींची पुस्तकं वाचत होती; पण शाळेच्या वर्गात बसून वाचताना नकळतच त्या वाचण्याला एक शिस्त यायची. पुस्तकं नीट हाताळली जायची, पुस्तकं हरवायचा प्रश्न नसायचा, मस्ती-गडबड न करता वाचनाचा आनंद घेतला जायचा.
***

‘आमची युक्ती सफल झाली, आमच्या प्रयत्नांना यश आलं,’ हे आज सात वर्षांनंतर आम्ही अभिमानानं सांगू शकतो.
मुख्य म्हणजे, हे कुणा एकाचं यश नव्हे. हा एक सांघिक उपक्रम आहे. त्याअंतर्गत आज सन २०१९ मध्ये आम्ही पुणे आणि परीसरातल्या काही शाळा आणि स्वरूपवर्धिनी संस्थेच्या काही शाखा इथं एकूण १६ वाचनवर्ग घेतो. दर आठवड्याला आम्ही ८०० हून अधिक मुलांना पुस्तकं वाचायला देतो.
पुस्तकं देताना आम्ही त्यांच्यासोबत कविता म्हणतो, गोष्टी सांगतो आणि दर वर्षी एक निबंधस्पर्धा घेतो. मुलांना ‘वाचनाच्या तासा’नं काय दिलं आणि आपला प्रयत्न किती यशस्वी ठरला ते या निबंधांमधून आम्हाला कळतं.
आमचं स्वप्नं एका टप्प्यापर्यंत पूर्ण झालं आहे; पण आमच्या ५० हातांबरोबरच वाचनप्रेमी मंडळींचे आणखी हात येऊन मिळाले तर भविष्यात अधिकाधिक नवे वाचक आम्ही घडवू एवढं नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com