किम यांचं गूढ (श्रीराम पवार)

shriram pawar
shriram pawar

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेले किमान तीन आठवडे तरी ते त्यांच्या देशात कुणाला दिसलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीविषयीच्या उलटसुलट बातम्या हे या वेळच्या चर्चेचं कारण आहे.
सध्या सगळ्या जगात कोरोनाचं थैमान सुरू असताना आणि बातम्यांमध्येही कोरोना हाच विषय मध्यवर्ती असताना किम यांच्या बातम्यांनीही त्यात ठळक जागा मिळवली आहे. मात्र, यात नवल काहीच नाही. कारण, हुकूमशाही पद्धतीनं कारभार पाहणाऱ्या या देशाचं उपद्रवमूल्यच असं आहे की सगळ्या जगाला त्याची दखल घेणं भागच पडतं.

सगळी दुनिया कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आणि बातम्यांचं विश्व याच एका विषयाभोवती फिरत असताना उत्तर कोरियातील घडामोडी लक्ष वेधणाऱ्या होत्या. शेजारच्या चीनमध्ये नवकोरोनाचा जन्म झाला, तिथून तो जगात पसरला. चीनसह बहुतेक शेजारीदेशांना कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचा फटका बसलाच आहे. मात्र, उत्तर कोरियात नेमका याचा परिणाम किती हे समजू शकलं नाही. तसं ते समजणारच नाही याची कडेकोट व्यवस्था या देशानं केली आहे. कायमच एका पोलादी पडद्याआड आणि गूढतेच्या वलयात उत्तर कोरियातील व्यवहार जगापासून दूर असतात. अशा देशावर संपूर्ण पकड असलेले त्या देशाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून अनेक अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. सतत भांडण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या, त्यातही अण्वस्त्रसंपन्न असलेल्या, देशात सर्वंकष सत्ताधीशांविषयी असं काही बोललं जाऊ लागलं की अनेक शक्‍यतांचा जन्म होतो. तसा तो उत्तर कोरियाच्या बाबतीत होतो आहे.

किम खरंच अस्ताला निघाले असतील तर ‘पुढं कोण?’ हा त्यातला लाखमोलाचा सवाल. ‘पुढं कोण’ यावर या देशाचं आणि त्या भागातील शांततेचंही भवितव्य अवलंबून आहे. कोरोनाशी जग लढत असतानाही जगात काही भाग लष्करीदृष्ट्या अतिसंवेदनशील बनताना दिसत आहेत. त्यात दक्षिण चीन समुद्र, इराणलगतचा समुद्र आणि उत्तर कोरियाचा समावेश होतो. अशा हॉटस्पॉटकडं जगाचं लक्ष वेधलं जाणं स्वाभाविकच.
‘किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे,’ इथपासून ते ‘त्यांच्या बहिणीनं उत्तराधिकारी म्हणून सूत्रंही हाती घेतील आहेत’ इथपर्यंतच्या बातम्या जगाला घोर लावणाऱ्या ठरू शकतात.
***

उत्तर कोरियात जिथं तिथं अस्तित्व दाखवणारे किम जोंग उन हे किमान तीन आठवडे देशात कुणालाच दिसलेले नाहीत. त्यांचं सार्वजनिक वावरणं थांबलं. अगदी त्यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे पहिले हुकूमशहा किम इल संग यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमातही किम यांचं दर्शन झालं नाही. सन २०११ मध्ये किम यांनी सत्ता हाती घेतली तेव्हापासून ता. १५ एप्रिलच्या या कार्यक्रमात किम नाहीत असं पहिल्यांदाच घडलं. या दिवशी गेली अनेक वर्षं नव्या क्षेपणास्त्रांचं लाँचिंग हा उत्तर कोरियाचा परिपाठ बनला आहे. ते होत असताना, किम हसत पाहत आहेत, हे उत्तर कोरियातील सरकारनियंत्रित माध्यमांचं ठरलेलं छायाचित्रही नेहमीचंच. यंदा क्षेपणास्त्रं झेपावली; पण किम त्यात कुठंच दिसत नव्हते. यातून त्यांच्या प्रकृतीविषयीच्या चर्चांना उधाण आलं. या देशाचं वैशिष्ट्य असं की अशा बाबतीत नेमकी माहिती कुणीच सांगत नाही.

यासंदर्भात अमेरिका, तिचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरिया हा देश हे काही प्रमाणात माहिती मिळवू शकतात असं मानलं जातं. दक्षिण कोरियानं ‘किम जिवंत आहेत आणि प्रकृतीही सुधारते आहे’ असं सांगितलं आहे, तर ट्रम्प यांनी ‘मला किम यांच्याविषयी नेमकी माहिती आहे,’ असं सांगून गूढ वाढवण्यावरच भर दिला. उत्तर कोरियात किमघराण्याविषयी कोणतीही माहिती सहजासहजी बाहेर पडत नाही. काय माहिती द्यावी आणि कशा पद्धतीनं द्यावी यावर किम आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा पूर्ण प्रभाव असतो. किम यांचे वडीलही तिथले हुकूमशहाच होते.

त्यांचं निधन झाल्याचं जगाला ज्या दिवशी समजलं त्याच्या आधीच दोन दिवस ते झालं होतं. मात्र, उत्तराधिकाऱ्याची व्यवस्था लावून आणि किम यांनी सर्वंकष सूत्रं हाती घेतल्यानंतरच हे जगाला समजेल अशी कडेकोट व्यवस्था केली गेली होती.
उत्तर कोरिया गूढतेचं वलय नेहमीच कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आला आहे. आतापर्यंत या देशाच्या प्रमुखपदी किम यांच्या घराण्यातीलच तीन पिढ्यांचे प्रतिनिधी राहिले आहेत. देशांचं प्रतिनिधी-मंडळ, पॉलिट ब्यूरो वगैरे रचना तिथं असल्या तरी त्यांचं अस्तिव आणि भूमिका सर्वोच्च नेत्याच्या निर्णयाला ‘मम’ म्हणणं एवढ्यापुरतीच असते. किम आणि त्यांची भावंडं स्वित्झर्लंडमध्ये शिकल्याचं सांगितलं जातं. तिथं त्यांची ओळख लपवून ठेवण्यात आली होती. ‘उत्तर कोरियन मुत्सद्द्यांची मुलं’ म्हणून त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. किमघराणं अत्यंत असुरक्षित वातावरणात वाटचाल करत आलं आहे. कुणावरही विश्वास न ठेवणं हे त्या घराण्याचं वैशिष्ट्य. याचा एक भाग म्हणून उत्तर कोरियाच्या नेत्याचा कोणताही माग शिल्लक राहू नये याचा खास प्रयत्न केला जातो. ट्रम्प आणि किम यांची गाजलेली भेट झाली तेव्हा किम यांच्या सिगारेटची राखही परदेशात उरणार नाही याची काळजी घेण्यात आली होती असं सांगितलं जातं. किम यांच्यानंतर त्यांच्या ज्या बहिणीकडं सूत्रं जातील असा अंदाज बांधला जातो तिनंच ही व्यवस्था केली होती. या अतिकाळजीचं कारण असुरक्षिततेची भावना आणि जगाविषयीची भीती हेच आहे. ‘पाश्‍चात्य देश; खासकरून अमेरिका, आपली सद्दी संपवेल’ अशी चिंता किमघराण्याला कायमच वाटत आली आहे. अधूनमधून क्षेपणास्त्रं डागत जल्लोष करण्याचा उत्तर कोरियाचा रिवाज याच भयगंडातून आलेला आहे. या देशाची आक्रमकता, काहीही करून अण्वस्त्रं मिळवायलाच हवीत यासाठीचा आटापिटा हे सारं काही किमघराण्याच्या असुरक्षिततेपोटीच. म्हणूनच आताही किम तीन आठवडे कुणाला दिसले नाहीत तर स्पष्टपणे त्याविषयी काहीही सांगण्यापेक्षा गूढच कायम ठेवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे सांगोवांगीची माहिती आणि यापूर्वीच्या अनुभवांवर आधारित अटकळबाजी हाच या देशाविषयी काही समजून घेण्याचा आधार बनतो. किम यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरू झाल्यानंतरही हेच घडतं आहे. उत्तर कोरियाच्या सत्ताधीशाला नेमकं झालंय काय हे कुणालाच ठामपणे सांगता येत नाही. हृदयविकारानं ग्रासल्यापासून ते घोड्यावरून पडल्यापर्यंतच्या विविध कहाण्या त्यांच्याविषयी पसरल्या. या कहाण्यांचा सूर ‘किम यांचं काही खरं नाही,’ असाच होता, म्हणूनच मग ‘किम यांच्यानंतर कोण’ याविषयी अंदाज बांधणं सुरू झालं. ट्रम्प आणि किम यांच्यात संवाद सुरू झाल्यानंतर कोरियन द्वीपकल्पातील तणाव काहीसा हलका झाला असला तरी उत्तर कोरियानं आपला अण्वस्त्रकार्यक्रम सोडलेला नाही. या देशाकडं अण्वस्त्रं आहेत यावर तज्ज्ञांत सहमती आहे. ती किती आणि कितपत क्षमतेची आहेत यावर निरनिराळी मतं आहेत. मात्र, जगाला उघड धमक्‍या देणाऱ्या देशाकडं अण्वस्त्रं असणं हेच धोक्‍याकडं निर्देश करणारं आहे, म्हणूनच गेली काही दशकं एका बाजूला उत्तर कोरियाला अण्वस्त्रांच्या हव्यासातून बाजूला होण्यासाठी जग समजावण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडं या देशाची संपूर्ण कोंडी करून त्याला गुडघे टेकायला लावण्याची रणनीतीही अवंलबली जात आहे. मात्र, देशावर असलेलं संपूर्ण वर्चस्व किम यांच्या साथीला नेहमीच आलं आणि अत्यंत विदारक स्थितीतही देश या घराण्याच्याच कब्जात राहिला आहे. यामुळेच किमघराण्यातील सत्ताधीशाला हटवणं पाश्चात्यांना जमलं नाही. अण्वस्त्रं सोडायची किम यांची किंवा उत्तर कोरियाची तयारी नाही आणि युद्धानं तसं करायला भाग पाडणं परवडणारं नाही अशा पेचात कोरियन प्रश्‍न अडकला आहे. ही स्थिती कायम असताना किम यांच्या प्रकृतीला काही गंभीर होणं आणि निर्णयप्रक्रियेतून किम बाहेर पडण्याचे परिणाम आतापर्यंतच्या वाटचालीत नवं वळण आणू शकतात, म्हणूनच किम यांच्या प्रकृतीविषयी आणि ते जिवंत आहेत की नाहीत याविषयी जगाला उत्कंठा आहे. शेजारच्या दक्षिण कोरियानं मधल्या काळात प्रचंड प्रगती केली आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत या देशानं लक्षणीय स्थान मिळवलं आहे. तरीही जगाच्या लेखी दक्षिण कोरियापेक्षा उत्तर कोरियातील हालचाली अधिक लक्ष वेधणाऱ्या असतात. याचं कारण या देशाच्या हुकूमशाही-राजवटीचं उपद्रवमूल्य. किम यांनी आजोबा आणि वडिलांप्रमाणेच हा धागा कायम ठेवला आहे.

‘किम यांच्यानंतर कोण’ या प्रश्‍नाचं उत्तर म्हणून त्यांची बहीण किम यो जोंग आणि काका किम प्याँग इल यांची नावं घेतली जात आहेत. यातील किम यो जोंग हिचा उत्तर कोरियातील सत्तेच्या वर्तुळातील वावर आणि प्रभाव स्पष्ट आहे. भावाला मदत करताना ती सतत दिसते. तिथल्या पॉलिट ब्यूरोची ती सदस्य आहे. किमघराण्यातील इतरांप्रमाणेच ती धूर्त आणि क्रूर वागू शकते असं सांगितलं जातं. किम हे सध्या उद्भवलेल्या चित्रातून बाहेर असताना तीच प्रत्यक्ष कामकाज पाहत असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, दुसरीकडं या देशात कधीच कुणी महिला महत्त्वाच्या सत्तापदावर आलेली नाही, तेव्हा पुरुष वर्चस्ववादी समाज आणि सत्तारचनेत २७ वर्षांच्या किम यो जोंग हिला स्थान मिळेल काय यावर अनेक निरीक्षक साशंक आहेत. मात्र, किम यांचं खरंच बरं-वाईट झालं तर सध्याच्या सत्तारचनेत बहुतेक सारेजण तिच्या पाठीशी राहतील अशीही अटकळ बांधली जाते. यातले दुसरे स्पर्धक आहेत ते किम यांचे काका. किम यांचे वडील सत्ताधीश झाले तेव्हाच या काकांना मुत्सद्देगिरीतील काही ना काही पदं देऊन सतत देशाबाहेर ठेवलं गेलं होतं. जवळपास ४० वर्षांनंतर अलीकडेच ते पुन्हा उत्तर कोरियात परतले आहेत. ‘जगभर फिरलेला अनुभवी प्रशासक’ म्हणून त्यांनाही संधी असू शकते. अर्थात्, मुळात अशी संधी तयार झाली तर! याचं कारण, किमघराण्यातील प्रत्येक जण कधी ना कधी अचानक लोकांसमोरून गायब झाला आणि पुन्हा परतला असं झालं आहे. सध्याचे किमही सन २०१४ मध्ये काही काळ अचानक गायब झाले होते. नंतर काही घडलंच नाही अशा रीतीनं ते कारभार पाहायला लागले. तेेव्हा किम परतण्यात फार आश्‍चर्याचं काही नसेल. मुद्दा या एवढ्याशा देशातील सत्तेच्या घडामोडींवर जगात इतकी चर्चा कशासाठी? ज्या देशाचं आर्थिक बळ नगण्य आहे, मोठ्या प्रमाणात जिथली जनता भुकेकंगाल आहे, ज्याचा भूप्रदेशही फार तर आपल्या बिहारइतकाच आहे अशा या देशाचं बलस्थान आहे ते त्याच्या उपद्रवमूल्यात! किम यांचं घराणं हे राजेशाही वारसा नसलेलं तरीही जगातील सर्वाधिक काळ सत्तेत असलेलं हुकूमशाही-घराणं आहे. या घराण्यानं अण्वस्त्रसज्जता ही आपली ‘इन्शुरन्स पॉलिसी’ बनवली आहे. किम यांनी अण्वस्त्रं बनवण्यात आणि ती डागू शकणारी क्षेपणास्त्रं विकसित करण्यात यश मिळवलं, ज्याचा घोर जगाला आहे. बाकी, साऱ्या क्षेत्रांत ठणठणाट असला तरी आधी सोव्हिएत व नंतर चिनी क्षेपणास्त्रांवर प्रयोग करत उत्तर कोरियानं क्षेपणास्त्रविकासात चांगलंच यश मिळवलं आहे. सारे जागतिक नियम धाब्यावर बसवून त्यांची तस्करी, विक्री या देशानं केली आहे. पाकिस्तानला अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रं देण्यात उत्तर कोरियानंच मदत केल्याचं सांगितलं जातं. बदनाम अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादर खान यांनी ती उत्तर कोरियातून तांदळाच्या बदल्यात मिळवल्याचं सांगितलं जातं. मात्र, तांदळाशिवाय पाकनं अणुतंत्रज्ञानातही उत्तर कोरियाला मदत केली असावी असा संशय आहे. उत्तर कोरियासाठी अण्वस्त्रं आणि ती डागण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रं हे जगाला भीती दाखवण्याचं हत्यार आहे. जगातील सगळे हुकूमशहा अण्वस्त्रं मिळवायचा प्रयत्न करतात ते त्यांची सत्ता पाश्‍चात्य देश बळानं उलथवून टाकू नयेत यासाठी. सद्दाम असो की गडाफी, त्यांची सत्ता उलथवता येऊ शकली. हे उत्तर कोरियाच्या बाबतीत मात्र अण्वस्त्रांमुळं आता आणखी कठीण बनलं आहे आणि या देशातील कुणाही सत्ताधीशानं शेजारच्या दक्षिण कोरियाच्या विरोधात किंवा जपानच्या विरोधातही वेडं धाडस करायचा प्रयत्न केला तर कदाचित हा देश आणि तिथले सत्ताधीश शिल्लकच राहणार नाहीत. मात्र, तेव्हा जग एका भयंकराला सामोरं जाईल, म्हणूनच किम जोंग उन असले किंवा नसले तरी जगासाठी उत्तर कोरियातल्या घडामोडी लाखमोलाच्या असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com