थकलेल्यांचं अवेळी चिंतन (श्रीराम पवार)

श्रीराम पवार shriram.pawar@esakal.com
Sunday, 13 October 2019

ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले, दमलेले आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड यंत्रणेमुळं गोंधळलेले काय आणि कसा पर्याय देणार असाच मुद्दा तयार होतो. मग उरते ती आपापल्या भागातलं वर्चस्व टिकवायची, सुभेदारीचा उरलासुरला चतकोर वाचवायची लढाई.

ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले, दमलेले आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड यंत्रणेमुळं गोंधळलेले काय आणि कसा पर्याय देणार असाच मुद्दा तयार होतो. मग उरते ती आपापल्या भागातलं वर्चस्व टिकवायची, सुभेदारीचा उरलासुरला चतकोर वाचवायची लढाई. मात्र, ज्या पक्षानं देशाच्या कानाकोपऱ्यात नुसती सत्ताच मिळवली नाही, तर भारताच्या एका विशिष्ट दिशेनं वाटचालीची पायभरणी केली तो पक्ष कुंठित अवस्थेत जातो आहे, ही दमलेल्या पक्षाची (की नेतृत्वाची) कहाणीच सत्ताधाऱ्यांच्या कोण अडवतो तेच पाहतो या आत्मविश्‍वासाचं कारण बनत आहे.

सत्तेची कमान चढती असेल, तर सगळ्या चुका झाकल्या जातात- किंबहुना चुकांनाही व्यूहनीतीची झालर लावता येते. त्यावर टाळ्याही मिळवता येतात आणि कौतुकाचे इमलेही उभे केले जाऊ शकतात. याचं कारण राजकारणात यशासारखं दुसरं काहीच नसतं. अपयशाला तसाही बाप नसतोच. मग आत्मचिंतनाच्या अवेळी गप्पा सुरू होतात. खरंतर ज्यांना काहीच करायचं नसतं, करायची इच्छाही नसते असेच ही पळवाट शोधायला लागतात. कॉंग्रेसमध्ये सध्या हे घडतं आहे. चिंतन करायलाही हरकत नाही, ते गरजेचं असतं; पण त्याचीही वेळ असते. दोन महत्त्वाच्या राज्यांत निवडणुका असताना आठवलेली चिंतनवेळ आणि थकल्याची भावना पक्षातल्या गोंधळाचं निदर्शक आहे. दुसरीकडं सत्ताधारी भाजप ‘विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही’ असं सांगू शकतो. याचंही एक कारण विरोधकांतल्या भोंगळपणातच शोधता येईल. भाजपनं महाराष्ट्र आणि हरियानातल्या निवडणुकांना सामोरं जाताना काय सांगावं याची भ्रांत मिटवताना ‘३७० कलम हटवलं हेच तर यश’ असा सूर लावला आहे, तो बाकी अनेक आघाड्यांवर जी दाणादाण सुरू आहे त्यावर पांघरुण घालण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. तासाभराच्या पावसानं पुण्याची दैना उडते इथपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपर्यंत नाना मुद्द्यांवर काही करण्याबोलण्याऐवजी ३७० च्या भासमान विजयाचे डिंडींम वाजवणं तसंही सोपंच. हे झालं यशाची कमान चढती असलेल्या सत्ताधारी भाजपचं. तर दुसरीकडं लोकसभेनंतर सारा उत्साहच मावळलेल्या कॉंग्रेसला आपण निवडणूक का लढवतो आहोत असाच प्रश्‍न पडलाय की काय, असं वाटण्यासारखी अवस्था आहे. ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले, दमलेले आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड यंत्रणेमुळं गोंधळलेले काय आणि कसा पर्याय देणार असाच मुद्दा तयार होतो. मग उरते ती आपापल्या भागातलं वर्चस्व टिकवायची, सुभेदारीचा उरलासुरला चतकोर वाचवायची लढाई. ती कॉंग्रेसवाले करतीलच. शेवटी तो अस्तित्वाचा प्रश्‍न असतो आणि त्या बळावर जे काही मिळेल त्यावर समाधानही मानतील. मात्र, ज्या पक्षानं देशाच्या कानाकोपऱ्यात नुसती सत्ताच मिळवली नाही, तर भारताच्या एका विशिष्ट दिशेनं वाटचालीची पायभरणी केली तो पक्ष कुंठित अवस्थेत जातो आहे, ही दमलेल्या पक्षाची (की नेतृत्वाची) कहाणीच सत्ताधाऱ्यांच्या कोण अडवतो तेच पाहतो या आत्मविश्‍वासाचं कारण बनत आहे.

कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी असते. मात्र, तशी शक्‍यता कितीही कमी असली, तरी ती पक्ष शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठीची संधी असते. आपलं राजकारण, आपला पर्यायी कार्यक्रम, दिशा लोकांसमोर ठेवण्याची संधी असते. त्यावेळी एकमुखानं पक्षधोरणच लोकापर्यंत जाईल एवढी तरी किमान काळजी पक्षानं घ्यायला हवी. मात्र, महाराष्ट्रात आणि हरियानाच्या निवडणुका ऐन भरात असताना कॉंग्रेसमधल्या भल्याभल्यांची अवस्था गोंधळग्रस्त झाली आहे. निवडणुका अलीकडं रणांगणातल्या लढायासारख्या लढल्या जातात, तेव्हा या काळात आपापल्या कार्यकर्त्यांमध्ये जमेल तितका उत्साह फुंकायचा असतो. मात्र, कॉंग्रेसमध्ये सलमान खुर्शीद, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून सारे निराशाग्रस्त विधानं करताहेत. जे काही चिंतन, मंथन करायचं ते लोकसभा निवडणुकीनंतर करायला खरंतर भरपूर वेळ होता. लोकसभेला दारुण पराभव झाला हे खरंच; मात्र तरीही ११ कोटी मतदारांनी कॉंग्रेसला मतं दिली, याचाच अर्थ नेता, त्याचं कर्तृत्व, वक्तृत्व यापलीकडं विरोधी राजकारणाला साथ देणारे आहेत आणि ते लोकशाहीत कायमच असतात. कॉंग्रेसच्या अव्वल काळात भाजप किंवा अन्य पक्ष सत्तेच्या राजकारणात तोळामासा दिसत होते तरीही ही विरोधातली स्पेस होती, ती लोकशाही व्यवस्थेतली गरज आहे. मुद्दा ती स्पेस व्यापून सत्तेकडं जाणारी वाटचाल करायची कशी असा असतो. मात्र, दोनवेळच्या लोकसभेतल्या पराभवानं कॉंग्रेसमधल्या धुरंधरांची मती कुंठित झाली असावी. पराभवानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं, तेव्हा तिथं नेमावं कुणाला यावर पक्षानं जो घोळ घालून अनाकलनीय कालपव्यय केला, त्यापेक्षा हाच वेळ काय चुकलं आणि काय करावं यावरच्या चिंतनात घालवला असता, तर आता निवडणुकीचं रणमैदान समोर दिसत असताना लढायचं सोडून चिंतनाची आणि दमल्याची भाषा करायची वेळ आली नसती. जोवर सत्तेचं टॉनिक होतं, तोवर कॉंग्रेसमधले परस्परविरोधी सूर दबले होते. कार्यकर्त्यांची प्रचंड फौज असलेला पक्ष ते दरबारी राजकारणात आकंठ बुडालेलं सत्ता मिळवायचं मशीन हे कॉंग्रेसमधलं स्थित्यंतर सत्तेचं कोंदण जाताच पक्षाला गलितगात्र करणारं ठरलं आहे. सत्ता होती तोवर गांधी घराण्यातलं जे कोणी नेतृत्वपदावर असेल ते सांगतील ती पूर्व होती. याचं कारण कोणी ना कोणी गांधी मैदानात उतरला, की मतांच्या झोळ्या भरता येतात, हे सिद्ध झालेलं समीकरण होतं. राजकारणात अशी समीकरणं तयार होतात, तशी ती लयालाही जातात. कॉंग्रेसच्या भराच्या काळात गांधी घराण्याचा करिश्‍मा राजकारणात अनेक दगडांना शेंदूर फासणारा होता. बदलत्या काळात हा करिश्मा लयाला गेला आहे आणि त्या अभावी राजकारण कशावर करायचं यावरचं भांबावलेपण उघड्यावर पडतं आहे.
हा गोंधळ कॉंग्रेसमध्ये आता पुनःपुन्हा दिसायला लागला आहे. देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी मध्यवर्ती स्थानी आल्यानंतर आणि ते ज्या प्रकारे राजकारण स्वतःभोवती फिरत राहील, याची काळजी घेताहेत त्या स्थितीत त्यांच्या निर्णयांवर, कृतीवर बोलण्यावर टीका करणं, आक्षेप घेणं हे विरोधातल्या राजकारणाचं सूत्र बनतं. मात्र, त्यामुळं लाभ मोदींचाच तर होत नाही ना, हे तपासायची वेळ आली आहे. यातही कॉंग्रेसमध्ये मतभेद दिसताहेत. शशी थरुर, जयराम रमेश, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखे उच्चभ्रू वर्तुळात वावरणारे बुद्धिमंत सरसकट मोदींना झोडपण्यापासून पक्षानं बाजूला व्हावं असं सांगताहेत. त्यांच्या कृतीची दखल व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून न घेता त्या त्या निर्णय, कृतीचा परिणाम समजून घ्यायला हवी असं त्याचं सांगणं, तर पक्षाची सूत्रं ज्यांच्या हाती आहेत त्या मंडळींना मोदींना लक्ष्य करणं हेच पर्यायी राजकारण वाटतं आहे.

कॉंग्रेसमधल्या महत्त्वाच्या नेत्यांची निवडणुकीचा प्रचारकाळ सुरू असतानाची विधानं पक्षातलं गोंधळलेपण दाखवणारी आणि त्यावर हायकमांड नावाचं एकेकाळी सर्वशक्तीमान असलेलं प्रकरण पुरेसं नियंत्रण ठेवू शकत नाही हे दाखवणारी आहे. तसंही केंद्र कमजोर होतं, तेव्हा सुभे बळजोर होतात असं म्हटलं जातं. इथं केंद्र तर कमकुवत झालंच आहे आणि सुभेदारांच्या पायाखालची जमीनही सरकायला लागली आहे. गोंधळलेपण दुहेरी आहे. यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याचं केलेलं निदान अगदीच नामी आहे. त्यांनी सांगून टाकलं : ‘कॉंग्रेस पक्ष थकला आहे.’ आपला पक्ष थकल्यापुरतं निदान करून ते थांबले नाहीत, तर राज्यातला साथीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही तीच अवस्था असल्यानं सांगत ‘आता दोघांनी विलीन व्हावं,’ असा उपायही सांगून टाकला. शिंदे याचं हे प्रामाणिक मत असू शकतं. तसं ते असण्याला कोणाची हरकतही असायचं कारण नाही. मुद्दा हा साक्षात्कार त्यांना मतदान दहा-बारा दिवसांवर आलं असताना झाला काय आणि झालाच तर तो मांडायची हीच वेळ होती काय? या निमित्तानं त्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेला एक प्रचाराचा मुद्दाच पुरवला. तसंही मुख्यमंत्री ‘लढायला समोर पैलवानच नाही’ असं सांगतच आहेत. सत्ताधाऱ्यांना समोर लढायलाही कुणी नाही, असं वाटावं, विरोधी पक्षनेताही कोणाला करता येणार नाही इतकं मतदारांच्या कौलाविषयी ठाम असावं अशा वातावरणात जे कोणी विरोधाची पताका घेऊन लढताहेत त्यांच्या उत्साहावर पाणी टाकणारं निदान मांडण्याची वेळ चुकली यात शंकाच नाही. खरंतर ज्यांच्यामध्ये अशी दमल्याची, थकल्याची भावना बळवली असेल, त्यांनी अवश्‍य आराम करावा, किमान लढणाऱ्यांना लढू द्यावं. त्यातही हे विधान शिंदे यांनी केल्यानं त्याला अधिकच महत्त्व मिळणं स्वाभाविक आहे. शिंदे हे एकाचवेळी कॉंग्रेसच्या सत्तावर्तुळात आतल्या गोटात वावरलेले, गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात; तसेच ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मित्र, स्नेही म्हणूनही ओळखले जातात. त्यांना दोन्ही पक्षांची वाटचाल, त्यातलं राजकरण चांगलं समजतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर सत्तेसाठी एकत्र येणं अनिवार्य बनल्यानं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली. तिनं १५ वर्षं महाराष्ट्रात राज्यही केलं- त्याच काळात शिंदे मुख्यमंत्रीही झाले. या आघाडीचे लाभ-तोटे याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. त्यातले अंतर्विरोध आणि तणावही त्यांनी पाहिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पक्षाची आणि पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची दुहेरी पंचाईत करून ठेवली. लोकसभेच्या पराभवानंतर पवार आणि राहुल गांधी एकमेकांना भेटले, तेव्हाही राष्ट्रवादी कॉंग्रेस विलीन होणार काय यावर बरीच पतंगबाजी स्क्रीन टाईम भरण्याची भ्रांत असणाऱ्या माध्यमांनी केली होतीच. आता निवडणुकीत हे प्रकरण पुन्हा उपटल्यानंतर त्यावर खुलासे करणं आपोआपच येतं. तसा तो राष्ट्रवादी कॉंग्रेसनं केलाही. मात्र, ज्यावेळी पंचहत्यारं घेऊन रणात उतरायचं, सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवायच्या, विसंगती उघड करायच्या, पर्यायी कार्यक्रम मांडायचा, तेव्हा ‘आम्ही थकलो आणि आता एकत्र येऊया’ हा उदासराग कशासाठी आळवायचा?
कॉंग्रेसमध्ये ही भावना का बळावत असावी याचं कारण सत्ताहीनतेतच शोधलं पाहिजे. सत्ता मिळवणारी आणि राबवणारी यंत्रणा एवढंच पक्षाला स्वरूप आलं, की पराभवाच्या धक्‍क्‍यानंतर थकल्याची जाणीव ताबा घेत असावी. याचा एक परिणाम म्हणजे महाराष्ट्रात निवडणूक सुरू असताना कॉंग्रेसकडून कोणीही स्पष्टपणे राज्यव्यापी प्रचारमोहीम चालवताना दिसत नाही. पक्षातली मोठी नावं आपापल्या मतदारसंघात अडकून पडली आहेत. दुसरीकडं अवसानघाताची सवय काम ठेवत याच काळात राहुल गांधी यांना परदेश दौरा करावासा वाटला. राहुल आता पक्षाचे अध्यक्ष नाहीत. त्या अर्थानं ते पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यासारखे आहेत. मात्र, सोनियांना तात्पुरतं का असेना- अध्यक्षपदी आणण्याचा सरळ अर्थ पक्षाची धुरा गांधी कुटुंबच चालवणार असाच होतो आणि त्यात राहुल गांधींना जबाबदारी कशी टाळता येईल? एकदा मैदानी राजकारणात उतरल्यानंतर अशी निवड करायची संधी नसतेच. शरद पवार भाजपशी दोन हात करताना या वयात सारं राज्य पालथं घालत असतील, तर राहुल गांधींना निवडणूक सुरू असताना असं कोणतं त्याहून महत्त्वाचं काम पडलं आहे? निवडणूक जाहीर होण्याआधीपर्यंत राज्यात येऊन मोदी वातावरण तयार करत होते. अमित शहा हेच करत होते. कॉंग्रेससाठी मात्र राज्यात असा झंझावात तयार करू शकणारं कुणीही केंद्रातून आलं नाही. निवडणुकीच्या प्रचारातही राहुल गांधींचं नाव स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या यादीत असलं, तरी ते फार काळ प्रत्यक्ष प्रचारात येणार नाहीत. सोनिया यांच्या प्रचार करण्यातल्या मर्यादा उघड आहेत. या दोहोंखेरीज प्रियांका गांधी-वड्रा या तिसऱ्या गांधीही प्रचारात फार सक्रिय होण्याची शक्‍यता दिसत नाही. त्यांच्याशिवाय राज्यात प्रभाव टाकावा असं कोणी राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व कॉंग्रेसकडं उरलेलं नाही. लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या नेतृत्वाची वानवा हे कॉंग्रेसचं दुखणं आहे. शतकाहून अधिक काळ अनेक चढउतार पचवत चाललेला पक्ष थकला, की पक्षाचं नेतृत्व थकलं, कंटाळलेलं आहे हे खरंतर शोधायला हवं. एका बाजूला ही स्थिती दुसरीकडं भाजपचा प्रचंड साधनसामग्रीसह सुरू असलेला धडाका कॉंग्रेसला हतोत्साहित करणारा असू शकतो. मात्र, अशा प्रतिकूल स्थितीतच जे लढतात त्यांचं नेतृत्व सिद्ध होतं, झळकतं. केंद्रातल्या हायकमांडच्या जीवावर मतं मिळवून दरबारी राजकारण करण्याच्या मळवाटेपेक्षा हे काम मेहनतीचं आहे. क्षमता जोखणारं आहे. मात्र, त्याखेरीज कॉंग्रेसला तरणोपायही नाही. ‘मोदींचं सरकार चुका करेल आणि त्याचा लाभ आपल्याला होईल; लोकांसमोर दुसरा पर्याय आहेच कुठं’ ही मानसिकता ज्या प्रकारचं संकट कॉंग्रेससमोर आहे त्यात लाभाची नाही. म्हणूनच थकल्याची जाणीव आणि रणांगणात असताना चिंतनाची उबळ बाजूला ठेवून लढणं ही कॉंग्रेसची गरज बनते. आज महाराष्ट्रात भाजप बलदंड दिसतो हे खरं असलं, तरी या पक्षाला कॉंग्रेस, राष्ट्रवादीतल्या आयातीवर विसंबावं लागतं आहे. हे सत्ताकांक्षी कोणत्याच वैचारिक परिवर्तनानं तिकडं गेलेले नाहीत. सत्तेचा आश्रय हवा, एवढंच त्यामागचं मूळ कारण. साहजिकच ही मंडळी कायम तिकडंच असतील असंही नाही. दुसरीकडं या निवडणुकीत धसाला लावावेत असे अनेक मुद्दे समोर आहेत. ते तसे असतानाही प्रचार हवा तसा वळवू शकतो हा सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास दिसतो, याचं कारण विरोधातला मुख्य प्रवाह असलेला कॉंग्रेस मुद्दे घेऊन भिडतच नाही. देश आणि स्वाभाविकपणे राज्यात आर्थिक आघाडीवर चितेचं वातावरण हा खरंतर निवडणुकीतला मुद्दा असला पाहिजे. अर्थव्यवस्था वाढत नाही, सणासुदीतही बाजार अपेक्षित गतीनं हलत नाही. गुंतवणुकीचा वेग मंदावला आहे. अनेक क्षेत्रांत मंदीचं मळभ दाटलं आहे. ते कित्येकांच्या नोकऱ्या खाऊन टाकतं आहे. नव्या रोजगारसंधी पुरेशा तयार होत नाहीत. त्याचा पुन्हा परिणाम लोकांच्या क्रयशक्तीवर आणि उलाढालीवर होतो. दुसरा आधार जो शेतीचा- तिथं स्थिती सुधारण्याची चिन्हं काही दिसत नाहीत. पावसाच्या लहरीनं राज्यभर शेतकरी चिंतेत आहे. त्यातच कांद्याच्या अवेळी निर्यातबंदीसारखे निर्णय होतात. मात्र, चर्चा ३७० कलम रद्द करून किती मोठं काम केलं यावर केंद्रीत करण्याची स्पष्ट रणनीती भाजपनं राबवायचं ठरवलं आहे. अमित शहा प्रत्येक भाषणात यावरच भर देताना दिसतात. पाच वर्षांपूर्वी गावगन्ना दिलेल्या आश्‍वासनांचं काय झालं आणि या राज्याच्या विकासासाठी काय करणार, यापेक्षा ३७० कलम रद्द करण्यावरून ‘तुम्ही आमच्या बाजूचे की नाही’ असा खोडा तयार करण्याच प्रयत्न आहे. यात सरकारच्या बाजूनं असाल, तर सरकारनं महान कामगिरी केल्याचं मान्य करा नाहीतर हे पाऊलच काय ते देशहिताचं हा निष्कर्ष आधीच काढल्यानं त्याला विरोध कराल तर देशविरोधी ठरवता येईल हा साधा प्रचारव्यूह आहे. म्हणून भाजपकडून पुनःपुन्हा विरोधकांना ‘तुम्ही ३७० कलम रद्द होण्याच्या बाजूचे आहात की विरोधातले’ असा सवाल केला जातो. तिथून राजकीय चर्चाविश्‍वात लोकांचे मुद्दे आणणं हे आव्हान आहे. सध्यातरी ते काही प्रमाणात समाजमाध्यमांतूनच घडताना दिसतं आहे. भाजपच्या लोकानुनयी राजकीय कथनाला उत्तर देणं हे खरंतर कॉंग्रेसमधल्या ज्येष्ठांनी पेलायचं आव्हान आहे. थकल्याची जाणीव आणि अवेळी आत्मचिंतनाची कुठंच घेऊन न जाणारी उबळ ते कसं पेलू शकणार?

श्रीराम पवार लिखित/ संपादित आणि ‘सकाळ’ प्रकाशित ‘राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा’, ‘जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा’, ‘धुमाळी (करंट : अंडरकरंट)’ ‘संवादक्रांती’ आणि ‘मोदीपर्व’ ही पुस्तके उपलब्ध. इथे क्लिक करा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang shriram pawar write vidhan sabha 2019 and politics article