सुटीचे दिवस (स्नेहा अवसरीकर)

sneha avasarikar
sneha avasarikar

जायची गाडी सकाळी. पटकन तयार होऊन नमस्कार वगैरे सोपस्कार करून सायकल रिक्षात बसायचं. "निघाली का सोलापूरला? संपली का सुट्टी?' असा गाव निरोप व्हायचा. बस सुटली, की पुन्हा तेच चक्र फिरायचं. तीच गावं मोजायची. यावेळी तुळजापूरच्या घाटाअगोदर लख्ख जाग असायची. खिडकीच्या गजाला घट्ट धरून घाट पार केला, की अर्ध्या-पाऊण तासात सोलापूर यायचंच की. पुन्हा तोच उत्साह. दिवस संपला, की वर्ष संपून नववर्ष सुरू झाल्याची जाणीव व्हायची. सुट्टी संपल्याचीही. एक रितेपण अन्‌ एक नवेपण जोडून मनभर पसरून राहायचं..

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन झाला, की तो उरलेला दिवस फार मजेशीर असायचा. एक मोकळेपण असायचं, सुट्टीत निश्‍चित काय करायचं हे माहीत नसायचं. महिनाभराचे मोकळे दिवस हातात असायचे ज्याचा कुठलाच असा खास कार्यक्रम नसायचा. तसा तो आपणच ठरवायचा असतो याचीही जाणीव नव्हती.
पेपर देऊन घरी येईपर्यंत आजोबा आलेले असायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परळी-अंबाजोगाई गाडीनं आजोळी जायचं हे ठरलेलं. मग काय वर्षभरात घेतलेले नवे कपडे भरायचे आणि पहाटे लवकर उठायचं म्हणून रात्री गच्चीवर लवकरच झोपायला जायचं. गच्चीत इतकी गार हवा असायची..आभाळभर चांदणं.. मोकळं मोकळं हलकं सुखी वाटायचं.. आणि गाढ झोप लागायची. पहाटेच कुणीतरी हलवून जाग करायचं, तेव्हा झोपेतून उठणं फार जड जायचं; पण उठावं तर लागेच.

चालत चालत गेलं, तरी पंधरा मिनिटांत बस स्टॅंडवर सहज पोचता येई. गाडीही लागलेली असे. आत चढून खिडकीशी जागा पकडली की झालं.. मग पाच-दहा मिनिटात ड्रायव्हर-कंडक्‍टर जोडीनं येत. तोवर गाडी भरून जाई.. कंडक्‍टरनं डबल बेल मारली, की नजर खिडकीबाहेर स्थिर होत असे. गाव परिसर तसा अंधारात असे, डिझेलचा एक भपकारा विरून गेला की हवेतला हलका हलका गारवा जाणवे. गाव मागे पडत जाई, तशी नजर सराईतपणे मागे पडणाऱ्या तुरळक झाडात हरवून जाई...
अर्धा-पाऊण तासांत डोळ्यांवर नव्यानं पेंग यायला लागे, तेव्हा बस तुळजापूरच्या घाटापर्यंत पोचलेली असे. सोलापूर-कळंब प्रवासातला हा एकमेव थरार. एरवी हा सगळा रस्ता तसा उजाडच. त्यात हा प्रवास एप्रिलच्या कडक उन्हाळ्यातला असायचा. सोलापूरहून निघालं, की तुळजापूर हे पाहिलं गाव. मग उस्मानाबाद, एडशी, एरंमाळा आणि कळंब. साधारण तीन-साडेतीन तासांचा प्रवास. तुळजापूर सोडलं, की पुढे मराठवड्यातली ही सगळी तालुक्‍याची गावं. कोरडी हवा अन रुक्ष परिसर. कळंब आमचं आजोळ. शाळेत असतानाच्या जवळपास सगळ्या उन्हाळ्यात तिथं महिना-तीन आठवडे मुक्काम असायचाच.

तुळजापूरला गाडी पाच-दहा मिनिटं थांबली, की किलकिल्या डोळ्यांनी एकदा बाहेर बघायचं फक्त. तेवढी ती झोपमोड व्हायची खरी; पण पुन्हा झापड येत जायची..उस्मानाबाद येईपर्यंत.. उस्मानाबादला आजोबांना हमखास कुणीतरी भेटायचंच. भाषेचा पोत बदललेला असायचा. पोशाखही. धोतर-सदरा घातलेली माणसं अन्‌ लुगडं नेसलेल्या बायांची गाडीत गर्दी झालेली असायची. खिडकीतून ऊन आत आलेलं असायचं. आम्हा भावंडाना जाग आलेली पाहून आजोबा चौकशी करायचे. तोपर्यंत उस्मानाबाद सुटलेलं असायचं. येरमाळा मागे पडला, की खरं कधी एकदा गाव येईल असं वाटायचं. किती वाजले आजोबा? कधी येणार कळंब? अजून किती वेळ?...आम्ही पाळीपाळीनं तेच तेच प्रश्न विचारत राहायचो. जेमतेम पाऊण-एक तासाचं अंतर; पण वेळ रस्ता संपता संपत नसे... आणि मग एकदम गाव आल्याची चाहूल लागायची. बस स्टॅंड नजरेच्या टप्प्यात यायचं. बसकी बसकी घरं दिसायची अन्‌ गाडी भर्रकन स्टॅंडमध्ये शिरायची. आजोबांच्या सूचना ऐकताऐकता बसच्या शेवटच्या उंच पायरीवरून धपकन उडी मारून मोकळे व्हायचो आम्ही. आजोबा उतरले, की रंगीत फेटे बांधलेली, धोतर नेसलेली माणसं राम राम अण्णा करत आजोबांना भेटत. आम्ही मात्र सायकल रिक्षा कुठं दिसेल ते बघत पुढे जात असू. गाव सगळं आजोबांच्या ओळखीचं. त्यामुळं प्रत्येक भेटणाऱ्या माणसांशी आजोबांनी दोन-दोन वाक्‍यं बोलली, तरी तेवढा वेळही आम्हाला धीर धरता येत नसायचा. सायकल रिक्षा मिळाली बरं वाटायचं. मग पहिल्यांदा गावातल्या देवीचं मंदिर दिसे. मग खंडेराव इटकूरकर, मांडवेकर, राजमाने असे गावातल्या मातब्बर मंडळींचे वाडे आणि मग तिथून डावीकडे वळलं, की कडुलिंबाच्या झाडाखाली असणारी पिठाची गिरणी दिसे. ही आमच्या आजोळच्या घराजवळची मोठी खूण. गिरणीशेजारच्या गल्लीत वळलं, की पहिल्यांदा देशमुखांचा वाडा आणि मग लगेच आजोबांचं घर.. घराच्या कोपऱ्यावर सायकल रिक्षा थांबे. त्या अरुंद माती अन्‌ फरशांच्या गल्लीत रिक्षा नेता येतच नसे. आम्ही तिथून दोन मिनिटांच्या आत घरी पोचत असू. घरात आजी अन्‌ दोन्ही मामांना माहीत असायचंच ना आम्ही येणार ते, त्यामुळं आजी जड पितळी ताब्यात पाणी अन्‌ भाकरीचा तुकडा घेऊन ओवाळून टाकायला यायची. ते बारीकसे सोपस्कार पार पडले, की थेट ओसरीत धाव घेत असू. आजी, दोन मामा, आजोबा लगेच चौकशा सुरू करत. "काय कसे गेले पेपर? झाली न परीक्षा? कितवा नंबर येणार? आई कशीय?'...जमेल तशी एकेक वाक्‍यात उत्तर देत आम्ही घरभर फिरून नुसतंच फिरत राहायचो. ओसरी, तिथला समोरच्या भिंतीवर असलेला आजोबांच्या वडिलांचा फोटो, मग त्या खालचा कोनाडा, तिथलं गजराचं घड्याळ आणि फिलिप्सचा ट्रान्झिस्टर, शेजारीच असलेलं देवघर, त्याचा उंच उंबरा, बारकी खिडकी, त्यावरच मोठा व्यंकटेशाचा फोटो, तिथून मग लांबलचक स्वयंपाकघर, तिथली कोपऱ्यातली चूल, पितळी डब्यांची मांडणी, दुधाचं कपाट, रांगेत ठेवलेले पाट, स्वयंपाकघराचा दुसरा दरवाजा अंगणात उघडायचा. त्या दारासमोर छोटा सहा-सात पायऱ्यांचा जिना, माळवदावर जाण्यासाठी. पुढं अंगण. मातीचं, शेणानं सडा टाकलेलं, तुळशी वृंदावन आणि शेजारच्या कोपऱ्यात लावलेली फुलझाडं, बाजूला बैठक असा सगळा आजोळच्या घराचा कोपरान्‌ कोपरा आजही लख्ख आठवतोय. देवघरातला काजळी अन्‌ उदबत्तीचा कापूराचा साठून राहिलेला गंध, ओसरीवरचे उन्हाचे कवडसे, अंगणातल्या कोपऱ्यातल्या तेरड्याचा बहर, चुलीवर स्वयंपाकाअगोदर चूल सारवून काढलेली रांगोळी.. या सगळ्या गोष्टी दरवर्षी तशाच्या तशा असत. एकदा का सगळं घर फिरून झालं, की मग निवांत वाटायचं.

कळंब हे तसं तालुका असलेलं गाव. अर्धी मातीची अर्धी पक्की घरं, पाण्याचं दुर्भिक्ष्यच. गावातून मांजरा नदी वाहायची; पण दर उन्हाळ्यात केवळ वाळूच शिल्लक. आजोबांचं हे घर गावाच्या टोकाला नदीजवळ होतं. अठरा पगड जातीची माणसं, शेती करणारी नाहीतर दुकान असणारी. बाकी सगळ्या नोकऱ्या गावव्यवस्थेच्या गरजा असणाऱ्या. गावातल्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सगळी घर एकमेकांच्या ओळखीची. ऐंशीच्या दशकात जसं गाव होतं तसं तितकंच पुढारलेपण. आमच्या थोड्याशा शहरीपणाचंही तिथं कौतुक असायचं खरं.

आम्ही कळंबला गेलो, की दुसऱ्या दिवशी आम्ही झोपेतून उठायच्या आतच आजोबा बाजारात जाऊन मोठी पिशवी भरून आंबे आणत. शेकडाभर. त्या आकड्याचंही अप्रूप वाटायचं. सोलापूरला तर सगळं डझनात आणलं जायचं. मग मोठा मामा रस करायला बसे. अगदी साग्रसंगीत. दोन मोठे लाकडी पाट पाण्यानं धुवून ते शेजारी ठेवले जायचे. एक मोठं स्टीलच पातेलं. दुसरं एक भांडं पाणी भरून आणि आंबे पाण्यात घालून ठेवलेली मोठी बादली. पहिल्यादा सगळे आंबे पाण्यातून काढून पुसून घ्यायचे. मग एक एक माचून पाटावर ओळीत मांडायचे. मग एकेकातून रस काढून साली ताटात मांडायचा. हे सगळं रसभरीत हातानं तो ज्या काही प्रेमानं, तंद्रीत करायचा- जसं एक मोठं कलात्मक काम उभं केलं जातं असायचं. यात कुणाचीही मदत तो घ्यायचा नाही. मांजरीसारखे आम्ही आसपास घुटमळायचो, तर एखादा गोटी लहान आंबा देऊन तो आम्हाला पिटाळून लावायचा. एखादा तासभर तो हे रसपुराण चालवत असे. तोपर्यंत बाकी स्वयंपाक झालेला असायचा. मग जेवण. पहिल्यांदा प्रेमानं, मग जरा आग्रहानं, मग अटीतटीनं पोटात वाट्यावर वाट्या रिचवल्या, की सगळी मंडळी सुखी होत. तिथून आमचा दिवस हुंदडण्यात आणि बाकीच्या मोठ्या मंडळींचा वामकुक्षी वगैरेसाठी रिकामा. गावात तितक्‍या काळापुरत्या दरवर्षीच्या मैत्रिणी असायच्या. त्यांच्याबरोबर काहीही कारण काढून गावभर भटकणं हा सुट्टीतला सगळ्यात महत्त्वाचा उद्योग. गावभरच्या अद्‌भुत गोष्टी ऐकत निरुद्देश भटकणं हे तिथल्या मातीत रूळलेलं होतच. दिवसभर अशी भटकंती करून घरी येईपर्यंत बहुदा अंधरलेलं असायचं. जेवण झालं, की अंगणात टाकलेल्या अंथरुणावर आडवं होताना मामा कुठल्या कुठल्या गोष्टी सांगायचे. भुताखेताच्या, रानातल्या नाग-सापांच्या. गावातल्या चित्रविचित्र माणसांच्या.. आतून जाम भीती वाटायची; पण वरून मात्र धीटपणाचा फुसका आव आणावाच लागे, नाहीतर आजोबा आमच्या शहरीपणाची पार दैना करून टाकत. अंगणात अगदी नीरव शुभ्र शांतता.. दिवसभरातलं तापमान खाली येत हवेत बऱ्यापैकी गारवा असायचा. गोष्ट ऐकताऐकता झोप कधी लागायची कळायचं नाही; पण खरी गंमत नंतर असायची. रात्री मध्येच कधीतरी कशी कुणास ठाऊक जाग यायची. टक्क जाग. सगळे जण अगदी शेजारी शेजारी गाढ झोपलेले असायचे; पण तरी भोवती पांघरुणाची घट्ट तटबंदी असायची. समोर एक तीनमजली वाडा होता. दिवसभर कधी लक्ष जायचं नाही; पण अंगणात आडवं होऊन पाहिल्यामुळे तो चांगला उंच दिसायचा. खालच्या मजल्यावर काही बिऱ्हाडं होती; पण वरचा मजला रिकामाच होता. आता रात्रीच्या अंधारात त्याच्या खिडक्‍या दारातून दाटलेला गच्च काळोख नजरेत भरायचा. वाड्याच्या समोर अगदी जवळ एक मोठं बाभळीचं झाड होतं. वाऱ्याच्या हलक्‍या झुळकेनंही ते सरसरून हालायचं. त्याचा आवाज त्या शांततेला पार विस्कटून टाकायचा. बारीकबारीक काहीतरी घडत रहायचं त्या अंधारात आणि त्या वातावरणात गूढ तरंग उमटत राहायचे. गळ्यापर्यंत चादर ओढून भीती बाहेरच रोखून धरायचा मी आटोकाट प्रयत्न करत असताना त्या सगळ्याविषयी एक अनिवार उत्सुकताही वाटायची. जशी अवचित जाग यायची, तशीच कधीतरी झोपही लागायची. जाग आल्यावर सगळंच बदलेलं असायचं. अंगणातल्या पाणी तापवण्याच्या बंबाजवळची खरपूस मातकट राख घेऊन कट्टयावर संथ दात घासताना सहज समोरच्या बाबळीकडे लक्ष गेलं, तर पोपटी हिरवी नाजूक पालवी फुटलेली बाभळी काय लोभस दिसायची.. तिचा विस्तारही मोठा होता. बारीक बारीक हळदी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा तिच्याभोवती. आणि नंतर ती कोवळी पानं चरण्यासाठी सुताराकडच्या शेळ्या दिवसभर बाभळीशी झटत असायच्या. ती समोरची भुतांची माडी तर पार विटलेली निरुपद्रवी दिसायची. मग रात्री काळोखात कसली भीती वाटायची कुणास ठाऊक? सगळंच वेडेपणाचं. हातातल्या उरल्यासुरल्या राखेसारखी भीती झटकून एक कोवळं ऊन पडायचं दिवसावर. एकदा असंच त्या गावाकडच्या मैत्रिणीबरोबर शेतात गेल्याच आठवतं. कडाक्‍याचं ऊन. जाताना मैत्रिणीबरोबर तिची बहीण, वडील वगैरे होतेच. शेत घरापासून फार दूर नव्हतंच. नुसतं ओझरत सांगितलं होतं घरी, शेतात जाते. तेव्हाचा काळ अन्‌ माहोल सगळंच सुरक्षित, अन्‌ निश्‍चित.. मग निघालो शेतात. सुरुवातीला तर विनाकारण बांधावर बागडून झालं. शेतात विहीर खणणं सुरू होतं. माझ्यासारख्या तथाकथित मोठ्या गावात राहणाऱ्यांसाठी फार नवलाईचं दृश्‍य होतं ते. कुदळ अन्‌ पहारीचे घाव घालणारी, खोल खोल खड्डयात लीलया वावरणारी ती फाटकी माणसं. बघता बघता दुपार उतरत चालली.. काका म्हणजे मैत्रिणीचे वडील त्या विहीर खोदणाऱ्या माणसाच्या सरबराईत गुंतले. तिची आई आणि बहीणही कंटाळून घरी जायला निघाल्या. आम्हाला मात्र भोवतालच्या आंब्याच्या झाडावर लगडून वाकलेल्या कैऱ्याचा मोह पडला होता. खाली पडलेल्या, पाड लागलेल्या आंबट गोड कडक रसरशीत कैऱ्यांनी अशी काही भुरळ घातली होती, की बस. पाच-साडेपाच वाजले तसं काकांनी येऊन घरी जायला सांगितलं ः ""मला वेळ लागलं, तुम्ही निघा आता.'' ते बजावून गेले तरी आता एकच..शेवटची..ही एकच पाडाची असं म्हणत म्हणत आम्ही आणखी कैऱ्या जमवल्या आणि घराकडं निघालो. बांधावरून रस्त्यावर आलो, तर अचानक अंधारून येऊन टपोरे पावसाचे थेंब पडायलाही लागले. पहिल्यांदा तर हरखूनच गेलो.. अहाहा.. काय सुरेख वाटत होतं.. टपोऱ्या थेंबांच्या सरीवर सरी..अंगातले फ्रॉक भिजलेले. केस ओले. चालताना पायातली स्लीपर सरकायला लागली अन्‌ मजा वाटतावाटता एकदम सरसरून भीती दाटली. ओलेपणानं अंगावर काटा आला. दात वाजायला लागले. आम्ही मातीच्या रस्त्यावरून घराकडे निघालो खरे; पण आसमंतात चिटपाखरू दिसत नव्हतं. पाऊस वाढला होता अन्‌ आभाळ अंधारून आलं होतं. मी सहावीतून सातवीत जाणारी अन्‌ ती आठवीतून नववीत जाणारी अशा आम्ही दोघीच त्या लांबलचक विलक्षण मोहक रस्त्यावर कावऱ्याबावऱ्या भराभरा चालत होतो. माझा तर सगळा भरवसा तिच्यावर. मला काहीच माहीत नव्हतं. ती धीर देत होती. ""आता हा रस्ता संपून वळलं की झालं बघ,'' असं सांगत होती. रस्ता संपता संपत नव्हता. तासाभरपूर्वीचा सगळा आनंद थिजून, जिरून गेला होता. शेवटी कसंबसं गावातल्या मंदिराचा कळस दिसला अन्‌ गाव टप्प्यात आलं. मग घरंही दिसू लागली. खेड्यातली घरं ती, बाहेरूनही घराघरात चुली पेटल्याचं कळत होतं. खूप उशीर झाल्यानंही आता घरी गेल्यावर खैर नाही हेही लक्षात येत होतं. शेवटी आलं घर, उंबऱ्यातून आत पाय टाकताच काळजी अन्‌ चिडचिड, प्रश्नांच्या ठिणग्या उडायला लागल्या.. सगळ्याचा सामना करणं शक्‍य नव्हतंच. जावयाची पोर या एका मुद्द्यावर सगळं शांत झालं. तेव्हा खरं हायसं वाटलं. दिवसभरात शेतात फिरलेला मोकळा आनंद, हाताशी येणाऱ्या कैऱ्या तोडून खाण्याचं अप्रूप, मोकळा भरार वारा, रानातला मुक्त पाऊस, हिरव्या शेताच्या पायवाटेवर चालताना अनुभवलेली अनोखी घनदाट भीती... तो सगळा माहोल कायमस्वरूपी मनावर कोरला गेला. निसर्गातल्या उन्मुक्त देखणेपणातच एक गार शिरशिरीत भीतीची रेघ उमटते खरी.
अर्थातच दिवस उजाडला, तसा परत सगळा नवेपणानं समोर आला. नेहमीप्रमाणे शेतातून दूध घेऊन शेतकरी आले. गल्लीच्या कोपऱ्यावर राहणारे कुणब्याकडचे गोविंदाण्णा देवघरासमोर हात जोडून व्यंकट रमण गोविंदा म्हणत ओसरीवर टेकले. ""काय रे पोरानो ..करमतंय नव्हं?'' नेहमीसारखं त्यांनी म्हणून विचारलं. समोरच्या सुतारकडच्या सरूमावशीनी अंगणातूनच ""उठली का पोरं?'' म्हणत चौकशी केली. आजोबा मोठी पिशवी घेऊन आंबे आणायला बाजारात गेले. ""मी आलोच, येतो लगेच'' म्हणत लहान मामानं काढता पाय घेतला. आता कालचं इतकं भटकणं झाल्यावर आज घरात लुडबुड सुरू झाली. आजोबांचं कपाट उघडून एकेक पुस्तक काढून खिडकी गाठून वाचत बसण्यात दिवस कसा गेला समजलं नाही. तोच काय पुढचे आठवडाभराचे दिवस संपले. "सचित्र सावरकर' असं सावरकरांचं चरित्र, फास्टर फेणे, जोत्स्ना देवधर यांचं "घर गंगेच्या काठी' असा हाती येईल त्या पुस्तकांचा फडशा पाडण दिवसभर सुरू असायचं. संध्याकाळी गावभर चैत्र गौरीची हळदीकुंकू असायची. गावात कुणाकडेही हळदीकुंकू असलं, तरी गावाला बोलावणं असायचं. ओळख ना पाळख तरी आजीबरोबर, पुढं मामीबरोबर जायचं. फार अवघडून जायला झालं, तरी तिथं जाण्यात मजाही वाटायची.

दिवस असे सहज सरून जात. मग एक दिवस दुपारभर प्रचंड उन्हानं घालमेल व्हायची आणि चार-पाच वाजता जोरदार पाऊस यायचा. अंगणात पाणी साठेल एवढा. सगळे घरातच असायचे. कागदी नावा सोडण्यात आजोबाही सामील व्हायचे. त्या दिवशी अंगणात झोपता यायचं नाही. ओसरीवर झोपून आढ्याकडे पाहत झोपेची वाट पहावी लागायची. सकाळी जाग आली, की अंगणातल्या कोपऱ्यात तेरड्याला फुलं लागलेली. कोरांटीच्या फुलांनी पानही दिसायचं नाही. गुलबक्षीची नाजूक फुलं.. गोकर्णीच्या वेलावर वरपर्यंत जांभळी फुलं..सगळं पावसानं साजरं झालेलं असायचं, सगळं नीट मजेत असायचं; पण का कुणास ठाऊक एकदम बेचैन वाटायचं. सोलापूरला परत जायला हवंच असा हट्टी विचार अनाहूत मनात यायचा. दिवसभर करमेनासं व्हायचं. आजोबांना बरोबर कळायचं. तोपर्यंत घरात कुणीतरी म्हणायचं ः "तीन आठवडे झाले की पोर युन' मग आजोबा जाहीर करायचे ः "जाऊ सोलापूरला.' मग मात्र दिवस दिवस मोजत दिवस काढायचे. बॅगा भरल्या जायच्या. जायची गाडी सकाळी. पटकन तयार होऊन नमस्कार वगैरे सोपस्कार करून सायकल रिक्षात बसायचं. "निघाली का सोलापूरला? संपली का सुट्टी?' असा गाव निरोप व्हायचा. बस सुटली, की पुन्हा तेच चक्र फिरायचं. तीच गावं मोजायची. यावेळी तुळजापूरच्या घाटाअगोदर लख्ख जाग असायची. खिडकीच्या गजाला घट्ट धरून घाट पार केला, की अर्ध्या-पाऊण तासात सोलापूर यायचंच की. पुन्हा तोच उत्साह. दिवस संपला, की वर्ष संपून नववर्ष सुरू झाल्याची जाणीव व्हायची. सुट्टी संपल्याचीही. एक रितेपण अन एक नवेपण जोडून मनभर पसरून राहायचं..

आजही दर उन्हाळ्यात चैत्रात ते सगळे दिवस आठवतात. नवेपण तर जुन झालं; पण रितेपण आजही जाणवत राहतं. म्हटलं तर कुठलीच साधनं नव्हती त्या काळात. मोबाईल काय- साधे फोनही नव्हते, तरी एकमेकांची खुशाली सहज पोचायची. रेडिओवर जे लागेल ते गाणं आपलंसं वाटायचं, अनपेक्षित आवडीचं गाणं लागलं, की फार खूश होता यायचं. टीव्ही मालिकांपेक्षा रसाळ, अद्‌भुत गोष्टी सहज गावात चर्चिल्या जायच्या. आनंद, दुःख, सुख, समाधान, करमणूक, चिंता, काळजी... सगळंच एकमेकांच्या साथीनं उत्कटपणे जगता यायचं. माणसांचा माणसांना केवढा आधार वाटायचा, याची कल्पना आज मोबाईलच्या रेंज अन्‌ डेटा आधार असणाऱ्या काळात कळणार नाही. लॉकडाउनच्या बंदिस्त काळात या वर्षी तर ते फार तीव्रतेनं जाणवत आहे. जन्म-मरण्याच्या सीमारेषेवर गोठून गेलेल्या या काळात पुढची स्वप्नं काही केल्या दिसत नाहीयेत आणि म्हणून कदाचित मागच्या शांत, स्वस्थ, निर्भय जगलेल्या दिवसांच्या आठवणी पुनःपुन्हा विरंगुळा बनत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com