"पालकांनी वर्तनातून शिकवावं' (सोनाली कुलकर्णी)

सोनाली कुलकर्णी
Sunday, 17 May 2020

मुलांनी जसं वागावं हे पालकांना वाटत असतं; तसंच त्यांनी स्वतः आधी वागावं. मुलांना आदर्शाचे वेगळे नियम आणि स्वतःला वेगळे असं केलं तर ते चुकीचं ठरेल. आई-बाबा स्वतः टीव्हीसमोर तासन्‌तास बसत असेल आणि तू एकच तास टीव्ही बघायचा असा नियम मुलांना घातला, तर मुलं ते ऐकतील का?

मुलांनी जसं वागावं हे पालकांना वाटत असतं; तसंच त्यांनी स्वतः आधी वागावं. मुलांना आदर्शाचे वेगळे नियम आणि स्वतःला वेगळे असं केलं तर ते चुकीचं ठरेल. आई-बाबा स्वतः टीव्हीसमोर तासन्‌तास बसत असेल आणि तू एकच तास टीव्ही बघायचा असा नियम मुलांना घातला, तर मुलं ते ऐकतील का? आपण मुलांना जे सांगतो आणि आपण जे वागतो त्यात सारखेपणा असला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न असतो, की जास्त उपदेशाचे डोस पाजायचे नाहीत. जे आहे ते आपल्या वर्तनातून मुलांना दिसू दे.

माणूस आयुष्यात जे काही शिकतो त्यावरच त्याचं आयुष्य उभारलेलं असतं. त्याच्या शिकण्यामध्ये पालकांची भूमिका मोठी असते. वेळेची, श्रमाची आणि कमावलेल्या पैशांची किंमत या तीन गोष्टी मी प्रामुख्यानं माझ्या आई-बाबांकडून शिकले. कुटुंब एकत्र असणं किती महत्त्वाचं असतं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. काहीही होवो- आपण सर्व कुटुंबीय एकत्र आहोत याची जाणीव करून दिली. किती पैसे आहेत त्यापेक्षा ते प्रामाणिकपणे कमवले आहेत याचं महत्त्व पटवून दिलं. वेळेचं महत्त्व पटवून देत असताना आम्हा तिन्ही भावंडांना शाळेत कधीही उशीर होणार नाही याची स्वतः काळजी घेतली. त्यामुळे माझे दोन्ही मोठे भाऊ आणि मी शाळेत कधीच उशिरा गेलो नाही. शाळेतच नाही, तर कॉलेजमध्येही नाही. आम्हा तिघांना घरातलं कुठलंही काम करताना कधी लाज वाटत नाही. तसंच वस्तूंचं आणि त्यासाठी खर्च केलेल्या पैशांचं महत्त्वही त्यांनी समजावून दिलं. त्यांची समजवण्याची पद्धत विलक्षण होती. एकदा माझा भाऊ संदेशला त्याच्या वाढदिवसानिमित्त नवी सायकल आणली होती. ती घेऊन तो एके ठिकाणी गेला आणि सायकलला कुलूप न लावताच आत गेला. तेवढ्यात ती सायकल कोणीतरी पळवली. आई-बाबांनी कष्टाच्या पैशातून ती आणली होती. त्यामुळे आर्थिक फटका पण बसला होता. संदेश खूप घाबरला होता; पण कुलूप लावायला विसरला हे त्यानं खरं सांगितल्यामुळे त्याला शाबासकी मिळाली, मात्र कुलूप न लावणं हा बेजबाबदारपणा होता त्यामुळे त्याला शिक्षा झाली. त्यात पुढचे अनेक दिवस त्यानं बागकाम करणं, समोरच्या घरांमध्ये जाऊन त्यांची काही कामं करून देणं अशी बरीच कामं केली. एक महिन्यानंतर आई-बाबांनी त्याला सांगितलं, की ही तुझी शिक्षा होती, यापुढे असं वागायचं नाही. अशा शिक्षेमुळे शिस्त लागते- शिवाय वस्तूंचं मूल्य त्याच्या किंमतीपलीकडे जाऊन कळलं पाहिजे, हा त्यांचा शिक्षेमागचा उद्देश होता आणि तो आम्हाला शिकवण्यात ते यशस्वी झाले.
काळ बदलला, तशा बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्या पालकांनी मला एकत्र कुटुंबात राहण्याचा आनंद देऊ केला होता. माझे आजी-आजोबा खालच्या मजल्यावरच राहायचे. आमचं घर पुण्यात होतं, त्यामुळे माझे बरेच भाऊ-बहिणी आमच्याकडे येऊन राहायचे. एकत्र राहताना आपण सर्व गोष्टी वाटून घ्यायच्या, सर्वांनी एकत्र राहायचं, आपल्या आजी-आजोबांची काळजी घ्यायची, या गोष्टी नकळतपणे आम्ही शिकलो. या गोष्टी माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या होत्या; पण मी आता त्या माझ्या मुलीला- कावेरीला नाही देऊ शकत. छोट्या कुटुंबामुळे किंवा अधिक संपन्नतेमुळे आताची मुलं खूप लाडकी होऊन बसतात. त्यामुळे घरात केलेला कोणताही पदार्थ सर्वांनी वाटून खायचा, केलेली गोष्ट सर्वांना पुरली पाहिजे ही समज आताच्या मुलांना येत नाही. कारण सुबत्तेमुळे काहीतरी कमी पडणार आहे ही भावनाच संपलीये. या बदललेल्या परिस्थितीमुळे एकत्र जगण्यातला जो गोडवा होता, तो मी कावेरीला नाही देऊ शकत. तो गोडवा मी आणि माझ्या भावंडांपर्यंत आई-बाबांनी पुरेपूर पोचवला होता. आजोबांना बरं नाहीये, तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे नाही का? पण आता काळजी हॉस्पिटलमध्ये घेतली जाते. याचा अर्थ असा नाही, की आजकालच्या मुलांना भावना नसतात; पण त्यात काही गोष्टी हरवल्या असतात. आजकाल भावंडांची संख्या कमी झाली आहेत, त्यामुळे भावंडांकडून मिळणारं प्रेमही कमी झालं आहे. याची मला फार खंत वाटते. मला दोन मोठे भाऊ आहेत. लहान भावंड असावं, असं मला बरेच दिवस वाटत होतं; पण नंतर माझ्या आईनं पंधरा वर्षं पाळणाघर चालवलं. त्यामुळे मला बरीच लहान भावंडं मिळालीत. कावेरीला यापैकी बऱ्याच गोष्टी देऊ शकत नाही, ही खंत मात्र आहे.
कावेरी झाल्यापासून मी अतिशय आनंदात आहे. मला वाटलंच नव्हतं, की लहान मूल घरात असणं, स्वतःला बाळ होणं इतकं आनंददायी असेल. आपल्याला नेहमीच असं वाटत असतं, की मुलांवर संस्कार करणं हा आनंदाचा भाग असतो; पण मुलं आपल्यावर जे प्रेम करतात ते विलक्षण असतं. त्यांचं प्रेम ती स्पर्शातून, एखाद्या दृष्टिक्षेपातून व्यक्त करतात. कावेरी गोड आहे. प्रत्येक आई-वडिलांनाच आपलं मूल गोड वाटत असतं; पण त्यापलीकडे कावेरी फार प्रेमळ आहे. जे प्रेम ती माझ्या आयुष्यात घेऊन आली आहे, ते फार विलक्षण आहे. हा खूप मोठा आनंद आहे. लहान असून मुलं आपल्यासाठी किती काय काय करत असतात, ते खूपच सुंदर असतं. खरं तर लग्न होणं हेच किती वेगळं असतं. कारण लग्न झाल्यानंतर सासरची माणसं आपली होतात, ती आपल्यावर प्रेम करतात. नवऱ्याच्या रूपात प्रेम करणारं हक्काचं माणूस मिळतं आणि त्याबरोबर मुलंही आपल्यावर प्रेम करू लागतात. हे निर्मळ प्रेम मिळत असल्यामुळे मी अक्षरशः नंदनवनात आहे असं अनुभवतेय. आपल्या मनात अनेक आदर्श कल्पना असतात. आईपण म्हणजे काय? मुलांना कसं वाढवावं याच्याबद्दल चुकतमाकत का होईना मी अनेक गोष्टी शिकतेय. पदोपदी मला माझी आई, माझ्या सासूबाई किंवा घरात जी कोणी मोठी माणसं आहेत ज्यांनी आपल्यावर केलेल्या संस्कारांची मला आठवण येते. त्यांच्या पिढीत मुलांना वाढवताना एक सहजता होती, तर माझ्या पिढीमध्ये एक प्रयत्न आहे. आम्हाला असं वाटतं, की आम्ही सगळं अचूक केलं पाहिजे. मी अनेकदा प्रयत्न करते, की परफेक्‍शनच्या नादाला लागू नये. त्यात आपण अनेक क्षण हरवतो. हे थोडंसं तत्त्वज्ञान वाटेल; पण कावेरी माझ्या जीवनात आल्यापासून मला खूप परिपूर्ण वाटतंय. आनंद जास्त चांगल्या अर्थानं उपभोगू शकतेय.
मूल जन्माला आलं, की पालकांना वाटतं की आपण आपल्या मुलांना अमुक गोष्टी शिकवाव्यात; पण त्यांना काही शिकवण्यापेक्षा मुलांसमोर आपण चांगलं जगलं पाहिजे. मुलांनी जसं वागावं हे पालकांना वाटत असतं; तसंच त्यांनी स्वतः आधी वागावं. मुलांना आदर्शाचे वेगळे नियम आणि स्वतःला वेगळे असं केलं तर ते चुकीचं ठरेल. आई-बाबा स्वतः टीव्हीसमोर तासन्‌तास बसत असेल आणि तू एकच तास टीव्ही बघायचा असा नियम मुलांना घातला, तर मुलं ते ऐकतील का? आपण असे नियम घालणारे कोण? घरात कावेरी माझी लाईफस्टाईल बघते, तिला माहीत आहे, की मला खरंच वेळ नसतो. मला एखादा सिनेमा अगदी बघायचाच असेल, तर मी तो वेळ काढून बघते. थोडक्‍यात काय तर आपण मुलांना जे सांगतो आणि आपण जे वागतो त्यात सारखेपणा असला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न असतो, की जास्त उपदेशाचे डोस पाजायचे नाहीत. जे आहे ते आपल्या वर्तनातून मुलांना दिसू दे.
बरेचदा मुलंच आपल्याला खूप काही शिकवत असतात. कावेरीमुळे मला पुन्हा एकदा शालेय शिक्षण घेता येतंय, ही खूप मजेदार गोष्ट आहे. तसंच तिच्यातला प्रेमळपणा, ती समोरच्याचं खूप चांगल्या प्रकारे ऐकू शकते हे गुण खरोखरच घेण्यासारखे आहेत. अभ्यासाची असो वा इतर कोणतीही गोष्ट समजावून सांगताना ती खूप शांतपणे ऐकून घेते. ती तिच्या गतीनं एखादी गोष्ट समजून घेते, खऱ्या अर्थानं शिकते. त्यामुळे मुलांच्या मनात असुरक्षितता राहत नाही. नाही तर बरेचदा शिक्षकांना आवडावं म्हणून, आई-वडिलांना बरं वाटावं म्हणून खूप पटपट शिकण्याची घाई केली जाते. कावेरीकडून खूप चांगल्या प्रकारचं स्थैर्य तिच्या वृत्तीमध्ये बघायला मिळतंय. हे माझ्यासाठीही खूप चांगलं आहे. समजून घेण्याची तिची प्रोसेस मला फार आवडते आणि ती मी तिच्याकडून शिकले आहे.
कावेरीचे तीन वाढदिवस मी घरीच साजरे केलेत. ती थोडी मोठी झाल्यानंतर तिच्या मित्रमैत्रीणींना बोलवलं. तिच्या एका वाढदिवसाला मी मुलांच्या आई-वडिलांना विनंती केली की भेटवस्तूशिवाय वाढदिवस साजरा करायचाय- गिफ्ट पाठवू नका. त्याचं कारण म्हणजे ती वस्तू हवी आहे का नाही याचाही विचार नसतो. यामागे त्यांचं प्रेम असलं तरी इतर कारणांना कंटाळून मी तसा निर्णय घेतला होता. वाढदिवस झाल्यावर कावेरीला खूप आश्‍चर्य वाटलं की आपण सगळ्यांना शोधून, विचार करून गिफ्ट देतो पण आपल्याला कोणीच दिलं नाही. तिला त्याचं वाईट वाटलं. यात मला एक गोष्ट जाणवली, की आपण पालकत्वाचा आदर्श सांगण्यासाठी एखादी गोष्ट करणं ही एक स्वतंत्र गोष्ट असते आणि त्यात आपल्या पाल्याला सामावून घेणं ही दुसरी गोष्ट असते. त्यानंतर मी स्वतः तिच्या वाढदिवसाशी संबंधित निर्णय कधीच एकटीनं घेतला नाही. मी तिला समजावून सांगितलं, की मागच्या वर्षी किती गिफ्टस्‌ आली होती, त्यातली किती वापरली आणि किती नुसतीच पडून राहिली, वाया गेलीत. त्यापेक्षा आपण त्यांना एक थीम आणि एक बजेट देऊ या का? म्हणजे त्या बजेटमध्येच ते गिफ्ट आणतील. तिला ते पटलं. महानगरांत मोठा खर्च करून वाढदिवस साजरे केले जातात. त्या हॉलचं भाडंच लाखो रूपये असतं. त्यात महागडी रिटर्न गिफ्टस्‌ दिली जातात- जी घरी आणताना आपल्याला ओशाळल्यासारखं होतं. एकदा रिटर्न गिफ्ट म्हणून प्रत्येक मुलाचं नाव टाकलेली बीन बॅग दिली, अशा तीन जणांनी दिलेल्या तीन बीन बॅग घरी आल्या होत्या. त्यामुळे मी वाढदिवस साजरा करण्याची थोडी वेगळी पद्धत शोधली. त्यात कावेरीचंही मत घेतलं. यानंतर दोन-तीन वाढदिवस फार मजेचे गेले. एकदा मी कावेरीच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून बेसिलची छोटी रोपं मुलांना दिली होती. देताना सांगितलं, की हे कावेरीचं रोप आहे आणि तुम्ही कावेरीची काळजी घ्या. ती तुमची मैत्रीण आहे ना, मग तिची काळजी कशी घेतली हे सांगा. काही दिवसांनी मी भेटले, की मुलं सांगायची ः "आंटी प्लॅट मोठं झालं, आईनं त्याची पानं सॅलडमध्ये टाकली,' कोणी सांगायचं "त्याची पानं ऑम्लेटमध्ये घातली, ते खूप टेस्टी होतं.' बेसिलबरोबर मी कॅक्‍टसचा पर्याय ठेवला होता. आपल्या आवडीनुसार मुलांनी ते निवडलं. मग त्यांच्यात चर्चा होऊ लागली आणि त्यातून त्यातून त्यांना त्या झाडांची माहिती मिळाली. असे वेगवेगळे प्रयोग कावेरीच्या इच्छेनं मी करत असते.
एकदा माझ्या लक्षात आलं, की कावेरीच्या वर्गात ती एकटीच मराठी मुलगी आहे. मग त्या वर्षी आम्ही तिच्या सर्व वर्ग मित्र-मैत्रिणींना घरी बोलावलं होतं. माझे आई-बाबा, सासू-सासरे सगळे आले होते. या सगळ्यांना सांगितलं, की प्रत्येकानं मुलांसमोर काहीतरी सादर करायचं. आईनं भजन म्हटलं, बाबांनी गाणं म्हटलं, सासऱ्यांनी बासरी वाजवून दाखवली. माझा नवरा नचिकेतनं तबला वाजवून दाखवला, सासूबाईंनी श्‍लोक म्हणून दाखवला. मी भरतनाट्यमची झलक सादर केली. हे बघितल्यावर मुलांना खूप आश्‍चर्य वाटलं, की अरे गणपती म्हणजे केवळ मोठ्या आवाजातली गाणी आणि धांगडधिंगा नाही. तर हे असंही असतं. आम्ही आरती केली आणि घरी जाताना माझी मैत्रीण गार्गी फुले हिच्याकडून मिळालेले छोटे छोटे गणपती दिले. ते रंगवलेले नव्हते. त्यांच्या सोबत तीन इकोफ्रेंडली रंग दिले आणि घरी रंगवा असं सांगितलं. नंतर समजलं, की यामध्ये ख्रिश्‍चन, मुस्लिम, तमीळ, तेलगू, गुजराती अशी अनेक वेगवेगळ्या जातीधर्माची मुलं होती. विशेष म्हणजे कोणाच्याही पालकांनी गणपती घरी नेऊन रंगवण्यास आक्षेप घेतला नाही. मुलांनी या सगळ्या भेदभावांचा विचार न करता वाढावं हेच तर आपलं स्वप्न आहे ना! मग अजून काय हवं?
लग्न करतानाच माझे विचार खूप सुस्पष्ट होते. मला कुटुंबाचं सुख, आनंद हवा होता. त्यामुळे मी खूप मोठी अभिनेत्री आहे आणि मला वेळ नसतो वगैरे काहीही त्यांना दाखवायचं नव्हतं. त्यामुळे मला कावेरीबरोबर किती वेळ घालवायचा आहे. केवळ तिच्याबरोबर नाही तर नचिकेत बरोबरही किती वेळ घालवायचा आहे हे डोक्‍यात स्पष्ट होतं. कारण सहजीवन म्हणजे फक्त मुलांबरोबर वेळ घालवणं नव्हे, तर ती एक पार्टनरशीपही असते. त्यामुळे कावेरीइतकाच नचिकेतबरोबरही मला वेळ हवाय. आमच्या दोघात जेवढं निरंतर प्रेम राहील, तेवढा कावेरीला इतर नात्यांबद्दल विश्वास वाटत राहील. त्यामुळे वेळ काढणं हा माझ्यासाठी कधी प्रश्न नसतो इतकी समंजस माणसं माझ्या आयुष्यात आहेत. माझा नाटकाचा प्रयोग असतो, तेव्हा बहुतेक वेळा आम्ही सर्वच दौऱ्यावर जातो. अर्थातच माझ्या कुटुंबाचा खर्च आम्हीच करतो. शूटिंगलाही ते येतात. अनेकदा माझी आऊटडोअर शूटिंग्ज मी कावेरीच्या सुट्या बघूनच आखते. त्यामुळे शक्‍यतो ती माझ्या बरोबरच असते. बरेचदा रविवारी नचिकेतही आम्हाला भेटायला येतो. कावेरीच्या शाळेच्या वेळेनुसार मी माझी बहुतेक कामं ठरवते. असं असलं तरी मी कायम तिच्या मागे हातात दुधाचा ग्लास घेऊन वा जेवणाचं ताट घेऊन उभी असणार नाही हे तिला माहित आहे. बाबाला काम असतं, तसंच आईलाही काम असतं हे ती जाणते.
मला आणि नचिकेतला वाटतं, की आम्हाला ज्या गोष्टी नॉर्मल वाटतात, त्या कावेरीनं अनुभवल्याच पाहिजेत. म्हणजे जगातली सगळी मुलं टीव्ही बघतात आणि आम्हीच म्हणायचं की टीव्ही बघणं चांगलं नाही, हे योग्य नाही. मात्र, आम्ही सगळ्या छोट्या गोष्टींसाठी वेळा आखल्या आहेत. त्यात गॅजेट्‌स आलीच. संध्याकाळी पाच ते सात कावेरीनं मोकळ्या हवेत खेळावं असं आम्हाला वाटतं. तीदेखील फुलांमध्ये, झाडांमध्ये खूप रमते. खेळताना मित्रमैत्रिणी भेटतात. ते तिला आवडतं. टीव्हीबाबत आमची फार बंधनंही नाहीत. वेळ संपली, आता टीव्ही बंद असं काही आम्ही करत नाही. बरेचदा मी तिच्याबरोबर टीव्ही बघायला बसते. आता लॉकडाऊनच्या काळात मी आणि नचिकेत बातम्या बघतो. तेव्हा तिच्याही कानावर त्या पडतात. तिलाही त्याचं गांभीर्य समजतं. तसंच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान जनतेला काही संबोधन करायला येतात, तेव्हा तीही ते ऐकते. त्यावेळी आम्ही तिला आयपॅड सुरू करून तू हे बघ असं करत नाही. टेक्‍नॉलॉजी आणि भाषा मुलांना चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. त्यांपासून दूर ठेऊन, त्याचा कॉम्प्लेक्‍स देऊन तिला वाढवण्यापेक्षा आजूबाजूला जे आहे त्याची ओळख करून देणं आम्हाला जास्त योग्य व नैसर्गिक वाटतं. सध्या ज्याप्रकारे शिक्षण पद्धती आणि जग बदलत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलांना या बदलांची ओळख होणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांना आपण त्यापासून दूर नाही ठेवू शकत. मला जे मिळालं आणि मी जे कावेरीला देऊ करतेय, त्यात "आमच्या वेळी' हा शब्द टाळायचा प्रयत्न करते. पालक जर आजचे होऊ शकले तर मुलांना जगताना मजा येईल असं मला वाटतं. "आजचं' असण्यामध्ये पालकांच्या विचारांचा ताजेपणा, त्यांनी स्वतःच्या पारंपरिक विचारांना दिलेला छेद किंवा त्यांनी मुलांच्या वयाचं होऊन विचार करू शकणं या सगळ्याच गोष्टींचा अंतर्भाव आहे. तेव्हा आपण सगळे आजचे आहोत हे जर पालकांनी लक्षात ठेवलं जगताना खूप ताजेपणा येऊ शकतो आणि मुलांना त्यांच्याबरोबर जगताना आनंद मिळू शकतो. आई-वडिलांबरोबर कुठलाही हिशेब नसलेला आनंद मिळत असेल, तर ते खरं पालकत्व!!
(शब्दांकन ः मोना भावसार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sonali kulkarni write parents article