वैशिष्ट्यपूर्ण ‘स्पेशल ट्रेन’ (संज्ञा घाटपांडे)

saptarang soudnya ghatpande write lalit article
saptarang soudnya ghatpande write lalit article

पतीच्या कामामुळे पुणे ते पंजाब हा प्रवास एका ‘स्पेशल ट्रेन’मधून करण्याची संधी लेखिकेला मिळाली आणि चार-पाच दिवस एक वेगळीच दुनिया तिनं अनुभवली. जवानांच्या कामापासून त्यांच्या कुटुंबीयांच्या जिव्हाळ्यापर्यंत अनेक गोष्टी अनुभवता आल्या. या आगळ्यावेगळ्या प्रवासाची ही कहाणी.

‘स्पेशल ट्रेन’मधून प्रवास करायचा का नाही हा पर्याय नव्हताच! पुणे ते पंजाब विमान असताना पुण्याहून उठून आसामला जाऊन, तिथून चार-पाच दिवस तडफडत ट्रेनमधून पंजाबला यायचं या विचारांनीच डोकं गरम झालं. सगळे शिव्याशाप देऊन झाले! माझा नवरा माझा आक्रस्ताळेपणा शांतपणे बघत होता. माझं नाटक संपल्यावर तो शांतपणे म्हणाला : ‘‘काहीही झालं तरी जायचं आहेच आणि तुलाही यायचं आहेच! त्यामुळे आनंदाने तयार हो- नाहीतर रडत रडत तयार हो.’’

दोन-तीन दिवसांच्या विचारविनिमयानंतर मी रडतरडतऐवजी ‘उसना आनंद’ आणत तयार झाले. सगळ्या प्रकारचे ‘गुगल सर्च’ करून झाले. किती अंतर आहे, किती वेळ लागेल वगैरे वगैरे. ‘ठीके! फार दिवस लागणार नाहीत’ असं स्वतःलाच समजावलं आणि तिकीट वगैरे काढून तयार झाले. लागणारं, न लगणारं, ‘सेफ साईड’ म्हणून घेतलेलं असं आठवून आठवून, याद्या बनवून, सगळ समान गोळा केलं आणि ट्रेन आणि प्रवास दोन्हीचा ‘नॉशिया’ असलेली मी चार-पाच दिवस ट्रेनमध्ये राहायला तयार झाले.
आपल्याला एक घर पुण्यातल्या पुण्यात बदलताना नाकी नऊ येतात; पण इथं सैन्याची अख्खी पलटणच आसामवरून पंजाबला हलवायची होती. सलाम या सगळ्या जवानांना- ज्यांनी अशक्य उकाड्यात स्वयंपाकघरापासून प्राण्यांपर्यंत सगळं सात-आठ तासांत ट्रेनमध्ये चढवलं. ट्रेन स्वच्छ केली. ज्यामुळे आम्ही इतके दिवस आरामात आतमध्ये राहू शकलो. शिलामाताची पूजा करून सगळे ट्रेनमध्ये शिरलो. ट्रेन उत्तम होती. सकाळच्या चहापासून अंघोळीपर्यंत सगळीच सोय केली गेली होती. एका बोगीत किचन थाटलेलं. एका बोगीत आमची राहायची सोय. काही बोग्यांमध्ये सामान. एका बोगीत चक्क बदकं, ससे, कोंबड्या, बकऱ्या यांची सोय केली होती. आणि सगळ्यात सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे छप्पर नसलेली ओपन बोगी! सगळ्यात जास्त मजा आम्ही इथं केली. यातून चतकोर भारत बघायला मिळाला!

ट्रेन कशी आहे, त्यात काय काय सोयी (गैरसोयी) आहेत, यावर लक्ष केंद्रित करायला मला आवडलं असतं; पण आमच्याबरोबर प्रवास करणारे इतर ऑफिसर्स, बायका, लहान मुलं, यांचे अतिउत्साही चेहरे बघून मी त्यांच्याकडे लक्ष वळवायचं ठरवलं. मला आपल्यात सामावून घ्यायला या सर्वांना अक्षरशः पाच मिनिटं लागली. दुसऱ्या दिवसापर्यंत मी कुणाची बहीण, कुणाची मैत्रीण, मुलांची ‘आंटी’ बनून गेले होते. एखाद्याला आपल्यात सामावून घेण्याची कला ‘फौजीं’कडून शिकावी. मैत्रीसाठी भरभर पुढे आलेले हात बघून माझ्या भूतकाळातल्या पुणेरीपणाची मला लाज वाटली. ‘ती नवीन आहे नं? मग येईल की ती स्वतःच. आपणहून कशाला जायचं उगाच? तिनं आलं पाहिजे,’ हे असे ‘प्रगल्भ’ विचार करण्याची शक्ती या लोकांमध्ये नसते. ते येतात, हसतात, बोलतात, मैत्री करून जातात. आपल्याला काही कळायच्या आत.
तीन-चार दिवसांत आमच्या वेडेपणाला अगदी उधाण आलं होतं. दिवसातून तीन-चार तास पत्ते खेळण्यात जायचे. किरकोळ पैसे लावून सगळे एकदम गंभीरपणे खेळायचे. दहा-दहा रुपयांची जिंकून आणलेली संपत्ती बघून लढाई जिंकून आल्यासारखं शानदार वाटायचं. माझा नवरा तर अगदी निरागसपणे नोटा माजून, जुन्या-नव्या नोटा वेगळ्यावेगळ्या ठेवून यातून काय खरेदी करता येईल याचा विचार करत बसायचा. (शेवटी तोही ‘पुणेकर’ आहेच) दुपारी सगळे दाबून झोप काढायचे. एकदा पंजाबला पोचल्यावर रात्रीचीही झोप मिळायची मारामार होणार हे सगळ्यांनाच माहीत होत. संध्याकाळी सगळे ओपन बोगीत मुक्काम ठोकायचे. डासांनी पुरतं हैराण केल्यावरच नाईलाजानं सगळे आत जायचे. बाहेर बसायला तर अफलातून मजा यायची. बाकबिक लावून अगदी बागेचा फील आणला होता. कितीतरी वेळ बाहेरची भरभर मागे पडणारी गावं बघण्यात जायचा. रात्री परत तीन पत्ती सेशन व्हायचं. उकिडवं बसून बसून पाय आखडायला लागल्यावर जेवायचा ब्रेक व्हायचा. सलाम या सगळ्या जवान आणि स्वयंपाक्यांना ज्यांनी हलत्या ट्रेनमध्ये आणि तीव्र उकाड्यामध्ये चहापानापासून जेवणापर्यंतची सगळी सोय उत्तमपणे केली होती. या लोकांची स्वतःची राहायची सोय काही फार चांगली नव्हती; पण आपल्या ‘साब’ आणि ‘मेमसाब’साठी हे लोक अक्षरशः काहीही करतात.

ट्रेनमध्ये मजेदार गोष्टी घडायच्या. ती जरी घरासारखी बनवली असली, तरी प्रत्यक्षात काही ते घर नव्हतं. घरी लांब हातपाय करून आळोखेपिळोखे द्यायची सवय होती. इथंही त्याच स्टाईलनं आळोखेपिळोखे दिल्यामुळे दोन-तीन वेळा बर्थवर डोकी आणि हातपाय आपटून झाले. चार-पाच दिवसांनंतर साध्या लाकडाच्या बेडवर झोपल्यावरही स्वर्गसुख वाटलं. कमीत कमी तो ऐसपैस आणि न हलणारा तरी होता. ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतरही कितीतरी तास आपण मागेपुढे हलत आहोत असं वाटायचं. चालत्या ट्रेनमध्ये स्नान हा तर अजबच प्रकार होता. स्नान संपेपर्यंत ‘गेट सेट गो’ पोझिशनमध्ये उभं राहावं लागायचं- नाहीतर पडायला व्हायचं. आणि त्या टीचभर बाथरूममध्ये सगळे कपडे चढवून बाहेर येणं तर दिव्यच होतं; पण भयंकर उकाड्यामुळे अंघोळ करायला मिळतीये, साबण लावायला मिळतोय, चार-पाच मग पाणी अंगावर ओतायला मिळतंय यातच समाधान वाटायचं. प्रत्येक स्टेशनवर थांबून जवान पाणी भरायचं काम करायचे. कधी नळ, कधी अगदी हातपंपावरूनही भरावं लागायचं. ते कष्ट बघून मी प्रत्येक मग पाणी खर्च करताना विचार करायचे.

या प्रवासात बरंच काही शिकायला मिळालं. प्रत्येक लहानलहान गोष्टींची किंमत कळली. आपल्याला सगळंच किती आरामात आणि फुकटात मिळालं आहे, हे लक्षात आलं. लहानलहान गैरसोयींवरून माझी होणारी चिडचिड आणि कितीही गैरसोय झाली, तरी एक अवाक्षरही न काढता हसत हसत adjust करणारे जवान आणि इतर लोक बघून मला किती लांबचा प्रवास अजून करायचा आहे ते समजलं. सततचे फोन, वरून येणारी प्रेशर्स, वेळेच्या चौकटीतली कामं, अपुरी झोप, शारीरिक श्रम या सगळ्यातून आराम मिळाला हीच इतकी मोठी गोष्ट होती, की त्यापुढे हे सगळं क्षुल्लक होतं. एकमेकांना सांभाळून घेत, स्वभाव माहिती करून घेत, मजामस्ती करत चार-पाच दिवस संपलेसुद्धा.

शेवटच्या संध्याकाळी मी एकटीच ओपन बोगीत बसले होते. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाना करतकरत आम्ही पंजाबमध्ये पोचलो होतो. कधी थंड, कधी गरम, कधी छान, कधी कोंदट वातावरण, कधी मोकळं माळरान, कधी दाट झाडी, कधी शेत, कधी बकाल वस्ती, राज्याप्रमाणे बदलणारे लोकांचे चेहरे, ठेवणी, कपडे, भाषा बघतबघत येताना आपल्या देशाचा खूप खूप अभिमान वाटला. एखाद्या चित्रकाराचं चित्र सर्वांत जास्त सुंदर असलं, तरी केवळ त्याला सुंदरशी फ्रेम, त्यावर दिवा लावून ते प्रदर्शनात येऊ शकलं नाही तर त्याचं मूल्य ठसत नाही. तसं काहीसं आपल्या देशाबद्दल झालं आहे. इतर देशांइतकाच आपला भारत सुंदर आहे; पण तो जपून ठेवला गेला नाही. त्याचं मोल आपल्याला शिकवलं गेलेलं नाही. त्याबद्दल अभिमान बाळगायला आपल्याला सांगितलं गेलं नाही- कारण आपण अजूनही पैसा आणि थेरी यांतच अडकलो आहोत. शाळेत पश्चिम बंगाल, कोलकाता अशी नावं पाठ केली; पण ही नावं घेतल्यावर कुठलाही प्रदेश माझ्या डोळ्यांसमोर येतच नाही, तर त्या भागाचा इतिहास-भूगोल मी कुठल्या आधारावर लक्षात ठेवू? आपल्या शिक्षणपद्धतीत खूप मोठा बदल करणं खूप गरजेचं आहे, असं प्रकर्षानं जाणवलं. उशिरा का होईना; पण आज आसाम म्हटलं, की डोळ्यांसमोर एक प्रदेश येतो आणि तो आयुष्यभर लक्षात राहील.

पंजाबात पोचल्यापोचल्या कुठला शब्द आठवला असेल, तर तो आहे ‘सुजलाम सुफलाम!’ किती अचूक वर्णन केलं आहे. इथं उंच उंच इमारती नाहीत, गजबजाट नाही. गोंगाट नाही. लांबलांबपर्यंत पसरलेली शेती. सगळीकडे हिरवागार सुंदर. इथं खऱ्या अर्थानं श्रीमंती आहे. इथले सरदार लोक देताना विचार करत नाहीत, हिशेब करत नाहीत. मात्र, रात्रीबेरात्री एकटं फिरण्याची चैन इथं करता येत नाही. आत्तापर्यंत मी मुलगी आहे हे कधी जाणवलं नाही; पण पुणे सोडलं, की ते स्वतःला सांगावं लागतं. कारण परिस्थितीच अशी झाली आहे. अर्थात या ज्या गोष्टी आहेत, त्या मूळ अर्थातच इथल्या नसणार, असं राहूनराहून वाटतं. असो!

आमचा प्रवास छान झाला. ‘कळलंच नाही दिवस कसे गेले,’ असं मी अजिबातच म्हणणार नाही. कारण मिनिट आणि मिनिट मी जगले आहे. माझ्या आठवणीत आहे आणि पुढेही हा घालवलेला हा काळ मी विसरणार नाही. सगळ्यांनीच एकदा तरी याचा अनुभव घ्यावा, असं मी म्हणू शकत नाही. कारण माझं नशीब इतकं उत्तम आहे तसं सगळ्यांचंच असेल असं नाही! या प्रवासाचा भाग होण्याची संधी मला माझ्या नवऱ्यामुळे मिळाली. त्यामुळे त्याला खूप खूप धन्यवाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com