कबूल करायची हिंमत आहे? (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

वरकरणी आनंदी दिसणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यानं
काही काळ क्रिकेट खेळणं थांबवायचं ठरवलंय. खेळातल्या कामगिरीविषयीच्या दडपणांमुळे आपण मानसिक आजाराला बळी पडल्याची जाहीर कबुली त्यानं दिली आहे.
नामवंत खेळाडू असोत, वलयांकित जगात वावरणारे अन्य सेलिब्रिटीज्‌ असोत की सर्वसामान्य माणसं...आज जवळपास सगळ्यांनाच असह्य मानसिक ताण-तणावांना सामोरं जावं लागत आहे. हे ताण-तणाव कमी कसे करता येतील याचा विचार करू या... ग्लेनच्या निमित्तानं!

वरकरणी आनंदी दिसणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यानं
काही काळ क्रिकेट खेळणं थांबवायचं ठरवलंय. खेळातल्या कामगिरीविषयीच्या दडपणांमुळे आपण मानसिक आजाराला बळी पडल्याची जाहीर कबुली त्यानं दिली आहे.
नामवंत खेळाडू असोत, वलयांकित जगात वावरणारे अन्य सेलिब्रिटीज्‌ असोत की सर्वसामान्य माणसं...आज जवळपास सगळ्यांनाच असह्य मानसिक ताण-तणावांना सामोरं जावं लागत आहे. हे ताण-तणाव कमी कसे करता येतील याचा विचार करू या... ग्लेनच्या निमित्तानं!

माझ्या शाळकरी वयातली गोष्ट. तेव्हाचं एक दृश्य मला चांगलंच आठवतंय. ते दृश्य म्हणजे पुण्यातले प्रसिद्ध सराफ ‘पु. ना. गाडगीळ’चे सर्वेसर्वा दाजीकाका गाडगीळ आणि ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे प्रमुख रघुनाथराव चितळे रस्त्यानं चालत जाताना दिसायचे. धोतर-कोट-टोपी अशा पेहरावात या दोन असामी अगदी रुबाबदार दिसायच्या. या दोघांनाही कार घेणं अगदीच सहजशक्य होतं; पण ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ ही म्हण ते रोजच्या जीवनात कटाक्षानं अमलात आणायचे.
सूट आणि गळ्याजवळ मस्तपैकी ‘बो’ लावून मोठ्या कारच्या पुढच्या सीटवर बसून जाताना ज्येष्ठ उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर दिसायचे तेव्हाही कमाल वाटायची. त्यांना ते सगळं अतिशय शोभून दिसायचं. या तिन्ही व्यक्तींचा रुबाबदारपणा मनावर कायमस्वरूपी छाप पाडणारा होता.

गेल्या काही वर्षांत चित्र आमूलाग्र बदललं आहे. आज ज्याच्या त्याच्या घराखाली कार दिसू लागली आहे. यातल्या किती जणांनी केवळ ‘माझं सगळं काही झकासपैकी सुरू आहे’ हे दाखवण्यासाठी कार घेतली आहे आणि कुणी खरंच आपली ऐपत आहे म्हणून घेतली आहे याचा मात्र अंदाज लागत नाही. आलिशान कारच्या वातानुकूलित वातावरणातसुद्धा अनेकांना दरदरून घाम फुटल्याची उदाहरणं मला माहीत आहेत. थोडक्यात, प्रत्यक्षातली स्थिती-परिस्थिती आणि वेगवान काळामुळे जगण्‍याशी करावी लागणारी स्पर्धा अशा विसंगत वातावरणात आपण आज जगत आहोत आणि विविध प्रकारच्या ताण-तणावांना सामोरे जात आहोत.

हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल! वरकरणी आनंदी असल्याचं भासवत जगणाऱ्या ग्लेननं, आपल्याला मानसिक आजार असल्याचं कबूल करत क्रिकेट खेळणं काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वरून आनंदी, उत्साही आणि शांत दिसणारा ग्लेन दडपणांनी आतून इतका बेजार झालेला असेल याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती.

मानसिक आजार हा गंभीर विषय केवळ खेळाडूंपुरता मर्यादित आहे का, असा प्रश्न मी मानसिक स्वास्थ्याविषयी कार्य करणाऱ्‍या डॉ. मीनल सोहनी यांना विचारला असता त्या म्हणाल्या : ‘‘खरं सांगायचं तर हा विषय खेळाडूंपुरता मर्यादित नक्कीच नाही. मानसिक आजार समाजात सर्वदूर पसरलेला आढळतो. मात्र, तसं कबूल करायची हिंमत फार कमी लोकांमध्ये दिसून येते.’’

चिंता भेडसावते
सर्वोच्च स्तरावर खेळताना खेळातून येणारे ताण-तणाव असह्य झाल्याच्या घटना फक्त क्रिकेटमध्येच घडलेल्या नाहीत. तब्बल ११ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्यावर स्वीडनच्या बीयॉन बोर्ग यानं असह्य ताणाचं कारण देत टेनिसपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी त्याचं वय केवळ २६ होतं. बऱ्याच खेळाडूंना मानसिक ताण असह्य झाल्यावर त्याचा दुष्परिणाम शरीरस्वास्थ्यावर झाल्याचंही अभ्यासाअंती लक्षात आलेलं दिसतं. मग दुखापतीनं बेजार झाल्यावर खेळ थांबवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, याचं मूळ कारण ‘दुखापत’ हे नसून ‘मानसिक ताणानं निर्माण झालेला आजार’ हे असतं.
डॉ. सोहनी म्हणाल्या :‘‘ताण प्रत्येक व्यक्तीलाच असतो. मात्र, खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीच्या अपेक्षांचं ओझं बाळगत खेळावं लागत असल्यानं इतरांच्या आणि त्यांच्या ताणात फरक असतो. खेळाडूंकडे सगळ्या क्रीडारसिकांचं लक्ष लागलेलं असतं. त्यांची प्रत्येक कृती बारकाईनं पाहिली जाते. चांगल्या कामगिरीनंतर खेळाडू हीरो ठरतात, तर खराब कामगिरीनंतर त्यांच्यावर कठोर टीका होते. हे सगळं पेलणं-झेलणं खूप कठीण असतं. परिणामी, याचा प्रचंड ताण खेळाडूंना सातत्यानं सहन करावा लागतो.’’

आपल्याला मानसिक आजार आहे हे प्रांजळपणे कबूल करताना ग्लेन जे सांगितलं आहे ते असं :‘‘मी वरकरणी आनंदी असल्याचं भासवत होतो; पण आतून पिचलेला होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सततच्या तणावपूर्ण वातावरणात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विचार करून मी थकून गेलो होतो. अपयश आल्यावर दु:ख किंवा झालेला त्रास व्यक्त करत नव्हतो व त्यामुळे माझ्या मनावरचा ताण वाढत गेला. सहन करणं अशक्य झालं आणि मी क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.’’

मलाही त्रास झाला : विराट
सन २०१४ च्या इंग्लंडदौऱ्यादरम्यान सातत्यानं धावा करण्यात अपयश आल्यानं विराट कोहलीही त्रस्त झाला होता.
इंदूरमधल्या भेटीत या विषयावर बोलताना विराट म्हणाला :
‘‘खोटं कशाला बोलू... सन २०१४ च्या इंग्लंडदौऱ्यात मलाही खूप निराशा जाणवत होती. कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित धावा करता येत नव्हत्या. मी एकसारखा बाद होत होतो. त्या वेळी मानसिक त्रास काय असतो, अपेक्षांच्या ओझ्याचा मनावर काय परिणाम होतो हे मी अनुभवलं आहे. याचा विचार करता, आपल्याला मानसिक आजार असल्याची कबुली देऊन ग्लेननं मोठंच धैर्य दाखवलं आहे.
सातत्यानं चांगली कामगिरी करण्याचं दडपण खेळाडूला किती थकवत असतं आणि सर्व प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा निराशा कशी घेरते, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडूच समजू शकतो.
पूर्वीच्या काळी दोन खेळाडू एका खोलीत असायचे. गप्पांच्या माध्यमातून सुख-दु:ख एकमेकांमध्ये वाटली जायची. आता आम्हां सगळ्यांना स्वतंत्र खोली असते. खासगीपण जपण्याच्या दृष्टीनं हे रास्तच असलं तरी जेव्हा एखादा खेळाडू निराशाग्रस्त असतो तेव्हा त्याला एकटं राहण्याचे किती तोटे असतात ते कळतं. सांघिक खेळ खेळत असल्यास मनातली भीती-निराशा बोलून दाखवायला संघात किंवा वैयक्तिक खेळ खेळत असल्यास व्यवस्थापनात मोकळीक पाहिजे. संवाद साधण्यासाठी तसं वातावरण असणं खूप गरजेचं असतं.’’

समस्या गंभीर आहे
मानसिक आजाराचे सर्वाधिक बळी ‘आयटी’ म्हणजेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, असं तज्ज्ञांशी बोलताना समजलं.
एका दिवसात हे लोक अंदाजे ३६ पानं कॉम्प्युटरवर चाळतात आणि ४० पेक्षा जास्त वेबसाइट स्क्रोल करतात. यांचं वेळापत्रक त्यांच्या किंवा त्यांच्या ऑफिसच्या मर्जीनुसार नसतं तर ते ज्यांच्याकरता काम करत असतात त्या क्लायंटवर म्हणजेच ग्राहकावर अवलंबून असतं. ग्राहक अमेरिकेतला असला तर तो त्याच्या सोईनं चर्चेची वेळ ठरवतो. तिकडची सोईची वेळ ही भारतीय वेळेनुसार मध्यरात्र उलटून गेल्यावरची असते. कृत्रिम प्रकाशात काम करायचं आणि बऱ्याच वेळा अबरचबर खायचं, सतत चहा-कॉफी प्यायची आणि डेडलाईनच्या प्रचंड दडपणाखाली रोज जगायचं...या जीवनशैलीचा भयानक दुष्परिणाम मनावर होत असतो.
तुमच्या-माझ्यासारखी साधी माणसंही या परिस्थितीपासून दूर नाहीत, हेही आपण लक्षात घेतलेलं बरं. आपण रोजच्या जीवनात किती अस्वस्थ असतो हे एकदा आठवून पाहा! साधं यूट्यूबवर एखादं गाणं बघायचं-ऐकायचं झाल्यास आणि इंटरनेटचा वेग मनासारखा नसेल तर ते ‘बफर’ होत असताना आपली चलबिचल होते की नाही? कधी एखाद्या जागी दोन मिनिटं बसायचं झालं तरी आजकाल सगळे जण आपापला मोबाईल काढून काहीतरी बघत बसतात. तरुण मुलं तर बहुतेक वेळा इअरफोन घालूनच वावरताना दिसतात. प्रवासातही कुणी कुणाशी मोकळेपणानं बोलताना दिसत नाही. इतकंच काय, पालकही लहानग्यांना शांत बसवण्यासाठी, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईलवर किंवा टॅबवर काही ना काही तरी बघायला देतात आणि मग ते मूल त्यात दंग झालेलं दिसतं. हे सगळंच आपल्याला चुकीच्या वाटेवर नेणारं आहे असं नाही वाटत तुम्हाला?

उपाय आहेत
तसं पाहायला गेलं तर निराशेपासून किंवा मानसिक आजारापासून
दूर राहण्यासाठीच्या अतिशय साध्या-सोप्या उपाययोजना आहेत.
डॉ. सोहनी सांगतात : ‘‘अनप्लग्ड्‌ राहणं हा एक महत्त्वाचा उपाय. म्हणजे काय? तर मोबाईल-फोन, टीव्ही, कानाला फोन लावून म्युझिक ऐकणं, कॉम्प्युटर आदी गोष्टींपासून काही काळ तरी स्वत:ला पूर्णतः दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. इतका सगळा ताण-तणाव सहन करण्याची आपल्या मेंदूची क्षमता नाही हे लक्षात घ्यायला हवं. मेंदूला कामात सतत गर्क न ठेवता त्याला थोडी विश्रांती देणं गरजेचं असतं. तणाव वाढत गेला तर झोपलेल्या अवस्थेतही आपला मेंदू व्यग्र राहण्याची शक्यता असते आणि ही अवस्था धोकादायक आहे.
ताप आल्यावर आपण ज्याप्रमाणे डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेतो, उपचार करून घेतो, त्याचप्रमाणे ताण असह्य व्हायला लागला तर आणि त्याचा रोजच्या जीवनावर परिणाम व्हायला लागला तर त्याची प्रांजळपणे कबुली देत डॉक्टरांकडे जाणं फायद्याचं ठरतं.’’

इंदूरला विराटची भेट झाली तेव्हा तो अतिशय ताजातवाना, आनंदी दिसत होता. असं ताजं, तरतरीत दिसण्याचं कारण काय यावर आमची चर्चा झाली आणि रोजच्या ताण-तणावांपासून काही काळ लांब जाणं किती आवश्यक आहे, यावरही आम्ही बोललो. विराट म्हणाला : ‘‘खेळाडू असो वा कोणतंही काम तन्मयतेनं करणारी अन्य व्यक्ती असो, वेळापत्रकाची आखणी नितांत गरजेची असते, तसंच
कामातून काही काळ थोडासा विसावाही अत्यंत गरजेचा असतो. माझं आणि अनुष्काचं रोजचं आयुष्य खूप व्यग्र आणि दगदगीचं असतं.
स्वतःच्या अस्तित्वाचंही भान राहू नये अशी ती धावपळ असते.
अशा वेळी सुटी घेऊन ती शांततापूर्ण वातावरणात, निसर्गाच्या सान्निध्‍यात घालवण्याला आम्ही प्राधान्य देतो. अशा ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क नसेल तर उत्तमच आणि ते असलं तरी आम्ही आमचे मोबाईल बंद करून टाकतो. आम्ही दोघं नुकतेच भूतानला गेलो होतो. हिमालयाच्या कुशीत. एकदम शांत जागी. आम्हा दोघांना ओळखणारं तिथं कुणीही नव्हतं. आम्ही पायी भटकंती केली. साध्यासुध्या झोपडीवजा घरात राहणाऱ्या लोकांना भेटलो. त्यांनी प्रेमानं दिलेला स्थानिक चहा प्यायलो. वाहत्या पाण्याचा खळखळाट,
झाडा-पानांतून वारा वाहताना येणारा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट... सगळंच अद्भुत होतं. निसर्गात, अशा शांत जागी काही दिवस घालवले की मग स्वत:ची ओळख नव्यानं पटायला लागते आणि मग ते समाधान, तो आनंद चेहऱ्यावर विलसू लागतो.’’

सरतेशेवटी इतकंच सांगावंसं वाटतं, की मानसिक ताण-तणाव हे सगळ्यांनाच असतात. त्यातून सुटका करून घेण्याचे सरळ मार्गही आहेत. ते जाणून घेऊन त्यानुसार उपाययोजना करायला पाहिजे.
त्यातूनही ताण-तणावांचं, भीतीचं प्रमाण वाढत चालल्याचं लक्षात येताच डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला लागलीच घ्यावा.
शरीराला होणाऱ्या जखमा, इजा अथवा अन्य त्रास चटकन्‌ दिसून येतो. मात्र, मानसिक आजार इतरांना सहजपणे दिसेलच असं नाही. तो ज्याचा त्यालाच ठाऊक असतो. तेव्हा आतून त्रास होत असला तर ‘भय्या, ऑल इज वेल’ असं भासवायची गरज नाही. कारण, तसं करताना मन थकून जातं आणि मग खऱ्या अडचणी डोकं वर काढायला लागतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sunandan lele write australia glenn maxwell cricket article