दोन वेगळ्या कर्णधारांची गरज (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटकरता दोन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार व्हायला हवाय. एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माचा विचार करायला हरकत नाही.

या आठवड्यातला रविवार (ता. १४ जुलै) असा होता, की खेळावर प्रेम करणाऱ्या लोकांचे डोळे तिरळे व्हायची वेळ आली होती. लॉर्डस् मैदानावरचा इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड विश्वकरंडक अंतिम सामना सामना प्रत्येक क्षणाला रंग बदलत असताना तिकडं विंबल्डनला नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडररचा सामना लोकांचा रक्तदाब वाढवत होता. पूर्वी काही चित्रपटांच्या जाहिरातीत लिहिलं जायचं बघा, ‘इशारा : कृपया कमजोर हृदयाच्या माणसांनी बघू नये!’... अगदी तसा हा प्रकार होता. दोनही सामन्यांतल्या निकालानंतर लोक हळहळले. दैव बलवत्तर असलं, तर काहीही घडू शकतं हेच इंग्लंडच्या विश्वविजेतेपदातून दिसून आले. अफलातून सामने बघितल्याचं सुख उपभोगल्यानंतरही न्यूझीलंड आणि फेडररला विजेतेपद मिळालं नसल्याचं दुःख लोकांना सतावत राहिलं. खेळाच्या मैदानावर अमाप सुख आणि अपरंपार दुःख एकाच वेळी कसं नांदत असतं हे बघून मनाला चुटपुट लागली. जोकोविच आणि इंग्लंड संघाचं अभिनंदन करावं, का फेडरर आणि न्यूझीलंडचं सांत्वन करावं अशा द्विधा विचारांत आपण सगळे अडकलो होतो.

अंतिम सामना बघत असताना एक मजेदार पोस्ट वाचनात आली, ज्यात म्हटलं होतं : ‘लॉर्डस् मैदानावरचा विश्वकरंडक अंतिम सामना मनापासून बघणं म्हणजे प्रेम केलेल्या मैत्रिणीच्या लग्नात भात वाढल्यासारखं आहे.’ बऱ्या‍च क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच प्रश्न घर करून असणार, की भारतीय संघ लॉर्डस् मैदानावर अंतिम सामना का खेळत नव्हता? भावना बाजूला ठेवून या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं झालं आहे.

डळमळीत बीसीसीआय
न्यायालयीन वादांमुळं गेल्या दोन वर्षांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ डळमळीत झालं आहे. म्हणायला गेलं, तर अध्यक्ष, सचिव, खजिनदार सगळे आहेत; पण त्यातला रुबाब किंवा रया गेली आहे. मला आठवतं, की सौरव गांगुली कर्णधारपदी राज्य करत असताना जगमोहन दालमियांसारखा तगडा अनुभवी क्रिकेट संयोजक बीसीसीआयच्या मानाच्या पदी होता. गांगुली कितीही आक्रमक असला, तरी दालमियांची गांगुलीला ठणकावून सांगण्याची कुवत होती. तीच गोष्ट महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत सांगता येईल. धोनी कितीही ताकदवान कर्णधार असला, तरी एन. श्रीनिवासन यांचं म्हणणं तो आदरानं ऐकून घ्यायचा. आत्ताच्या घडीला रवी शास्त्री आणि विराट कोहलीसारख्या जात्याच आक्रमक माणसांना वेसण घालायला कोण आहे बीसीसीआयमध्ये? कोणत्या बीसीसीआय पदाधिकाऱ्याचा रवी शास्त्री किंवा विराट कोहलीला बीसीसीआय ऑफिसमध्ये बोलावून केलेल्या चुकांबद्दल खडे बोल सुनावण्याचा तो वकूब आहे?

डळमळीत बीसीसीआयमुळं अत्यंत कमकुवत निवड समिती काम करताना दिसत आहे. कर्णधार विराट कोहली किंवा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीची दादागिरी बाजूला ठेवून योग्य संघाची निवड करण्याची क्षमता सध्याच्या निवड समितीत आहे, असं अजिबात वाटत नाही. निवड समितीनं विश्वकरंडकाकरता केलेली संघनिवड आणि त्याचं स्पष्टीकरण दोन्ही हास्यास्पद वाटले. रिषभ पंतला दुसरा विकेटकीपर म्हणून संघात पहिलं स्थान न देण्याचा निर्णय निवड समितीचा होता, का संघ व्यवस्थापनानं लादलेला होता हे समजलं पाहिजे. जर रिषभ पंत मूळ संघात नव्हता, तर तो संघात आल्यावर थेट मानाच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याइतपत तो परिपक्व नक्कीच नव्हता. निवड समितीनं चौथ्या क्रमांकाकरता विजय शंकरला प्राधान्य देताना काय विचार केला हे समजण्यापलीकडचं आहे. श्रेयस अय्यरला संधी का नाही मिळाली? किंवा विजय शंकर दुखापतीनं स्पर्धेतून बाहेर पडल्यावर अजिंक्य रहाणेचा विचार का केला गेला नाही? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, की निवड समितीच्या सदस्यांना कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीसमोर तोंड उघडून धडधडीत बोलता येत नाही.

एक उदाहरण सांगतो. सन २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याकरता संघनिवड करायला निवड समितीची बैठक झाली होती- ज्यात कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा अर्थातच हजर होता. मुकाबला स्टीव्ह वॉच्या तगड्या ऑस्ट्रेलियन संघासोबत असल्यानं भारतीय संघात कोणत्या गोलंदाजांना घ्यायचं यावरून ऊहापोह चालू होता. अध्यक्ष सय्यद किरमाणी, संजय जगदाळे, किरण मोरे, प्रणव रॉय, कीर्ती आझाद या निवड समितीसोबत गांगुली आणि प्रशिक्षक जॉन राईट बैठकीला हजर होते. हैदराबादला १५ नोव्हेंबर २००३ रोजी सुरू झालेली बैठक सहा तासांनंतर संपली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी निवड समिती आणि कर्णधार प्रशिक्षक जोडीत एकमत झालं आणि संघाची निवड जाहीर झाली. त्याच कमाल बैठकीतला हा किस्सा आहे.

बैठकीत संघात कोणत्या वेगवान गोलंदाजांना घ्यावं यावरून निवडीवर चर्चा चालू असताना किरण मोरे यांनी एकदम तरुण गोलंदाज इरफान पठाणला संघात घेण्याचा आग्रह धरला. ‘‘काहीतरीच काय किरण?... ऑस्ट्रेलियासारख्या सर्वांत आव्हानात्मक दौऱ्या‍वर १९ वर्षांच्या पोराला संघात वेगवान गोलंदाज म्हणून कसं घेऊन जाता येईल?...इरफान पठाण बडोद्याचा आहे म्हणून किरण तू आग्रह धरतो आहेस असं मला वाटतं,’’ गांगुली म्हणाला. ‘‘माझ्यावर विश्वास ठेव सौरव. इरफान चांगला होतकरू गोलंदाज आहे आणि भारतीय ‘अ’ संघासोबत भरपूर क्रिकेट खेळला आहे...झहीर खान, अजित आगरकर आणि आशिष नेहराबरोबर राहून तो शिकेल आणि नंतर तोच अनुभव कामाला येईल,’’ किरण मोरेनं आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. तरीही सौरवला मान्य होत नव्हतं. शेवटी सौरवनं बैठकीच्या मिनिट्‍समध्ये लिहायला लावलं, की ‘मला हा निर्णय मान्य नाही; परंतु किरण मोरे यांच्या आग्रहास्तव इरफानला संघात घेतलं जात आहे.’ तशी नोंद करून इरफान दौऱ्यावर गेला. प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाल्यावर अचानक इरफान पठाणला कसोटी सामन्यात खेळवायची वेळ आली तेव्हा त्याच्या चेंडू स्विंग करण्याच्या कलेवर सौरव खूश झाला. ज्या इरफानला सौरवनं विरोध केला, त्याच्यातली गुणवत्ता बघून नंतर त्याच कर्णधारानं इरफानला भरपूर संधी दिली. दौऱ्यावरून परत आल्यावर सौरवनं किरण मोरेला फोन करून निवड समितीच्या बैठकीत केलेल्या विरोधाबद्दल माफी मागितली आणि किरण मोरेच्या गुणवत्ता हेरण्याच्या क्षमतेचं कौतुक केलं होतं.
दुर्दैवानं आत्ताच्या निवड समितीमध्ये कोहलीला समजावून सांगून योग्य निवड करायची धमक आहे असं वाटत नाही. थोडक्यात सांगायचं, तर खरंच निवड समितीनं विश्वकरंडकाकरता संघ निवडलेला असला, तरी ती चूक होती आणि समजा कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या आग्रहानं संघनिवड केलेली असली, तर ती घोडचूक आहे.

सतत बदल मारक ठरले
गेली दोन वर्षं भारतीय संघाचे बहुतांशी सामने जवळून बघितल्यावर स्पष्ट जाणवतं, की संघ व्यवस्थापन अंतिम ११ जणांच्या संघात आणि फलंदाजीच्या क्रमवारीत करत असलेले सततचे बदल संघाच्या प्रगतीकरता मारक ठरले आहेत. मुद्दा सविस्तर मांडतो म्हणजे करण्यात आलेले बदल किती चुकीचे ठरले हे तुम्हाला समजेल.
कसोटी संघ असो, वा एकदिवसीय संघ विराट कोहली वगळता एकही फलंदाज सातत्यानं संघात खेळलेला नाही. शिखर धवन, लोकेश राहुल आणि एम. विजयला सलामीच्या जागेकरता सतत बदललं गेलं. त्यांच्या कामगिरीत सातत्य नव्हतं, म्हणून त्यांना बदललं गेलं, असं संघ व्यवस्थापनाचं म्हणणं असेल, तर मग चेतेश्वर पुजाराचं काय? कोहलीइतकाच चेतेश्वर पुजारा कसोटी संघातला महत्त्वाचा फलंदाज असताना त्यालाही संघातून वगळण्याचा घाट कर्णधार कोहली आणि रवी शास्त्रीनं मिळून का घातला याला काही कारण असूच शकत नाही. कोहली- शास्त्री चेतेश्वर पुजाराला वगळण्याच्या निर्णयाचं समर्थन करू शकतात, तर बाकीच्यांचं काय बोलायचं? अजिंक्य रहाणेलासुद्धा काहीही कारण नसताना संघातून वगळण्याचा निर्णय घेतला गेला. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की सर्व फलंदाज मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले.

फलंदाजीची क्रमवारी सतत बदलत ठेवल्याचा भयानक दुष्परिणाम भारतीय संघातल्या फलंदाजांना सहन करावा लागला आहे. मान्य आहे, की मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळाच्या अवस्थेनुसार फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करावे लागतात. तरीही त्याला क्रिकेटचं लॉजिक नसलं, तर तेच बदल मारक ठरतात. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या‍तल्या एकदिवसीय मालिकेत संघ व्यवस्थापनानं महेंद्रसिंह धोनीला बऱ्याच वेळा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं. धोनीनं अत्यंत चांगली फलंदाजी करून संघाला गरज असताना करून विजयाचे मार्ग शोधले होते. इतकंच नाही तर धोनी मालिकेचा मानकरी ठरवला गेला होता. विश्वकरंडक मोहिमेला जाताना धोनीनं आपण पाचव्या क्रमांकावर खेळणार असा विचार करून मानसिक तयारी केली होती. मात्र, या स्पर्धेत संघ व्यवस्थापनानं धोनीला बहुतांशी वेळेला सातव्या क्रमांकावर खेळवलं. संघाची अवस्था नाजूक झाल्यावर धोनीला फलंदाजीला पाठवणं म्हणजे धोनीचा वापर आगीच्या बंबासारखा केल्यासारखं वाटलं. संघ अडचणीत पूर्ण सापडल्याशिवाय धोनीला पाठवायचं नाही, असंच जणू संघ व्यवस्थापनानं ठरवलं होतं.

केदार जाधवला तर तांदूळ निवडताना खडा बाजूला करावा तसं बाजूला केलं गेलं. मूळ मधल्या फळीतला फलंदाज म्हणून संघात आलेल्या केदार अगोदर बाकी फलंदाजांना पाठवल्यानं केदारच्या आत्मविश्वासाला जो तडा गेला त्याला संघ व्यवस्थापनच जबाबदार आहे. न्यूझीलंडसमोरच्या उपांत्य सामन्यात रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकनंतर धोनीला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय तर अनाकलनीय होता.

धोनीला काय झालं?
धोनीनं यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज केली असं म्हणता येणार नाही. त्यानं एकेरी धावा घ्यायचा पुरेसा प्रयत्न केला नाही- ज्यानं स्ट्राईक रोटेट झाला नाही आणि अपेक्षित धावगती सतत वाढत राहिली. एक नक्की आहे, की उत्तम लयीत नसतानाही धोनीनं संघाला नितांत गरज असताना खेळपट्टीवर उभं राहण्याचं दाखवलेलं धैर्य कमाल होतं. धोनी निवृत्त होणार का, या प्रश्नाचं उत्तर फक्त धोनीच देऊ शकतो. त्याच्या एकंदर स्वभावाचा अंदाज घेता धोनी मिरवण्याकरता शेवटचा सामना खेळेल असं वाटत नाही. तो कदाचित भारतापासून लांब सुट्टीवर जाऊन अचानक चमत्कारिक घोषणा करायची शक्यता नाकारता येत नाही- जेणेकरून माध्यमांना त्याच्यापर्यंत पोचता येऊ नये. धोनीच्या शरीरानं क्रिकेट खेळताना झेललेले आघात अंतिम निर्णय घ्यायला मदत करतील, असंही वाटतं.

उपाय आहेत
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय विराट कोहली आणि रवी शास्त्रीची दादागिरी नियंत्रणाखाली येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे- जेणेकरून संघावर त्याचा योग्य वचक राहील. तिसरी सर्वांत महत्त्वाची शक्यता म्हणजे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटकरता दोन वेगवेगळे कर्णधार नेमण्याचा विचार व्हायला हवाय. एकदिवसीय आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माचा विचार करायला हरकत नाही असंही वाटतं.

विश्वकरंडक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी न झाल्यानं संजय बांगरला दोषी ठरवून काढणं म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार होईल. विराटनं प्रचंड धावा केल्या किंवा पुजारानं शतकांची माळ लावली किंवा रोहित शर्मानं पाच शतकं ठोकून विश्वकरंडक गाजवला, तेव्हा संजय बांगरनं केलेल्या प्रशिक्षणाचं कौतुक झाली नाही. मग एका सामन्यातल्या खराब खेळानंतर संजय बांगरला काढण्याचा विचार खूप चुकीचा होईल. संघाची कामगिरी खरोखरच सुधारायची असेल, तर वरवरचे नाही तर सखोल आणि दीर्घकालीन विचार करून उपाययोजना कराव्या लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com