मनं जोडण्यासाठी खेळाचा राजमार्ग (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
Sunday, 18 August 2019

जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर.

जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर.

काश्मीर खोऱ्यातल्या उरी गावात १८ सप्टेंबर २०१६ रोजी पहाटे भयानक घटना घडली. पाकिस्तानातून सीमा पार करून घुसलेल्या अतिरेक्यांनी कालापहाड ब्रिग्रेडवर हल्ला करताना ३ मिनिटांत १५-१७ हातबाँम्ब टाकून तंबूत झोपलेल्या १७ जवानांची हत्या केली. या घटनेचे अत्यंत तीव्र प्रतिसाद उमटले. पुढच्या काही दिवसांतच भारतीय लष्करानं धाडसी पाऊल उचलताना पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे तळ उद्‍ध्वस्त करताना सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिलं.

तसं बघायला गेलं, कमालकोट म्हणा किंवा उरी म्हणा इथले रहिवासी नेहमी भारताच्या बाजूनं उभे राहिले आहेत. मात्र, उरी हल्ल्यानंतर परिती जरा बिघडली होती. स्थानिक लोकांनी अतिरेक्यांना मदत तर केली नाही ना, अशी शंका होती. त्यामुळं लष्कर आणि रहिवासी यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काश्मीर खोऱ्यात चांगलं समाजकार्य करणाऱ्या ‘असीम’ संस्थेला कालापहाड ब्रिगेडनं हाच तणाव कमी करायला काय करता येईल असं विचारलं होते. ‘असीम’च्या कार्यकर्त्यांनी मन जुळायला खेळाची स्पर्धा भरवायचा सल्ला दिला.

स्पर्धा भरवायला कालापहाड ब्रिगेडनं हसतहसत तयारी दाखवली, तरी किती प्रतिसाद मिळेल ही शंका होती. झालं उलटंच! उरीच्या आसपासच्या असंख्य छोट्या गावांतून तरुण मुलांनी आपापले संघ स्थापन केले आणि एक ना दोन तब्बल ४८ संघांनी उरी प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेतला. कालापहाड ब्रिगेडच्या सुंदर मैदानावर अंतिम सामना भरवला गेला. लष्कराच्या तळावर चांगल्या खेळ सुविधा असून, जिथं स्थानिक लोक अजिबात फिरकायचे नाहीत, त्याच क्रिकेट मैदानावर उरी प्रीमियर लीगचा अंतिम सामना बघायला सात हजारपेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली. बघताबघता स्थानिक जनता आणि लष्करातला तणाव हवेत विरून गेला.
अंतिम सामन्यानंतर मला ‘असीम’च्या कार्यकर्त्यांसोबत उरीला जायची संधी मिळाली. उरीच्या निसर्गसौंदर्यानं मी घायाळ झालो. स्थानिक खेळाडूंशी वार्तालाप केल्यावर पुढची योजना पक्की झाली आणि उरी प्रीमियर लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या निवडक खेळाडूंचा संघ पुण्यात बोलवायचा विचार पक्का झाला. कालापहाड ब्रिगेडनं खेळाडूंच्या प्रवासाची सर्व व्यवस्था चोख केली आणि उरीचा संघ पुण्यात दाखल झाला. डेक्कन जिमखाना, पीवायसी, पूना क्लब आणि वेंगसरकर अकादमीनं पुढं पाऊल टाकले आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणाची आणि एका सामन्याची सोय आनंदानं केली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं उरीच्या संघाला गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमची सैर करवली. असीमच्या कार्यकर्त्यांनी खेळाडूंना सिंहगडावर नेऊन पिठलं-भाकरीची मेजवानी आयोजित केली. शेवटचा सामना बीएमसीसी मैदानावर झाला- ज्यात पुणे संघाचा कर्णधार अमेय श्रीखंडेनं सामना जिंकूनही पुणे-उरी फ्रेंडशिप कप उरीच्या कर्णधाराच्या हाती देत मैत्रीची साथ घातली. खेळातून मनं जोडण्याचा उपक्रम इतका यशस्वी झाला, की उरीहून आलेल्या खेळाडूंनी आपापल्या गावी जाऊन ‘असीम’ संस्थेच्या कामाची वाहवा केली आणि पुण्यातल्या त्यांच्या क्रिकेट सहलीच्या कहाण्या सगळ्यांना चवीनं सांगितल्या. इतकंच नाही, तर महेंद्रसिंह धोनी नुकताच उरीला गेला असताना त्यानंही या संघाशी वार्तालाप केला.

या सर्व उपक्रमातून इतकंच परत एकदा समजून आलं, की दुभंगलेली मनं जोडायला खेळाचा राजमार्ग किती झकास आहे. भारत सरकारनं धडाडीचं पाऊल उचलताना जम्मू-काश्मीरला लागू असलेलं कलम ३७० रद्द केलं. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पहिल्यांदाच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचं जोरदार सेलिब्रेशन झालं असताना, आता पुढं मनं जोडण्याकरता खेळाचा राजमार्ग कसा अवलंबता येईल याचा विचार केंद्र सरकार गांभीर्यानं करत आहे.  
याच संदर्भात मी जम्मू- काश्मीर क्रिकेटमध्ये भरीव कार्य करणारा भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणशी चर्चा केली.  

आव्हान स्वीकारले
बडोदा क्रिकेट संघटनेच्या राजकारणाला कंटाळलेल्या इरफान पठाणचा विचार चालू होता, की भारतातल्या स्पर्धात्मक क्रिकेटला रामराम ठोकून परदेशातल्या टी-२० स्पर्धा खेळायच्या. त्याचवेळी जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिक अली बुखारी वेगळा सकारात्मक विचार करून क्रिकेटमध्ये जान ओतायचा प्रयत्नात होते. ‘‘बुखारी सरांनी मला बैठकीला बोलावलं, तेव्हा बीसीसीआयचा प्रतिनिधी आणि कपिल देवसुद्धा होते. एकीकडं मला परदेशातल्या टी-२० स्पर्धा खेळून क्रिकेटचा आनंद घेत भरपूर पैसा कमवायची संधी होती, तर दुसरीकडं जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटला विधायक वळण देण्याकरता काम करायचं आव्हान होते. सुखासीन आयुष्यापेक्षा मला आव्हानं नेहमीच आवडत आली असल्यानं मी जम्मू-काश्मीर रणजी संघाचा खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून काम करायला होकार दिला,’’ इरफान पठाण सांगत होता.        

‘‘काम सुरू करायला लागल्यावर मला दिसून आलं, की जम्मू-काश्मीर क्रिकेटचा पाया ट्वेंटी-२० स्पर्धांचा होता. पहिल्यांदा ते बदलावं लागलं. प्रथम स्थानिक स्पर्धांत किमान ४० षटकांचे सामने करण्यावर मी भर दिला. वयोगटातला संघ असो वा रणजी संघ, सगळीकडं जम्मूचे निम्मे खेळाडू असायचे आणि काश्मीर खोऱ्यातले निम्मे. ही विभागणी उगाचच केली होती. ज्यानं दोनही भागातल्या गुणवान खेळाडूंवर अन्याय होत होता. बुखारी सरांशी चर्चा करून ही पद्धत मोडून काढताना निवडीचा निकष फक्त गुणवत्ता आणि कामगिरी हेच असावेत- मग तो कोणत्याही भागातले असोत असा आग्रह सुरू केला,’’ सुरवातीच्या काळात आलेल्या अडथळ्यांना कसं पार केलं, हे इरफान सांगत होता.

मूलभूत बदल
जम्मू-काश्मीर भागातल्या गुणवान खेळाडूंचा शोध घ्यायला इरफाननं भाग पिंजून काढला. तब्बल चाळीस हजार खेळाडूंनी विविध क्रिकेट चाचण्यांत भाग घेतला- ज्यातून इरफान पठाणनं स्वत:च्या नजरेनं सत्तर मुलांना निवडलं. ‘‘निसर्गाचा वरदहस्त असूनही जम्मू-काश्मीर क्रिकेट मॅटिंग विकेटवर का खेळवलं जातं, हे मला पडलेलं कोडं होतं. संघटनेच्या पदाधिकाऱ्यां‍शी बोलून प्रत्येक विभागात किमान एक हिरवळीची खेळपट्टी असलेलं मैदान तयार करण्यावर मी आग्रह धरला. अजून ते काम पूर्ण झालेलं नसलं, तरी बारामुल्ला, कुपवाडा, सोप्पोरसारख्या काही जागी टर्फ विकेटसवर जम्मू-काश्मीरची मुलं क्रिकेट सातत्यानं खेळू लागली आहेत, ज्याचा मला आनंद आहे. अजून एक गोष्ट मी जाणीवपूर्वक केली- ती म्हणजे कोणत्याही संघाचं शिबिर किंवा प्रत्यक्ष सामने खेळताना संघ दौऱ्यावर गेला, की मुद्दाम जम्मूच्या मुलाबरोबर काश्मीरचा मुलगा खोली शेअर करेल, असं बघितलं. त्यामुळं दोन भागांत असलेला अनावश्यक तणाव नाहीसा झाला. आता या मोसमात मला दोन दिवसांच्या क्रिकेट सामन्यांचं संपूर्ण जम्मू - काश्मीर भागात आयोजन करायचं आहे,’’ इरफान उत्साहानं सांगत होता.  

भरपूर गुणवत्ता
जम्मू-काश्मीर विभागातल्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, हे सांगताना इरफानच्या बोलण्यातला आनंद लपत नव्हता : ‘‘मला वाटतं, पहाडी लोकांच्यात आपल्यासारख्या शहरी लोकांपेक्षा तंदुरुस्ती आपसूकच जास्त असते. त्यातून त्यांना क्रिकेटची नुसती आवड नाहीये, तर जाण जात्याच चांगली आहे. मी फक्त ती गुणवत्ता योग्य मार्गानं प्रवास करेल याकडं लक्ष देतो आहे. अशाच एका शिबिरात मी रसीख सलाम नावाच्या मुलाला गोलंदाजी टाकताना बघितलं आणि दहा चेंडूंनंतर त्याला थांबवलं आणि निवड पक्की केली- इतकी त्याची गोलंदाजीची शैली सुंदर होती. वेगवान गोलंदाजाला लागणारी सहजता त्याच्यात होती. मग फक्त शारीरिक तंदुरुस्तीवर भर द्यायला लावून रसीखला तयार केलं. त्याचंही नशीब असं, की मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघानं रसीखला आयपीएल संघात निवडलं आणि खेळवलंसुद्धा. माझ्याकरता हा मोठा आनंदाचा क्षण होता.’’  
शुभम खजुरीया, जम्मूचा कन्हैय्या वाधवान, कूपवाडाचा बासीत बशीर आणि अनंतनागचा मुश्तफा नावाचा खेळाडू यांच्याबद्दल इरफान असाच भरभरून बोलत होता. इरफाननं या गुणवान खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केल्यानं ही मुलं नॅशनल क्रिकेट अकादमीच्या शिबिरांकरता निवडली गेली आहेत. ‘‘चांगल्या मार्गदर्शनाचे दरवाजे जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटपटूंकरता उघडले जात आहेत. आता फक्त त्यांच्या मानसिकतेमध्ये आणि तंदुरुस्तीमध्ये बदल घडवण्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. गेल्या काही रणजी सामन्यांत आम्ही हरियाना आणि ओडिशा संघांना पराभवाचे दणके दिले आहेत. इतकंच काय, उत्तर प्रदेशसारख्या तगड्या संघांविरुद्ध पहिल्या डावात १०० धावांची आघाडी घेण्याची करामत करून दाखवली आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायला अजून दोन-तीन वर्षांचा वेळ लागणार आहे; पण मी आशावादी आहे,’’ इरफान पठाण केलेल्या कामाचा आढावा घेताना म्हणाला.  

खेळाचा राजमार्ग    
मनात शिरायचा मार्ग पोटातून जातो, असं जुनेजाणते लोक म्हणतात जे मला पटतं. त्याच्या साथीला जम्मू-काश्मीर भागात होत असलेल्या राजकीय बदलांचा विचार करता मन जिंकण्याचा अजून एक राजमार्ग खेळातून अंगीकारला जातो, असंही वाटतं. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्यात खास करून क्रिकेटच्या खेळाबद्दल असलेली मूलभूत जाण मला नेहमीच चकित करून जाते. काश्मीरमधल्या सगळ्याच लोकांना मुख्य प्रवाहात आणायला जसे अनेक राजकीय उपाय योजले जाणार आहेत, त्यात खेळातून सकारात्मकता कशी वाढेल याकडंही लक्ष देणं गरजेचे वाटतं. स्थानिक पातळीवर क्रिकेट लोकप्रिय खेळ आहे, तसेच फुटबॉल, कबड्डी आणि व्हॉलीबॉलही जोमानं खेळले जातात. राज्यकर्त्यांनी योग्य पावलं उचलली, तर जम्मू-काश्मीरचे तरुण जोरात दगड नाही, तर चेंडू फेकतील, लाथा माणसांना नव्हे तर फुटबॉलला घालतील आणि खिलाडू वृत्ती फुलवतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptarang sunandan lele write kashmir youth ms dhoni and irfan pathan article