खेळ संस्कृतीची पेरणी (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

न्यूझीलंड देशामध्ये खेळ संस्कृती पूर्णपणे रुजली आहे. तंदुरुस्ती हा त्या देशाच्या जीवनाचा भाग आहे. मैदानात जाऊन कोणताही खेळ खेळणं म्हणजेच तंदुरुस्ती असं इथं अजिबात नाही. समुद्राच्या लाटेवर आरुढ होऊन सर्फिंग करणं किंवा जंगलात जाऊन भटकंती करणं किंवा रोज फक्त सायकलनं प्रवास करून ऑफिसला जाणं हेसुद्धा न्यूझीलंडचे लोक अगदी सहजी करतात. इतकंच काय, इथले बरेच लोक ऑफिसला गेल्यावर दुपारच्या जेवणाच्या वेळात हाफ पँट आणि टी-शर्ट घालून पाच किलोमीटर पळून येतात आणि परत आल्यावर पटकन अंघोळ करून कामाला लागतात. या देशातल्या निरीक्षणांवर आधारित विवेचन.

न्यूझीलंड दौऱ्या‍त वार्तांकन करायला भटकत असताना तीन प्रसंग मोठे मजेदार होते. ते प्रसंग न्यूझीलंडच्या संस्कृतीबद्दल एकही शब्द न बोलता बरेच काही सांगणारे होते. पहिल्या प्रसंगात ऑकलंडहून मी बसनं तौरंगाला जात होतो. बस चांगली भरलेली होती. माझ्यासारखे काहीच प्रवासी हातात मोठ्या बॅगा घेऊन प्रवासाला निघालेले होते. बाकीच्या लोकांच्या बॅक सॅक होत्या. मला जरा त्याचं आश्चर्य वाटलं. माझ्यासमोर एक कुटुंब बसलं होतं. चाळिशीतले आई-वडील आणि त्यांची सात, पाच आणि तीन वर्षांची मुलं. वाटेत अचानक एका जागी बस थांबली आणि बसमधले ऐंशी टक्के प्रवासी उतरायच्या तयारीला लागले. कमाई-मामाकू नावाची ती जागा होती. माझ्यासमोरचं कुटुंबसुद्धा उतरायला उठलं. आईच्या पाठीला मोठी बॅक सॅक होती. वडिलांच्या पाठीला खूप दणकट बॅक सॅक होती आणि प्रत्येक मुलाच्या पाठीलाही बॅक सॅकच होती. बसमधून उतरल्यावर मी कुतूहलानं त्या कुटुंबाकडे बघत होतो. पाचही जण उतरून तरातरा चालू लागले आणि मग माझं बोर्डाकडे लक्ष गेलं- कमाई- मामाकू. न्यूझीलंडमधली एक सर्वांत लोकप्रिय कँपिंग साइट होती आणि ते कुटुंब टेंट बांधून राहायला जंगलात चाललं होतं. आई-वडिलांनी मुलांना कोणतीही सूचना दिली नाही आणि मुलं पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून जंगलाकडे चालू लागली होती. नंतर मी स्थानिक लोकांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी खांदे उडवत सांगितलं, की त्यात विशेष काहीच नाही! खरे किवी लोक सुट्टी कुटुंबासोबत अशीच घालवतात. छोटा तंबू बॅक सॅकमध्ये बांधून जंगलात जाऊन किंवा रम्य तळ्याच्या काठी उभारतात आणि दोन दिवस भटकंती करून त्या टेंटमधे येऊन झोपतात.

त्याच बसचा प्रवास करून मी तौरंगला पोचलो तिथला दुसरा प्रसंग. भारतीय संघाचा एकदिवसीय सामना तौरंगाच्या मैदानावर होता. तौरंगाच्या जवळच माउंट मँगानुई नावाचा मोठा डोंगर आहे. त्या डोंगराला लागूनच सुंदर समुद्रकिनारा आहे. दुपारी लख्ख सूर्यप्रकाशात त्या स्वच्छ सुंदर समुद्रात डुबकी मारायचा मोह मला आवरला नाही. डोक्यावर चांगलाच तळपता सूर्य होता म्हणून वाटलं, की पाणी छान उबदार असेल. कसलं काय आणि कसलं काय. पाणी मरणाचं थंड होतं; पण मनात विचार आला : जो वादा किया वो निभाना पडेगा. मग काय मनाचा हिय्या करून मारली उडी. वाटलं, की काय धीट आहोत आपण. पाण्याबाहेर येऊन आजूबाजूला बघितलं, तर माझं चांगलंच गर्वहरण झालं. कारण साधारणपणे सात-आठ वर्षांच्या मुलांना बाजूलाच सर्फिंगचे धडे दिले जात होते. लहान मुलं पहिल्यांदा तो सर्फिंगचा बोर्ड काखोटीला धरून वाळूतून चालत येऊन मग समुद्रात शिरत होती. मग त्यांचा प्रशिक्षक त्यांना लाटेवर तरंगत जाऊन सर्फिंग बोर्डवर पालथं पडून हातानं वल्हवायचं कसं हे शिकवत होता. एका तासाच्या प्रशिक्षणानंतर मुलं हळूहळू लाटेवर आरुढ होऊन मधूनच सर्फिंग बोर्डवर उभी राहून लाटेनं ढकलल्यावर पाण्यात पडत होती. परत बोर्डवर चढून लाटेवर जात होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक मुलांपासून भरपूर लांब होते आणि ते मुलांकडे लक्ष देत किनाऱ्यावरच्या वाळून बसले नव्हते, तर ते समुद्रात शिरून पोहण्याचा आनंद घेण्यात मग्न होते.

मी सुंदर ताज्या हवेच्या सकाळी माउंट मँगानुईवर गेलो, तेव्हाचा तिसरा प्रसंग होता. तसा चढायला खूप कठीण नव्हता माउंट मँगानुई- कारण त्याची उंची ७६० फूट होती. मात्र, चढण जरा उभी असल्यानं वर पोचल्यावर जरा दम लागला होता. इतक्यात मला न्यूझीलंडचा खेळाडू नील वॅग्नर त्याच डोंगरावर बऱ्या‍पैकी वेगानं पळत येताना दिसला. मला बघून तो थांबला आणि मग थांबून जरा बोलला. ‘‘चांगलं केलंस डोंगरावर आलास. इथं आल्यावर समुद्रात डुबकी आणि माउंट मँगानुईवर पळत येणं गरजेचं असतं हं...नाहीतर तो पर्यटकानं टाकलेला ‘नो बॉल’ समजला जातो,’’ असं तो हसतहसत डोळे मिचकावत सांगत होता. मग त्यानं गप्पांच्या ओघात सांगितलं, की तो सकाळ, संध्याकाळ माउंट मँगानुईवर न चुकता पळत येतोच येतो.

वेगळी जीवनशैली
तीनही प्रसंग माझ्या मनात घर करून बसले. न्यूझीलंड देशात खेळ संस्कृती रुजली आहे, याची खात्री मला ते प्रसंग देऊन गेले. न्यूझीलंडमध्ये तंदुरुस्ती हा जीवनाचा भाग आहे. मैदानात जाऊन कोणताही खेळ खेळणं म्हणजेच तंदुरुस्ती असं इथं अजिबात नाही. समुद्राच्या लाटेवर आरुढ होऊन सर्फिंग करणं किंवा जंगलात जाऊन भटकंती करणं किंवा रोज फक्त सायकलनं प्रवास करून ऑफिसला जाणं हेसुद्धा अगदी सहजी करतात न्यूझीलंडचे लोक. इतकंच काय, इथले बरेच लोक ऑफिसला गेल्यावर दुपारच्या जेवणाच्या वेळात हाफ पँट आणि टी-शर्ट घालून पाच किलोमीटर पळून येतात आणि परत आल्यावर पटकन अंघोळ करून कामाला लागतात. काम करताना सॅलड खातात किंवा हलकं जेवण करतात.

मैदानांना प्राधान्य
मानवी जीवनाला न्यूझीलंडमध्ये जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व निसर्गाला दिलेलं आहे. खेळाची मैदानंच नव्हे, तर जंगल, डोंगर, झरे, नद्या यांची जिवापाड राखण न्यूझीलंडचे रहिवासी करतात. शेवटचा कसोटी सामना ज्या हॅगली पार्कवर चालू आहे, तो पार्क म्हणजे कमाल आहे. सन १८५५ मध्ये स्थानिक सरकारनं हॅगली पार्कला शहराच्या व्यवस्थेत मानाचं स्थान दिलं. पार्क म्हणल्यावर आपल्यासमोर जो आकार येतो, त्याला छेद देणारी ही जागा आहे. होय. कारण हॅगली पार्कचं क्षेत्र ४०७ एकरचं आहे. सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे हा पार्क शहराच्या अगदी मध्यवस्तीत आहे. मी या पार्कच्या अगदीच समोर राहत असल्यानं दिसून येत होतं, की सकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत कोणी ना कोणी पळत किंवा सायकलिंग करत या पार्कमधून जात-येत होतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ विविध खेळांचा आनंद हॅगली पार्कच्या हिरव्यागार मैदानावर वेगवेगळ्या वयोगटांतले लोक घेत होते.

म्हणून आतषबाजी रोखली
या सर्व जागरुकतेबाबत स्थानिक मित्रांशी बोललो असता, त्यांनी अजून एक कमाल गोष्ट सांगितली. एक मित्र म्हणाला : ‘‘न्यूझीलंड देशात माणसाच्या जीवनाला किंमत किंवा मोल आहे, तसंच निसर्गाला आहे. सन २०१८ मध्ये वेलिंग्टन शहरात मजा झाली. वेलिंग्टनमधे मूळ आदिवासी माओरींचा नववर्ष दिन ‘माताराकी डे’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी वेलिंग्टन हार्बरला मोठा फटाक्यांच्या आतषबाजीचा सोहळा होता. २०१८ मध्ये माताराकी डेच्या आदल्या दिवशी वेलिंग्टन हार्बरमधे मोठाच्या मोठा व्हेल मासा आला. तो पाण्यात दोन-तीन दिवस निवांत वास्तव्य करून खेळत होता. व्हेल मासा खेळताना पाण्याचे फवारे उडवत होता. मग काय सगळे रहिवासी त्या माशाला बघायला हार्बरला आले. स्थानिक सरकारनं आतषबाजीनं आवाज होतो- त्यानं माशाला त्रास होईल, तो दचकेल, घाबरेल म्हणून नववर्ष दिनाची आतषबाजी पुढं ढकलली. वेलिंग्टनच्या नागरिकांनी त्या व्हेल माशाला ‘माताराकी’ नाव कौतुकानं बहाल केले. सांगायचं तात्पर्य असं, की इथं माणसांइतकंच पक्षी जलचरांना जपलं जातं.’’
यापेक्षा कमाल गोष्ट दुसऱ्या‍ मित्रानं निदर्शनास आणून दिली. ती ऐकून मी थक्क झालो. गेली कित्येक वर्षं माओरी लोक सरकारला विनंती करत होते, की काही नद्यांची जपणूक करायला हवी- कारण निसर्गचक्र अबाधित ठेवायला त्यांना जपणं गरजेचं आहे. माओरी त्या नद्यांना जीवनाचा भाग मानत होते. २० मार्च २०१७ रोजी न्यूझीलंड सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या भागातून चालू होणाऱ्या आणि १८० मैलांचा लांबचा प्रवास करून समुद्रात मीलन होणाऱ्या फँगानुई नदीला आणि त्याच्या आजूबाजूच्या जंगलाला सरकारनं चक्क मानवी जीवनाचा दर्जा प्रदान केला. माओरी म्हणतच होते, की नदी हीसुद्धा एक जिवंत गोष्ट आहे आणि त्याला मानवाला मिळतात ते सर्व अधिकार द्यायला पाहिजेत. अखेर सरकारनं ती सूचना मान्य केली. जसं कोणत्याही मानवाला, त्याच्या अस्तित्वाला कोणताही धक्का लावायची किंवा त्याच्यात बदल करायची परवानगी नाही, तसंच आता नियमानुसार फँगानुई नदी आणि त्याच्या जंगलाच्या परिसरात बदल करायची परवानगी कोणालाही नाही. उलट त्याची प्राणपणानं जपणूक करणं सरकारचं काम आहे- कारण ती आता कायद्यानं ‘जिवंत गोष्ट’ समजली जाऊ लागली आहे.

तंदुरुस्ती का ‘मॅक्डोनाल्ड्स?
या सगळ्या सकारात्मक चर्चा कानावर येत असताना एक मजेदार उपहासात्मक लेख माझ्या वाचनात आला. विचार मांडणारा महान अर्थतज्ज्ञ होता. त्यानं तंदुरुस्त लोक देशाच्या अर्थव्यवस्थेची कशी वाट लावतात, हे मजेदार पद्धतीनं मांडलं होतं. तो म्हणाला : ‘रोज सायकल चालवणारा माणूस अर्थव्यवस्थेकरता नाशकारक आहे. तो मोटर कार विकत घेत नाही, की त्याकरता कर्ज घेत नाही... पर्यायानं तो कारचा विमा उतरवत नाही...तसंच कार नसल्यानं इंधन विकत घेत नाही...त्याच्याकडे कार नसल्यानं तो ती दुरुस्तीकरता पाठवत नाही...आणि पार्किंगकरताही पैसे भरत नाही... सायकल चालवल्यानं तो गलेलठ्ठ होत नाही...म्हणून त्याला आजार होत नाहीत...मग तो ना डॉक्टरकडे जातो, ना औषधे घेतो...म्हणून खूप तंदुरुस्त नागरिक अर्थव्यवस्थेकरता चांगले नसतात... थोडक्यात सांगायचं, तर ते अर्थव्यवस्थेच्या गतीला ब्रेक्स लावतात.’
दुसरी बाजू मांडताना तो अर्थतज्ज्ञ म्हणाला : ‘त्या उलट मॅक्डोनाल्ड्सचं बघा... मॅक्डोनाल्डचं प्रत्येक दुकान किमान तीस लोकांना रोजगार देतं...तिथं सतत खाल्ल्यावर हृदयरोग तज्ज्ञांपासून दंतचिकित्सा करणारे दहा डॉक्टर आणि वजन घटवण्याचा वादा करणाऱ्या दहा व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ अशा सगळ्यांना मॅक्डोनाल्ड्समुळे काम मिळतं, उत्पन्न मिळतं...मग सांगा अर्थव्यवस्थेकरता कोण चांगलं आहे?... तंदुरुस्त माणसं का मॅकडोनाल्ड्स?’
यातला उपरोध बाजूला ठेवा; पण आपल्याला ‘चांगली अर्थव्यवस्था’ हवी आहे, का शारीरिक तंदुरुस्ती, हे भारतीय नागरिकांनी ठरवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटतं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com