वरून नारळ, आतून खोबरं ! (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्मा धमाल करतो आहे. रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. रोहितच्या वेगवेगळ्या पैलूंवर एक नजर.

पाकिस्तान सामन्याअगोदर पत्रकार परिषदेला रोहित शर्मा आला, तेव्हा मी त्याला मराठीतून प्रश्न विचारला. आयसीसीच्या स्पर्धेत इंग्लिश सोडून क्वचित हिंदीत प्रश्न विचारले जातात. रोहित अस्खलित नसला, तरी गोड मराठी बोलतो हे मला माहीत असल्यानं मी त्याला हमखास मराठीतूनच प्रश्न विचारतो. रोहित शर्माही मजेदार मराठीत उत्तर देतो.

पत्रकार परिषद संपल्यावर रोहित म्हणाला ः 'काय हो सर तुम्ही मराठीत प्रश्न विचारता? तुम्हाला लाइक्‍स मिळतात आणि मला लोक स्लेज करतात; पण कसंही करा आणि 16 तारखेची मॅच करा हं. न्यूझीलंडसारखी मॅच पावसानं रद्द झाली नाही, तर भारत-पाकिस्तान सामना बघायला जगभरातून आलेले फॅन्स स्टेडियमला पावसातही आग लावतील,'' रोहित शर्मा हसत हसत म्हणाला होता. भारत-पाकिस्तान सामना पावसाच्या व्यत्यय न येता पार पडला. ज्यात रोहित शर्मानं धावांचा पाऊस पाडून भारतीय संघाच्या फॅन्सना दंगा करायला पूर्ण संधी दिली.
रोहित शर्मा म्हणजे एक अजब रसायन आहे. वरून एकदम निवांत दिसणारा हा खेळाडू आतून खूप निग्रही आहे. चालू विश्वकरंडक स्पर्धेत रोहितचा आत्तापर्यंतचा खेळ अगदी दृष्ट लागण्यासारखा झाला आहे. सगळे फॅन्स आणि पत्रकार रोहितच्या पुढंपुढं करताना दिसत आहेत. मैदानावर गोलंदाजांवर तुटून पडणारा रोहित मैदानाबाहेर मात्र पत्नी रीतिकासह बाहेर फिरताना आणि मुलगी समायरासह निवांत खेळताना दिसतो. 'तिकडे कष्ट, इकडे मज्जा...'' रोहित डोळा मिचकावत म्हणाला.

खडतर बालपण
गुरुनाथ आणि पौर्णिमा शर्मा यांना नागपूरजवळच्या बनसोड गावी 30 एप्रिल 1987 रोजी झालेलं बाळ म्हणजे रोहित शर्मा. रोहितची आई गृहिणी, तर वडील वाहतूक कंपनीच्या स्टोअर रूममध्ये नोकरी करायचे. डोंबिवलीला एका छोट्या खोलीत राहण्याइतपत घरची परिस्थिती बेताची असल्यानं रोहितला बोरिवलीला काकांकडं राहायला पाठवावं लागलं. बोरिवलीचं घरही मोठं नव्हतं. घरात बरीच माणसं राहायची, त्यामुळं लहान असताना रोहित चक्क हॉलमधल्या टीव्हीजवळ झोपायचा. दिवसभर खेळून दमलेल्या रोहितला झोप यायची त्यावेळीच घरच्या सगळ्यांना टीव्हीवर मालिका बघायच्या असायच्या. आवाज सहन व्हायचा नाही आणि मालिकांमध्ये रस नसल्यानं मग रोहित खाली जाऊन स्टारलाईन सोसायटीच्या वॉचमनबरोबर बसून गप्पा मारायचा आणि मालिकांच्या वेळा संपल्या, की घरात येऊन झोपायचा.
मुंबईतल्या बऱ्याच मुलांना असते तशी रोहितला क्रिकेटची आवड होती. शाळेच्या लहान संघाकडून रोहित गोलंदाज म्हणून खेळायचा. एकदा बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेविरुद्ध सामना चालू असताना त्या शाळेचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितला गोलंदाजी टाकताना बघितलं. 'लहान चणीच्या रोहितला सहज शैलीत गोलंदाजी टाकताना बघून मला आनंद झाला. त्या सामन्यात त्यांचा 10 षटकात 67 धावांमध्ये डाव संपला होता,'' त्या दिवसाबद्दल बोलताना दिनेश लाड सांगत होते. 'सामना संपल्यावर मी रोहितला बोलावून घेतलं आणि आमच्या शाळेकडून खेळशील का विचारलं. तो म्हणाला ः "सर, मी काय सांगणार? मला घरच्यांना विचारायला लागेल.' मग मी म्हणालो ः "वडिलांना घेऊन ये.' तर रोहित म्हणाला ः "मी आई-वडिलांना आठवडा दहा दिवसातून एकदा भेटतो. ते दुसरीकडं राहतात. मी काकांकडं राहतो.' मग मी काकांना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं, की रोहितमध्ये चांगला क्रिकेटर बनण्याचे गुण मला दिसत आहेत. त्याला मी प्रशिक्षण देतो त्या शाळेत स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये घाला. शाळेत प्रवेशाकरता फॉर्म त्यांनी घेतला. जेव्हा त्यांना समजलं, की महिन्याची फी 275 रुपये आहे. ते दचकले. प्रांजळ कबुली देताना, इतकी फी परवडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मी पहिल्यांदाच शाळेचे मुख्याधिकारी होते- त्यांना फीमाफी देण्याची विनंती केली. देवकृपेनं त्यांनी ती मान्य केली. तेव्हा कुठं रोहितची ऍडमिशन झाली.''

'पहिल्या वर्षी सातवीमध्ये असताना रोहितला मी गाईल्स शिल्ड स्पर्धेत गोलंदाज म्हणून खेळवलं. चमक बघून पुढच्या वर्षी लगेच मी रोहितला हॅरिस शिल्डमधे गोलंदाजी चांगली करतो म्हणून उतरवलं. एकदा सराव संपत आला असताना एक मुलगा नॉकिंग करताना मला दिसला. त्याच्या बॅटचा झोका एकदम मस्त येत होता. जाऊन बघितलं, तर रोहित फलंदाजी करत होता. मग मलाच जाणीव झाली, की या मुलातला गुणवान फलंदाज आपण इतके दिवस का बघितला नाही. त्यानंतर मी रोहितला जास्तीत जास्त फलंदाजीचा सराव द्यायला लागलो आणि खूप सामन्यांत फलंदाजी करायला लावली. त्यानंतर रोहितनं मागं वळून बघितलेलं नाही. मी एवढंच सांगीन, की अगदी थोडं मार्गदर्शन मी रोहितला केलं. बाकी सगळे त्याचे कष्ट आहेत. त्याला कोणीही घडवलेलं नाही. त्यानं कष्टानं स्वत:च्या यशाचा मार्ग आखला आहे,'' आठवणीत रमताना दिनेश लाड कहाणी सांगत होते. ते ऐकल्यानंतर मनात विचार आला, की कोण प्रशिक्षक यशाचे संपूर्ण श्रेय विद्यार्थ्याला देण्याचा प्रांजळपणा दाखवेल.

रोहित शर्मासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सुरवातीचा काळ म्हणजे यश-अपयशाचा हिंदोळा राहिला. भारतीय संघाचं दार रोहितकरता लवकर उघडलं. सन 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात रोहित खेळला. सन 2008 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असताना रोहित शर्माला फलंदाजी करताना बघून इयान चॅपेल जाम खूश झाले. खूप मोठा प्रभाव पाडता आला नाही म्हणून 2011 मध्ये विश्वकरंडक संघात रोहितला जागा मिळाली नाही. संघ व्यवस्थापनानं रोहित शर्मापेक्षा सुरेश रैना आणि विराट कोहलीला पसंती दिली.

सन 2007 मध्ये पहिला एकदिवसीय सामना रोहित खेळला; पण कसोटी सामन्यातल्या पदार्पणाकरता त्याला सहा वर्षं वाट बघावी लागली. 'काय सांगू एकदा तर कसोटी पदार्पण करायच्या दिवशी सकाळी माझा पाय मुरगळला. अक्षरशः "वाट लागली' होती...'' रोहित खराब काळाबद्दलही विनोदानं सांगत होता.
अत्यंत कठीण काळातून गेल्यावर रोहित शर्माचं नशीब उजळलं. सन 2013 मध्ये रोहितला महेंद्रसिंह धोनीनं संपूर्ण पाठिंबा देत शिखर धवनसह सलामीला फलंदाजीला जायला पाठवलं. त्या वर्षीची चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धा रोहितच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. घरी परतल्यावर रोहितनं बंगळूरला झालेल्या ऑस्ट्रेलियासमोरच्या एकदिवसीय सामन्यात 16 षटकारांसह द्विशतक ठोकलं. पुढच्या वर्षी रोहितनं श्रीलंकन संघाला धोपटून काढताना एकदिवसीय सामन्यात 264 धावांचा विक्रम केला. सन 2017 मध्ये टी-20 सामन्यात अवघ्या 35 चेंडूंत शतक करणाऱ्या रोहितचा गोलंदाजांनी धसका घेतला होता- तो आजही कायम आहे.

गाड्यांची आवड
रोहितचा एक खास किस्सा दिनेश लाड यांनी सांगितला ः 'रोहित 19 वर्षांखालचा वर्ल्डकप खेळून मुंबईत परतला होता. आम्ही कांदिवलीला क्‍लबपाशी उभे असताना एक चकाचक मर्सिडीज गाडी आमच्या समोरून गेली. रोहित मला म्हणाला ः "सर, एक दिवस लवकरच येईल, जेव्हा मी अशीच गाडी घेईन आणि तुम्हाला मस्त चक्कर मारीन.' मी त्याला म्हणालो ः "क्रिकेटवर लक्ष दे...गाडी आपोआप येईल.' रोहितला पहिल्यापासून आत्मविश्वास जबरदस्त होता, की मी भारतीय संघाकडून खेळेनच. चार वर्षांनी मला रोहितचा घाबऱ्याघुबऱ्या आवाजात फोन आला ः "सर, खाली या. प्रॉब्लेम आहे...लवकर या...' मी टीशर्ट चढवून खाली गेलो. खाली कोणी नव्हतं. इतक्‍यात एक चकाचक नवी गाडी समोर उभी राहिली. आत रोहित होता. माझ्याकडं बघत हसत होता. मग त्यानं मला चक्कर मारली. अजून त्याची गाड्यांची आवड खूप आहे.''

खादाडीची मजा
रोहितला खाण्याची आवड किती आहे याचा गंमतीदार किस्सा दिनेश लाड यांनी सांगितला. 'सन 2007 च्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावून भारतीय संघ मायदेशी परतला, तेव्हा मला रोहितचा फोन आला ः "सर, तुमच्याकडं खायला यायचं आहे.' रोहित काकांकडं राहायचा, तिथं मांसाहार तर सोडाच अंडंही खाण्याची परवानगी नव्हती. रोहितला माझ्या हातचं हाफ फ्राय अंडं खूप आवडायचं. मग रोहित घरी आला, तेव्हा त्याला सणकून भूक लागली होती. विश्वास बसणार नाही; पण रोहित, सिद्धेश लाड आणि मी मिळून तीसपेक्षा जास्त अंडी बसल्या बैठकीला फस्त केली होती. आजही रोहित हक्कानं हाफ फ्राय खायला घरी येतो, तेव्हा आनंद होतो.''
वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेलो असताना रोहित त्याच्या पत्नीसह माझ्या फ्लॅटवर जेवायला आला होता. जेवणानंतर तो त्याची प्लेट धुवायला लागला, तेव्हा त्याची पत्नी रीतिका आश्‍चर्यचकित झाली. 'लेलेंकडं जेवायला आलं, की आपापली प्लेट धुवायला लागते असं मला वरिष्ठ खेळाडूंनी सांगितलं आहे- तेच मी करतोय,'' असं रोहित हसत म्हणाला होता.

सध्या सुरू असलेल्या दौऱ्यातही एक मजेदार गोष्ट घडली. साउदम्पटनला सरावानंतर अचानक रोहित भेटला असता, मला म्हणाला ः 'काय लेले सर, तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं. जेवायला बोलावत नाहीत... मला पोहे किती आवडतात तुम्हाला माहीत आहे. ते पण देत नाहीत.'' मी माझी लॅपटॉपची बॅग समोर धरत म्हणालो ः 'घाल हात आत.''
'काय आहे आत?'' रोहितनं विचारलं.
'सापाचं पिल्लू आहे... घाल हात आत,'' मी पुणेरी टोमणा मारला.
रोहितनं हात आत घातला आणि बॉक्‍स बाहेर काढला, तर गडी एकदम खूश झाला- कारण त्याची पोह्यांची आवड लक्षात घेऊन मी नेमके त्याच दिवशी सुहानाचे कप्पा पोहे रोहितकरता बनवून नेले होते.
'सर, क्‍या बात है... मस्त मस्त,'' मला मिठी मारत रोहित म्हणाला आणि लगेच बॉक्‍स उघडून पोह्यांचा आस्वाद घ्यायला लागला.

समायराने रोहित बदलला
वरून बेदरकार दिसणारा रोहित शर्मा वरून नारळ आणि आतून खोबरं आहे, असं मला वाटतं. इतका मनानं तो चांगला आहे. त्यातून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रोहित बाप झाला. 'समायरानं माझं आयुष्य बदलून टाकलं हो. आता मला तिच्यापासून लांब नाही राहता येत. मैदानावर यश येवो वा अपयश- परतल्यावर समायराला भेटलो, की सगळं विसरायला होतं. मुलीचं आणि बापाचं नातं किती गोड असतं, हे मला समजलं आहे,'' मुलीवर प्रेम करणारा रोहित शर्मा म्हणाला.
सात साखळी सामन्यांत चार दणदणीत शतकांसह 544 धावा ठोकणाऱ्या रोहितला विश्वचषक स्पर्धेतला सर्वाधिक धावांचा 673 धावांचा विक्रम साद घालतो आहे. उरलेल्या एक साखळी एक उपांत्य आणि अंतिम सामन्यात मिळून रोहित नुसता विक्रमच नव्हे, तर भारतीय संघाला विश्वकरंडक हाती देईल हीच आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com