शतकानुशतकं टिकणारे उद्योग (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

जपान, युरोपमध्ये काही उद्योग शतकानुशतकं अस्तित्व टिकवून आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे उद्योग तरुण भारतीय उद्योजकांना प्रेरणादायक ठरू शकतात. आपणही जर खरोखर हजारो वर्षं चालणारे असे उद्योग निर्माण करू शकलो तर भविष्य आपल्या हातात येऊ शकतं. जपान, इटली, इंग्लंड आदी देशांत जर हे जमू शकतं तर आपल्याला का नाही जमणार?

जपानच्या मध्यवर्ती भागात राजधानी टोकिओपासून खूप दूर एक हॉटेल आहे. त्याचं नाव आहे : निशियामा ओनसेन केऊनकान. हे तसं छोटंसंच हॉटल आहे. तिथं फक्त ३५ खोल्या आहेत. टोकिओहून तिथं जायचं म्हटलं तर चार वेळा ट्रेन व बस बदलावी लागते. हॉटेलचा दरही प्रचंड आहे. तरीही लोक लांबून येऊन या हॉटेलात राहतात.
फुजिवारू माहितो या उद्योजकानं हे हॉटल सुरू केलं सन ७०५ मध्ये. आपल्या इकडं भारतात त्या वेळी गुप्त साम्राज्याचा काळ संपून केवळ १५० वर्षं झाली होती. रोमन साम्राज्य लयास जाऊन ५०-६० वर्षं झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक होण्यासाठी अद्याप ९०० ते हजार वर्षांचा अवधी होता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका असे कोणतेही देश तेव्हा अस्तित्वातही आलेले नव्हते.

सन ७०५ मध्ये सुरू झालेलं हे हॉटेल माहितो यांचे कुटुंबीय आजही चालवत आहेत. आजवर त्यांच्या ५२ पिढ्या होऊन गेल्या आहेत.
व्यवसायाचा हा वारसा प्रत्येक पिढीत मुलग्यांनीच पुढं चालवला असं नव्हे. काही वेळा मुलगे जन्माला आले नाहीत, केवळ मुलीच जन्मल्या.
अशा वेळी मुलींनी लग्नानंतर पतीला घरजावई करून घेऊन त्याकरवी कुटुंबाचा हा उद्योग सुरू ठेवला.
गेली एक हजार ३१४ वर्षं हे हॉटेल कोणताही खंड न पडता एकाच कुटुंबाचा व्यवसाय म्हणून सुरू आहे. त्यात काळानुसार बदल करण्यात आले. सुविधा वाढवण्यात आल्या; पण त्या उद्योजक-कुटुंबानं कधी इतर उद्योग सुरू केले नाहीत. एकाच हॉटेलवर एक हजार ३१४ वर्षं लक्ष केंद्रित करून ते सुरू ठेवलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जपानमध्ये एवढं जुनं हॉटेल हेच एकमात्र आहे असं नाही. दुसऱ्या एका कुटुंबानंही सन ७१८ मध्ये, म्हणजे तेराशे वर्षांपूर्वी ‘होशी रोक्यान’ हे हॉटेल जपानच्या दक्षिण भागात सुरू केलं. त्याच कुटुंबाच्या ४७ पिढ्या सन ७१८ पासून हा व्यवसाय पाहत आहेत. त्यांनीही कधी एका हॉटेलपलीकडं आपला व्यवसाय वाढवला नाही.
या दोन हॉटेलांपासून उद्योजकांनी प्रेरणा घ्यायला हवी. कोणताही उद्योग करायचा म्हटला तर अनेक अडचणी येतात. ग्राहक मिळणं हे तर सगळ्यात मोठं आव्हान असतं. कित्येक उद्योजक काही वर्षांतच
हात-पाय गाळतात. जपानच्या दोन दुर्गम भागांत असलेल्या या हॉटेलांना गेली सतत तेराशे वर्षं ग्राहक कसे मिळाले असतील?
सन ७०५ च्या दरम्यान तर जपानमध्ये सर्वत्र जंगलच असलं पाहिजे. नंतरही अनेक अडचणी आल्या असणार; परंतु या दोन कुटुंबांनी तेरा शतकं चिकाटी सोडली नाही. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला पैशाची उधळपट्टी करण्याचा मोह झाला नाही. व्यवस्थापनात कधीही ढिलेपणा येऊन व्यवसाय कोलमडला नाही. कुटुंबातल्या वारसदारांमध्ये भांडणं होऊन संपत्तीच्या वाटपासाठी हॉटेल विकलं गेलं नाही. हॉटेलकडं ‘केवळ एक जमिनीचा तुकडा’ म्हणून पाहून तिथं घरांचा मोठा समूह अथवा रिसॉर्ट उभारण्याचा मोह कुणाला झाला नाही. तब्बल तेराशे वर्षं नेटकं व्यवस्थापन आणि फायदेशीर व्यवहार ठेवून या दोन कुटुंबांनी त्यांच्या उद्योगांची वाढ केली; परंतु त्याला अतिमहत्त्वाकांक्षी स्वरूप दिलं नाही.
कदाचित हॉटेलच्या व्यवसायात शेकडो वर्षं अखंडपणे उद्योग करण्याची त्यांची क्षमता असेल.

युरोपमध्ये तेराशे वर्षं जुनं हॉटेल नाही; परंतु इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली व स्वित्झर्लंड या देशांत तीनशे ते हजार वर्षं जुनी हॉटेलं अनेक आहेत. प्रत्येक बाबतीत एक कुटुंब अथवा एक कंपनी ते हॉटेल ३०० ते हजार वर्षं चालवत आहे. जपानच्या हॉटेल-उद्योजकांप्रमाणे त्यांनीही कधी व्यवसाय वाढवून वेगवेगळे उद्योग निर्माण केले नाहीत अथवा गेल्या शेकडो वर्षांत एकाही व्यक्तीनं पैशाची उधळपट्टी केलेली नाही.

मी एकदा स्वित्झर्लंडमधल्या एग्लिसाऊ या छोट्याशा खेड्यात ‘गॅस्टॉफ हर्शेन’ या हॉटेलात उतरलो होतो. ते २५० ते ३०० वर्षं जुनं होतं. आतील कपाटंही तेवढीच जुनी होती. मला दोन्ही हात वापरून खूप जोर लावून कपाटाची कडी उघडावी लागत असे. दरवाजे तर अतिशय भक्कम होते. पुढची किमान ३००-४०० वर्षं तरी ते सामान जसंच्या तसं टिकेल याबद्दल मला थोडीदेखील शंका नाही.
आता व्हेनिसमधला अनुभव. एकदा मी व्हेनिसमधल्या प्रसिद्ध सॅन मार्को चर्चसमोरच्या ‘कॅफे फ्लोरियान’ इथं जेवायला गेलो होतो. हे कॅफे सन १७२० मध्ये सुरू झालं आहे. म्हणजे आपल्याकडचा पेशवाईच्या उदयाचा हा काळ. आजतागायत हे कॅफे व्यवस्थितरीत्या सुरू आहे. महायुद्धाच्या काळात अधूनमधून काही दिवस ते बंद ठेवलं जाई. त्या दिवसांचा अपवाद वगळता गेली तीनशे वर्षं हे हॉटेल यशस्वीपणे सुरू आहे. त्याच कॅफेच्या समोर दुसरं एक कॅफे आहे. त्याचं नाव ‘लवेना’. ते सन १७३० च्या आसपास सुरू झालं.
या ‘कॅफे फ्लोरियान’मध्ये कॅसानोव्हा नेहमी जात असे, तर
संगीतज्ञ रिचर्ड वॅग्नर हा लवेनामध्ये तासन् तास बसलेला असे. ही
सन १८५० मधली गोष्ट.

आपल्याकडं बरिस्ता, ब्रू कॅफे, तसंच इराणी चहाची हॉटेलं शतकानुशतकं का चालत नसावीत? मुंबईतली इराणी हॉटेलं सुमारे शंभर-सव्वाशे वर्षं टिकली; पण अलीकडच्या काही वर्षांत ती बंद पडण्यास सुरवात झाली आहे. जी काही सुरू आहेत तिथं वृद्ध मालक दिसतात. युवा पिढीनं या व्यवसायाकडं पाठ फिरवलेली दिसते.
हॉटेल व कॅफेशिवाय इतरही अनेक औद्योगिक समूह शेकडो वर्षं चालल्याची नोंद आहे. जपानमध्ये ‘कोंगो गुमी’ या बांधकाम व्यवसायातल्या कंपनीची स्थापना सन ५७८ मध्ये झाली. म्हणजे, आपल्याकडच्या गुप्त साम्राज्याच्या अखेरचा काळ. ही कंपनी एवढी प्रदीर्घ वर्षं एक कुटुंब चालवत असे. १२-१३ वर्षांपूर्वी त्या कुटुंबानं कंपनी दुसऱ्या एका उद्योगसमूहाला विकली व नवीन बॅनरअंतर्गत ती आजही सुरू आहे.
जपानमध्येच सन ७७१ मध्ये विशिष्ट स्वरूपाच्या कागदाची निर्मिती करणारी कंपनी सुरू करण्यात आली. ‘गेंदा शिगियो’ असं तिचं नाव. ती क्योटो शहरात आहे. असा कागद तयार करणारा ‘फॅब्रियानो’ हा उद्योगसमूह त्यानंतर ५०० वर्षांनी, म्हणजे सन १२६४ मध्ये इटलीत अस्तित्वात आला. एकेकाळी चित्रकार मायकेलअँजेलो या समूहाकडून कागद घेत असे. आता युरोच्या व कधी कधी भारतीय नोटा छापण्यासाठीसुद्धा ही कंपनी कागद पुरवते.

शतकानुशतकं अस्तित्व टिकवून ठेवणारे वेगवेगळ्या क्षेत्रांतले हे उद्योग तरुण भारतीय उद्योजकांना प्रेरणा देतील. आपण जर खरोखर हजारो वर्षं चालणारे उद्योग निर्माण करू शकलो तर भविष्य आपल्या हातात येऊ शकतं. जपान, इटली, इंग्लंड आदी देशांना जर हे जमू शकतं तर आपल्याला का नाही जमणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com