गांधीजी आणि आईनस्टाईन (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

गांधीजी आणि आईनस्टाईन या दोघांचाही युद्ध आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास विरोध असला, तरी तो निष्कर्ष ठरवण्याआधी त्यांचा वैचारिक प्रवास वेगवेगळ्या मार्गानं झाला. गांधीजी अहिंसेचे पुरस्कर्ते होते. हाच विचार आंतरराष्ट्रीय कक्षेत आणल्यावर निःशस्त्रीकरण आणि युद्धबंदी हे विचार पुढं आले. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांना पत्र लिहून अण्वस्त्रं तयार करण्याचा सल्ला दिला होता. हिटलर अण्वस्त्र तयार करून संपूर्ण जगावर अधिपत्य करेल, या विचारातून त्यांनी तो सल्ला दिला होता. हिटलर अण्वस्त्र बनवू शकला नाही. मात्र, अमेरिकेनं अण्वस्त्रांचा वापर जपानवर केला, रशियावर हल्ला करण्यासाठी अण्वस्त्रांचा साठा करण्यास सुरवात केली. हे पाहिल्यावर आईनस्टाईन यांचं मतपरिवर्तन झालं. त्यांनी अण्वस्त्रांना आणि सर्वच प्रकारच्या शस्त्रांना आणि युद्धांना विरोध केला.

या वर्षी दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती केवळ भारतातच नव्हे, तर जगभर साजरी करण्यात आली. हे वर्षं अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या एकशे चाळीसाव्या जयंतीचं वर्ष आहे. त्यामुळे पाश्‍चात्य देशात गांधीजी आणि आईनस्टाईन या दोन महापुरुषांच्या कार्यावर आणि विचारांवर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. जगातलं अग्रगण्य विद्यापीठ- ऑक्‍सफर्ड इथं दोन ऑक्‍टोबरला मला गांधीजी आणि आईनस्टाईन यांच्या विश्‍वशांतीसंबंधी विचारांबद्दल व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं होतं.

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्याचे एक शिल्पकार म्हणून ओळखले जातात. अल्बर्ट आईनस्टाईन हे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. हे दोन्ही युगपुरुष शांतिदूतही होते. त्यांनी विश्‍वशांतीच्या नावीन्यपूर्ण वैचारिक बैठकीची मांडणी केली होती. आजच्या परिस्थितीत त्यांच्या विश्‍वशांतीच्या संकल्पना बऱ्याच जणांना पटणार नाहीत; पण त्यांचे विचार दूरदर्शी, धाडसाचे आणि अभिनव होते यात शंका नाही.
गांधीजी आणि आईनस्टाईन यांची परस्परांशी ओळख होती; परंतु प्रत्यक्ष भेट झाल्याची नोंद नाही. एकदा गांधीजींचे एक परिचित आईनस्टाईन यांना भेटले होते. आईनस्टाईन यांनी आदर व्यक्त करणारं पत्र गांधीजींना पाठवलं. गांधीजींनी उत्तरात आईनस्टाईन यांना आपल्या आश्रमात येऊन काही दिवस राहण्याचं आमंत्रण दिलं; परंतु भेट मात्र झाली नाही.

गांधीजींचं कार्य सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांवर आधारित होतं, हे आपल्याला माहीत आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषास विरोध केला. भारतात परतल्यावर स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला आणि टिळकांनंतर स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं. भारतीय समाजातल्या कमकुवत घटकांना बळ दिलं आणि ‘हरिजन’ ही संज्ञा रुढ केली. जुलमी आणि वर्चस्व स्थापन करू पाहणाऱ्या मानसिकतेस त्यांचा विरोध होता. एखादा वंश, एखादी राजवट अथवा एखादी जातिव्यवस्था दुसऱ्या घटकावर वर्चस्व स्थापन करू पाहते असं त्यांना दिसलं, तर ते त्याचा विरोध करत. याच विचारांचं प्रतिबिंब त्यांच्या जागतिक संरचनेसंबंधी धोरणात दिसते.

गांधीजींच्या मते जगाचा कारभार एका फेडरेशनच्या हातात असावा आणि सर्व राष्ट्रं त्या फेडरेशनची समान सभासद असावीत. प्रत्येक राष्ट्रानं संरक्षणाच्या नावे शस्त्रास्त्र जमवण्यास त्यांचा विरोध होता आणि युद्ध ही संकल्पनाच नाहीशी झाली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आईनस्टाईन यांनादेखील सर्व राष्ट्रं सभासद असलेली संघटना हवी होती. त्यांचा शस्त्रस्पर्धेला विरोध होता आणि युद्ध हे इतिहासजमा झालं पाहिजे, असं आईनस्टाईन यांचं मत होतं. नाहीतर मानवी संस्कृती इतिहासजमा होईल, असं त्यांना भय वाटत होतं.

गांधीजी आणि आईनस्टाईन या दोघांचाही युद्ध आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास विरोध असला, तरी तो निष्कर्ष ठरवण्याआधी त्यांचा वैचारिक प्रवास वेगवेगळ्या मार्गानं झाला. गांधीजी व्यक्तीच्या खासगी आयुष्यात आणि देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत, अगदी परकीय शक्तीविरुद्ध लढाईत देखील, अहिंसेचे पुरस्कर्ते होते. हाच विचार आंतरराष्ट्रीय कक्षेत आणल्यावर निःशस्त्रीकरण आणि युद्धबंदी हे विचार पुढं आले. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सन १९३९ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष फ्रॅंकलीन रुझवेल्ट यांना पत्र लिहून अण्वस्त्रं तयार करण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळेस हिटलर अण्वस्त्र तयार करून संपूर्ण जगावर अधिपत्य करेल, असं त्यांना वाटलं. त्यास प्रतिकार करण्यासाठी त्यांनी अमेरिकेला अण्वस्त्रं बनवण्यास प्रोत्साहन दिलं. नंतर हिटलर स्वतः अण्वस्त्र बनवण्यास निष्प्रभ ठरला. अमेरिकेनं अण्वस्त्रांचा वापर जपानवर केला. नंतर रशियावर हल्ला करण्यासाठी अण्वस्त्रांचा साठा करण्यास सुरवात केली. हे पाहिल्यावर आईनस्टाईन यांचं मतपरिवर्तन झालं. त्यांनी अण्वस्त्रांना आणि सर्वच प्रकारच्या शस्त्रांना आणि युद्धांना विरोध केला.
अशा प्रकारे गांधीजी आणइ आईनस्टाईन हे दोन वेगवेगळ्या मार्गानं निःशस्त्र जागतिक राजकीय पद्धतीचे पुरस्कर्ते झाले. मात्र, सर्व राष्ट्रांचं फेडरेशन कसं असावं याबद्दल त्यांचे विचार वेगळे होते. आईनस्टाईन यांच्या मते जागतिक सरकार स्थापन करण्याची गरज होती. गांधीजींच्या मते सर्व देश समान पातळीवर असणारी सर्व देशांची संघटना अथवा फेडरेशन असणं आवश्‍यक होतं. गांधीजी आणि आईनस्टाईन यांचा युद्धाला आणि शस्त्रास्त्र स्पर्धेला असलेला विरोध आज अनेक लोकांना पसंत पडणार नाही. इराकच्या अध्यक्ष आपल्याला आवडत नाही? युद्ध करा. सीरिया अंतर्गत निवडणुका करायला तयार नाही? युद्ध करा. युक्रेनची राजवट आपण सांगतो तसं ऐकत नाही? युद्ध करा. बॉम्ब टाका, बायका-मुलांना मारून टाका. सध्या जगाच्या अनेक देशांत हा विचार प्रबळ आहे.

गांधीजींचे विचार प्रसिद्ध जर्मन विचारवंत इम्यॅन्युएल कांत आणि भारतीय विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याशी मिळतेजुळते होते.
इम्यॅन्युएल कांत यांनी अठराव्या शतकात प्रथम निःशस्त्र युद्धविरहित शाश्‍वत शांतीसाठी आंतरराष्ट्रीय फेडरेशनची कल्पना प्रथम मांडली; पण कांत हे प्रामुख्यानं युरोपसंबंधी बोलत होते. महात्मा गांधींनी ही कल्पना जागतिक स्तरावर नेली.
गुरुदेवांनी राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेपेक्षा मानवता अधिक महत्त्वाची आहे, हा विचार मांडला. गांधींजीच्या विश्‍वशांतीच्या कल्पनेचा मानवता हा पाया होता.
गांधीजींनी मांडलेली आंतरराष्ट्रीय फेडरेशनची कल्पना आणि सध्याची संयुक्त राष्ट्रं (यूएन) यांत फरक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाच देश स्थायी सभासद आहेत आणि त्यांच्याकडे व्हेटोचा अधिकार आहे. आज भारतातल्या विद्वानांना ही संख्या पाचहून जास्त करून त्यात भारताचा समावेश करावा, भारतालादेखील व्हेटोसहित स्थायी सभासदत्व मिळावं असं वाटतं. गांधीजींच्या मते सर्व देश समान सभासद असले पाहिजेत. त्यात कोणासही स्थायी सभासद आणि व्हेटो असणं अयोग्य आहे. कदाचित पंधरा देशांची सुरक्षा परिषद असणं आवश्यक आहे; परंतु दर वर्षी कोणीही १५ देश निवडणुका जिंकून सुरक्षा परिषदेवर जाऊ शकतील. त्यात कोणालाही स्थायी सभासदत्व अथवा व्हेटो देण्याची गरज नाही. आईनस्टाईन यांची जागतिक सरकारची कल्पना आजच्या संयुक्त राष्ट्रांच्या जवळची आहे. आज आईनस्टाईन हयात असते, तर त्यांनी कदाचित भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सभासदत्व देण्यास पाठिंबा दिला असता.

गांधीजी आणि आईनस्टाईन यांच्यासारख्या महापुरुषांची महाजयंती त्यांच्या कार्याचं आणि विचारांचं स्मरण करण्यासाठी उद्युक्त करते. अशा प्रसंगी साफसफाईसारखे लाक्षणिक कार्यक्रम करणं ठीक आहे. त्याचा काही परिणाम होत नाही; पण त्यानं काही वाईटही होत नाही. आपल्याला खरोखर परिणाम व्हावा असं वाटत असेल, तर आपण महापुरुषांनी दिलेल्या विचारांचा खोलवर विचार केला पाहिजे आणि त्या विचारांची किती गरज आहे याचं मूल्यमापन केलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com