sundeep waslekar
sundeep waslekar

सोशल मीडियापासून सावधान! (संदीप वासलेकर)

फेसबुकच्या व ट्विटरच्या वापरात मेक्‍सिको, ब्राझील, भारत, फिलिपाईन्स, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई हे देश अग्रगण्य आहेत, तर जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोपातले देश हे या वापरात खूप मागं आहेत. जे देश एकदम दारिद्र्यात राहतात अशा देशांची नावं समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या देशांच्या यादीत नाहीत. ही आकडेवारी काय दर्शवते?

काही महिन्यांपूर्वी आयआयटीच्या प्रवेशपरीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनी ‘आपण समाजमाध्यमांपासून (सोशल मीडिया) लांब राहतो,’ असं सांगितलं.

त्याच दरम्यान दोन अहवाल प्रसिद्ध झाले. एक अहवाल आहे नेदरलॅंड्स इथल्या भारतीय वंशाच्या प्राध्यापिका पायल अरोरा यांनी तयार केलेला. जगभरातल्या उदाहरणांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे. दुसरा अहवाल ‘टिक टॉक’ या विशिष्ट समाजमाध्यमाच्या भारतातल्या वापराबद्दलचा होता.
अरोरा यांचा अहवाल जगभर गाजला. काही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली.

त्या अहवालानुसार, भारतातल्या ग्रामीण भागात व छोट्या शहरांत सोशल मीडियाचा व मोबाईलचा वापर वाढत्या प्रमाणावर आहे. या वापराला अधिक पसंती आहे. याची तीन कारणं आहेत. पहिलं कारण, परगावी असलेल्या नातेवाइकांशी संवाद साधणं. दुसरं कारण, करमणुकीच्या बाबी पाहत बसणं व तिसरं कारण, टाईमपास करणं; विशेषतः आपल्या भावना व्यक्त करणं, आपले राहणीविषयीचे, खाण्याविषयीचे आणि अन्य विचार लोकांसमोर मांडणं व लोकांना हे सगळं आवडण्याची (Like) वाट पाहत राहणं. हे सर्व करताना आपण सर्वज्ञानी असल्याचं सिद्ध करणं.
***

ऑगस्टच्या सुरवातीला दोन घटना घडल्या. पहिला घटना दुःखदायक होती. ‘कॅफे कॉफी डे’च्या संस्थापक-उद्योजकानं आत्महत्या केल्याची. तीवर दोन-तीन दिवस हजारो लोक फेसबुकद्वारा व ट्विटरद्वारा आपलं मत मांडत होते. ते सर्व जण कॉफीपासून ते भारतीय करपद्धतीपर्यंत अनेक विषयांत ‘पारंगत’ असल्याचं दिसून येत होतं!
दुसरी घटना : जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं राज्यघटनेचं ३७० वं कलम केंद्र सरकारनं रद्द केल्याविषयीची. या घटनेवरही समाजमाध्यमात हजारोंनी मत व्यक्त केली गेली. जे लोक तीन-चार दिवसांपूर्वी कॉफी व करपद्धती या विषयांतले तज्ज्ञ होते ते एका तासात काश्‍मीर या विषयातले तज्ज्ञ झाले. सरकारला राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्रधोरण, भारतीय राज्यघटना अशा विषयांवर सल्ला देऊ लागले.
मात्र, जे युवक आयआयटी प्रवेशपरीक्षेत उच्च गुण मिळवतात त्यांना जगातल्या व देशातल्या प्रत्येक घडामोडीवर मत व्यक्त करण्याची गरज वाटत नाही.
***

दुसऱ्या एका पाहणीनुसार, ज्या भारतीय युवकांना जगातल्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑक्‍सफर्ड व हार्वर्डसारख्या विद्यापीठांत प्रवेश मिळतो ते युवक सोशल मीडियाकडं फारसे फिरकत नाहीत; परंतु अरोरा यांच्या अहवालानुसार अनेक गृहिणी, रोजगार नसलेले युवक, राजकारणी, महत्त्वाकांक्षा असलेले लोक व त्यांच्याच शब्दात टाईमपास करू इच्छिणारे लोक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. अर्थात याला अपवादही आहेत. काही उच्चपदस्थ राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते हेही सोशल मीडियाचा वापर करतात; पण त्यामागं आपद्ग्रस्तांना मदत करण्याचा अथवा अन्य कुठला तरी चांगला उद्देश असतो. मात्र, अशी मंडळी केवळ काही हजारांतच भरतील. बाकी लाखो लोक सोशल मीडियावर रोज तासन्‌-तास घालवण्यासाठी वेळ कुठून आणि कसा मिळवतात याचं मला आश्‍चर्य वाटतं.
वर उल्लेख केलेल्यापैकी एक अहवाल टिक टॉकसंबंधीचा होता. या माध्यमात कुणीही व्यक्ती १५ सेकंदांत आपलं कौशल्य दाखवू शकते. अतिशय अल्प काळात भारतात टिक टॉकचे २० कोटी सभासद झाले आहेत. त्यातले बहुतेक लोक हे छोट्या शहरांतले, गावांतले आहेत. ग्रामीण आहेत. ‘टिक टॉक कलाकार’ म्हणून प्रसिद्ध होणं ही एक सध्या प्रतिष्ठेची बाब झाली आहे. यांपैकी काही मोजक्‍या व्यक्तींना कंपन्यांच्या मालाची जाहिरात करून उत्पन्न निर्माण करता येतं. बाकी हजारो युवक व युवती, आपणही महालोकप्रिय होऊन काही उद्योगसमूहांचं प्रायोजकत्व मिळवू, अशा आशेवर असतात. जे युवक असल्या फंदात पडत नाहीत ते आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवतात व स्वतःचं जीवन उज्ज्वल करतात.

समाजमाध्यमांविषयीची आंतरराष्ट्रीय आकडेवारी बरंच काही सांगून जाते. फेसबुकच्या व ट्विटरच्या वापरात मेक्‍सिको, ब्राझील, भारत, फिलिपाईन्स, तुर्कस्तान, इंडोनेशिया, दुबई हे देश अग्रगण्य आहेत, तर जपान, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोपातले देश हे या वापरात खूप मागं आहेत. ही आकडेवारी काय दर्शवते? जे देश एकदम दारिद्र्यात राहतात अशा देशांची नावं समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या देशांच्या यादीत नाहीत. कदाचित तिथं इंटरनेटचा वापर फारसा नाही. जे देश ‘उत्पादक’ म्हणून प्रसिद्ध आहेत तिथं सोशल मीडियाला फारसं स्थान नाही. ज्या देशात नवश्रीमंतांचा मोठा वर्ग आहे व नवश्रीमंत होण्याची मोठी अभिलाषा आहे अशा देशांत सोशल मीडिया खूप लोकप्रिय आहे!

संपूर्ण जगाकडं नजर टाकली तर दक्षिण अमेरिका व आशिया खंडात सोशल मीडियाचा प्रभाव दिसतो. जिथं फेसबुक, ट्विटर व इतर माध्यमांचा जन्म झाला त्या उत्तर अमेरिका खंडात, युरोपमध्ये व जपानमध्ये हा प्रभाव खूप कमी आहे. यांपैकी परदेशांतून सोशल मीडियाचा वापर करून काही देशांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला जातो असंही दिसतं. जिथं राजकारणात अतिशय रस, सतत करमणुकीचा शोध, नवश्रीमंतीची व महत्त्वाकांक्षी मानसिकता आहे अशा सामाजिक घटकांत कॉफीपासून ते काश्‍मीरपर्यंत सर्व विषयांत ‘पारंगत’ असलेल्या अथवा १५ सेकंदांत वाकुल्या दाखवून लोकप्रियता शोधणाऱ्या युवकांची संख्या कोटींनी वाढत आहे.
***

मी स्वतः सोशल मीडियापासून सावध राहतो. माझं ट्विटर, इन्स्टाग्राम, टीक टॉक यांवर खातं नाही. मी कोणत्याही व्हाट्सॲप ग्रुपमध्ये नाही. मला कुणी व्हॉट्सॲपवर विनोद, राजकीय संदेश अथवा इतर कोणताही सार्वजनिक संदेश पाठवला तर मी ताबडतोब तो संबंधित नंबर ब्लॉक करतो. फेसबुकवर माझं अकाउंट आहे; परंतु तिथं मी कोणतेही विचार मांडत नाही. मात्र, कोण काय चर्चा करत आहे हे सामाजिक अवलोकनाच्या दृष्टीनं दिवसभरातून एकदा सुमारे १५-२० मिनिटं पाहतो. मी माझ्या वेळेचा अपव्यय होऊ देत नसल्यानं मला कामासाठी, कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी व भरपूर वाचन करण्यासाठी खूप वेळ मिळतो. जर युवकांनी सोशल मीडियावर वेळेचा अपव्यय केला नाही तर जीवनातल्या अनेक रंग-तरंगांचा त्यांना आल्हाद मिळेल, आनंद मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com