माणुसकीच्या शत्रूसंगे... (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

धार्मिक व इतर भावनांचा वापर दहशतवादी गट करतात; पण त्यामागं त्यांचं मोठं जाळं असतं. हे गट एकमेकांशी स्पर्धा करतात व वेळ पडेल तेव्हा एकमेकांना मदतही करतात. त्यांच्याशी लढा हा माणुसकीच्या शत्रूशी लढा आहे.

‘दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी जगानं एकत्र यावं’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या, म्हणजेच युनोच्या, वार्षिक आमसभेत बोलताना नुकतंच केलं. ही आमसभा सप्टेंबरमध्ये झाली.
भारताला दहशतवादापासून खूप त्रास होतो. इतर अनेक देशांनाही होतो. अशा परिस्थितीत दहशतवाद ही केवळ भारताची डोकेदुखी आहे असं न मानता ते सगळ्या जगापुढचं आव्हान आहे अशी भूमिका घेणं ही मोठी मुत्सद्देगिरी होती.
यापूर्वी पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझर याचा युनोच्या काळ्या यादीत समावेश केला जावा यासाठी, तो केवळ भारतालाच नव्हे तर सगळ्या जगालाच कसा धोकादायक आहे हे स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळेच भारताला चीनसह जगाचा पूर्णपणे पाठिंबा मिळाला.
दहशतवादी निरपराध लोकांची हत्या करतात. समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. धर्म, तत्त्वं, राजकारण यांचा गैरवापर करून हिंसाचार करतात हे सगळ्यांना माहीत आहे.

मात्र, दहशतवाद हा एक मोठा धंदा आहे हे अनेक लोकांना माहीत नाही. पाकिस्तानातले मोठे दहशतवादी - लष्कर-ए-तैयबाचे व जैश-ए-मोहंमदचे दहशतवादी - यांच्या मालकीच्या शेकडो एकर जागा आहेत. लष्कर-ए-तैयबाचं पाकिस्तानातल्या पंजाबात मुदीरके या ठिकाणी काहीशे एकरांवर पसरलेलं मुख्यालय आहे. तिथं कातड्याच्या वस्तू बनवण्याचे त्यांच्या मालकीचे
कारखाने आहेत. प्रकाशनसंस्था आहेत. त्यातून त्यांना मोठा पैसा मिळत असतो. याशिवाय गावागावात लोक जेव्हा दूधखरेदी करतात तेव्हा त्या ठिकाणी लष्कर-ए-तैयबाचे डबे त्या ठिकाणी फिरवले जातात. त्या डब्यात नागरिक सुटे पैसे टाकतात. पैशाची मदत मिळवण्याचा त्यांचा हाही एक मार्ग आहे.
लष्कर-ए-तैयबाचा कारभार एखाद्या मोठ्या औद्योगिक समूहासारखा चालतो. जे वरिष्ठ पातळीवरचे म्होरके आहेत त्यांना घरं दिली जातात, तसंच त्यांना खर्चासाठीही अमर्याद रक्कम दिली जाते. जे मधल्या फळीतले दहशतवादी आहेत त्यांना घरभत्ता व ठराविक प्रमाणात खर्चाची रक्कम मिळते. याशिवाय निरागस मुलांना फसवून दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्यासाठी कमिशन एजंट असतात.

ज्या वेळी आपलं भारतीय सैन्य एखाद्या दहशतवाद्याला मारतं त्या वेळी पाकिस्तानी लष्कराच्या गुप्त संघटनांकडून त्या दहशतवाद्याच्या कुटुंबासाठी काही रक्कम पाठवली जाते. त्यापैकी दोनतृतीयांश रक्कम लष्कर-ए-तैयबासारखी संघटना स्वतःकडे ठेवते व एकतृतीयांश रक्कम मृत दहशतवादी मुलाच्या पालकांना देते.
सर्व दहशतवादी संघटनांची ‘धंद्यांची मॉडेल्स’ वेगवेगळी आहेत. श्रीलंकेत प्रभाकरन यानं ‘द लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ ही दहशतवादी संघटना अनेक वर्षं चालवली. या संघटनेच्या मालकीची अनेक जहाजं होती. ही जहाजं जगातल्या गुन्हेगारी संघटनांची व दहशतवादी संघटनांची शस्त्रास्त्रं आणि तस्करीचा माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचं काम करत असत. त्यातून त्यांना खूप मोठा नफा होत असे. तो नफा पश्‍चिमेकडच्या देशांतल्या काही शॉपिंग मॉल्ससारख्या दुकानांत कायदेशीररीत्या गुंतवला जात असे. हे सर्व करण्यासाठी अर्थात त्यांना तज्ज्ञ व्यावसायिकांची मदत मिळत असे.

इसिस या दहशतवादी संघटनेनं अल्पशा काळात खूप मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं, त्याचं एक कारण, त्यांचं काळ्या धंद्यातलं कौशल्य हे होतं. सीरिया व इराकमधून पुरातन संस्कृतीच्या अनेक वस्तू त्यांनी वस्तुसंग्रहालयांतून, प्रार्थनास्थळांतून व इतर ठिकाणांहून मिळवल्या व काळ्या बाजारात विकल्या. त्याशिवाय इसिसनं दडपशाहीचा वापर करून तेलाची केंद्रं व धरणे यांवर कब्जा केला व तेल विकून अमाप संपत्ती मिळवली. तसेच ज्या आसद सरकारविरुद्ध इसिस दहशतवादी कृत्ये करत असे, त्या असद सरकारलाच सीरियातल्या धरणांतून निर्माण होणारी वीज काळ्या बाजारात इसिस विकत असे.

इसिसचा उत्पन्न मिळवायचा दुसरा एक मार्ग म्हणजे, आखातातल्या श्रीमंत अरब कुटुंबातल्या मुलांचं अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून खंडणी मिळवणं हा होता. या मुलांना आकर्षित करण्यासाठी युक्त्या-प्रयुक्त्यांचा वापर केला जाई.
काही अहवालांनुसार, सन २०१५-२०१६ च्या दरम्यान इसिसचं उत्पन्न सुमारे पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं, त्यामुळे या पैशाच्या बळावर युवक-युवतींना विविध प्रकारे आकर्षित करून दहशतवादाच्या खाईत ओढणं शक्‍य होत असे.
इसिसच्या आर्थिक संरचनेत सीरियामधलं तबका हे धरण महत्त्वाचं होतं. एका अर्थानं तीच इसिसची राजधानी होती. सुमारे पाच किलोमीटरवर पसरलेल्या या धरणाच्या क्षेत्रावर इसिसनं सन २०१४ मध्ये ताबा मिळवला व तिथून निर्माण होणारी वीज काळ्या बाजारात विकण्याचा धंदा सुरू केला. तिथं ‘कर खातं’ स्थापन केलं. सीरियातल्या व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून तिथं नेऊन कर भरण्यास भाग पाडण्यात येत असे.

या प्रकाराची जगातल्या सर्व गुप्तहेर संघटनांना पूर्णतः माहिती होती. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडे तर सर्वच तपशील होता; पण इसिसचा खात्मा करण्यासाठी धरणावर बॉम्ब टाकले तर संपूर्ण दक्षिण सीरिया पुराखाली येईल व लाखो लोक मरतील अशी भीती होती. त्यामुळे कुणी धरणावर बॉम्बहल्ला करू शकत नव्हतं. शेवटी, काट्यानं काटा काढावा या धोरणानुसार दुसऱ्या एका दहशतवादी संघटनेची मदत घेऊन अमेरिकेनं धरणावर हल्ला न करता इसिसचा पराभव केला. धरणावरचं नियंत्रण सुटल्यानंतर केवळ तीन महिन्यांत इसिसचं सुमारे ९० टक्के साम्राज्य संपुष्टात आलं. (अमेरिकी सैन्यानं सीरियाच्या उत्तर भागात गेल्या आठवड्यात घातलेल्या छाप्यादरम्यान इसिसचा म्होरक्या अबू बगदादीही मारला गेला असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच, म्हणजे ता. २७ ऑक्टोबर रोजी, केली आहे).

दहशतवाद हा आपल्याला वाटतो तेवढा सोपा प्रकार नाही, हे या सगळ्या उदाहरणांवरून स्पष्ट होतं. दहशतवादी गट धार्मिक व इतर भावनांचा वापर करतात; पण त्यामागं त्यांचं मोठं जाळं असतं. हे गट एकमेकांशी स्पर्धा करतात व वेळ पडेल तेव्हा एकमेकांना मदतही करतात. त्यांच्याशी लढा हा माणुसकीच्या शत्रूशी लढा आहे.
भारत सरकार दहशतवादाविरुद्ध लढाई करण्यासाठी सक्षम आहे; पण समोरचा शत्रू हा काही एका देशाचं पारंपरिक सैन्य नव्हे, तर ते जगभर पसरलेलं गुन्हेगारी-औद्योगिक-लष्करी असं वेगवेगळे कंगोरे असलेलं जाळं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला ‘ताज’ किंवा ‘ओबेरॉय’वर हल्ला करणारे सहा-सात दहशतवादी समोर दिसतात; परंतु त्यांच्यामागं खूप मोठी यंत्रणा असते हे लक्षात येत नाही. सरकारपुढचं काम केवळ त्या सहा-सात दहशतवाद्यांना मारणं एवढंच नसतं तर त्यामागची यंत्रणा कमकुवत करणं हे असतं.

जेव्हा दहशतवादी हल्ले होतात तेव्हा सरकारला अनेक पातळ्यांवर काय करायचं ते माहीत असतं. काही उपाय सोपे असतात. काही उपाय कठीण असतात. भारताला याबाबतीत इतर देशांकडून सहकार्य मिळतं. अशा परिस्थितीत अभिनेते, क्रिकेटपटू, राजकारणातली नवखी मंडळी, साहित्यिक, अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले अधिकारी, सोशल मीडियातले वाचाळवीर यांनी, दहशतवादाचा प्रश्‍न कसा सोडवावा याविषयी ज्ञान देणं हे अनेकदा हास्यास्पद ठरतं.

दहशतवादाविरुद्धचा लढा हा काही खेळ नव्हे. ते माणुसकीच्या शत्रूसंगे सुरू असलेलं युद्ध आहे. या युद्धाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्याकडे पाहणं आवश्यक आहे व भारतानं अतिशय मुत्सद्दीपणे या प्रश्‍नावर जागतिक मतैक्‍य करण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com