हवा शांततेचा जागर (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे. दुसरं महायुद्ध संपल्यावर लगेच म्हणजे सन १९४९ मध्ये जगातला संरक्षणावरचा खर्च अडीचशे अब्ज डॉलर होता. सन २०१९ मध्ये तो सुमारे दोन हजार अब्ज डॉलर होईल, असा अंदाज होईल. विश्‍वशांती ही केवळ एक दिवस साजरा करण्याची गोष्ट नाही. जगात शांतता प्रस्थापित झाली नाही, तर मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. मानवी संस्कृती शाश्‍वत राहायची असेल, तर विश्‍वशांती ही निकडीची गरज आहे.

दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. हा निर्णय सन १९८१ मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोच्या आमसभेत ठराव मंजूर करून घेतला होता. हा ठराव आणण्यासाठी कोस्टा रिका या मध्य अमेरिका खंडातल्या देशानं पुढाकार घेतला होता.
कोस्टा रिका या देशात संरक्षण मंत्रालय नाही. कारण तिथं सैन्य नाही. सन १९८० च्या दशकात कोस्टा रिकाच्या भोवतालच्या देशात अनेक युद्धं चालू होती. अमेरिका व रशिया यांच्यातील वैमनस्याचा तो परिणाम होता, पण कोस्टा रीकाने सैन्य उभारले नाही. त्यांनी मध्य अमेरिकेत स्थायी शांती घडवू आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आलं आणि तत्कालीन अध्यक्ष ऑस्कर अरीयास यांना नोबेल सन्मान मिळाला.

कोस्टा रिकासहित जगात २२ देशांत सैन्य नाही. तिथं संरक्षण खातं नाही. कोस्टा रिकाच्या शेजारी असलेल्या पनामामध्येदेखील सैन्य नाही. तिथं जगप्रसिद्ध पनामा कालवा आहे. तिथून अमेरिका आणि आशिया खंडातला सुमारे पन्नास टक्के व्यापार होतो. तरीही त्यांना संरक्षणदलाची गरज वाटत नाही. हे २२ निःशस्त्र देश लहान आहेत; परंतु त्यांना आपल्याला कोणी मोठा देश गिळंकृत करेल आणि त्यासाठी स्वरक्षण करावं म्हणून सैन्य असण्याची गरज वाटत नाही. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या निःशस्त्र देशांवर कोणी कधी हल्ला करत नाही.
याशिवाय स्वित्झर्लंडमध्ये सैन्यदल आहे; परंतु ते सक्रिय नाही. सर्व स्विस तरुणांना सैन्यात सक्तीनं काम करावं लागतं आणि कधी गरज पडली तर सैन्यात जाणं आवश्यक असतं. परंतु कायमस्वरूपी सैन्यदल खूप लहान आहे. स्वित्झर्लंडवरही कोणी कधी हल्ला करत नाही.

विश्‍वशांती दिनाच्या सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे. दुसरे महायुद्ध संपल्यावर लगेच म्हणजे सन १९४९ मध्ये जगातला संरक्षणावरचा खर्च अडीचशे अब्ज डॉलर होता. तो शीतयुद्धात वाढून सन १९९९ मध्ये एक हजार अब्ज डॉलर झाला. शीतयुद्ध संपल्यावर तो कमी होणं आवश्यक होतं; परंतु गेल्या वीस वर्षांत तो दुप्पट होऊन सन २०१९ मध्ये सुमारे दोन हजार अब्ज डॉलर होईल, असा अंदाज होईल.

युद्धाच्या सामुग्रीसाठी जास्तीत जास्त खर्च अमेरिका आणि रशिया करतात. गेल्या तीस वर्षांत फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंडनं आपला संरक्षण खर्च खूप कमी केला आहे; पण चीन, भारत, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया या चार देशांत तो प्रचंड वेगानं वाढत आहे. येत्या काही वर्षांत तो ब्राझिल आणि जपान इथंही हळूहळू वाढेल. जगात दोन मतप्रवाह आहेत. काही देशांत सैन्यास महत्त्व देणं चुकीचं समजतात. कूटनीती, वाटाघाटी आणि शांतता प्रक्रिया या मार्गांनी आपले इतर देशांबरोबरचे मतभेद सोडवावेत असं तिथं वाटतं. काही देशांत सैन्यदल पवित्र समजलं जातं आणि सैन्याची स्तुती, सैन्यावरचा खर्च आणि शस्त्रास्त्रांची पूजा हे पवित्र कार्य समजलं जातं.
जगभर अनेक देशांमध्ये युद्धसामुग्री जमवण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यात जास्तीत जास्त विद्ध्वंसक शस्त्रं विकसित करण्यावर भर आहे. जगात सुमारे १९ हजार अण्वस्त्रं आहेत. त्यापैकी दोन हजार अण्वस्त्रं ‘हाय ॲलर्ट’ स्थितीत आहेत. म्हणजे निर्णय घेतल्यावर ती सुमारे पाच ते दहा मिनिटांत शत्रूच्या दिशेनं झेप घेण्यासाठी सज्ज आहेत. यातली बहुतांश अण्वस्त्रं अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये आहेत. वास्तविक या दोन देशांचं काही उद्या युद्ध सुरू होईल एवढे ताणलेले संबंध नाहीत. तरीही २००० अण्वस्त्रं ‘हाय ॲलर्ट’मध्ये का ठेवली आहेत हा मोठा प्रश्‍न आहे.

अण्वस्त्रं शत्रूवर टाकण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत. त्यांचा वेग तासाला वीस हजार किलोमीटर आहे. आता हेही पुरेसं नाही म्हणून ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रं तयार करण्यासाठी स्पर्धा चालू आहे. त्यांचा वेग तीस हजार किलोमीटर असेल. न्यूयॉर्कहून क्षेपणास्त्रं सोडलं, तर ते दक्षिण आशियात एक तासातून कमी वेगात ध्येय गाठेल आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सोडलं, तर अर्धा तासही लागणार नाही.

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र काही सात-आठ मिनिटांत पोचेल. निर्णय घेतल्यानंतर अक्षरशः काही क्षणांत शत्रूराष्ट्रावर अण्वस्त्र पडलेलं असेल आणि तीन-चार मिनिटांत लाखो लोक गतप्राण होतील. पाकिस्ताननं मुंबईवर अण्वस्त्र टाकलं, तर दहा-पंधरा मिनिटांत पुण्यापर्यंतचे सर्व लोक मृत्युमुखी पडतील. अमेरिकेनं सन १९४५ मध्ये हिरोशिमावर टाकलेला अणुबॉंब १५ किलोटनचा होता. सध्याचे अणुबॉंब त्याच्या दहा ते वीसपट क्षमता असलेले आहेत. म्हणून त्याचा परिणामही खूप मोठा आहे.
क्षेपणास्त्रांचा प्रचंड वेग असल्यानं एक समस्या होते. एकदा क्षेपणास्त्र सोडलं आणि ते चुकीनं अथवा अपघाताने गेलं, तर ते सावरायला वेळ नसतो. शत्रूनं प्रतिहल्ला केला, तर अर्ध्या तासात अणुयुद्ध सुरू होऊ शकतं. असं युद्ध एक-दोन तासच चालू शकेल. कदाचित केवळ पंधरा-वीस मिनिटं चालेल. तेवढ्या वेळात कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडतील. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि युनोच्या नियमांनुसार अणुयुद्धात भाग घेणाऱ्या देशांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व गमावलं जाण्याची वेळ येऊ शकेल.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत अनेक नागरिक ‘युद्ध करू या’ आणि ‘वेळ पडल्यास अण्वस्रांचा वापर करू या’ या मताचे आहेत. अशा लोकांना आधुनिक युद्ध काय करू शकतं आणि तीन-चार तासांत ते स्वतः, त्यांचा समाज आणि देश या सर्वांवर काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना नाही.

सध्या अण्वस्त्रांच्या पलीकडली शस्त्रास्त्रं निर्माण करण्यावर भर आहे. इस्राईलच्या पुढाकारानं आणि इतर अनेक देशांच्या सहभागानं ‘खुनी यंत्रमानव’ अथवा ‘किलर रोबो’ बनवले जात आहेत. हे किलर रोबो देशाच्या सैन्यदलाकडून सूचना घेत नाहीत, तर स्वतःहून स्वतःच विचार करून योग्य वाटेल तिथं हल्ला करतात. दुसऱ्या प्रकारची अस्त्रं जैविक क्रांतीतून निर्माण करण्यावर भर आहे. त्यात दोन जीवांत संकर करून नवीन श्‍वापदं अथवा प्रयोगशाळेत नवीन जंतू करण्यावर भर आहे. येत्या काही वर्षांत किलर रोबो आणि जैविक अस्त्रांचा वापर सुरू झाला, तर मानवी आयुष्यातले शेवटचे ठोसे मोजण्यास सुरवात झाली असं मानायला हरकत नाही. त्यानंतर संपूर्ण पृथ्वीतलावरच्या मानवी संस्कृतीचा संपूर्ण विनाश कधीही होऊ शकतो.
विश्‍वशांती ही केवळ एक दिवस साजरा करण्याची गोष्ट नाही. जगात शांतता प्रस्थापित झाली नाही, तर मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. मानवी संस्कृती शाश्‍वत राहायची असेल, तर विश्‍वशांती ही निकडीची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com